Monday, January 30, 2017

जिल्हा प्रशासनाच्यावतीने हुतात्म्यांना आदरांजली


पुणेदि30 स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना आज आदरांजली वाहण्यात आलीजिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात झलेल्या या कार्यक्रमात आज सकाळी 11 वाजता पाच मिनिटे स्तब्धता राखून  हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली.
 यावेळी विभागीय आयुक्त एस.चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी सौरभ रावअपर जिल्हाधिकारी रमेश काळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठेसामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त कविता द्विवेदी, महसुल विभागाचे उपायुक्त एस.पी.तेलंग, पुरवठा विभागाच्या उपायुक्त निलीमा धायगुडे, पुर्नवसन विभागाचे उपायुक्त दिपक नलावडे, रो.ह.यो चे उपायुक्त अजित पवार,  तसेच जिल्हाधिकारी आणि जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते
*****

Friday, January 27, 2017

कृषी विषयक योजनांना पतपुरवठा करा - जिल्हाधिकारी



सोलापूर दि. 27 – राज्य शासन शेतक-यांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध कृषी विषयक योजना राबविते. या योजनेंतर्गत संबंधित बँकांनी शेतक-यांना वेळेवर व पूरक आर्थिक मदत करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी दिले.
खरीप – रब्बी हंगामातर्गंत पीक विमा योजनेच्या संदर्भात समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सभागृहात आयोजित करण्यात आली होती याप्रसंगी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी रणजीतकुमार म्हणाले , ‘ सध्या बँकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे मात्र याही परिस्थितीत बँकांनी शेतक-यांच्या आर्थिक प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या उद्देशाने कार्यप्रणाली राबवावी .’
सन 2016 -17 या वर्षाकरिता संबंधित बँक अधिका-यांनी पीक विमा योजनेअंतर्गत सहभाग नोंदविलेल्या शेतक-यांची संपूर्ण यादी त्याचबरोबर पीक निहाय यादी agri_insurance वेबपोर्टलवर सादर करावी असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार यांनी सन 2015 – 16 या वर्षामध्ये जिल्ह्यातील 1 लाख 64 हजार शेतक-यांना इन्शुरन्स कंपन्याकडून सुमारे 67 कोटी 72 लाख रूपये रब्बी हंगाम पीक विमा पोटी मंजूर झाल्याची माहिती दिली.
तर पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत जिल्हा उद्योग केंद्राकडे सादर झालेले 134 प्रस्ताव, खादी बोर्डाचे 77 तर खादी कमिशनचे 242 प्रस्ताव संबंधित बँकांनी मंजूर केले नसल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक बाळासाहेब यशवंते यांनी दिली.या बैठकीसाठी अग्रणी बँकेचे व्यवस्थापक सुरेश श्रीराम यांच्यासह इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
***********

परिक्षा केंद्राच्या परिसरात कलम 144 लागू


            पुणेदि. 27:- लोकसेवा अयोगाच्यावतीने  विक्रीकर निरीक्षक परीक्षा 29 जानेवारी,2017 रोजी सकाळी 10-00 ते दुपारी 1-00 या वेळेत आयोजित केली आहे. पुणे शहरात 97 केंद्रावर विक्रीकर निरीक्षक  परिक्षा घेण्यात येणार आहे.  परिक्षा केंद्र परिसरात पोलीस सह आयुक्त सुनिल रामानंद  यांनी त्यांना फौजदारी दंड प्रक्रीया संहीता 1973 चे कलम 144 अन्वये प्राप्त अधिकारानुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याचे आदेश दिले आहे.
 या आदेशानुसार संबधीत परीक्षा केंद्राच्या इमारतीचे 100 मीटर परिसरात सार्वजनिक टेलिफोन/एस.टी.डी. आय.एस.डी/फॅक्स केंद्र,सुविधा याचा वापर करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. संबधीत परीक्षा केंद्राच्या इमारतीचे 100 मीटर परिसरात ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यास मनाई करण्यातस येत आहे. वरील सर्व परीक्षा केंद्राचे इमारतीचे परिसरात परीक्षेस बसणारे उमेदवारा खेरीज अनधिकृत व्यक्तीस/वाहनास प्रवेश मनाई करण्यात येत आहे. वरील सर्व परीक्षा केंद्राचे इमारतीचे परिसरात परीक्षेस बसणारे उमेदवार मोबाईल फोन आणणार नाहीत.  सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती शिक्षेस पात्र राहीलअसे पत्रकात नमुद करण्यात आले आहे.
                                                0000000

