Saturday, July 2, 2016

जिल्हास्तरीय सार्वजनिक वितरण व्यवस्था समितीची बैठक संपन्न



पुणे, दि. 2 (विमाका): जिल्हास्तरीय सार्वजनिक वितरण व्यवस्था व जिल्हा दक्षता समितीची मासिक बैठक जिल्हा पुरवठा अधिकारी ज्योती कदम यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय आणि अशासकीय सदस्यांच्या उपस्थितीत पार पडली.
या बैठकीमध्ये सार्वजनिक वितरण व्यवस्था, अन्नसुरक्षा कायद्याबाबत, केरोसीन वाटपाबाबत अशासकीय सदस्यांनी मांडलेल्या विविध प्रश्नांवर जिल्हा दक्षता समितीच्या सदस्य सचिवांनी माहिती देवून शंकाचे निरसन केले.
00000


Friday, July 1, 2016

लोक साहित्य-प्राच्यविद्येचा गाढा आणि समर्पित अभ्यासकगमावला - मुख्यमंत्री

जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय)

लोक साहित्य-प्राच्यविद्येचा गाढा आणि समर्पित अभ्यासकगमावला - मुख्यमंत्री
मुंबई, दि. 1: ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉ. रामचंद्रचिंतामण ढेरे यांच्या निधनाने महाराष्ट्राने लोक साहित्य-प्राच्यविद्येचागाढा आणि समर्पित अभ्यासक-संशोधक गमावला आहे, अशा शब्दांतमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, डॉ. ढेरे यांनी भारतीयइतिहास, लोकसाहित्यासोबत प्राच्यविद्येत केलेले संशोधन अतुलनीय आहे.महाराष्ट्र संस्कृतीच्या अनेक अस्पर्शित पैलुंवर प्रकाश टाकण्याचे मोलाचेकार्य त्यांनी केले. मुस्लिम मराठी संतकवी, ग्रामदैवते, सांस्कृतिक इतिहासअशा अनेक विषयांवर त्यांनी केलेले लिखाण अभ्यासकांना सदैव मार्गदर्शकठरेल. साहित्याच्या प्रेमापोटी त्यांनी स्वत:कडील पुस्तकांचा संग्रहसमाजासाठी खुला केला. त्यांच्या निधनाने एक सच्चा ज्ञानोपासक आणिनिष्ठेने काम करणारा ध्येयवादी संशोधक आपण गमावला आहे.  अशा यासव्यसाची व्यक्तिमत्त्वाला माझी श्रद्धांजली.
-----000------

हवामान बदलानुसार शेतकऱ्यांनी पीक पध्दती बदलावी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचे प्रतिपादन

हवामान बदलानुसार शेतकऱ्यांनी पीक पध्दती बदलावी
पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचे प्रतिपादन
सोलापूर, दि. 1 : हवामान बदलानुसार शेतकऱ्यांनी पीक पध्दती बदलावी, असे प्रतिपादन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी केले.
हरित क्रांतीचे जनक स्व. वसंतराव नाईक यांचा जयंती दिन राज्यात कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात कृषी सप्ताह व कृषी दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा जयमाला गायकवाड, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पोपट बनसोडे, जिल्हा परिषदेचे सभापती सर्वश्री मकरंद निंबाळकर, पंडित वाघ, श्रीमती ॲड. सुकेशनी देशमुख, कल्पना निकंबे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्रीनिवास पत्की, वित्त व लेखाधिकारी गौतम जगदाळे, जिल्हा उपनिबंधक श्री. आघाव, कृषी विकास अधिकारी गजानन ताटे आदी उपस्थित होते.
विहीर खोदण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अडीच लाख रुपये मिळावेत यासाठी आपण शासन स्तरावर प्रयत्न करणार असून शेतकऱ्यांसाठी शासनाच्या ज्या - ज्या योजना आहेत त्या सर्व योजनांची अंमलबजावणी व्हावी यासाठी आपण जातीने प्रयत्न करणार असल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती गायकवाड म्हणाल्या की, पर्यावरण रक्षणासाठी केवळ शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन चालणार नाही तर सामान्य माणसानेही यात पुढाकार घ्यावा त्याचबरोबर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवरील पीक कर्ज माफ होण्यासाठी पालकमंत्र्यांनी प्रयत्न करावा अशी अपेक्षा व्यक्त केली. शेतकऱ्यांनी रासायनिक शेती एैवजी सेंद्रीय शेती कडे वळावे असे सांगून जि.प. प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी पोपट बनसोडे यांनी स्व्‍. वसंतराव नाईक यांच्या कृषी विषयक धोरणांचा गौरव केला.
यावेळी पालकमंत्री व इतर मान्यवरांच्या हस्ते शेतकऱ्यांना सेस फंडातून शेती अवजारे तसेच मका बियाण्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी पालकमंत्री देशमुख यांच्या हस्ते स्व. गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात वीमा योजनेच्या घडीपत्रिकेचे तसेच पीक उत्पादकतेत स्थैर्य राखत उत्पादन खर्चात बचत या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी श्री. वाघ यांनीही आपले विचार व्यक्त केले. याप्रसंगी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, रवींद्र माने, कृषी अधिकारी अशोक देसाई, गुरुनाथ म्हेत्रे यांच्यासह कृषी विभागाचे इतर अधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000

