Friday, September 30, 2016

स्टॅंडअप इंडिया योजनेचा लाभ घ्या : प्रदीप झिले


 सोलापूर दि. 30 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवा निमित्त केंद्र सरकारने स्टॅंड अप इंडिया योजना सुरूवात केली आहे. या योजनेचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घेऊन उद्योग व्यवसाय विकसित करावेत , असे आवाहन नाबार्डचे जिल्ह्याचे व्यवस्थापक प्रदिप झिले यांनी केले.
श्री. झिले यांनी दिलेल्या माहितीनुसार या योजनेचा लाभ एस.सी , एस.टी प्रवर्गातील महिला असावी किंवा मागासवर्गिय सभासदांचे भांडवल 50 टक्के पेक्षा जास्त असणारी संस्था पात्र ठरू शकते. अर्जदारने प्रथम www.standupmitra.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. नोंदणी करतानाच व्यवसाय , बँकेचे नांव आणि शाखेची निवड करणे अपेक्षित आहे.नोंदणी केल्यानंतर अर्जदाराने संबंधित शाखेच्या अधिका-यांची भेट घेऊन योजना समजून घ्यावी तसेच कागदपत्रांची पुर्तता करावी .
बँकेकडून प्रकल्प खर्चाच्या 75 टक्के रक्कम मिळणार आहे. उर्वरित 25 टक्के रक्कम कर्जदाराने उभे करणे अपेक्षित आहे. कर्जासाठीचा व्याजदर कमीत कमी राहील कर्जाची परतफेड सात वर्षात करणे अपेक्षित असून कर्जाचे हप्ते  प्रकल्प सुरू झाल्यानंतर किंवा 18 महिन्यानंतर करणे अपेक्षित आहे, अशी माहितीही श्री. झिले यांनी दिली. कर्जदारांनी निवडलेल्या व्यवसायाकरिता प्रशिक्षण आणि इतर माहिती करिता सोलापूर जिल्ह्यातील अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्रीनिवास पत्की अथवा नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक  प्रदीप झिले ( मोबाईल 9423119448) यांच्याशी संपर्क साधावा.

0000000

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा सोलापूर दौरा



              सोलापूर दि. 30 : उद्योग , खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांचे सोमवार दि. 03 ऑक्टोबर रोजी
सकाळी 6.50 वाजता मुंबई येथून सिध्देश्वर एक्सप्रेसने सोलापूर रेल्वेस्थानक येथे आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण करतील. सकाळी 10.00 वाजता सोलापूर इंडस्ट्रिज असोसिएशन आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून दुपारी 12.30 वा. सोलापूर येथून शासकीय वाहनाने पुण्याकडे  प्रयाण करतील. सायंकाळी 5.45 वा. पुणे येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील .          

पालकमंत्री विजय शिवतारे यांचा सातारा जिल्हा सुधारीत दौरा


सातारा, दि.30 (जिमाका) : राज्याचे जलसंपदा, जलसंधारण व संसदीय कार्य राज्यमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे.
शुक्रवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी सोईनुसार मुंबई येथून मोटारीने सातारा येथे आगमन व मुक्काम. स्थळ- शासकीय विश्रामगृह सातारा.
शनिवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 वा. विक्रीकर दिनानिमित्त जास्त कराचा भरणा करणाऱ्या तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार. स्थळ विक्रीकर भवन, दूध संघाशेजारी, पोवई नाका सातारा.  सोयीनुसार कार्यक्रमानंतर तोंडल, ता.पुरंदर, जि.पुणेकडक मोटारीने प्रयाण.
00000