सक्षम करुया युवा व भावी मतदार

( राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त (25 जानेवारी,2017 अंक) विशेष लेख )


  
            संविधानाने आपल्याला मतदानाचा अमूल्य अधिकार दिला आहे. आपल्या देशात प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार घटनेने दिला असला तरी अधिकारासाठी भांडणारे आपण सर्व या नाण्याची दुसरी बाजू असलेल्या मतदान करण्याच्या कर्तव्याचे पालन किती करतो हा मोठा प्रश्न आहे.  मतदानाची आकडेवारी बघताना हेच जाणवते. याच पार्श्वभूमीवर तरुण वर्गाचा मतदान प्रक्रियेमध्ये मोठया प्रमाणावर समावेश व्हावा यासाठी जनजागृती व्हावी म्हणून दरवर्षी भारत निवडणूक आयोगातर्फे 25 जानेवारी 2017 रोजी राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
            या वर्षीच्या राष्ट्रीय मतदार दिवसासाठी सक्षम करुया युवा भावी मतदार हे घोषवाक्य निश्चित करण्यात आले आहेवेगवेगळया पातळीवर यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.  महाविद्यालयीन स्तरावर युवक महोत्सव, मतदार दिनाची शपथ घेणे व नविन मतदारांना ओळखपत्राचे वाटप करणे, 15 ते 17 वयोगटातील विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीनची (EVM) ची माहिती करुन देणे,  Every vote count या संकल्पनेचा वापर करुन विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. भारतीय राज्यघटनेने दिलेला मतदानाचा अधिकार, मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे, नागरिक म्हणून निर्भय व निस्पृहपणे मतदान करण्याचे महत्व याविषयावर व्याख्यान आयोजित करण्यात येत आहे. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त 209-शिवाजीनगर विधानसभा मतदार मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या मतदारांना तेथील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदार संघामध्ये शिल्लक असलेल्या नव्याने प्राप्त झालेल्या मतदार ओळखपत्रांचे वाटप करणार आहेततसेच यासाठी मतदार जाणीव-जागृती मोठया प्रमाणात करण्यात येत आहे.
            मतदार होण्यापूर्वीच जर भावी मतदारांना त्यांच्या अधिकाराची माहिती झाली तर इथून पुढे होणाऱ्या निवडणूकांमध्ये मतदानाचे प्रमाण नक्कीच वाढण्यास मदत होणार आहे. यासाठी निवडणूक आयोगाने सैराट चित्रपटात नायक व नायीकेची भूमिका करणाऱ्या आकाश ठोसर व रिंकू राजगुरु अर्थात आर्चीला ब्रँड अम्बॅसिडर (सदीच्छादूत) बनवलं आहे. हे दोघे अद्याप मतदार नाहीत हे विशेष. गेल्या 3 वर्षात ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये तुलनेत अधिक "टक्का"  वाढलेला आपणास दिसला हा टक्का अर्थातच वाढला तो केवळ नवमतदार आणि जागरुक मतदारांमुळे वाढला आहे.
माध्यमांना श्रेय
            मतदानाची टक्केवारी वाढत आहे. हा सकारात्मक बदल घडवून आणण्याचे श्रेय माध्यमांना द्यावे लागेल.  निवडणूक आयोग विविध प्रकारे प्रचार आणि प्रसिध्दीचे काम करीत असते.  त्याला वृत्तपत्रांनी सकारात्मक असा प्रतिसाद दिला आहे. या खेरीज इलेक्ट्रॉनिक प्रचार माध्यमानी देखील यात आपला महत्वाचा वाटा उचलला आहे.  
            काही वर्षांपूर्वी  'पेड न्यूज' हा कळीचा मुद्दा बनला होता.  सोशल मिडीया, इंटरनेट, युटयूब, व्हॉटस् अपच्या वापरामुळे तर यावर आयोगाने मात केली आहे. आयोगाने प्रभावी अशी यंत्रणा उभी केली ज्यामुळे देशात निवडणुकीत वाहणारा पैसा आणि केवळ पैशावर आधारित निवडणूक हे समीकरण आता स्वत: माध्यमानी आणि मतदारांनी नाकारलेले दिसत आहे. आता तर सर्वसामान्य नागरिकांना याबद्दल गोपनियरित्या तक्रार करता यावी यासाठी निवडणूक आयोगाने कॉप नावाचे ॲप तयार केले आहे. याचेही श्रेय अर्थात नव्या पिढीतील नवमतदारांमध्ये जागृती घडविणाऱ्या निवडणूक आयोगाच्या प्रयत्नांसोबत माध्यमांना द्यावे लागेल.
            मतदान करण्याची प्रक्रिया आता डिजिटल  तंत्रामुळे अद्ययावत झालेली आहे. यात पूर्ण पारदर्शकता आणली गेली आहे. आता गरज आहे ती मतदारांनी मतदान करण्याची.  जगातील सर्वात मोठी लोकशाही  असणाऱ्या आपल्या या देशात मतदाराला राजा म्हटले जाते.  हा राजा आपले कर्तव्य बजावणारच असे जोवर ठरवत नाही  तोवर ही अधिकार आणि  कर्तव्यांची चर्चा सुरु राहील.                   
                                                                                                           