शेतीसंदर्भात दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

शेतीसंदर्भात दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन
सोलापूर, दि. 1 : पंतप्रधान पारंपारिक शेती विकास अंतर्गत सेंद्रीय शेतीची संकल्पना याविषयाची माहिती देण्यासाठी दि. 3 व 4 जुलै 2016 रोजी विभागीय कृषी संशोधन केंद्र, कृषक भवन, दयानंद महाविद्यालयाजवळ, सेंद्रीय शेती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
28 सेंद्रीय शेती गटाद्वारे 1400 एकर क्षेत्रावर सेंद्रीय शेतीची संकल्पना राबविण्यात येणार आहे. या कार्यशाळेत सेंद्रीय शेती तज्ञ डॉ.एल.नारायण रेड्डी भाजीपाला फळपिके व इतर पिकाविषयी माहिती देणार असून या संधीचा जिल्हयातील सर्व शेतक-यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प संचालक आत्मा कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
0 0 0 0

नगरपालिका निवडणुकीच्या आरक्षणाची आज सोडत



पुणे, दि. 1 (विमाका): पुणे जिल्ह्यातील बारामती, आळंदी, लोणावळा, शिरुर, तळेगांव दाभाडे, जेजुरी, सासवड, इंदापूर, दौंड आणि जुन्नर या दहा नगरपरिषदांच्या निवडणुका डिसेंबर 2016 ते फेब्रुवारी 2017 या कालावधीत पार पडणार आहेत. या नगरपरिषदांचा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम त्या त्या नगरपरिषदांच्या क्षेत्रात दि. 2 जुलै 2016 रोजी सकाळी 11.00 वाजता उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
00000