समभाग निधी, पतहमी योजनांची कार्यशाळा संपन्न


                सातारा, दि.30 (जिमाका) : जागतिक बँक अर्थसहाय्यीत, महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प (MACP), कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (ATMA) व ए.पी.सी. इंडीया लि., न्यु दिल्ली यांच्या वतीने शेतकरी उत्पादक कंपनीच्या विकासासाठी समभाग निधी व पतहमी योजनांची माहिती देण्यासाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा तालुका कृषी अधिकारी, सातारा कार्यालयातील कृषी भवन सभागृहात मंगळवार दिनांक 20 सप्टेंबर 2016 रोजी संपन्न झाली.
                या कार्यशाळेस ए.पी.सी. इंडीया लि., न्यु दिल्लीचे मॅनेजर श्री.कटीयार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे, आत्माचे प्रकल्प उपसंचालक (1) विकास बंडगर, आत्माचे प्रकल्प उपसंचालक (2) प्रकाश सुर्यवंशी, एम.ए.सी.पी. च्या कृषी पणन तज्ञ, कु.सायली महाडीक,बँक ऑफ महाराष्ट्र सातारचे झोनल मॅनेजर ए.बी.थोरात, कृषक व्यापार संघ नवी दिल्लीचे अधिकृत सल्लागार , पुणे येथील विजय आठवले, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाच्या प्रभारी सहाय्यक आयुक्त डॉ.अर्चना नेवसे, बँक ऑफ महाराष्ट्रचे जिल्हा अग्रणी व्यवस्थापक एम.वाय.शिरोळकर,नाबार्डचे सहायक महाप्रबंधक सुबोध अभ्यंकर आदि उपस्थित होते. तसेच जिल्हयातून स्थापित 14 शेतकरी उत्पादक कंपनीमधील अध्यक्ष,उपाध्यक्ष,सचिव-37 शेतकरी , कृषी व सलंग्न विभागाचे अधिकारी, कर्मचारी 35 असे एकुण 72 प्रशिक्षणार्थी सहभागी या कार्यशाळेस उपस्थित होते.
                या कार्यशाळेत सादरीकरण करताना, श्री.कटीयार यांनी प्रामुख्याने महाराष्ट्र राज्य छोटया शेतकऱ्यांच्या कृषी व्यापार संघ, नवी दिल्ली (SFAC) अंतर्गत, समभाग निधी व पतहमी  योजनांची माहिती देवून कार्यशाळा आयोजनाबाबतचे महत्व विषद केले.  या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेल्या नियम व अटी बाबत माहिती दिली. जिल्हा अग्रणी व्यवस्थापक एम.वाय.शिरोळकर यांनी योजनेस लागणारे कर्ज त्वरील उपलब्ध करुन देऊ असे सांगितले.
                उपसंचालक अरुण कांबळे (SFAC)  यांनी उपस्थित सर्व शेतकऱ्यांचे महाराष्ट्र राज्य छोटया शेतकऱ्यांच्या कृषी व्यापार संघ, नवी दिल्ली (SFAC) अंतर्गत, समभाग निधी व पतहमी योजनांचा पुनश्च आढावा घेतला.

0000

कास पठारावर प्रतिदिन 3 हजार पर्यटकांना प्रवेश


                सातारा, दि.30 (जिमाका) : कास पुष्प पठारावरील पर्यटकांच्या गर्दीचे नियंत्रण ठेवण्यासाठी व नैसर्गिक जागतिक वारसा स्थळाचे कास पुष्प पठाराचे संरक्षणासाठी सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत प्रत्येकी तीन तासाला 750 या प्रमाणे प्रतिदिन 3 हजार पर्यटकांना कास पठारावरील दृष्यके पाहण्यासाठी प्रवेश मर्यादा घालण्यात आलेली आहे, अशी माहिती उपवनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी दिली आहे.
                26 ऑगस्ट पासून कास पुष्प पठार पर्यटन हंगाम सुरु करण्यात आलेला आहे. पर्यटकांसाठी www.kas.ind.in या संकेतस्थळावर वन विभागामार्फत बुकींगची सुविधा करण्यात आलेली आहे. कास पठारावर सर्व पुष्पप्रजातींना फुले आली असून ती पाहण्यासाठी बहुतांश पर्यटक हे साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी येतात. त्यामुळे कास पठरावर मोठ्या प्रमाणात गर्दी होते. कास पुष्प पठार येथे सध्या पाऊस पडत असल्याने पर्यटकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.
                येत्या दिनांक 1 व 2 ऑक्टोबर,2016 रोजीच्या साप्ताहीक सुट्टीरोजी कास पुष्प पठाराचे ऑनलाईन बुकींग फुल झाले असल्याने पर्यटकांना विनंती आहे की,  या दिवशी कास पुष्प पठारास भेट देण्याचे टाळावे. जेणे करुन पर्यटकांचा वेळ वाया जाणार नाही व पर्यटकांची गैरसोय होणार नाही. कास पठारावर होणारी गर्दी व वाहतूक कोंडी व वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी मुंबई, पुणे व स्थानिक पर्यटकांनी सोमवार ते शुक्रवार या कालावधीत कास पुष्प पठाराला भेट द्यावी, असे आवाहनही श्री. अंजनकर यांनी केले आहे.