जयंत कर्पे,
माहिती सहायक,
जिल्हा माहिती कार्यालय,पुणे

000

Thursday, January 26, 2017

प्रजासत्ताक दिनाच्या सदुसष्टाव्या वर्धापनदिनानिमित्त जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या हस्ते शनिवारवाडा येथे ध्वजारोहण


पुणेदि. 26: प्रजासत्ताक दिनाच्या सदुसष्टाव्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याहस्ते शहरातील ऐतिहासिक शनिवारवाडा येथे आज उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण झालेयावेळी  जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी राष्ट्रगीताचे पठण करत राष्ट्रध्वजाला उपस्थितांसमवेत सलामी दिली. तसेच उपस्थित सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी रमेश काळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, हवेलीच्या उपविभागीयअधिकारी ज्योती कदमशहर  ग्रामीण पोलीस दलातील अधिकारीकर्मचारीहोमगार्ड तसेच जिल्हा प्रशासन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकारी,कर्मचारीनागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मध्यवर्ती इमारत येथे ध्वजारोहण
                मध्यवर्ती इमारतीच्या परिसरात कृषि आयुक्त विकास देशमुख यांच्याहस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्तउत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण करण्यात आलेयावेळी विविध विभागातील अधिकारीकर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
000


देशासमोरील आव्हानांना तोंड देण्यासाठी महाराष्ट्र सज्ज --पालकमंत्री गिरीश बापट प्रजासत्ताक दिनाचा वर्धापन दिन समारंभ उत्साहात साजरा