वृक्ष लागवड जनतेची चळवळ झाली पाहिजे : पालकमंत्री बापट





पुणेदि. 1 : वृक्ष लागवड हा शासनाचा किंवा वन विभागाचा कार्यक्रम न राहता  जनतेची चळवळ झाली पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री गिरीश बापट यांनी केली.
            2 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या वारजे येथील वन उद्यानात आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बोलत होते.  यावेळी आ. मेधा कुलकर्णी, आ. भिमराव तपकीर, सिनेअभिनेते जॅकी श्रॉफ, संगीतकार सलील कुलकर्णी,  मुख्य वनसंरक्षक जितसिंह  आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
            यावेळी बोलताना पालकमंत्री बापट म्हणाले की 2 कोटी वृक्षारोपणाचा शासनाचा महत्वकांक्षी कार्यक्रम आज सर्वत्र केला जात आहे.  अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्साहाने झाडे लावतो पण लावलेलं झाड  टिकले पाहिजे.   केवळ झाड लावणे नाही तर  जगविणे टिकविणे   महत्वाचे आहे.  वन खात्याबरोबरच इतर शासकीय विभाग, विद्यार्थी,  विविध संस्था यामध्ये सहभागी झाल्या आहेत.  जिल्ह्याचे वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण होईल. यामाध्यमातून वृक्ष लागवड चळवळ सरकारची नाही तर जनतेची झाली पाहिजे असे प्रतिपादन केले.
               याप्रसंगी बोलतांना आ. भिमराव तापकीर म्हणाले की, मागील वर्षी येथे वनउद्यान सुरु केले आहे.  निसर्गाचा समतोल टिकविण्यासाठी झाडे लावा, झाडे जगवा यशस्वी करण्याचे आवाहन केले.  तर आ. मेधा कुलकर्णी यांनी वारजे येथील टेकडी यापुढे पर्यटन स्थळ होईल अशी आशा व्यक्त केली तसेच पुणे शैक्षणिक नगरी, सांस्कृतिक शहर प्रदुषणमुक्त असले पाहिजे असे प्रतिपादन केले.
               सदरील कार्यक्रमात सिनेअभिनेता जॅकी श्रॉफ म्हणाले की आज 'डॉक्टर डे' आहे.  झाड हेच खरे डॉक्टर आहे.  ऑक्सीजनसाठी झाडे लावणे अत्यंत गरजेचे आहे.  यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन केले तर संगीतकार सलील कुलकर्णी यांनी राज्य शासनाने व  वनमंत्री  यांनी आपल्यासाठी वृक्ष लागवड उपक्रम राबविला आहे.  याबाबत त्यांचे आभार मानले.
               पालकमंत्री गिरीश बापट, उपस्थित मान्यवर, जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.   याप्रसंगी निसर्गप्रेमी, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आदिंनी वृक्षारोपण केले.
*****

स्वच्छता अभियानात महाराष्ट्र अव्वल

स्वच्छता दिंडी व ग्रामसभा दिंडीचे ग्रामविकास मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
स्वच्छता अभियानात महाराष्ट्र अव्वल
-    ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे



पुणे दि. 1: स्वच्छ भारत अभियान हे केंद्रशासनाचे अत्यंत महत्वकांक्षी अभियान आहे. या अभियानात महाराष्ट्र अव्वल असून लोकसहभागामुळेच हे शक्य झाले असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज केले.
   येथील विधान भवन परिसरात राज्य शासनाच्या ग्रामविकास विभाग, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या स्वच्छता दिंडी व ग्रामसभा दिंडीचा शुभारंभ श्रीमती मुंडे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद, आमदार माधुरी मिसाळ, विभागीय आयुक्त एस चोक्क्‍लिंगम, जिल्हाधिकारी सौरभ राव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई उपस्थित होते.
   मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, वनमहोत्सवाच्या निमित्ताने राज्यभरात वृक्षलागवडीचे मोठे काम हाती घेण्यात आले आहे. वन विभाग व ग्राम विकास विभाग मिळून हे काम करत आहेत. वृक्षलागवडीचे हे अभियान यापुढेही असेच सुरु ठेवण्यात येणार आहे. स्वच्छ मनातूनच स्वच्छ कारभार होत असतो, स्वच्छ आचार आणि विचार करणारी नवी पिढी घडविण्यासाठी स्वच्छता मोहिम अत्यंत महत्वाची आहे. पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा सोहळा आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने वारकऱ्यांच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश राज्यभरात पोहोचणार आहे. त्यामुळे या स्वच्छता दिंडीला अनन्य साधारण महत्व आहे. केंद्राच्या स्वच्छ अभियान उपक्रमात महाराष्ट्र अव्वल असून राज्यातील ६ हजार ९३ ग्रामपंचायती, १४ तालुके व एक जिल्हा हगणदारी मुक्त झाला आहे. ही किमया लोकसहभागातून साधली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
   पालकमंत्री श्री. बापट म्हणाले, सरकारच्या कोणत्याही योजना यशस्वी होण्यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्वाचा असतो. स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरातून आणि दारापासून स्वच्छतेची सुरुवात करावी.
   यावेळी प्रदीप कंद, दौलत देसाई यांची भाषणे झाली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्वच्छता दिंडीच्या घडीपुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते विधानभवन परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्यभरातून आलेल्या विविध कलापथकांनी आपली कला सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतिश उमडीकर यांनी केले. आभार विलास जाधव यांनी मानले. 
*****