Thursday, November 23, 2017

राज्यात येत्या दोन वर्षात 22 हजार किलोमीटरचे महामार्ग सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती


सोलापूर दि. 23 :-  राज्यात येत्या दोन वर्षात 22 हजार किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग तयार केले जाणार आहेत. या महामार्गाच्या निर्मितीला केंद्र सरकारने मंजूरी दिली असून त्यासाठी एक लाख सहा हजार कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज येथे दिली.
मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक झाली. त्या बैठकीत ते बोलत होते. सार्वजनिक बांधकाम भवनच्या कुमठा नाका येथील बांधकाम भवन येथे ही बैठक झाली. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलीस आयुक्त महादेव तांबडे, मुख्य अभियंता प्रविण भिडे, अधीक्षक अभियंता राजेश पाटील आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले की, येत्या दोन वर्षात रस्ते विकासाच्या माध्यमातून राज्याचे चित्र बदलण्याचा प्रयत्न आहे. बावीस हजार किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्ग विकासातून आर्थिक प्रगती शक्य होईल. हे सर्व महामार्ग चार पदरी आहेत.भारतमाला प्रकल्पातून राज्यात 6500 किलोमीटरचे सहा पदरी रस्ते होणार आहेत.
राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील निवासी इमारतीचे बळकटीकरण करण्याचे धोरण आखत आहोत. यामुळे इमारतीचे आयुष्य आणखी दहा ते पंधरा वर्षे वाढेल अशी अपेक्षा असल्याचे श्री.पाटील यांनी सांगितले.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निधीत कपात केली जाऊ नये अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करणार आहोत. ही विनंती मान्य झाल्यास भरघोस निधी मंजूर होईल. त्यातून प्रलंबित देयके देणे शक्य होईल, त्याचबरोबर नवीन कामांना निधी देणे शक्य होईल, असे श्री.पाटील यांनी सांगितले.
जिल्ह्यातील सर्व प्रमुख मार्गावरील रस्त्यांवरील खड्डे मुजविण्याचे काम तातडीने हाती घ्यावे. 15 डिसेंबर 2017 पूर्वी खड्डे मुजविण्याचे काम पूर्ण करा अशा सूचना त्यांनी दिल्या.
टेंभुर्णी – करमाळा रस्त्यासाठी निधी मुजूर करण्यात आला आहे. सोलापूरच्या महसूल भवनाच्या फर्निचरसाठीही निधी दिला जाईल. कार्यालयीन इमारत पुर्ण झाल्यावर संबंधित विभागाकडे हस्तांतरीत केली जावी असेही श्री. पाटील यांनी सांगितले.
******



Monday, November 20, 2017

भूसंपादन प्रक्रीया गतीमान होण्यासाठी महसूल विभागाने यंत्रणा कार्यान्वित करावी -महसूलमंत्री चंद्रकांत पाटील


                                                          
पुणे दि. 20 : राज्यातील विविध विकास प्रकल्पांसाठी करण्यात येत असलेल्या भूसंपादनाच्या प्रक्रियेत सुसूत्रीकरण व्हावे.  ही प्रक्रिया गतीने व्हावी, त्यासाठी महसूल विभागाने यंत्रणा कार्यान्वित करावी, असे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज केले.
महसूल आणि वन विभागाच्यावतीने आज भूसंपादन, पुनर्वसन आणि महसूलविषयक बाबींसंदर्भात   राज्यस्तरीय परिषद आयोजित करण्यात आली होती. त्या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी श्री. पाटील बोलत होते. यावेळी महसूल राज्यमंत्री संजय राठोड, वन विभागाचे सचिव विकास खारगे, पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, नाशिक विभागीय आयुक्त महेश झगडे यांच्यासह महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, राज्यात विविध विकास प्रकल्प सुरु आहेत. भूसंपादनाची प्रक्रिया गतिमानव सुटसुटीत होणे आवश्यक आहे. जेणे करुन शासनाचे महत्वाचे प्रकल्प विहित वेळेत पूर्ण होतील व प्रकल्पाच्या किंमतीत वाढ होणार नाही. तसेच विकास प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या नागरिकांनाही त्याचा मोबदला वेळेत मिळायला हवा. त्यांना त्यासाठी कोणत्याही प्रकारचा त्रास आणि विलंब होता कामा नये याची दक्षता आपण घ्यायला हवी.
भूसंपादन आणि पुनर्वसन विषयक प्रक्रियेतील विलंब टाळण्यासाठी कायदे आणि नियमात दुरुस्ती करण्याची आवश्यकता असल्यास त्यासाठी शासन सकारात्मक असेल. भूसंपादन प्रक्रिया राबविताना येणाऱ्या अडचणींबाबत अशाप्रकारे पहिलीच परिषद होत आहे यातून ही प्रक्रिया गतिमान होण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास श्री. पाटील यांनी व्यक्त केला.
परिषदेस राज्यातील विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, अतिरीक्त जिल्हाधिकारी, पुनर्वसन अधिकारी उपजिल्हाधिकारी उपस्थित होते.