0000

2 ते 8 ऑक्टोबर कालावधीत व्यसनमुक्ती सप्ताह


सातारा, दि. 30 (जिमाका) : व्यसनमुक्ती कार्यासाठी दरवर्षी समयबध्द कार्यक्रम समाज कल्याण विभाग, सातारा, सातारा जिल्हा परिषद व परिवर्तन व्यसनमुक्ती संस्था, सातारा यांच्यामार्फत राबविण्यात येतात. सन 2016-17 साठीचा व्यसनमुक्ती कार्यासाठी वार्षिक समयबध्द कार्यक्रम दिनांक 2 ते 8 ऑक्टोबर,2016 या कालावधीत व्यसनमुक्ती सप्ताह संपन्न होणार आहे, अशी माहिती  जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी दिली आहे.
व्यसनमुक्ती सप्ताहाचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-  रविवार दि.2 ऑक्टोबर 2016 रोजी सकाळी 11 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, सातारा., सोमवार दि.3 ऑक्टोबर, 2016 रोजी सकाळी 11 वाजता परिवर्तन व्यसनमुक्ती संस्था, सातारा, मंगळवार दि.4 ऑक्टोबर 2016 रोजी सकाळी 11 वाजता सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, सातारा, बुधवार दि.5 ऑक्टोबर, 2016 रोजी  दुपारी 3.30 वाजता समता कनिष्ठ महाविद्यालय, पाडेगाव, ता.खंडाळा, गुरुवार दि. 6 ऑक्टोबर, 2016 रोजी सकाळी 11 वाजता श्री.समर्थ विद्यामंदीर व ज्यु.कॉलेज, चाफळ, ता.पाटण, शुक्रवार दि.7 ऑक्टोबर, 2016 रोजी सकाळी 11 वाजता दहीवडी कॉलेज, दहीवडी, ता.माण, शनिवार दि.8 ऑक्टोबर,2016 रोजी सकाळी 10 वाजता आर्टस ॲन्ड कॉमर्स कॉलेज, नागठाणे, ता.सातारा. या सर्व कार्यक्रमांचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असेही आवाहन सातारा जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे.


00000

रयत शिक्षण संस्थेचा मंगळवारी वर्धापन दिन


                सातारा, दि.30 (जिमाका) : रयत शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन समारंभ मंगळवार दि.4 ऑक्टोबर, 2016 रोजी कर्मवीर समाधी परिसर, सातारा येथे सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती रयत शिक्षण संस्थेचे  सचिव  डॉ.गणेश ठाकूर यांनी दिली आहे.

                या वर्धापन दिन समारंभास मॅनेजिंग कॉन्सिलचे, सदस्य आमदार दिलीप वळसे पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा समारंभ मॅनेजिंग कौन्सिलचे, सदस्य प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि मॅनेंजिग कौन्सिलचे, सदस्य आमदार डॉ.पतंगराव कदम, रयत शिक्षण संस्थेचे, चेअरमन डॉ.अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

बेरोजगारांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन


      पुणे,दि.30 :- विद्यापीठाचा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नूतन महाराष्ट्र विद्या तंत्र निकेतन अभियांत्रिकी महाविद्यालय इंद्रायणी महाविद्यालय, तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने 1 आक्टोबर, 2016 रोजी सकाळी 10 ते या वेळेत नूतन महाराष्ट्र विद्या तंत्र निकेतन अभियांत्रिकी महाविद्यालय, समर्थ संकुल, तळेगाव रेल्वे स्टेशनजवळ, तळेगाव येथे बेरोजगार युवक-युवतींसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचा पुणे जिल्ह्यातील नामवंत कंपन्या सहभागी होणार आहेत. .12 वी, कोणत्याही शाखेचा पदवीधर, आय.टी.आय., इंजिनिअरींग पदवीधर पदवीकाधारकांनी लाभ घ्यावा. मेळाव्यास उपस्थित राहाताना उमेदवारांनी आपले सी.व्ही, फोटो, इतर  शैक्षणिक कागदपत्रे सोबत आणावीत. एम्प्लॉयमेंट कार्यालयाकडे नाव नोंदणी नसलेले उमेदवार देखील या संधीचा लाभ घेवू शकतात, असे आवाहन सहायक संचालक विद्यापीठ कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता इंद्रायणी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

0000

Thursday, September 29, 2016

अनपटवाडीतील जलक्रांती


कोरेगाव तालुक्यातील अवघ्या 1 हजार 785 लोकसंख्येचं गाव अनपटवाडी ! गाव एकत्र आल्यानंतर कशाप्रकारे जलक्रांती साकारली जाते याचे उत्तम उदाहरण अनपटवाडीकरांनी दाखवून दिले आहे. सत्यमेव जयेते वॉटरकप स्पर्धेत या गावाने 10 लाख रुपयांचे बक्षिस मिळवून अन्य गावांसाठी प्रेरणा दिली आहे.
गेल्या दहा-बारा वर्षांपासून जानेवारी ते जुलै अखेरपर्यंत गावासाठी टँकर लागायचे. परंतु जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून गाव एकत्र झाला आणि माथा ते पायथा जलसंधारणाची कामे करुन भूईवर पडणारा प्रत्येक थेंब या माध्यमातून अडविला. सध्या झालेल्या पावसामुळे गावात जलक्रांती झालेली दिसून येत आहे. तलाव ओसंडून वाहू लागला आहे.

