Wednesday, October 25, 2017

भ्रष्टाचार विरोधी जनजागृती सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन


          पुणे दि.२५ : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने दि. ३० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत 'भ्रष्टाचार विरोधी दक्षता जनजागृती सप्ताह' आयोजीत करण्यात आला आहे. भ्रष्टाचार विरोधात जनजागृती करण्यासाठी या सप्ताहात विविध कार्यक्रम आयोजित करण्यातयेणार आहेत, अशी माहिती प्र. जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी दिली.
          'भ्रष्टाचार विरोधी जनजागृती सप्ताह' आयोजनाबाबत श्री. काळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली, यावेळी त्यांनी ही माहिती दिली. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस अधीक्षक प्रसाद हसबनीस, पोलीस उप अधीक्षक जगदीश सातव तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
           केंद्रीय दक्षता आयोगाच्या निर्देशानुसार दरवर्षी 'भ्रष्टाचार विरोधी जनजागृती सप्ताह' देशभरात सर्व शासकीय कार्यालयात आयोजित केला जातो. या माध्यमातून नागरिकांमध्ये भ्रष्टाचार विरोधी जनजागृती करण्यात येते. सोमवार पासून सुरु होणाऱ्या या सप्ताहात याविषयीच्या जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
 'समाजाचा विकास व भ्रष्टाचार, भ्रष्टाचार प्रतिबंध करण्यासाठीच्या उपाययोजना, भ्रष्टाचार प्रतिबंध संदर्भात मी काय करु शकतो?, भ्रष्टाचार समाजाला लागलेली एक कीड, भ्रष्टाचार संपवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर, भ्रष्टाचारमुक्त भारत माझे स्वप्न' या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.
          शहरातही सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ देऊन सप्ताहाला सुरुवात करण्यात येईल. या सप्ताहामध्ये शहर व जिल्ह्य़ातील सर्व शाळामहाविद्यालये, सहकारी गृहनिर्माण सोसायटी, सरकारी रुग्णालये तसेच मोक्याच्या ठिकाणी भ्रष्टाचाराविरुद्ध जनजागृतीसाठी फलकस्टीकर्स लावण्यात येणार आहेत. तालुका व गाव पातळीवर देखील भ्रष्टाचाराविरुद्ध जनजागृती करण्याचे नियोजन लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत करण्यात येत आहे, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या श्री. हसबनीस यांनी दिली. 
०००००००

Wednesday, October 18, 2017

पुणे जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप कर्जमाफी तर सुरूवात शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हेच शासनाचे अंतिम उद्दिष्ट - पालकमंत्री गिरीश बापट


