Saturday, May 20, 2017

पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट पूर्ण करा - जिल्हाधिकारी भोसले


सोलापूर दि. 19 :- पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट बँकांनी पूर्ण करावे, अशा सूचना आज जिल्हाधिकारी                डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिल्या. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हास्तरीय बँकर्स समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडली. त्या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात झालेल्या  जिल्हास्तरीय बँकर्स समन्वय समितीच्या बैठकीस अग्रणी बँक व्यवस्थापक सुरेश श्रीराम, जिल्हा उपनिबंधक नारायण आघावभारतीय रिझर्व्ह बँकेचे  व अन्य बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी अग्रणी बँक व्यवस्थापक सुरेश श्रीराम यांनी गेल्या वर्षातील पीक कर्ज वाटप, विविध महामंडळाकडील योजनांचा आढावा घेतला. समाधानकारक कामगिरी नसलेल्या बँकांनी चांगली कामगिरी करावी असे आवाहन  त्यांनी केले. यानंतर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले म्हणाले, सोलापूर जिल्हा कृषी आणि कृषीवर आधारित उद्योगावर अवलंबून आहे. त्यामुळे शेतीला कर्जपुरवठा झाल्याशिवाय सोलापूर जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला गती येणार नाही. त्यामुळे कर्ज मागणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला कर्ज पुरवठा केला जाईल याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
गेल्या वर्षी पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट पूर्ण करण्यात अपयश आलेल्या बँकांनी यावर्षी आपले उद्दीष्ट पूर्ण करावे, असे श्री. भोसले  यांनी सांगितले. पीक कर्ज वाटपाबरोबरच सामाजिक सुरक्षितता  योजनांची अंमलबजावणीही प्रभावी रित्या केली जावी, अशी अपेक्षाही जिल्हाधिकारी भोसले यांनी व्यक्त केली.
यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राज्य विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती विकास महामंडळ, इतर मागासवर्गीय विकास महामंडळ यांच्या योजनांचा कर्जपुरवठा करण्याबाबतच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.

*****

Friday, May 19, 2017

किरकसाल गाव जलसंधारणचा माईलस्टोन - जलयुक्त शिवार अभियान यशस्वी करण्यासाठी जल नियोजनाबरोबरच पीकपध्दतीचे नियोजन आवश्यक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस










पुणे दि. १९ (विमाका) : जलसंधारणात किरकसाल गावाचे काम आदर्शवत असून तो एक माईलस्टान आहे. मात्र जलयुक्त शिवार अभियान यशस्वी करण्यासाठी जल नियोजनाबरोबरच पीकपध्दतीचे नियोजन आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
किरकसाल ता. माण येथील जलयुक्त शिवार अभियानात झालेल्या कामांची पाहणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून ग्रामस्थांसोबत श्रमदान केले. यावेळी राज्यमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे सह पालकमंत्री सदाभाऊ खोत, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार जयकुमार गोरे,पृथ्वीराजबाबा देशमुख, डॉ. दिलीप येळगावगावकर, पंचायत समितीचे सभापती रमेश पाटोळे, उपसभापती नितीन राजगे, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, माण-खटावचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार सुरेखा माने, सरपंच अमोल काटकर, उपसरपंच शितल कुंभार उपस्थित होत्या.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, दुष्काळ हा निसर्गाबरोबरच मानवनिर्मित असतो. निसर्गाकडून मिळालेल्या  गोष्टींची परतफेड आपण निसर्गालाकेली तर तो आपल्याला समृध्द करतो, दुष्काळमुक्त करतो. मात्र निसर्गाला आपण ओरबाडले तर तो आपल्याला दुष्काळ देतो. त्यामुळेजलसंधारणाच्या विविध उपचार पध्दतीने आपण दुष्काळमुक्तीसाठी प्रयत्न केले पाहिजे. गावाच्या शिवारात पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब आपणडवला पाहिजे, तो जमिनीत जिरवला पाहिजे. किरकसाल गावाने अत्यंत दर्जेदार पध्दतीने जलसंधारणाचे काम केले आहे. राज्यातील इतर गावांसाठी हे प्रेरणादायी आहे.
गटशेतीला चालना देण्याचे शासनाचे धोरण आहे. शासनाच्या सर्व कृषी योजना शेतकरी गटांना देण्यात येणार आहेत. त्यामुळे किरकसाल ग्रामस्थांनी गटशेतीच्या माध्यमातून गावाचा सर्वांगिण विकास साधावा. जलसंधारणाच्या कामाबरोबरच गावकऱ्यांनी गावातील पीक पध्दतीतही बदल करणे आवश्यक आहे. अनिर्बंध पाण्याचा वापर टाळण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. जलसंधारणाच्या माध्यमातून गावागावांत समृध्दी येणार आहे. चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे राहणार असल्याची ग्वाही श्री. फडणवीस यांनी यावेळी दिली.
किरकसाल गावातील सातकीचा मळ्याशेजारील गुरवकीच्या परिसरात सुरु असणाऱ्या सामुहिक श्रमदानाच्या ठिकाणी भेट देवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामाची पाहणी केली. श्रमदानासाठी जमलेल्या ग्रामस्थांशी संवाद साधून मुख्यमंत्र्यांनीही ग्रामस्थांसोबत श्रमदान केले.  
किरकसाल गावातील ग्रामस्थांनी गुढ्या उभारून मुख्यमंत्र्यांचे अनोखे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच अमोल काटकर यांनी केले. यावेळी किरकसाल गावातील व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमातील क्षणचित्रे:
·         दारासमोर रांगोळ्या काढूनगुढ्या उभारून ग्रामस्थांनी केले मुख्यमंत्र्यांचे स्वागत.
·         फेटेधारी मुलींनी केले मुख्यमंत्र्यांचे स्वागत.
·         हात उंचावून ‘एक-दोन-तीन – फुले-फुले-फुले’ चा गजर करत मुख्यमंत्र्यांना ग्रामस्थांचे अभिवादन.
·         ग्रामस्थांसोबत मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद, कामांची घेतली माहिती.
·         स्वतः श्रमदान करून मुख्यमंत्र्यांनी केले श्रम जागराचे कौतुक.
·         मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीने ग्रामस्थ भारावले.
*****

इतर गावांनी आदर्श घ्यावा असे झाले आहे धामणेरचे काम ---- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



इतर गावांनी आदर्श घ्यावा 
असे झाले आहे धामणेरचे काम
                                   ----  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

                सातारा दि. 19 (जि.मा.का.) :  राज्यातील कुठल्याही गावांनी मला जर विचारले तर मी म्हणेल आदर्श गाव पाहण्यासठी  धामणेरला जा. राज्यातील इतर गावांनी आदर्श घ्यावा असे पथदर्शी काम या गावाने केले आहे. त्याबद्दल ग्रामस्थांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो,  असे कौतुक  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
                कोरेगाव तालुक्यातील धामणेर येथे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी भेट देऊन प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांची पाहणी केली. यावेळी सहपालकमंत्री सदाभाऊ खोत, आ. बाळासाहेब पाटील, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रविणसिंह परदेशी, पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस अधिक्षक संदीप पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक एन. एल. थाडे आदी उपस्थित होते.
                मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी घन कचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाची पाहणी करुन कम्युनिटी बायोगॅस प्रकल्पाचीही पाहणी केली. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना  माहिती दिली. यानंतर ग्रामस्थांना मार्गदर्शन करतांना मुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले,धामणेरच्या ग्रामस्थांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे. ते पाहण्यासाठी मी आज आलो आहे. खरं तरं मीच गावाचे अभिनंदन आणि आभार मानायला हवेत,असे भावोद्गार काढून, त्यांनी ग्रामस्थांचे मन:पूर्वक अभिनंदन केले. आपली गावं आपण कशी चांगली करु शकतो, याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणले धामणेर आहे, असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले, गावाने गरिबातल्या गरिबाचाही विचार केला आहे. 2022 पर्यंत देशातल्या प्रत्येक गरीबाला घर मिळालं पाहिजे ही प्रधानमंत्री यांची संकल्पना इथे साकार होत आहे. जिल्ह्यातील 7 हजार घरे आम्ही बांधायला घेतली आहेत. याबाबत जिल्हाधिकारी आणि मुख्यकार्यकारी अधिकारी या दोघांचेही मी अभिनंदन करतो. पंडित दिनदयाल उपाध्याय योजना घरकुलांसाठी आणली आहे.  त्यामधून 50 लाखाचे अनुदानही दिले जाते. शासनाची योजना उत्तमपणे यशस्वी केवळ ग्रामस्थांच्या पाठबळावरच होत असते, धामणेरकरांनी आपल्या कामाच्या माध्यमातून राज्यातील इतर गांवांना आदर्श घालून दिला आहे.
                राज्यातल्या उत्तमातील उत्तम गाव ठरणाऱ्या धामणेरकरांनी अन्य गावांसाठी प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव दिला आहे. मी निश्चितपणे केंद्र शासनाला विनंती करुन हे प्रशिक्षण केंद्र धामणेरमध्ये होण्यासाठी मी प्रयत्न करेन. गावाच्या पाठीमागे निश्चितपणे शासन उभं राहील, अशी ग्वाहीही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी शेवटी दिली.
                यावेळी सरपंच शहाजी क्षीरसागर यांनी गावातील केलेल्या प्रकल्पांविषयी माहिती दिली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवी शिवदास, चंद्रशेखर जगताप, आनंद भंडारी, प्रांतांधिकारी हिम्मत खराडे, सामाजिक कार्यकर्ते विक्रम पावसकर, अतुल भोसले, साताराचे नगरसेवक धनंजय जांभळे, आनंदराव कणसे, निवृत्त भारतीय कर अधिकारी अनिल पवार आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गुढ्या उभारुन मुख्यमंत्र्यांचे स्वागत
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी धामणेर ग्रामस्थांनी सर्व घरांवर गुढ्या उभ्या केल्या होत्या. रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांच्या आगमनावेळी ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी करुन त्यांचे आपल्या गावात स्वागत केले.