पुणेदि. 26 –  देशाच्या स्वाभिमानावर, एकतेवर, सुरक्षिततेवर ज्या- ज्या वेळी आक्रमण झाले त्या- त्या वेळी महाराष्ट्र नेहमीच देशासाठी धावून गेला आहे. देशा समोरील आव्हानांना तोंड देण्यासाठी यापुढेही महाराष्ट्र सज्ज असल्याची ग्वाही पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज येथे दिली.
            भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सदुसष्टाव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ध्वजारोहणाच्या समारंभात पालकमंत्री श्री. बापट बोलत होतेशिवाजीनगर येथील पोलीस संचलन मैदानावर झालेल्या या कार्यक्रमास विभागीय आयुक्त एसचोक्कलिंगमपोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ शासकीय अधिकारी प्रमुख उपस्थित होते.
            सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले की, 15 ऑगस्ट 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि स्वतंत्र भारताच्या पुढील योजना काय असतील, देश कोणत्या दिशेने वाटचाल करेल हे ठरविण्यासाठी देशाची घटना बनविली गेली. या राज्यघटनेची आखणी, मांडणी करण्यासाठी एक मसुदा समिती नेमली होती त्या समितीचे अध्यक्ष भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार हा बहुमान त्यांना आम जनतेने बहाल केला आहे. 26 जानेवारी 1950 रोजी आपण सार्वभौम, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित झालो. आपण हा राष्ट्रीय सण धार्मिक उत्सवांसारखाच मोठया आनंदाने, कौतुकाने, उत्साहाने साजरा करतो. स्वातंत्र्यासाठी बलीदान दिलेल्या राष्ट्रवीरांना यानिमित्ताने आदरांजली वाहणे आपले कर्तव्य आहे, असे ते म्हणाले.
            पालकमंत्री पुढे म्हणाले की,  साऱ्या जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या भगवान गौतम बुध्दांचा हा देश आहे. पण या शांतीप्रिय देशात अशांतता निर्माण करणाऱ्या प्रवृतींचा धोका जाणवत आहे. अशा प्रवृतींना नामशेष करण्याची ताकत भारताजवळ आहे. अशा प्रवृतींविरुध्द समाजातील सर्व घटकांनी एकत्र येवून संघटीतपणे लढा देण्यासाठी सज्ज होऊया, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
            जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या देशाकडे सारे जग एका आशेने पाहात आहे. जगाला मार्गदर्शन करण्याची पात्रता भारताजवळ असून ही अपेक्षा पूर्ण करण्यास भारतीय नागरिक म्हणून आपण प्रयत्न करण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. निरक्षरता, गरिबी, अस्वच्छता हेही समाजाचे शत्रु आहेत. स्वच्छ व सुंदर परिसर निर्माण करण्यासह पर्यावरणाचा समतोल राखताना मानव जीवन समृध्द करण्याची आज आपण शपथ घेऊया, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
            यावेळी पालकमंत्री बापट यांच्याहस्ते राष्ट्रपती पोलीस पदक विजेते पोलीस अधिकारी कर्मचारी,  खेळाडू आणि हरित सेनेच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रपती पोलीस पदक विजेते सहायक पोलीस आयुक्त सुनील खळदकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह गायकवाड, पोलीस निरीक्षक संजय नाईक- पाटील, महिला पोलीस निरीक्षक सीमा मेहेंदळे, पोलीस उपनिरीक्षक बबनराव भोर, सहायक पोलीस उपनिरीक्षक सर्वश्री पुनाजी डोईजड, अशोक झगडे, अरुण पोटे, अजिनाथ वाकसे, पोलीस हवालदार सर्वश्री विलास घोगरे, बळवंत यादव तसेच अशोक कांबळे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
            संत तुकाराम वनग्राम योजनेंतर्गत प्रथम क्रमांक- कडबनवाडी (ता. इंदापूर), द्वितीय क्रमांक साकुर्डे (ता. भोर) आणि तृतीय क्रमांक वळती (ता. आंबेगाव) यांना बक्षीस वितरण करण्यात आले. याशिवाय सामाजिक वनीकरण विभागाकडून वनीकरणामध्ये उत्कृष्ट कार्य केलेल्या तीन शाळांचाही पुरस्कार व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. क्रीडा विभागातर्फे विविध गुणवंत क्रीडा पुरस्कार देण्यात आले. यामध्ये गुणवंत खेळाडू पुरस्कार (महिला) साक्षी तुषार मळभट, गुणवंत खेळाडू पुरस्कार (पुरुष) स्वप्नील बाळासाहेब ढमढेरे, क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार भुपेंद्र आचरेकर, क्रीडा संघटक मृदुला महाजन, क्रीडा शिक्षक पुणे मनपा क्षेत्र- हर्षल निकम, क्रीडा शिक्षक पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्र- राजेंद्र महाजन, क्रीडा शिक्षक पुणे ग्रामीण क्षेत्र- निनाद येनपुरे, महिला क्रीडा शिक्षक- श्रीमती शबाना शेख यांना पुरस्कार देण्यात आले.
            श्री. बापट यांनी यावेळी उपस्थित स्वातंत्र्यसैनिकांची भेट घेतली. कार्यक्रमात पोलीस दलगृहरक्षक दल, अग्नीशमन दल आणि नागरी संरक्षण दलाने शानदार संचलनाव्दारे पालकमंत्री गिरीश बापट यांना मानवंदना दिलीयामध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या पथकांचाही समावेश होता. संचलनामध्ये सामाजिक वनीकरण, वन विभाग, पुणे महानगरपालिका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र (बार्टी) तसेच महाराष्ट्र बँकेच्या चित्ररथांचाही सहभाग होता. शेवटी शालेय विद्यार्थ्यांनी बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
            यावेळी आमदार माधुरी मिसाळ, यांच्यासह लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000000