*****



गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शाळा डिजीटल होणे गरजेचे : सहकारमंत्री देशमुख यांचे प्रतिपादन




सोलापूर दि. 20  :- शालेय शिक्षणात गुणवत्ता वाढावी, शिक्षणाचा दर्जा उंचवावा यासाठी शाळा 100 टक्के डिजीटल होणे गरजेचे आहे. शाळा डिजीटल होण्यासाठी यामध्ये लोकसहभाग वाढावा, असे प्रतिपादन  सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री  सुभाष देशमुख यांनी आज येथे केले. 
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत उत्तर व दक्षिण सोलापूर तालुक्यातील शाळेंच्या मुख्याध्यापकांची कार्यशाळा येथील निर्मलकुमार फडकुले सभागृहात संपन्न झाली, यावेळी सहाकरमंत्री सुभाष देशमुख बोलत होते. यावेळी पंचायत समिती उत्तर सभापती  श्रीमती संध्याराणी पवार, दक्षिण  सोलापूर पंचायत समितीचे  उपसभापती संदीप टेळे, गटशिक्षणाधिकारी धनंजय चोपडे, विस्तार अधिकारी मल्हारी बनसोडे यांच्यासह  उत्तर व दक्षिण सोलापूर मधील शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.
सहकार मंत्री देशमुख म्हणाले, विद्यार्थ्यांना चांगले संस्कार शाळेत मिळतात. त्यांच्या शिक्षणाचा पाया हा प्राथमिक शिक्षणावरच अवलंबून असतो. त्यामुळे प्राथमिक - माध्यमिक शाळेतच विद्यार्थ्यांना अद्ययावत शिक्षण मिळणे गरजेचे आहे. मुलांना अद्ययावत व चांगले शिक्षण देण्यासाठी शाळा डिजीटल असणे आवश्यक आहे. यासाठी मुख्याध्यापकांनी आपली शाळा डिजीटल होण्यासाठी प्रयत्न करावेत. या कामी गावकऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी  त्यांनी प्रयत्न करावेत, असे श्री. देशमुख यांनी यावेळी सांगितले. शाळा डिजीटल होण्यासाठी पत्येकाला शाळा माझी वाटली पाहिजे यासाठी शिक्षकांची जबाबदारी मोठी आहे असे ते म्हणाले.
श्री. देशमुख म्हणाले, चांगले विद्यार्थी घडवण्याची किमया शिक्षकांकडे असून आजचे विद्यार्थी हे उद्याच्या वैभवशाली राष्ट्राचे कर्ते आहेत. या विद्यार्थ्यांना चांगली स्वप्ने पाहण्यास व उच्च ध्येय गाठण्यासाठी शिक्षकांनी प्रवृत्त केले पाहिजे. यासाठी प्रत्येक शाळेत वेगवेगळे प्रयोग होणे आवश्यक आहे.
सोलापूर जिल्ह्यातील शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी  शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या  तज्ज्ञांची मदत घेण्यात येणार असून त्यासाठी ‘सोलापूर फौंडेशन’ची स्थापन करण्यात येणार आहे. उत्तर व दक्षिण सोलापूर तालुक्यातील शाळा 100 टक्के डिजीटल करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या निधीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना सहकारमंत्री देशमुख यांनी मुख्याध्यापकांना केल्या.
गटशिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात शाळा सिध्दी उपक्रमाबाबत माहिती दिली. विस्तार अधिकारी मल्हारी बनसोडे यांनी आभार मानले.
*****