मुख्यमंत्र्यांनी साधला लाभार्थ्यांशी संवाद
प्रधानमंत्री आवास योजनेमधून घरकुल मिळालेल्या लाभार्थी  शालिनी पवार यांच्याशी अगदी आस्थेवाईक विचारपूस करुन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी संवाद साधला. शौचालयाचा नियमीत वापर करा. परिसर स्वच्छ ठेवा. अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

पुरस्कार प्राप्त धामणेर
जिल्हा स्मार्ट ग्राम प्रथम पुरस्कार सन 2016-17.
बाबासाहेब आंबेडकर सामाजिक एकता पुरस्कार सन 2016-17
संत गाडगेबाब ग्राम स्वच्छता अभियान जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार सन 2001-02
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार सन  2003-04
संत ग्राडगेबाबा ग्राम स्वच्छताअभियान जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार सन 2004-05
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा विभागस्तरावर द्वितीय  पुरस्कार सन 2004-05
माजी राष्ट्रपती दिवंगत ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते 24 फेब्रुवारी 2005 रोजी निर्मल ग्राम पुरस्कार.
जिल्हास्तरीय अस्पृश्यता निर्मुलन प्रथम पुरस्कार सन 2002
यशवंत पंचायत राज अभियान विभागस्तर प्रथम पुरस्कार सन 2004-05
विभागीयस्तर वसंतराव नाईक पाणी व्यवस्थापन प्रथम पुरस्कार सन 2003-04
शाहु फुले आंबेडकर दलित वस्ती सुधार अभियानात जिल्हास्तरीय द्वितीय पुरस्कार सन 2006-07
राज्यस्तरीय वनश्री प्रथम क्रमांक सन 2006-07

                                                                                                                00000
राष्ट्र कार्य करणऱ्या पवारवाडीकरांना मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा
                                                                  