Ø  जिल्ह्यातील 25 पात्र शेतकऱ्यांचा प्रातिनिधीक सन्मान.
Ø  जिल्ह्यात एकूण 2 लाख 98 हजार 56 लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती अपलोड.
Ø  जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अंदाजे साडे पाचशे कोटींचा मिळणार लाभ.
पुणे दि. 18: बळीराजा हा आपल्या सर्वांचा पोशिंदा आहे. या पोशिंद्याच्या मागे सरकार ठामपणे उभे आहे. आजचा दिवस राज्याच्या दृष्टीने ऐतिहासिक असून कर्जमाफी ही तर केवळ सुरुवात असून राज्यातील सर्व शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हेच शासनाचे अंतिम उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज केले.
            येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या मुख्य सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 कर्जमुक्ती प्रारंभ कार्यक्रमात जिल्ह्यातील प्रातिनिधीक स्वरुपात पात्र 25 शेतकऱ्यांचा कर्जमाफी प्रमाणपत्र, सन्मानपत्र, साडीचोळी, दिवाळी फराळ देवून पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी सौरभ राव, आमदार बाबुराव पाचर्णे, आमदार जगदीश मुळीक, पुणे बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे, विभागीय सहनिबंधक दीपक तावरे, जिल्हा उपनिबंधक आनंद कटके उपस्थित होते.
            श्री. गिरीश बापट म्हणाले, राज्यातील शेतकरी निसर्गाच्या दुष्टचक्रात अडकला आहे. या दुष्टचक्रामुळे त्याच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. शेतकरी आपला सर्वांचा पोशिंदा असल्याने त्याला या संकटातून बाहेर काढण्याची आपली जबाबदारी आहे. आजचा दिवस हा राज्याच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस आहे. कर्जमाफी ही तर सुरूवात असून राज्यातील शेतकऱ्याला संपुर्ण कर्जमुक्ती द्यायची आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने सरकारची कार्यवाही सुरु असून शेतकऱ्यांना शेतीच्या बरोबर शेतीपुरक उद्योग उभारण्यासाठी सरकार मदत करत आहे. त्यासाठी सर्वंकश आराखडा तयार करण्याचे काम राज्य शासनाने हाती घेतले आहे.  
            राज्यातील शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करण्यावर शासनाचा भर राहणार आहे. त्यासाठी शासनाच्यावतीने विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना करुन देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. जलयुक्त शिवार अभियानाचे चांगले परिणाम राज्यभर दिसत आहेत. त्यामुळे राज्यातील अनेक गावे टँकरमुक्त झाली आहेत. पुणे जिल्ह्यातून एकूण 2 लाख 98 हजार 56 लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्याचे काम पूर्ण झाले आहे. या  योजनेचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अंदाजे साडे पाचशे कोटी रुपयांचा फायदा होणार आहे. या योजनची ही सुरूवात आहे, त्यामुळे या यादीत कोणाचे नाव नसेल तरी तो पात्र असेल तर त्याला त्याचा लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्री महोदयांनी जाहिर केल्या प्रमाणे राज्यातील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला लाभ मिळेपर्यंत ही योजना सुरू राहणार आहे.
            चंद्रकांत दळवी म्हणाले, राज्य शासनाने जाहीर केलेला कर्ज माफीचा निर्णय हा अत्यंत महत्वाचा आणि ऐतिहासिक आहे. यापूर्वी करण्यात आलेल्या कर्जमाफीमध्ये केंद्र सरकारने योगदान दिले होते. मात्र यावेळची कर्जमाफी ही संपुर्णपणे राज्य शासनाने केलेली आहे. या नवीन धोरणामुळे राज्यातील अपात्र लोकांना याचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे खऱ्या आणि योग्य लाभार्थ्यापर्यंत या योजनेचा लाभ जाणार आहे. राज्याने जाहीर केलेली 34 हजार कोटींची कर्जमाफी ही अत्यंत मोठी आहे. राज्य शासनाने हा निर्णय अत्यंत कमी वेळेत घेतला आहे. कर्जमाफीमध्ये गैरप्रकार होवू नये यासाठी शासनाने योग्य खबरदारी घेतली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीमुळे शेतकऱ्यांवरील मोठा बोजा कमी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा उपनिबंधक आनंद कटके यांनी केले तर आभार विभागीय सहनिबंधक दीपक तावरे यांनी मानले. या कार्यक्रमाला जिल्ह्यातून विविध संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुरू असणाऱ्या कर्जमाफी प्रारंभ कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण मोठ्या पडद्यावर दाखविण्यात आले.
*****
पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रीया
आमच्या आयुष्याला नवी उभारी मिळेल
शासनाने केलेल्या कर्जमाफीमुळे डोक्यावरचा मोठा बोजा कमी झाला आहे. निसर्गाचा कोप झालेला असताना शासनाने दिलेला मदतीचा हात आम्हाला नक्कीच मदतीला येणार आहे. यामुळे आमच्या आयुष्याला नवी उभारी मिळेल. या कर्जमाफी बद्दल आम्ही शासनाचे मन:पूर्वक आभार मानतो.
-    शशीकांत रंगनाथ गोटे – झगडेवाडी, ता. इंदापूर .
डोक्यावरचा बोजा उतरला
गेल्या काही वर्षापासून निसर्गाच्या बदललेल्या चक्रामुळे आम्ही अडचणीत आलो होतो. त्यामुळे कुटुंब चालविताना मोठी दमछाक होत होती. निसर्गाच्या कोपामुळे उत्पन्नात मोठी तुट झाली होती, त्यामुळं डोक्यावर मोठा कर्जाचा बोजा वाढला होता. या कर्जमाफीमुळं डोक्यावरचा बोजा उतरला आहे.  
-    शमशुद्दीन नबीराज शेख  – कडबनवाडी  ता. इंदापूर
आता नव्या दमाने कामाला लागणार
डोक्यावर कर्जाचा बोजा असल्यामुळे दुसऱ्या बँका कर्जासाठी दारात उभ्या करत नव्हत्या. त्यामुळं सगळच ठप्प झाल होतं. आता या कर्जमाफीमुळं डोक्यावरचा कर्जाचा बोजा तर उतलाच आहे. आता थकीत नसल्यामुळे पुढच्या हंगामासाठी बँकाही कर्ज देतील. त्यामुळं आता नव्या दमानं कामाला लागणार आहे.  
-    शमशुद्दीन नबीराज शेख  – कडबनवाडी  ता. इंदापूर
*****