Wednesday, January 25, 2017

लोकशाही अधिकाधिक प्रगल्भ व्हावी यासाठी नागरिकांनी मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे . माहिती उपसंचालक मोहन राठोड राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त चर्चासत्र संपन्न


          पुणेदि25 राज्यघटनेने नागरिकांना विविध महत्वपूर्ण अधिकार प्रदान केले आहेत. भारतीय राज्यघटनेचे हे वैशिष्टय आहे. याच राज्यघटनेने स्त्री पुरुषांना मतदानाचा अधिकार प्रदान केला आहे. भारतातील लोकशाही अधिकाधिक प्रगल्भ व्हावी यासाठी नागरिकांनी मतदान प्रक्रियेमध्ये मोठया प्रमाणावर सहभागी व्हावे, असे आवाहन माहिती उपसंचालक मोहन राठोड यांनी आज येथे केले.
          वयाची 18 वर्ष पूर्ण केलेल्या नवतरुण मतदारांना आकर्षित करणे, मतदार यादीमध्ये त्यांचा समावेश होण्यासाठी आणि  शासनाच्या सेवेत कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा लोकशाही प्रक्रियेतील सहभाग वाढावा यासाठी दरवर्षी 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो. यानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्री.मोहन राठोड बोलत होते. यावेळी ॲग्रोवनचे प्रतिनिधी संदीप नवले, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी वृषाली वृषाली पाटील उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांनी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शपथ दिली.
          यावेळी बोलताना श्री.राठोड म्हणाले की, भारतासारख्या आकाराने प्रचंड मोठया असलेल्या देशामध्ये विविधता आहे. विविध जाती-धर्माचे लोक इथे राहतात. या सर्वांचे वेगळेपण असूनही आपल्या राज्यघटनेने सर्वांना एकत्रित बांधले आहे. ही एकसंधता देशाचे मोठे सामर्थ्य आहे. घटनेने स्त्री-पुरुषांना समान अधिकार दिले आहेत. घटनेने दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचा वापर डोळसपणे करुन नागरिकांनी मतदान प्रक्रियेमध्ये सामील व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तरुण वर्गाचा मतदान प्रक्रियेमध्ये मोठया प्रमाणावर समावेश व्हावा यासाठी सर्वांनी वैयक्तिक पातळीवर मतदानाबाबत जनजागृती करावी अशी सूचना त्यांनी केली.
          कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती सहायक जयंत कर्पे यांनी केले तर प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.
          या कार्यक्रमास माहिती सहायक सचिन गाढवे, प्रशिक्षणार्थी सुगत जोगदंड, रोहीत साबळे, विभागीय व जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
000


सक्षम करुया युवा व भावी मतदार’ राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त रॅलीला उत्स्फुर्त प्रतिसाद