          सातारा दि. 19 (जि.मा.का.) :  पवारवाडीकरांनी आपल्या श्रमदानामधून राज्य दुष्काळमुक्त करुन जलयुक्त बनविण्यासाठी अतिशय चांगलं काम केलं आहे. या त्यांच्या राष्ट्र कार्याला, समाज कार्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारवाडी ग्रामस्थांचे कौतुक केले.
                कोरेगाव तालुक्यातील पवारवाडी येथे गामस्थांनी केलेल्या श्रमदानातून  विविध जलसंधारणाच्या कामांची पाहणी मुख्यमंत्री        श्री. फडणवीस यांनी आज केली. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी सहपालकमंत्री सदाभाऊ खोत, आ. बाळासाहेब पाटील, मुख्यमंत्र्यांची प्रधान सचिव प्रविणसिंह परदेशी, पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे, रोहयोचे उपजिल्हाधिकारी संजय पाटील आदी उपस्थित होते.
                ग्रामस्थांचे  अभिनंदन करुन मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, अतिशय चांगलं काम पवारवाडी ग्रामस्थांनी केलेले आहे. दुष्काळावर जर मात करायची असेल तर ते श्रमदानातून करण्यात येते,  हे त्यांनी दाखवून दिले आहे. पावसाचा थेंब न् थेंब आपल्या गावचा आपल्या मालकीचा आहे. तो गावातच थांबला पाहिजे आणि मुरला पाहिजे. माथा ते पायथा विविध उपचार करुन आपण पाणी आडवतो त्याबरोबरच मातीही अडविली पाहिजे. या कामामुळे माती थांबते. त्यातून पाणी भूगर्भात जाते आणि गाव जलयुक्त होते. पवारवाडी ग्रामस्थ वॉटर कप स्पर्धेसाठी दावेदार आहे, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही, असेही ते शेवटी म्हणाले.
                यावेळी इंधनाबाबतचा 1 लाख 93 हजाराचा धनादेश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी  सरपंच राजेंद्र पवार यांना दिला.  यावेळी वन विाभागाच्या वतीने मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.
                याप्रसंगी उपवनसंरक्षक अनिल अंजनकर, तालुका कृषी अधिकारी सुनील साळुंखे, रहिमतपूरचे नगरसेवक सुनील माने, साताराचे नगरसेवक धनंजय जांभळे,  आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जलयुक्त शिवार अभियान श्रमदानातून केलेली कामे
डीप सीसीटी 17 हजार मीटर
दगड बांध 2 हजार 700 मीटर
वृक्ष लागवड संख्या 903
लहान माती बांध संख्या 6
सी सी टी  1 हजार 267 मीटर
एल बी एस ( अनघड दगड बांध) 135
विहीर पुनर्भरण  15
ठिबक सिंचन 126 हेक्टर
यांत्रिक कामे
गाळ काढणे  15 हजार घन मीटर
ओढा रुंदीकरण 15 हजार 400 घन मीटर
मोठा माती बांध  5
नाविन्य उपक्रम
जाळी बंधारा 2
टायर बंधारा 1
शोष खड्डा 190

वन विभागाचे एक्सलंट काम
वन विभागाच्यावतीने  मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी वृक्षारोपण केले. गतवर्षी लावण्यात आलेल्या वृक्षारोपणाची पाहणी करुन वन विभागाचे एक्सलंट काम आहे असे गौरवोद्गार काढून उप वनसंरक्षक अनिल अंजनकर यांचे त्यांनी अभिनंदन केले.