विधानभवन : पुणे जिल्ह्यातील छ. शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ या कर्जमाफी योजनेचा प्रारंभ पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाला
































स्वस्त धान्य दुकाने मंजूर करण्याच्या कालावधीस मुदतवाढ



पुणेदि. 18 :  अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाअंतर्गत स्वस्त धान्य दुकाने मंजुरीसाठी जाहिर प्रकटन देण्यात आले होते. या जाहिर प्रगटनाद्वारे पुणे जिल्हयातील नवीन कायमस्वरुपी रास्तभाव दुकानांचे परवाने मिळण्यासाठी स्वयंसहायता बचत गटांनी अर्ज करण्याचे सूचित करण्यात आले होते. अन्न,नागरी पुरवठा व गा्रहक संरक्षण विभागाच्या सूचनेनुसार नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम किंवा संस्था नोंदणी झालेल्या संस्था, महिला स्वयंसहायता महिला बचत गट व महिलांच्या सहकारी संस्था या प्राधान्यक्रमानुसार स्वस्त धान्य दुकाने मंजूर करण्याची कार्यवाही करण्याचे सूचित करण्यात आले आहे. यासाठी अर्ज करण्याच्या कालावधीस मुदतवाढ देण्यात आली असून, 31 ऑक्टोबर 2017 पर्यंत अर्ज स्विकृतीचा कालावधी वाढविण्यात आला आहे. तरी अर्जदार यांनी विहीत नमुन्यातील अर्ज मुदतीतच सादर करावेत. यासंदर्भात अधिक माहितीसाठी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे जिल्हा पुरवठा अधिकारी, पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Monday, October 16, 2017

हडपसर-सासवड-जेजुरी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घ्या जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे निर्देश


           
पुणेदि. 16 : हडपसर-सासवड-जेजुरी हा पालखी रस्ता असून या रस्त्यावरील खड्डे तसेच अन्य दुरुस्तीचे काम तातडीने हाती घ्यावे असे निर्देश जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी अधिकाऱ्यांना दिले.
येथील शासकीय विश्रामगृहात हडपसर-सासवड-जेजुरी तसेच मंतरवाडी-पिसोळी-कोंढवा रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामांची आढावा बैठक आज जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होतीया रस्त्यांच्या दुरुस्तीसंबधी कामांचा आढावा घेताना ते बोलत होतेबैठकीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता जे.बी.चवरेसार्वजनिक बांधकाम दक्षिण विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय देशपांडेप्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंता नम्रता रेड्डीसंबंधित परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
 या बैठकीतहडपसर-सासवड-जेजुरी या मार्गावरील खड्डयांच्या दुरुस्तीचा विशेष आढावा जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी घेतला.रस्ते दुरुस्तीच्या कामात सर्व शासकीय यंत्रणांनी ताळमेळ ठेवावारस्ते दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर हाती घ्यावेआवश्यक असेल तेथे काँक्रिटीकरणाच्या माध्यमातून रस्ता दुरुस्तीचे काम करावेरस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजविणेराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मदतीने रस्त्याची दुरुस्ती करणे इत्यादी काम करण्याचे निर्देश जलसंपदा राज्यमंत्र्यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना दिलेत्याचबरोबर रस्त्याच्या दुतर्फा असलेली अतिक्रमणे त्वरीत काढण्याची सूचना त्यांनी केली.
   मंतरवाडी-पिसोळा-कोंढवा रस्त्याच्या कामाला अंदाजपत्रकात अनुदान मंजूर करण्यात येऊनहीविविध विभागांनी आवश्यक परवानग्या प्राप्त न केल्याची गंभिर दखल जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी घेतलीयासाठी गरज पडल्यास शॉर्ट टेंडर काढणेसार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्री महोदयांची या कामास  मान्यता मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचनाही त्यांनी केलीकात्रज-कोंढवा-उंड्री-पिसोळी-मंतरवाडी राज्य मार्गावरील 71 ते 73 किमी दरम्यान हाती घेण्यात येणाऱ्या 48 कोटी 71 लाख रुपयांच्या तसेच 73 ते 76 किमी दरम्यानच्या 15 कोटी रुपयांच्या कामांच्या प्रगतीचा आढावा यावेळी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी घेतला.
000