सोलापूर दि.25 :- लोकशाहीचे बळकटीकरण व्हावे, मतदार नोंदणी आणि मतदानामध्ये युवकांचा सहभाग वाढावा यासाठी राष्ट्रीय मतदान दिनी सोलापूर शहरातून मतदार रॅली काढण्यात आली. या मतदार रॅलीचा शुभारंभ पार्क चौक येथे जिल्हाधिकारी रणजीतकुमार, महानगरपालिका आयुक्त विजय काळम – पाटील, सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. एन.एन.मालदार यांनी रॅलीस हिरवा झेंडा दाखवून केला. ही रॅली पार्क चौक येथून आंबेडकर पूतळा, डफरीन चौक, हरीभाई देवकरण प्रशाला या मार्गे रंगभवन पर्यंत काढण्यात आली.
25 जानेवारी हा निवडणूक आयोगाच्या स्थापनेचा दिन हा मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून सोलापूर येथे जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन आणि सोलापूर विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने या मतदार रॅलीचे आयेाजन करण्यात आले होते. यावेळी उपजिल्हाधिकारी शिवाजी जगताप,  श्री. सतीश धुमाळ, महापालिकेचे उपायुक्त बी.पी.पाटील उपस्थित होते.
 सक्षम करुया युवा व भावी मतदार हे यावर्षीच्या राष्ट्रीय मतदार दिनाचे घोषवाक्य आहे. युवकांनी निर्भिडपणे मतदान करावे तसेच भावी मतदारांनी आपली नोंदणी करावी यासाठी निवडणूक आयोग विविध उपक्रम राबवित आहे. शहरात आज काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये सोलापूर विद्यापीठ, दयानंद शिक्षणशास्त्र महाविद्यालय, निर्मलाताई ठोकळ प्रशाला, कस्तुरबाई कॉलेज ऑफ एज्यूकेशन अध्यापक विद्यालय, महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी, छत्रपती शिवाजी प्रशाला, छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज, ए.आर.बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालय, शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्था, वालचंद कॉलेज ऑफ आर्टस ॲन्ड सायन्स, लक्ष्मीबाई भाऊराव महिला विद्यालय, सिंहगड कॉलेज, भाई अर्जुनसिंग चंदले समाजकार्य महाविद्यालय, वालचंद टेक्निकल इन्स्टिट्युट, सोलापूर सोशल आर्टस अँन्ड कॉमर्स कॉलेज, एनएसएसचे विद्यार्थी  यांच्यासह शहरातील अन्य शाळा व  महाविद्यालयांचा विद्यार्थ्यांनी रॅलीमध्ये सहभाग घेतला.
तत्पूर्वी पार्क चौक येथे आर्कीट कॉलेज आणि सिध्देश्वर इंग्लिश मिडीयम शाळेच्या विद्यार्थ्यांनी मतदान जागृतीसाठी  पथनाट्य सादर केले.
*****



निर्भिडपणे मतदान करुन विकासाचे दूत व्हा जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांची तरुणाईला साद





सोलापूर दि.25 :- युवकांना निर्भिडपणे मतदान करुन  विकासाचे दूत व्हा, असे आवाहन जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी आज तरुणाईला केले.
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात युवकांना मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी रणजीतकुमार बोलत होते.  येथील श्री शिवछत्रपती रंगभवन येथे झालेल्या या कार्यक्‌रमास सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु एन.एन.मालदार, पोलीस आयुक्त रवींद्र सेनगांवकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे, महापालिकेचे आयुक्त विजय काळम – पाटील, पोलीस अधिक्षक एस. वीरेश प्रभू आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी रणजीतकुमार म्हणाले, आपल्या लोकसंख्येत तरुणांचा वाटा मोठा आहे.            तरुण – तरुणी यांनी निर्भिडपणे मतदान करुन विकासाच्या प्रक्रियेत सहभागी व्हायला हवे. तरुणाईत सकारात्मक बदल घडवून आणण्याची ताकद आहे. त्याचा वापर करुन तरुणांनी बदलाचे दूत व्हायला हवे.
मतदान घटनेने दिलेला अतिशय पवित्र हक्क आहे. या हक्काचा वापर सकारात्मक पध्दतीने करुन तरुणांनी भारतील लोकशाही बळकट करण्याच्या प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी केले.
पोलीस आयुक्त रवींद्र सेनगांवकर म्हणाले, युवकांच्या शक्तीचा वापर मतदानासाठी झाला तर देशात चांगले सरकार निर्माण होईल. यासाठी युवकांनी मतदान करावे. भावी मतदाराने आपल्या नावाची नोंद करण्याबरोबरच मतदान जागृतीसाठी पुढे यावे.
जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन आणि सोलापूर विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने मतदान दिनानिमित्त आयाजित केलेल्या रॅलीत शहरातील शाळा, महाविद्यालयातील युवकांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविल्याबद्दल महापालिका आयुक्त विजय काळम पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त उपस्थित युवकांना जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी मतदार दिनाची शपथ दिली.
या कार्यक्रमात मतदार दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकाचे वितरण करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमास निवडणूक उपजिल्हाधिकारी सतीश धुमाळ, उपजिल्हाधिकारी रेश्मा माळी, शिवाजी जगताप, शिक्षण सह संचालक सुनिल देशपांडे आदी उपस्थित होते.