Thursday, November 16, 2017

क्रांतीवीर वस्ताद लहुजी साळवे यांचे स्मारक उभारणार : मुख्यमंत्री


पुणे दि. १६ ; क्रांतीवीर वस्ताद लहुजी साळवे यांचे स्वातंत्र्य काळातील योगदान अनेकांना प्रेरणा देणारे होते. ते केवळ एका समाजाचे नेते नव्हते तर संपूर्ण देशासाठी आदर्शवत होते. त्यांचे उचित स्मारक तर शासन निर्माण करीलच परंतु त्यांचे जीवन कार्य आजच्या पिढीला माहित होण्याच्या दृष्टीने त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट तयार करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली.
क्रांतीवीर वस्ताद लहुजी साळवे राष्ट्रीय स्मारक समिती पुणे यांच्या वतीने संगमवाडी येथे आयोजित जयंती उत्सव कार्यक्रमप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, आमदार भीमराव तापकीर, अशोक लोखंडे, विजयराव काळे, कैलास सोनटक्के, आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
क्रांतीवीर लहुजी साळवे यांचे कार्य कोणीही विसरू शकत नाही, असे स्पष्ट करून मुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले, रायगड, चैत्यभूमी, दीक्षाभूमीला जसे महत्त्व आहे, तसेच महत्त्व लहुजी साळवे यांच्या स्मारकाला यावे, यासाठी त्यांचे स्मारक उत्तम असे केले जाईल. त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. सर्वांना अभिमान वाटेल असे त्यांचे स्मारक होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले ; वस्ताद लहुजी साळवे यांचे वडील इंग्रजाविरूध्द लढले. इंग्रजांच्या विरूध्दच्या लढाईत त्यांना वीरमरण आले. तरीही वस्ताद लहुजी साळवे खचले नाहीत. त्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला. त्यांच्या प्रेरणेतून अनेक स्वातंत्र्यसेनानी घडले. मात्र त्यांच्या व्यक्तीमत्वावर आणि कार्यावर पुरेसा प्रकाश पडला नाही. त्यांचे व्यक्तिमत्व सर्वांना कळावे यासाठी त्यांचे स्मारक उभारले जाईल. त्यांच्या स्मारकासाठी आवश्यक असणारी जागा आरक्षित केली जाईल;
लहुजी साळवे एका समाजाचे नव्हते ते सर्वांचे आहेत. त्यामुळे त्यांच्यापासून आपण सर्वांनीच आदर्श घ्यायला हवा. असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 'मातंग समाजाचे विविध प्रश्न सोडवले जातील. शासन समाजाच्या पाठीशी आहे', त्यांच्या जीवन कार्याची माहिती आजच्या पिढीला होण्यासाठी चित्रपट निर्मिती केली जाईल, त्या चित्रपटात संपूर्ण जीवन कार्याचा आढावा घेतला जाईल, असेही ते म्हणाले. प्रारंभी अशोक लोखंडे यांनी प्रास्ताविक केले.
000000










मुलांत आरोग्य संस्कृती रुजविण्याची गरज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन : मुलांतील स्थूलपणाविरोधातील चळवळीचे उद्घाटन