                                                                                0000000









Saturday, May 13, 2017

सिव्हील हॉस्पिटलच्या आधुनिकीकरणास भरीव निधी देणार – पालकमंत्री देशमुख





                   सोलापूर दि.13 :- श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालयाच्या सिव्हील हॉस्पिटल आधुनिकीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून भरीव निधी देऊ,असे आज पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सांगितले.
                   पालकमंत्री देशमुख यांच्या हस्ते आज रूग्णालयात रक्तघटक विलीगीकरण यंत्रणेचे लोकार्पण आणि राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमातंर्गत टू डी इको तपासणी  शिबीराचे उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर शोभा बनशेट्टी ,आमदार सिध्दराम म्हेत्रे, मुख्यमंत्री कार्यालयातील विशेष कार्य अधिकारी ओमप्रकाश शेट्ये, अधिष्ठता डॉ. राजाराम पोवार , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मल्लिकार्जुन पट्टणशेट्टी, जिल्हा आरोग्य अधिकारी शीतलकुमार जाधव आदी उपस्थित होते.
                   पालकमंत्री देशमुख म्हणाले , ‘सिव्हील हॉस्पिटल सोलापूरसह इतर चार-पाच जिल्ह्यातील रूग्णांना आधार आहे. सिव्हील हॉस्पिटलमध्ये अनेक रूग्ण येतात. त्यांना चांगली सेवा देता यावी यासाठी गेली दोन वर्षे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी दिला आहे. यापुढे गेल्या वर्षी पेक्षा जास्त निधी देऊ .या निधीतून सिव्हील हॉस्पिटलच्या परिसरातील रस्ते विकास पण केला जाईल,असे सांगितले’.
                   श्री. ओमप्रकाश शेट्ये यांनी गरीब रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासन नेहमी तत्पर आहे. गरीबांवर उपचार होण्यासाठी शासकीय रूग्णालये बळकट होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी सर्वत्र निधी दिला जात आहे. सोलापूरलाही निधी दिला जाईल.
                   विकृतीशास्त्र विभागचे प्रमुख डॉ. जी. ए. पंडीत यांनी प्रास्ताविक केले. रक्त विलीगीकरण यंत्रणेमुळे रक्तातील विविध घटक स्वतंत्र करता येतात. त्याचा फायदा अनेक रूग्णांना होऊ शकतो. रक्तातील आवश्यक घटक स्वतंत्र करून योग्य मात्रेत प्रत्येक रूग्णाला देता येणे शक्य आहे. त्यामुळे रक्ताच्या एका बाटलीतील घटकांचे विलीगीकरण करून अनेक रूग्णांवर उपचारासाठी वापरणे शक्य आहे.
000000

Saturday, May 6, 2017

नागरिकांना वेळेत सेवा देण्यावर भर द्या : नोंदणी महानिरीक्षक कवडे


नागरिकांना वेळेत सेवा देण्यावर
भर द्या : नोंदणी महानिरीक्षक कवडे
हवेली सहदुय्यम निबंधक कार्यालयाचे उदघाटन
पुणे, 6 – नागरिकांना वेळेत आणि अचूक सेवा देण्यावर भर द्या, अशा सूचना नोंदणी महानिरीक्षक अनिल कवडे यांनी आज येथे दिल्या.
सह दुय्यम निबंधक, हवेली क्रमांक दोनच्या कार्यालयाचे आज नूतन वास्तूत स्थलांतर आणि उदघाटन झाले. त्यावेळी श्री. कवडे बोलत होते. यावेळी नोंदणी उपमहानिरीक्षक चिंतामणी भुरकुंडे, पुणे विभागाचे नोंदणी उपमहानिरीक्षक सोनप्पा यमगर, सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी अनिल पारखे प्रशासकीय अधिकारी बी.के. खांडेकर आदी उपस्थित होते.
दस्त नोंदणीची वाढती संख्या लक्षात घेता बिबवेवाडी येथे प्रशस्त जागेत आणि संगणकीकृत यंत्रणेनेयुक्त असे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयातून नागरिकांना कोणत्याही अडचणीशिवाय सेवा मिळावी. हे कार्यालय नोंदणी कार्यालयांचे आदर्श कार्यालय ठरावे, अशी अपेक्षाही श्री. कवडे यांनी व्यक्त केली. यावेळी श्री. कवडे यांनी कार्यालयातील अभिलेख्यांची आणि संगणकीय व्यवस्थेचेही पाहणी केली.
बिबवेवाडी येथील पुष्पा हाईटस इमारतीत पाच हजार चौरस फुटाच्या प्रशस्त जागेत हे कार्यालय स्थलांतरित करण्यात आले आहे. या कार्यालयात आय सरिता प्रणालीच्या माध्यमातून संगणकीकृत नोंदणी करण्याचे कामकाजही सुरू करण्यात आले आहे. कार्यालयात दस्त ठेवण्यासाठी स्वतंत्र अभिलेख कक्ष आहे. या अभिलेख्यांचे संगणकीकरण करण्यात  आले आहे. नागरिकांना कार्यालयात बसण्यासाठी प्रशस्त जागा असून कार्यालयापासून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही उपलब्ध आहेत.
कार्यालयाचा पत्ता असा- सह दुय्यम निबंधक, हवेली क्रमांक दोन, पुष्पा हाईटस, बिबवेवाडी कॉर्नर, पुणे-सातारा रोड, पुणे. दूरध्वनी क्रमांक - 8275090071

----