*****






महाराष्ट्रातील चौघांना ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार’ जाहीर


नवी दिल्ली, दि. २५ : दैनंदिन जीवनात मानवाच्या संरक्षणासाठी उत्तम कामगिरी बजावणा-या देशातील ३६ व्यक्तींना  आज जीवन रक्षा पदक पुरस्कार जाहीर झालेत. यात महाराष्ट्रातील चौघांचा समावेश आहे.
राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या अनुमतीनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने देण्यात येणारे जीवन रक्षा पदक पुरस्कार २०१६’ आज जाहीर करण्यात आले. महाराष्ट्रातील गोविंद  लक्ष्मण तुपे यांना उत्तम जीवन रक्षा पदक जाहीर झाले आहे. तर जीवन रक्षा पदक पुरस्कार  तेजस ब्रिजलाल सोनवणे, मनोज सुधाकरराव बारहाते आणि निलकांत रमेश हरिकांत्रा यांना जाहीर झाला आहे. 
देशातील ३६ नागरीकांना तीन श्रेणीत हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यातील ७ व्यक्तिंना हे पुरस्कार  मरणोत्तर जाहीर झाले आहेत.सर्वोत्तम जीवन रक्षा पदक पुरस्कार’ ५ जणांना जाहीर झाले आहेत. उत्तम जीवन रक्षा पदक पुरस्कार ८ जणांना आणि जीवन रक्षा पदक पुरस्कार२३ जणांना जाहीर झाले आहेत. पुरस्काराचे स्वरूप पदक, केंद्रीय गृहमंत्री यांच्या हस्ताक्षरातील प्रमाणपत्र आणि डिमांड ड्राफ्ट स्वरूपात पुरस्कार राशी असे आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर काही कालावधीने देशातील संबंधीत राज्य शासनाच्यावतीने हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.   
                                                                     ०००००  

महाराष्ट्रातील 3 पोलीसांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’


महाराष्ट्राला एकूण 42 पदक

नवी दिल्ली 24 : राष्ट्रपती पोलीस पदकांची आज घोषणा झाली, महाराष्ट्रातील एकूण 42 पोलीसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये 3 पोलीसांना राष्ट्रपती पोलीस पदक’ तर 39 जणांना पोलीस पदक जाहीर झाली आहेत.

राष्ट्रपती पोलीस पदकामध्ये मुंबईचे अतिरीक्त महासंचालक व्हि.व्हि लक्ष्मी नारायण, रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळुण विभागाचे उप अधिक्षक श्री महादेव श्रीपती गावडे आणि कोल्हापूर जिल्हयातील हातकंणगले येथील सहायक पोलीस उपनिरीक्षक, श्री शिवाप्पा इरप्पा मोर्टी, यांचा समावेश आहे.
यासह महाराष्ट्रातील 39 पोलीसांना पोलीस पदक जाहीर झाले आहेत. त्यांची नावे पूढील प्रमाणे आहेत.