पुणे दि. १६ ; सुदृढ भारताच्या जडणघडणीसाठी मुलांना लहानपणांपासून आरोग्य विषयक साक्षर करायला हवे, आरोग्य संस्कृती रुजवायला हवी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुलांतील स्थूलपणाविरोधातील चळवळीचे उद्घाटन झाले त्यावेळी ते बोलत होते. पुण्यातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते, खासदार अनिल शिरोळे, रोटरी क्लबचे अभय गाडगीळ, डॉ. जयश्री तोडकर, नवनीत प्रकाशनचे सुनील गाला, संदेश गुप्ता आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 'आपली जीवनशैली आणि जेवण शैली या दोन्हीत बदल झाले आहेत. त्यामुळे आपल्या मुलांना लठ्ठपणाच्या विकाराने घेरले आहे. मात्र समाजात अजूनही लठ्ठपणा हा विकार आहे याबाबत जाणीव जागृती झालेली नाही. फाईट चाईल्डहूड ओबेसिटी या चळवळीमुळे समाजाच्या विविध घटकांत स्थूलपणांबाबत योग्य ती जाणीव जागृती होईल'.
लहान मुलांतील स्थूलपणा ही चिंतेची बाब आहे. यावर तत्काळ कार्य करण्याची आवश्यकता आहे. डॉ. जयश्री तोडकर यांच्या पुढाकाराने होत असलेल्या या चळवळीमुळे याबाबत सुरूवात होत आहे. या चळवळीला राज्य शासन आवश्यक ती मदत देईल. ही चळवळ राज्याच्या सर्व भागात पोहोचण्यासाठी मदत करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
स्थूलपणाविरोधातील चळवळीत शाळा आणि शिक्षकांची भूमिका महत्वाची आहे. शाळांमधून स्थूलपणाविरोधारत जाणीव जागृती व्हायला हवी. यासाठी शिक्षकांनी भूमिका बजवायला हवी, अशी अपेक्षाही    श्री. फडणवीस यांनी वक्तव्य केले.
डॉ. जयश्री तोडकर यांनी स्थूलपणा केवळ शहरातील मुलांतच नव्हे तर ग्रामीण भागातही आढळत आहे. मुलांना पुन्हा एकदा काटक बनायला आपण प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी ही मोहीम असल्याचे सांगितले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते चळवळीचा लोगो, माहितीपट आणि बीएमआय-डायलरचे अनावरण झाले.
००००












देशातील पहिल्या इंडस्ट्रीअल पार्कचे रांजणगाव एमआयडीसीत उद्घाटन हायर इंडीया इंडस्ट्रीअल पार्कच्या माध्यमातून भारत-चीन औद्योगिक संबंध अधिक दृढ होतील -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



पुणे दि. १६: देशात महाराष्ट्राला उद्योजकांची गुंतवणुकीसाठी सर्वाधिक पसंती आहे. पुणे हे राज्याचे स्टार्ट अप हब असून जर्मनीपाठोपाठ चीनच्या अनेक कंपन्यांनी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे. हायर इंडिया इंडस्ट्रीअल पार्कच्या माध्यमातून या परिसरात रोजगार निर्मिती बरोबरच विविध करांच्या रूपाने महसुलातही मोठी वाढ होणार आहे. या पार्कच्या माध्यमातून भारत आणि चीनचे औद्योगिक संबंध अधिक दृढ होतील,असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला.
रांजणगाव एमआयडीसीतील हायर इंडस्ट्रीअल पार्कचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले,त्यावेळी ते बोलत होते. यावेळी हायर ग्रुपचे कार्यकारी अध्यक्ष लियांग हॅशनहायर इंडीयाचे व्यवस्थापकीय संचालक साँग युजुनहायर इंडीयाचे अध्यक्ष इरीक ब्रगॅन्झाआमदार बाबुराव पाचर्णे उपस्थित होते.
       मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले२०१५ साली चीन दौऱ्यावेळी हायर कंपनीच्या अधिकाऱ्यांशी गुंतवणुकीबाबत चर्चा झाली होती. त्यानुसार या पार्कची उभारणी करण्यात आली आहे. मेक इन महाराष्ट्र अभियानांतर्गत राज्य शासनाने उचललेल्या सकारात्मक पावलामुळे हे शक्य झाले. हायर इंडीया इंडीस्ट्रीअल पार्क हा देशातील पहिला औद्योगिक पार्क आहे. या पार्कमुळे राज्यातील उद्योग जगतात सकारात्मक बदल होणार आहे. या पार्कमुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असून विविध करांच्या रुपाने महसूलातही मोठी वाढ होणार आहे. त्याच बरोबर या परिसरातील पायाभूत सुविधांमध्येही अमुलाग्र बदल होईल.
      मेक इन महाराष्ट्र अभियानामुळे गेल्या तीन वर्षात महाराष्ट्राला गुंतवणुकदारांची सर्वाधिक पसंती मिळाली  आहे. याला अनुकूल उद्योजक धोरण,कुशल मनुष्यबळ कारणीभूत आहे. राज्यात इंग्लंड,जपानअमेरीकाजर्मनीनेदनलॅण्ड या देशातील उद्योजकांची मोठी गुंतवणुक आहे. पुणे हे देशातील आठवे मोठे महानगर असून प्रतिमाणसी उत्पादनात पुण्याचा सहावा क्रमांक लागतो. पुणे हे देशाचे स्टार्ट अप हब आहे. गुंतवणुकदारांची पुण्याला सर्वाधिक पसंती आहे.
      पुणे शहर परिसरात मोठ्या प्रमाणावर ॲटोमोबाईल कंपन्यांनी आपले उत्पादन सुरू केले आहे.त्याच बरोबर जागतिक बँकेच्या सहकार्याने फुड क्लस्टर म्हणूनही पुणे विकसीत होत आहे. भाजी पाला व फळांवर प्रक्रीया करणारे अनेक उद्योग या निमित्ताने येथे उभे राहणार आहेत. राजीव गांधी आयटी पार्कच्या माध्यमातून अनेक सॉफ्टवेअरहार्डवेअर कंपन्याही पुणे परिसरात कार्यरत आहेत. इंडो-जर्मनी करारामुळे पुणे परिसरात दोन हजाराहून अधिक जर्मन कंपन्या कार्यरत आहेत. आता चीनच्याही अनेक कंपन्या यापरिसरात येत आहेत. या पार्कच्या माध्यमातून रोजगाराला चालना मिळेल.
       यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हायर इंडिया प्रकल्पाची पाहणी करून माहिती घेतली.
       यावेळी लियांग हॅशनसाँग युजुनइरीक ब्रगॅन्झा यांची भाषणे झाली.

