Saturday, August 12, 2017

विश्व शांती विद्यापीठातून मूल्याधारीत शिक्षण घेतलेली नवी पिढीच जग बदलेल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे दि. १२: अज्ञानाच्या अंध:कारामुळे जगात अशांतता आहेहा अज्ञानाचा अंध:कार दूर करण्यासाठी मूल्याधारित शिक्षण आवश्यक आहे. विश्व शांती विद्यापीठाच्या माध्यमातून मूल्याधारित शिक्षण प्राप्त केलेली नवी पिढीच जग बदलेलअसा विश्वास मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला.
डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोथरुड येथील एमआयटी कॉलेजच्या प्रांगणात झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी एमआयटीचे प्रमुख डॉ. विश्वनाथ कराड, स्विडनचे ऊर्जा क्षेत्रातील उद्योजक मायकल नोबेल, पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, नालंदा ‍विद्यापीठाचे कुलगुरू पद्मभूषण विजय भाटकर, युजीसीचे माजी चेअरमन डॉ. अरुण निगवेकर, न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन सिस्टिमचे चेअरमन नानीक रुपानी, अध्यात्मिक गुरु जे.पी. ऊर्फ दादा वासवानी, प्रसिध्द तबलावादक पंडीत सुरेश तळवळकर उपस्थित होते.
श्री. देवेंद्र फडणवीस म्हणाले, शिक्षण हे मूल्यांवर आधारित असावे. मूल्यरहित शिक्षण ही फक्त माहिती असते ते ज्ञान नसते. जीवन जगताना कोणत्याही विषयाचे केवळ तांत्रिक ज्ञान पुरेसे नसते तर त्याला मूल्य शिक्षणाची जोड आवश्यक आहे. विश्व शांती विद्यापीठाचे स्वप्न बघून ते पूर्ण करणाऱ्या कराड कुटुंबाचा आम्हाला अभिमान आहे. या विद्यापीठाच्या माध्यमातून मूल्याधारित शिक्षण दिले जाईल. शासनाच्यावतीने अशा शिक्षणाला प्रोत्साहन दिले जाईल.
अज्ञानाच्या अंध:कारामुळे जगात अशांतता आहे. मूल्याधारित शिक्षणच हा अंध:कार दूर करेल. यामाध्यमातून जगात बंधूत्वाची भावना निर्माण होईल. यामुळे जग अधिक सुंदर होईल, ते सर्वांना जगण्यास लायक होईल. विश्वशांती विद्यापीठाची निर्मिती हा सर्वांसाठी ऐतिहासिक क्षण आहे. यापुढेही एमआयटी हे नवीन प्रयोग करण्यात आघाडीवर राहील असा विश्वास श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.
डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले, जीवन जगण्यासाठी विज्ञान आणि अध्यात्म यांचा संगम आवश्यक आहे. मूल्याधारित शिक्षण देणाऱ्या या विद्यापीठाच्या माध्यमातून सक्षम विद्यार्थी घडतील.
डॉ. विजय भटकर म्हणाले, या विश्व शांती विद्यापीठाची निर्मिती हा सर्वांच्यासाठी अत्यंत महत्वाचा क्षण आहे. अशा प्रकारच्या विश्वशांती विद्यापीठाची निर्मिती व्हावी असे माझे स्वप्न होते. डॉ. कराड यांनी ते पूर्ण केले. या विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे जीवन उंचावेल.
डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, विज्ञान आणि अध्यात्माची जोडच जगाला शांततेचा रस्ता दाखवेल. स्वामी विवेकानंदाच्या विचारावर ही संस्था सुरु आहे. हा देशासाठी ऐतिहासिक क्षण आहे. या विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मूल्याधारित शिक्षण मिळेल.
यावेळी दादा वासवानी, मायकेल नोबेल, डॉ. जय गोरे यांची भाषणे झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विश्व शांती विद्यापीठाचे उद्घान करण्यात आले. तसेच विद्यापीठाच्या माहिती पत्रकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दादा वासवानी यांच्यावरील माहिती पट यावेळी दाखवण्यात आला. तसेच उपस्थित विद्यार्थ्यांना विश्व शांती विद्यापीठाची शपथ श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहूल कराड यांनी केले. तर आभार मंगेश कराड यांनी मानले. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच एमआयटी विद्यापीठाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


