Thursday, June 30, 2016

ससून रुग्णालयात आज जीवनदायी उपकरणांचे लोकार्पण


पुणे, दि. ३० (विमाका): येथील बै. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालयातील बालरुग्ण विभागातील अतिदक्षता कक्षात आज, दि. १ जुलै २०१६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता जीवनदायी उपक्रमांचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मुकुल माधव फाउंडेशन व फिनोलेक्स कंपनीतर्फे ५७ लाख रुपये किमतीची उपकरणे या विभागासाठी देण्यात आली आहेत.
या उपकरणाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी प्रकाश छाबरिया, एक्झिक्युटिव्ह चेअरमन ऑफ फिनोलेक्स इंडस्ट्रीज लि. सौरभ धानोरकर, मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ फिनोलेक्स इंडस्ट्रीज, सौ. रितू छाबरिया, मॅनेजिंग ट्रस्टी ऑफ ऑफ मुकुल माधव फाउंडेशन व मुकुल माधव फाउंडेशनचे अधिकारी, अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले, डॉ. संध्या खडसे, डॉ. हरीश टाटीया व बालरोगचिकित्साशास्त्र विभागातील डॉक्टर उपस्थित राहणार आहेत.
ससून रुग्नालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभाग हे पूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील एक अतिशय महत्वपूर्ण अतिदक्षता विभाग असून दरवर्षी येथे पाच हजाराहून अधिक नवजात बालकांवर उपचार केले जातात. उपचार घेण्यासाठी येणारे रुग्ण हे गरीब व मध्यम कुटुंबातील असतात. कारण बऱ्याच खाजगी अतिदक्षता नवजात विभागात बालकांचे उपचार हे अतिशय खर्चिक असतात.
नवजात शिशूला जर चांगल्या प्रकारे अतिदक्षता विभागात उपचार मिळाल्यास नवजात शिशुमुळे बालक मृत्यू दरही बऱ्याच प्रमाणात कमी होण्यास मदत होते. महाराष्ट्र सरकारच्या १०८ अतिदक्षता रुग्णवाहिका सेवेमुळे अतिगंभीर असलेल्या गरोदर माता व सारेच नवजात अर्भक व तसेच नवजात अर्भक सतत उपचारासाठी सर्व जिल्ह्यांतून ससून रुग्णालयात दाखल होतात. या नवजातबालकांसाठी सद्य:परिस्थितीत ‘नवजात अतिदक्षता विभागाचे’ नुतनीकरण व त्याच्यावरील उपलब्ध सोयींचे अद्ययावत करण्यामागे ससून प्रशासन सतत कार्यरत आहे. जेणेकरून गंभीर नवजात बालकांना अतिशय अद्यावत उपचार मिळावा.
मुकुल फाउंडेशनचे अतिशय महत्वपूर्ण व्हेंटिलेटर (२), वॉर्मर (५), सिरींज पंप (२०), फोटो थेरपी युनिट (५) आदी ५७ लाख रुपये किमतीचे महत्वपूर्ण उपकरणे ससून रुग्नालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागाला देणगी स्वरूपात उपलब्ध केल्या आहेत. या महत्वपूर्ण देणगीमुळे अतिशय कमी वजनांच्या व प्रिमॅच्युअर बालकांच्या उपचाराला खूप मदत होणार आहे. सद्य:स्थितीत ‘सरफॅक्टंट’ नावाचे अतिशय महागडे औषध गरीब रुग्णांसाठी मोफत मिळणार असून, त्यासाठी ज्या उपकरणांची आवश्यकता असते. ही कमी या वरील उपकरणांमुळे मोठ्या प्रमाणात कमी होणार असून गंभीर स्वरूपातील नवजात बालकांच्या उपचारासाठी ही उपकरणे महत्वपूर्ण योगदान ठरणार आहेत.
*****