हायर इंडिया इंडस्ट्रीयल पार्कचे ठळक वैशिष्ट्ये:

१.      मेक इन इंडियाच्या धर्तीवरील मेक इन महाराष्ट्र अभियानातील गुंतवणूक.
२.      पार्कच्या माध्यमातून ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक.
३.      हायर इंडियाच्या माध्यामातून थेट २००० नवीन रोजगाराची निर्मिती तर अप्रत्यक्ष दहा हजार जणांना रोजगार उपलब्ध.
४.      सन २०१५ साली महाराष्ट्र शासनाचा हायर इंडिया कंपनीशी गुंतवणुकीचा करार.
५.       सन २०१६ साली प्रकल्पाचे भूमिपूजन.
६.      या प्रकल्पाच्या माध्यमातून हायर इंडिया कंपनीच्या उत्पादन क्षमतेत दुपटीने वाढ होऊन रेफ्रिजरेटरचे उत्पादन १.८ मिलियन होणार.
७.      त्याचबरोबर या प्रकल्पात एलइडी टेलिव्हिजनवाशिंग मशीनवाटर हिटर आणि एअर कंडीशनरचे उत्पादनही होणार.
८.      सन २०१५ साली हायर इंडिया कंपनीने मेक इन इंडिया अवार्ड फॉर एक्सलन्स’ हा पुरस्कार मिळविला होता.
९.      रांजणगाव मधील हा प्रकल्प ४० एकर क्षेत्रावर.
०००००