राज्याीतील न्याोयालयांमध्येा आवश्ययक त्याे चांगल्या सुविधा पुरविणार- मुख्येमंत्री पुण्याीच्यान कौटुंबिक न्यायालयाच्याे नूतन इमारतीचे उद्घाटन

पुणे दि 12 :  राज्‍यातील न्‍यायालयांच्‍या इमारतींमध्‍ये आवश्‍यक त्‍या सुविधा पुरविण्‍यासाठी सर्वतोपरी मदत करु, अशी ग्‍वाही  मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
येथील कौटुंबिक न्यायालयाच्‍या  नूतन इमारतीच्‍या  उद्घाटन  कार्यक्रमात ते बोलत होते.  मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती डॉ.श्रीमती मंजुळा चेल्लूर यांच्या हस्‍ते या नूतन इमारतीचे उद्घाटन झाले.  कौटुंबिक न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश श्रीमती एस.एस.सावंत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्या. श्रीमती रेवती मोहिते -डेरे, न्‍यायमूर्ती  भूषण गवई, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश प्रसाद पालसिंगनकर, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र दौंडकर, द पुणे फैमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनचे अध्यक्ष गणेश कवडे, महापौर मुक्‍ता टिळक, विभागीय आयुक्‍त चंद्रकांत दळवी, जिल्‍हाधिकारी सौरभ राव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्‍यमंत्री श्री. फडणवीस म्‍हणाले, देशातील आदर्श कौटुंबिक न्‍यायालय पुणे येथे झाले आहे. कामाच्‍या ठिकाणी चांगले वातावरण असेल तर कार्यक्षमतेवर चांगला परिणाम होतो. त्‍यासाठी न्‍यायालयांमध्‍ये चांगल्‍या सुविधा आवश्‍यक आहेत. राज्‍यातील सर्व न्‍यायालयांमध्‍ये आवश्‍यक त्‍या चांगल्‍या सुविधा देण्‍यासाठी प्रयत्‍न करु.
समाजातील एकत्र कुटुंब पध्‍दतीचे प्रमाण कमी होत असल्याबद्दल चिंता व्‍यक्‍त करुन मुख्‍यमंत्री म्‍हणाले, पूर्वी एकत्र कुटुंब पध्‍दती होती, घरांतील ज्‍येष्‍ठ सदस्‍यांच्‍या मध्‍यस्‍थीमुळे पती-पत्‍नीतील वाद संपुष्‍टात यायचे. बदलत्‍या जीवनशैलीमुळे कौटुंबिक वादाचे प्रमाण वाढत आहेत. या न्‍यायालयात येणा-या व्‍यक्‍ती  निराश, कौटुंबिक कलहामुळे जीवनावरील विश्‍वास उडालेल्‍या असतात. येथील वातावरणामुळे त्‍यांना संवादासाठी वेळ मिळेल आणि घटस्‍फोटासाठी आलेल्‍या व्‍यक्ती परत आनंदात एकत्र जातील, असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.
पान :
पान :
 मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती डॉ.श्रीमती मंजुळा चेल्लूर यांनी जीवनात सुबत्‍ता असलेल्‍या व्‍यक्‍ती कौटुंबिक कलहामुळे त्रस्‍त असल्‍याची उदाहरणे देऊन कौटुंबिक न्‍यायालयांमध्‍ये येणा-या व्‍यक्‍तींच्‍या जीवनात आनंद, आशा निर्माण करण्‍याची मोठी जबाबदारी या क्षेत्रात काम करणा-यांवर असल्‍याचे सांगितले. कौटुंबिक न्‍यायालय हे एक वेगळे आणि विशेष न्‍यायालय आहे. इथे येणा-या व्‍यक्‍तींबाबत सर्वांनी सहानुभूतीचा, आपुलकीचा दृष्टिकोन ठेवावयास हवा, असे आवाहन करुन त्‍या म्‍हणाल्‍या, आत्‍मविश्‍वास गमावलेल्‍या, नैराश्‍याने ग्रस्‍त असलेल्‍या व्‍यक्‍तींच्‍या जीवनात शांतता निर्माण करण्‍याचे, त्‍यांचे जीवन घडविण्‍याचे महत्‍त्वपूर्ण काम आपल्‍याला करावयाचे आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचे  न्‍यायमूर्ती  भूषण गवई यांनीही कौटुंबिक न्‍यायालयाच्‍या स्‍थापनेचा उद्देश सांगून विभक्‍त झालेले आणि घटस्‍फोटासाठी वेगवेगळ्या मार्गांनी या न्‍यायालयात आलेली जोडपी आपल्‍या मुलांचा हात हातात घेऊन येथून बाहेर जातील, असा आशावाद व्‍यक्‍त केला.
मुंबई उच्च न्यायालयाच्या न्या. श्रीमती रेवती मोहिते -डेरे म्‍हणाल्‍या, पुणे येथे  प्रथम कौटुंबिक न्‍यायालय 27 जानेवारी 1989 मध्‍ये स्‍थापन करण्‍यात आले होते. तेव्हापासून हे न्‍यायालय भारती विद्यापीठाच्‍या 7 व्‍या व नवव्‍या मजल्‍यावर कार्यरत होते. ती जागा अपुरी पडत असल्याने सध्‍या अस्तित्‍वात असलेल्‍या जिल्‍हा व सत्र न्‍यायालयाच्‍या इमारती शेजारील गोदामाच्‍या जागेत नूतन वास्‍तू उभारण्‍यात आली आहे. या वास्‍तूचे भूमिपूजन मुंबई उच्‍च न्‍यायालयाचे तत्‍कालीन  मुख्‍य न्‍यायमूर्ती श्री. स्‍वतंत्रकुमार यांच्‍या हस्‍ते 13 सप्‍टेंबर 2009 मध्‍ये झाले होते. शिवाजीनगर येथे उभारलेल्या कौटुंबिक न्यायालयाच्या नूतन इमारतीमध्ये विविध सुविधा देण्यात आल्‍या असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.  ज्यामध्ये लहान मुलांना भेटण्यासाठी मुलांचे संकुल, पक्षकार, कर्मचारी व वकील यांच्या मुलांसाठी पाळणाघराची व्यवस्था, प्रतीक्षालय, दूरदर्शन संच, सुसज्ज ग्रंथालय, मानसोपचारतज्ञ, बाल मानसोपचारतज्ञ यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष अशा सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. न्यायालयीन कक्षाची रचना देखील विशिष्ट पध्दतीने करण्यात आली आहे. ज्यामध्ये शारीरिकक दृष्टया विकलांग, पक्षकारांसाठी रॅम्पची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या नूतन इमारतीमध्ये न्यायाधीश, वकील व कर्मचाऱ्यांसाठी सुसज्ज असे भूमिगत वाहनतळ बांधण्यात आलेले आहे. नूतन इमारतीमुळे वकील, पक्षकार व कर्मचारी यांची सोय होणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र दौंडकर, द पुणे फैमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनचे अध्यक्ष गणेश कवडे यांनीही यावेळी आपले मनोगत व्‍यकत केले. कार्यक्रमास न्‍यायाधीश, कर्मचारी, वकील मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