मुद्रा योजनेचा लाभ घेऊन स्वाभिमानाने जगा -केंद्रीय मानवसंसाधन मंत्री प्रकाश जावडेकर


पुणे दि. 16:  मुद्रा योजनेच्या माध्यमातून लाखो तरुण स्वयंरोजगाराकडे वळत आहेत.या योजनेमध्ये कुठल्याही प्रकारचे भांडवल लागत नसल्यामुळे तरुणांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. त्यामुळे तरुणांनी या योजनेचा लाभ घेऊन रोजगार मिळवण्यापेक्षा रोजगारनिर्मिती करून स्वाभिमानाने जगावे, असे प्रतिपादन केंद्रीय मानवसंसाधन मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले.
राज्यस्तरीय बँकर्स समिती महाराष्ट्र राज्य तसेच जिल्हा प्रशासन पुणे आयोजित 'मुद्रा प्रोत्साहन अभियान',बालगंधर्व रंगमंदिर,पुणे येथे ते बोलत होते.
अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे,खा.अनिल शिरोळे,महाराष्ट्र बँकेचे मुख्य व्यवस्थापक रवींद्र मराठे, महापौर मुक्ता टिळक, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, डीएफएस दिल्लीचे अशोककुमार डोगरा,एमएसएलआरएमच्या मुख्य व्यवस्थापक आर.विमला,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे दिनेश डोके आदी मान्यवर तसेच बँकेचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने  उपस्थित होते.
यावेळी सर्व बँकेच्या वतीने विविध प्रकारच्या योजनांबद्दल  माहिती देण्यासाठी 38 स्टॉल्स लावले होते. त्याद्वारे नागरिकांना मुद्रा योजनेविषयी माहिती तसेच रजिस्ट्रेशन करून देण्यात आले. कार्यक्रमात बचत गटाच्या माध्यमातून स्वयंरोजगार करणाऱ्या महिलांना कर्जवाटप करण्यात आले. सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गतच्या लाभार्थ्यांना धनादेश देण्यात आला. तसेच मुद्रा योजनेअंतर्गत मंजूर तरुणांना मंजुरी प्रमाणपत्र देण्यात आले. ‘मुद्रा यशोगाथा’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच उपस्थित लाभार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.    
शासनाच्या विविध योजनाप्रमाणेच मुद्रा योजना ही अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे. यामधून मोठ्या प्रमाणात उद्योजक तयार व्हावेत हा सरकारचा मुख्य उद्देश आहे.कुठल्याही प्रकारचे तारण नसल्यामुळे लाभार्थ्याला याद्वारे कर्ज मिळवणे सोपे जाते.सामान्य लोकांना डोळ्यासमोर ठेवून ही योजना राबविण्यात येत आहे. 4 कोटी तरुणांचा पूर्वी कुठल्याही प्रकारचा व्यवसाय नसताना त्यांनी  मुद्रा योजनेच्या साह्याने व्यवसायात उडी घेतली आहे. मुद्रा योजनेच्या मदतीने सावकाराच्या जाळ्यातून मुक्तता होईल. मुद्रा योजना ही स्वयंरोजगाराचे नवे दालन आहे. 'नव्या भारताची नवी आकांक्षा, नवी योजना मुद्रा योजना' अशी घोषणा श्री. जावडेकर यांनी दिली.
           
                                                            0000000



Friday, October 13, 2017

मान्यवर वृध्द साहित्यिक, वृध्द कलाकार मानधन योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन



            पुणे दि.13: मान्यवर वृध्द साहित्यिक व वृध्द कलाकार मानधन योजनेसाठी इच्छूकांनी विहीत नमुन्यात अर्ज दहा दिवसात संबंधित गटविकास अधिकारी यांच्याकडे सादर करावेत, अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रविण कोरगंटीवार यांनी दिली.
            मान्यवर वृध्द साहित्यिक व वृध्द कलाकार मानधन देण्याची योजना 1954-55 पासून राज्यात राबविली जाते. शासन निर्णय दि. 22 ऑगस्ट 2014 नुसार सुधारित अटी व शर्ती निश्चित केल्या आहेत. ज्यांनी सांस्कृतिक, कला वाड:मय क्षेत्रात किमान 15 ते 20 वर्षे इतक्या प्रदिर्घ काळासाठी मोलाची भर घातली आहे व महत्वपूर्ण कामगिरी केली आहे. ज्या स्त्र्ी व पुरुष कलावंताचे व साहित्यिकाचे वय 50 वर्षापेक्षा जास्त आहे. साहित्यिक व कलावंताचे सर्व मार्गाने मिळून वार्षिक उत्पन्न 48 हजार पेक्षा जास्त नाही. असे कलावंत अर्ज करु शकतात. जिल्हयातून प्राप्त प्रस्तावांची जिल्हा परिषद स्तरावर जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत प्रत्येक वर्षी शासनाने निश्चित केलेल्या इष्टांकानुसार 60 पात्र वृध्द साहित्यिक व कलावंतांची निवड केली जाते.
            इच्छूक वृध्द साहित्यिक व वृध्द कलाकार यांनी विहीत नमुन्यात अर्ज करावेत. योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती, अर्जाचा नमुना व अटी/ शर्ती संबंधित तालुक्यातील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडून विनामुल्य उपलब्ध करुन घ्यावेत. परिपुर्ण अर्ज दोन प्रतीमध्ये कागदपत्रासह बातमी प्रसिध्द झाल्यापासून दहा दिवसात संबंधित गटविकास अधिकारी यांच्याकडे सादर करावेत असेही श्री.कोरगंटीवार यांनी कळविले आहे.
00000

युवकांनी पोल्ट्री व्यवसायाच्या माध्यमातून उद्योजक व्हावे. -पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर


            पुणे,दि. 13: दैनंदिन धकाधकीच्या जीवनात अंड्याचा आहारात समावेश असणे खूप आवश्यक आहे.अंडयांचा आहारात समावेश केल्यास आपण बऱ्याच आजारांपासून प्रतिबंध होऊ शकतो. यासाठी अंड्याविषयी जनजागृती,व्यापक प्रसिद्धी आवश्यक आहे. अंड्याचे महत्व शेतकऱ्यांना समजल्यास शेती व्यवसायाला पूरक असा कुक्कुटपालन व्यवसाय वाढेल.  या व्यवसायाकडे युवकांनी गांभीर्यानी पाहिल्यास युवक उद्योजक म्हणून पुढे येऊ शकतात, असे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी केले. जागतिक अंडी दिनानिमित्त मानवी आहारातील अंडयाचे पोषणमूल्य नागरिकांपर्यत पोहोचविणे, कुक्कूट पालन व्यवसायास चालना मिळावी व ग्रामीण भागात रोजगार निमिर्तीस चालना मिळावी यासाठी पशुसंवर्धन आयुक्तालय यांच्यातर्फे बालगंधर्व रंगमंदिर,पुणे येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, या कार्यक्रमात ते बोलत होते.
            आरोग्याच्या दृष्टीने अंड्याचे महत्व अनन्यसाधारण आहे. आजच्या काळात महिलांची शारीरिक स्थिती अवघड आहे.यासाठी महिलांनी दैनंदिन आहारात अंड्याचा समावेश करावा.अंडी उत्पादन घराघरांत व्हावे याकरिता शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत.या योजनांची अंमलबजावणी झाली तर शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येणार नाही. एक सजग नागरिक म्हणून युवकांनी या मोहिमेचा प्रसार करावा अशी अपेक्षा पालकमंत्री मंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केली.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा  तालुका समन्वयक शिल्पा ब्राह्मणे यांनी शिरूर तालुक्यातील स्वयंसहायता बचत महिला बचत गटामार्फत सुरु असलेल्या अंडी उत्पादन व्यवसायाच्या उल्लेखनीय उपक्रमाबद्दल  माहिती दिली. आहारतज्ञ् डॉ. गीता धर्मती यांनी आहारातील अंड्याचे महत्व त्यातील महत्वाचे घटक याविषयी माहिती दिली. तसेच अंड्याविषयी असणारे गैरसमज याबद्दल शंकानिरसन केले. यावेळी उपस्थितांना उकडलेली अंडी वाटप करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पशुसंवर्धन आयुक्त कांतीलाल उमाप यांनी केले.आभारप्रदर्शन अतिरिक्त आयुक्त डॉ. डी. एम. चव्हाण यांनी  तर सूत्रसंचालन आशिष जरद यांनी केले.
यावेळी केंद्रीय कुक्कुट अनुसंधान केंद्राच्या निर्देशक भारती सिंह, कृषी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाचे सचिव विकास देशमुख,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई,मार्केट यार्ड कमिटीचे चेअरमन दिलीप खैरे,सहआयुक्त डॉ. गजानन राणे, वेंकीज इंडियाचे व्यवस्थापक विजय तिजारे   विद्यार्थी, नागरिक, तसेच विविध विभागातील अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
00000