Sunday, November 12, 2017

शेतकरी हाच देशाचा कणा... शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेतकरी हाच देशाचा कणा...
शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी
                                                            - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
          §   राज्यातील ९९.५ टक्के शेतकऱ्यांना एफआरपी प्रमाणे दर
          §   साखर उद्योगाला स्थिरता आणण्याचा शासनचा प्रयत्न
          §   ‘जलयुक्त शिवार’मुळे तीन वर्षात २१ लाख हेक्टर संरक्षित सिंचन
पुणे दि. : शेतकरी हाच देशाचा कणा आहे, शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची शासनाची भूमीका आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांची सर्वात मोठी कर्जमाफी केली आहे. अडचणीतल्या शेतकऱ्यांबरोबरच प्रामाणिक शेतकऱ्यांनाही सरकार मदत करणार असून शेतकरी हाच  खरा हिरो असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
मधुकरनगर-पाटस ता. दौंड येथील भीमा सहकारी साखर कारखान्याचा ३७ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री गिरीश बापट, पशु संवर्धन मंत्री महादेव जानकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, कारखान्याचे अध्यक्ष आमदार राहूल कुल, आमदार बाबुराव पाचर्णे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, माजी आमदार रंजना कुल, कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेव बारवकर, कार्यकारी संचालक आबासाहेब निबे, साखर आयुक्त संभाजीराव कडू-पाटील, वासुदेव काळे, चंद्रराव तावरे उपस्थित होते. 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, शेतकऱ्याला उभे करण्याची ताकत सहकारी साखर कारखान्यात आहे. त्यामुळे सहकारी साखर कारखाने वाचले पाहिजेत, साखर उद्योग वाढला पाहिजे. यासाठी शासन कायमच साखर उद्योगाच्या मागे ठामपणे उभे आहे. साखर उद्योगाला स्थिरता आणण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. राज्यातील ९९.५ टक्के कारखान्यांनी एफआरपी प्रमाणे शेतकऱ्यांच्या ऊसाला दर दिला आहे.  शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय शासनाने घेतले आहेत. त्यामुळेच राज्याच्या शेती विकासाचा दर साडेबारा टक्के झाला आहे.
शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबिवले. या माध्यमातून गेल्या तीन वर्षात राज्यात २१ लाख हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली आले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनमानात मोठा बदल झाला. अडचणीतील शेतकऱ्याला मदत करण्याची शासनाची भूमिका आहे. त्यामुळे शासनाने ऐतिहासिक कर्ज माफी केली आहे. मात्र याच बरोबर शेतीमधील गुंतवणूक  वाढविण्यावर शासनाने भर दिला आहे. गेल्या काही वर्षात अर्धवट अवस्थेतील राज्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. येत्या दोन वर्षात हे अर्धवट असणारे सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहेत.
राज्याच्या सकल उत्पन्नात भर टाकणारा शेतकरी हाच सरकारचा ख्ररा हिरो आहे. त्यामुळे सरकारच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या जाहिरातीत खऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांचे मोठे फोटो वापरण्यात आले आहेत. मी लाभार्थी’ या जाहिरातीत वापरण्यात आलेली सर्व माहिती ही खरी असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. 
पंकजा मुंडे म्हणाल्यासाखर कारखाने नाही चालले तर शेतकरी वाचणार नाहीत. त्यामुळे साखर उद्योगाच्या मागे सरकार उभे राहणार आहे. अत्यंत अडचणीच्या स्थितीतून भीमा कारखाना जात आहेअशा काळात सभासदांनी या कारखान्याच्या मागे उभे राहण्याचे अवाहन त्यांनी केले.
गिरीश बापट म्हणालेशेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकार कायमच प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांचेउस उद्योगाचे प्रश्न सोडविण्याला सरकार प्राधान्य देत आहे.
महादेव जानकर म्हणालेराज्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्याची शासनाची प्रामाणिक भूमिका आहे. यामुळे कर्जमाफी सारखा मोठा निर्णय सरकाने घेतला आहे. दौंड विधानसभा मतदार संघातील विकास कामांसाठी शासन निधी कमी पडू देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात कारखान्याचे अध्यक्ष आमदार राहूल कुल यांनी राज्य शासनाने केलेल्या विशेष मदतीमुळे भीमा साखर कारखाना पुन्हा सुरू झाल्याबद्दल शासनाचे आभार मानले.
यावेळी भीमा कारखान्याला विशेष मदत करुन कारखाना पुन्हा सुरू केल्या बद्दल कारखान्याच्या ५० हजार सभासदांच्यावतीने कारखान्याचे जेष्ठ सभासदजेष्ठ कामगार व कार्यकारी संचालक आबासाहेब निबे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विशेष सत्कार केला.
यावेळी कारखान्याचे सर्व संचालकसभासदअधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००००