  गावात झालेली कामे :

1
सिमेंट साखळी बंधारा
5
2
सिमेंट बंधारा दुरुस्ती
2
3
नाला खोलीकरण
6
4
माती नालाबांध दुरुस्ती
1
5
गॅबियन स्ट्रक्चर
3
6
ठिबक/तुषार सिंचन
25 हे.
7
सिमेंट साखळी बंधारा
2
8
पाझर तलाव गाळ काढणे
1

नाविन्यर्ण कामे
1)       लोकसहभागातून सिमेंट/माती नालाबांधातून काढलेल्या गाळातून 5 शेतक-यांनी आले पिकाची लागवड करण्यात आली असुन .त्यातुन शेतक-यांना चांगल्या प्रकारे आर्थिक उत्पन्न मिळणार आहे.
2)       चालु वर्षी गावामध्ये 20.00 एकर क्षेञावर कांदा बियाणे उत्पादनाचा कार्यक्रम कृषी विभागाच्या सहकार्याने घेण्यात आला होता. कांदा बियाणे विक्रीतुन अंदाजे शेतक-यांना 15 ते 16 लाख चे एकुण उत्पन्न झाले आहे.
कामाचे दृष्य अदृष्य परिणाम
1)       पाण्याचे दरडोई उपलब्धता - झालेल्या कामातुन 263.71 टीसीएम पाण्याची उपलब्धता झालेली आहे.त्यामुळे सध्या 91573 लिटर प्रति वर्षी दरडोई पाण्याची उपलब्धता झाली आहे.
मागील दोन वर्षापर्यंत गावामध्ये नोंव्हेबर महिन्यात टँकरची गरज भासत असे परंतु मागिल वर्षी 120.00 मिमी इतका कमी पाऊस पडुन सुध्दा 15 एप्रिल 2016 पर्यंत टँकरची गरज भासली नाही. तसेच मे 2016 महिन्यात गावामधील 2 कुपनलिका घेतले असता 2.00 इंची पाणी भरपुर प्रमाणात लागले.
वैरण विकास कार्यक्रमांतर्गत 40 एकरावर मका हिरवा चारा उत्पादन केलेमुळे चारा टंचाई जाणवली नाही.
2)    विहीर पाण्याची पातळी
सरासरी पुर्वीची पाण्याची पातळी 15.00 मीटर होती.
सध्याची सरासरी प्रकल्पानंतर पाण्याची पातळी 9.00 मीटर आहे.