Tuesday, August 1, 2017

अण्णा भाऊ साठे यांना जिल्हाधिकारी कार्यालयात आदरांजली


 
सातारादि. 1 (जिमाका)  साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात  झालेल्या या आदरांजली कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे,  प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, जिल्हा नियोजन अधिकारी बी.जे. जगदाळे, उपजिल्हाधिकारी (महसूल) अविनाश शिंदे, आदींसह  जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारीकर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000
 
 

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळातर्फे दहा लाभार्थ्यांना धनादेश वितरण




सोलापूर दि.1:- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून आज दहा लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरण करण्यात आले.
            साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या सातरस्ता येथील कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमंत पाटोळे यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी जयंतीनिमित्त साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस श्री. पाटोळे, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत, महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एल..क्षिरसागर यांनी  पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.
            लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून सामाजिक समतेचा संदेश दिला. त्यांनी दिलेल्या संदेशाची अंमलबजावणी आजही अनुकरणीय आहे. त्यांच्या साहित्याचा अभ्यास करायला हवा, असे श्री. पाटोळे यांनी सांगितले.
            यावेळी महामंडळाच्या अनुदान योजनेतून पाच आणि बीजभांडवल योजनेतून पाच अशा दहा लाभार्थींना धनादेशाचे वितरण करण्यात आले.यावेळी  विविध महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आणि कर्मचारी उपस्थित होते.
            यावेळी अनुदान योजनेतून रेणुका धनराज गायकवाड, चंद्रशेखर शिवाजी कांबळे, अंकुश तात्या पारडे, गिरज्जापा रणदिवे, अंबादास मच्छिंद्र चांदणे यांना प्रत्येकी दहा हजार रूपयांचे धनादेश देण्यात आले. बीजभांडवल योजनेतून श्रीकृष्ण गणपती तोरणे, संजय नागनाथ कांबळे, श्रीराज रोहिदास पवार, दादा हरि बाबरे आणि प्रीती विलास लोंढे यांना धनादेश वितरीत करण्यात आले.
******
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना
जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन
सोलापूर दि.1:- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त आज जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात झालेल्या कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी अजित रेळेकर यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी रेश्मा माळी, यांच्यासह जिल्हाधिकारी , जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी , कर्मचारी उपस्थित होते.

*****

आण्णाभाऊ साठेंना अभिवादन करुन महसूल दिन साजरा





पुणे, दि. 1 : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महसूल दिनाच्या निमित्ताने आज विभागीय कार्यालय जिल्हा प्रशासनाच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
अल्प बचत भवन येथे झालेल्या या कार्यक्रमात महसूल विभागाने मागील वर्षात केलेल्या कामांचा तपशील यंदाच्या आर्थीक वर्षात राबवीले जाणाऱ्या कार्यक्रमांची माहिती देण्यात आली. यावेळी महसूल खात्यातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना झीरो पेंडन्सीचे पुस्तक देवून सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास  विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी सौरभ राव, अप्पर आयुक्त सुभाष डंबरे, अप्पर जिल्हाधिकारी रमेश काळे, उपआयुक्त कविता द्विवेदी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, विजय सिंह देशमुख, जिल्हा प्रशासन विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी, विविध संघटनांचे अध्यक्ष कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000





राष्ट्रध्वजाचा उचित वापर करावा अवमान थांबवण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या सूचना

राष्ट्रध्वजाचा उचित वापर करावा
अवमान थांबवण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या सूचना
पुणे, दि. 1 : दरवर्षी 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे, इतर राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम क्रीडा सामन्यांच्यावेळी विद्यार्थी नागरीकांकडून कागदाच्या प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजांचा वापर करण्यात येतो. कार्यक्रम पार पाडल्यानंतर फाटलेले कागदी राष्ट्रध्वज तसेच प्लॅस्टिकचे राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्त: पडलेले असतात. असे राष्ट्रध्वज पायदळी तुडविले गेल्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत ध्वजसंहितेमध्ये तरतुद नसल्याने त्याचा वापर करण्यात येऊ नये. प्लॅस्टीक बरेच दिवस नष्ट होत नसल्याने प्लॅस्टीकचे राष्ट्रध्वज त्याच ठिकाणी पडलेले दिसतात. राष्ट्राच्या प्रतिष्ठेच्या दृष्टिने हि बाब गंभीर आहे.
कागदापासून तयार केलेले ध्वज महत्वपूर्ण सांस्कृतिक क्रीडा विषयक कार्यक्रमांच्या वेळी लावता येतात. अशा कागदी ध्वजांची कार्यक्रमानंतर विल्हेवाट लावण्यात यावी, असे ध्वजसंहितेत नमूद केले असून देखील राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याचा दिसून येते.
इतस्त: पडलेले राष्ट्रध्वजांची विल्हेवाट लावण्यासंबंधी गृह मंत्रालयाच्या सूचना आहेत. कार्यक्रम पार पाडल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर, कार्यक्रमांचे ठिकाणी पडलेले राष्ट्रध्वज नागरिकांनी जिल्हा, तालुका गावस्तरावर असणाऱ्या नगरपालिका, नगरपरिषद, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पोलीस ग्रामीण पोलीस आयुक्त यांचेकडे सुपुर्द करावेत, असे निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
00000