1.    श्री. महादेव भिमराव तांबडे, पोलीस अधिक्षक, सी.आय.डी., महाराष्ट्र
2.   श्री.शांतीलाल अर्जुन भांमरे, पोलीस उपायुक्त, मंत्रालय सुरक्षा मुंबई, महाराष्ट्र
3.   श्री.यशवंत नामदेव वटकर, सहायक पोलीस महानिरिक्षक, मुंबई
4.   श्री.सुनिल वामनराव खालाडकर, सहायक पोलीस आयुक्त, पुणे शहर
5.   श्री.संजय शामराव निकम, पोलीस उपअधिक्षक,  लाचलूचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई
6.   श्री.विजयसिंग रामकृष्ण गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरिक्षक, पुणे शहर
7.   श्री. फासिउद्दीन मोइनिउद्दीन खान, निरिक्षक,  एम.टी. विभाग, औरंगाबाद शहर
8.   श्री.सावता महादेव शिंदे, निरीक्षक, एस.पी.   रायगड
9.   श्री.संजय गणपत सुर्वे, निरिक्षक, गुन्हे शाखा, मुंबई शहर
10. श्री.सुखलाल आनंद वरपे, निरिक्षक, मुंबई
11. श्रीमती सीमा दीपक मेहेंदळे, निरिक्षक, पोलीस नियंत्राण कक्ष पुणे शहर
12. श्री. संजय भाऊसाहेब नाईक पाटील, निरिक्षक, विमानतळ पोलीस ठाणे, पुणे शहर
13. श्री.अभय शामसुंदर कुरूंदकर, निरिक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, ठाणे ग्रामीण
14.श्री.प्रकाश मनोहर नलावडे, सहायक पोलीस निरिक्षक, राज्य गुप्तचर विभाग, मुंबई
15.श्री.श्रीकांत चंद्रकांत उबाळे, सहायक पोलीस शिपाई, विशेष कार्यदल, बीड
16.श्री.बबनराव बाळासाहेब भोर, उपनिरिक्षक, पोलीस आयुक्त कार्यालय, पुणे शहर
17.श्री.विजय राजाराम अंबेकर, उपनिरिक्षक, दरोडा विरोधी कक्ष, कुर्ला, मुंबई शहर
18.श्री.अजिनाथ दत्तात्रय वाकसे, सहायक उपनिरिक्षक, गुन्हे शाखा, महाराष्ट्र
19.श्री.पुनाजी पांडुरंग डोईजड, सहायक उपनिरिक्षक, प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज, पुणे
20.श्री.अशोक बाबुराव गायकवाड, सहायक उपनिरिक्षक, पोलीस मुख्यालय, लातूर
21.श्री.अशोक शिवराम झगडे, सहायक उपनिरिक्षक, पोलीस मुख्यालय, पुणे ग्रामीण
22.श्री.अरूण आत्माराम पोटे, सहायक उपनिरिक्षक, प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र,
    नानवीज, पुणे
23.श्री.विद्याधर रंगनाथ टेकाळे, सहायक उपनिरिक्षक, सीआरओ, लातूर
24.श्री.जगंनाथ देवीदास सुर्यवंशी, सहायक उपनिरिक्षक, डीएसबी, लातूर
25.श्री.कल्याण महादेव घोडके, सहायक उपनिरिक्षक, पोलीस मुख्यालय, एमटी विभाग, बीड
26.श्री.संजय जगंनाथ खरात, सहायक उपनिरिक्षक, सोलापूर शहर
27.श्री.हनुमंत सखाराम तुळसकर, सहायक उपनिरिक्षक, एसआरपीएफ जीआर व्ही ३, मुंबई
28.श्री.विलास कोंडीबा घोगरे, मुख्य शिपाई, शंकर नगर पोलीस ठाणे, पुणे शहर
29.श्री.राजेंद्र पांडुरंग कारंडे, मुख्य शिपाई, वर्सोवा पोलीस ठाणे, मुंबई शहर
30.श्री.अशोक आनंदराव हुंबे, मुख्य शिपाई, गुन्हे शाखा, सीआयडी, मुंबई शहर
31.श्री.बलवंत दत्तात्रय यादव, मुख्य शिपाई, समर्थ पोलीस ठाणे, पुणे शहर
32.श्री.रमेश महादेव जाधव, मुख्य शिपाई, पोलीस नियंत्रण कक्ष, ठाणे शहर
33.श्री.मोहन पोशा मोरे, मुख्य शिपाई, सायबर सेल गुन्हे शाखा, रायगड
34.श्री.अशोक बजरंग कांबळे, मुख्य शिपाई, विशेष शाखा, पुणे शहर
35.श्री.पांडुरंग शंकर खेडेकर, मुख्य शिपाई, एमआयडीसी महाड पोलीस ठाणे, रायगड
36.श्री.जयप्रकाश जगंनाथ माने, गुप्तचर अधिकारी, राज्य गुप्तचर विभाग मुंबई
37.श्री.चंद्रकांत परभाती शिंदे, मुख्य शिपाई, आर्म पोलीस ताडदेव, मुंबई
38.श्री.जयवंत चंद्रकांत शंकपाल, मुख्य शिपाई, गुन्हे शाखा, सीआयडी, मुंबई शहर
39.श्री.राजीव विष्णू जाधव, मुख्य शिपाई, गुन्हे शाखा, सीआयडी, मुंबई शहर

केंद्रीय गृह मंत्रालयाच्यावतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दरवर्षी देशातील पोलीसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर केली जातात. यावर्षी यातंर्गत 100 पोलीसांना विरता पोलीस पदक(पीएमजी), 80 पोलीसांना उत्कृष्ट सेवा राष्ट्रपती पोलीस पदक(पीपीएमडीएस ) आणि 597 पोलीसांना पोलीस पदक (पीएमएमएस) जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्राच्या एकूण 42 पदकांचा समावेश आहे.
00000