1.             पीक उत्पादकता मध्ये झालेली वाढ.
               प्रकल्प पूर्व                  - ज्वारी – 950 कि/हे, घेवडा – 920 कि/हे  
         प्रकल्प नंतर(अपेक्षित)                  - ज्वारी – 1350 कि/हे , घेवडा – 1130 कि/हे  
2.             वर्षाच्या एकूण कालावधीत पाण्याच्या उपलब्धतेतून/ पातळीत झालेली वाढ -                       
                                                 प्रकल्प पूर्वी सहा महिने उपलब्धता
                                                                                प्रकल्पानंतर (अपेक्षीत) - 12 महिने उपलब्धता
3. पाणलोट विकासाच्या कामामुळे शेती विकासाच्या शेती उत्पादकतेत व शेती पुरक व्यवसायात   
        झालेली वाढ                                      – 5 टक्के
4.   रोजगारासाठी स्थलांतराचे कमी झालेले प्रमाणदहा टक्के
5.    सरंक्षित सिंचन क्षेञातील वाढ                                     – 90.00 हेक्टर
6.   वहितीखाली वाढलेले क्षेञ                          – 20.00 हेक्टर क्षेञ
7. ठिबक व तुषार सिंचन क्षेत्रात झालेली वाढ(अपेक्षित)वीस टक्के
मनोज अनपट (सरपंच)- गावाला एकसारखा टँकर असायचा 30 ते 40 कोटी लिटर वाहून जाणारे पाणी गावामध्ये अडविले आहे. शेतकरी वर्षातून दोन पिके घ्यायचा आता तीन पिके घेऊ शकतो. यापुढे 100 टक्के ठिबकवर शेती करायचा निर्णय झाला आहे.  जलसंधारणाची कामे करण्यासाठी शेतकऱ्यानी स्वत:हून 60 एकर जमीन गावाला दिली. चारकोपचे आमदार योगेश सागर आणि निलकमल कंपनी शरद पारिख यांनी मोठी मदत केली. त्याशिवाय जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी चांगले सहकार्य केल्यामुळेच गावाने 10 लाखाचे बक्षिस मिळविले, अशी भावना सरपंच मनोज अनपट यांनी बोलून दाखवली. 
नंदकुमार कदम (ग्रामस्थ)- ग्रामस्थांच्या श्रमशक्तीपुढे जलसंधारणाची कामे झाली. त्यामुळे गावात चार पटीने पाणीसाठा वाढला आहे.
ज्ञानोबा अनपट (शेतकरी)- गावात झालेल्या जलसंधारणाच्या कामामुळे, नालाबंडींगमुळे विहिरीला भरपूर पाणी वाढले आहे.
भरत मुळीक (ग्रामस्थ)- दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गावात सीसीटी, डीप सीसीटी, तलाव रुंदीकरण, खोलीकरण आदी कामे झाल्याने गावामध्ये मोठया प्रमाणात पाणीसाठा दिसतोय. गावाची पाणी समस्या मिटली आहे.
सुलोचना अनपट (शेतकरी)- गावात जलसंधारणाची कामे झाली. त्यामुळे विहिरीच्या पाणीपातळीत वाढ झाली. आता वर्षातून तीन पिके घेता येतील.
ग्रामस्थांची श्रमशक्ती एकत्रीत आल्यानंतर गावात जलक्रांती होऊ शकते याचे उत्तम उदाहरण अनपटवाडीकरांनी  या निमित्ताने दाखवून दिले आहे. त्याचे फळही त्यांना सत्यमेव जयते वॉटरकपच्या माध्यमातून 10 लाखाचे बक्षीसाने मिळाले आहे.


                                             -   प्रशांत सातपुते
                                                                                                                          जिल्हा माहिती अधिकारी, सातारा
00000





पत्रकारांच्या अडचणी सोडविण्यासाठी मदत केली जाईल : महसुलमंत्री चंद्रकांत पाटील


       पुणे, दि. 29 : पत्रकार म्हणून काम करताना येणा-या अडचणी सोडविण्यासाठी शासन म्हणून काही करणे आवश्यक आहेतेथे आवश्यक मदत केली जाईल अशी ग्वाही राज्याचे महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
            महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या कर्वे रोड येथील सभागृहात नूतन अध्यक्ष राजा माने यांचा सत्कार जेष्ठ पत्रकार अनंत दिक्षित यांना स्व. जवाहरलाल दर्डा जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी लोकमत समुहाचे संपादक दिनकर रायकर, संघटनेचे संघटक संजय भोकरेदै. लोकमतचे संपादक विजय बावीस्कर, मावळते अध्यक्ष गोविंदराव घोळवे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
            यावेळी महसुल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की पत्रकार समाजात धाडसाने काम करीत असताना पत्रकारांनी समाजाचे  विविध विषय चळवळ म्हणून चालविले आहेत. यामुळे अनेक विषयांना बळ मिळते. अशा पत्रकारांचे जीवन सुरक्षित होण्यासाठी पत्रकारांचे वाढते वय, जबाबदा-या पार पाडणे, मुलांना चांगले शिक्षण देणे, कुटूंबाला चांगल्या आरोग्य सेवा मिळाली पाहिजे. पत्रकारांनी अटल पेन्शन योजना, अपघात बिमा सुरक्षा योजनेचाही लाभ घेण्याबाबत सूचित केले.
            याप्रसंगी जेष्ठ पत्रकार अनंत  दिक्षित पत्रकारांनी अभ्यासाने ताकत वाढविली पाहिजे. कायद्याचे पालन केले पाहिजे. त्याचबरोबर समाजातल्या दुबळया माणसापर्यंत आपली लेखणी पोहोचली पाहिजे याकडे लक्ष देण्याचे आवाहन केले तर अध्यक्षीय भाषणात दिनकर रायकर यांनी पत्रकारांनी समाजाला योग्य दिशा दिली पाहिजे. नि:पक्षपातीपणे काम करुन राज्याला, देशाला पुढे नेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे प्रतिपादन केले.
            यावेळी नूतन अध्यक्ष राजा माने यांनी पत्रकारांच्या विविध अडचणी समस्या सोडविण्यासाठी नियोजन करुन प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.

                                                                        0000