Saturday, November 5, 2016

सहकार सप्ताहानिमित्त चर्चासत्र, कार्यशाळा सोलापूरात चौदा नोव्हेंबर ते वीस नोव्हेंबर दरम्यान आयोजन


सोलापूर दि.05- शासन विकासामध्ये सहकाराचे योगदान अशी या वर्षाची संकल्पना निश्चित करण्यात आली असून 14 ते 20 नोव्हेंबर दरम्यान सहकार सप्ताह आयोजित करण्यात आला आहे, असे जिल्हा उपनिबंधक नारायण आघाव यांनी आज सांगितले.
           त्यांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे, –  ‘ सहकार सप्ताहाचे उद्घाटन 14 नोव्हेंबर 2016 रोजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत होईल.हा कार्यक्रम कृषि उत्पन्न बाजार समितीच्या कै.शिवदारे सभागृहात होईल. त्यानंतर प्रत्येक दिवशी सहकार क्षेत्राच्या विविध क्षेत्रांवर आधारित कार्यशाळा आणि चर्चासत्र आयोजित केली जाणार आहेत. कार्यशाळा आणि चर्चासत्रात दररोज त्या संस्थागटातील यशोगाथांचे सादरीकरण, संबंधित क्षेत्रातील तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन, समस्या, उपाययोजना, भविष्यकालीन नियोजन असे कार्यक्रम असतील. कार्यक्रमाच्या ठिकाणी सहकारी संस्था, बचत गट आणि सहकार विषयांच्या पुस्तकांचे स्टॉल्‍ उभे केले जाणार आहेत.’
         या सहकार सप्ताहास विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, सभासद यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन श्री.आघाव यांनी केले आहे.

                  सहकार  सप्ताहातील कार्यक्रम 

तारीख
कार्यक्रम / कार्यशाळा
14 नोव्हेंबर 2016
उद्घाटन, नागरी सहकारी बँक
15 नोव्हेंबर 2016
नागरी,ग्रामीण बिगर शेती पतसंस्था
16 नोव्हेंबर 2016
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वि.का.स.संस्था
17 नोव्हेंबर 2016
सहकारी गृहनिर्माण संस्था, पणन सहकारी संस्था
18 नोव्हेंबर 2016
सहकारी साखर कारखाने
19 नोव्हेंबर 2016
सहकारी सूतगिरणी हातमाग, यंत्रमाग संस्था
20 नोव्हेंबर 2016
दुग्ध – मत्स्य  व्यवसाय,समारोप
                           0 0 0 0 

Friday, November 4, 2016

लोकशाही दिन रद्द


सोलापूर दि. 04: - जिल्हयात 9 नगरपालिकांची सार्वत्रिक निवडणुकांची आचारसंहिता लागू लागली असल्याकारणाने दिनांक 7 नोव्हेंबर रोजी होणारा लोकशाही दिन रद्द करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.
                                                       0 0 0 0

शहरासाठी अन्नधान्य नियतन मंजूर


सोलापूर दि.04 -  राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत शहरातील अ.ब.क.ड या चार परिमंडळासाठी अंत्योदय व प्राधान्य कुटूंब लाभार्थीसाठी नोव्हेंबर महिन्याकरीता गहू व तांदूळ नियतन मंजूर झाले आहे.
                          अंत्योदय अन्न योजनेंतर्गत प्रतिकार्ड सुमारे 21 किलो गहू,14 किलो तांदूळ याप्रमाणे एकूण 35 किलो तर प्राधान्य कुटूंब लाभार्थींसाठी प्रति व्यक्ती 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ याप्रमाणे एकूण 5 किलो धान्य वितरीत करण्यात येते.
                           अंत्योदय अन्न योजनेंतर्गत शहरातील नागरिकांसाठी 1477.55 क्विंटल गहू व 977.16 क्विंटल इतका तांदूळ मंजूर झाला आहे तर प्राधान्य कुटूंब लाभार्थींसाठी 12683.38 क्विंटल गहू आणि 8448.30 क्विंटल तांदूळ या चारही परिमंडळासाठी मंजूर झाले आहे. मंजूर झालेले हे धान्य संबंधित लाभार्थ्यांनाच मिळेल याची दक्षता संबंधितांनी घ्यावी असे आवाहन अन्नधान्य वितरण अधिकारी श्रीमंत पाटोळे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
                                                              0 0 0 0

रॉकेल दरात वाढ


सोलापूर दि. 04: -  शहरात यापूर्वी किरकोळ केरोसीन विक्रीचा दर 17 रुपये30 पैसे प्रति लिटर इतका होता. या दरामध्ये अल्पशी वाढ झाली असून  शिधापत्रिका धारकांना दि.1 नोव्हेंबर पासून 17 रुपये 60 पैसे प्रति लिटर इतक्या दराने रॉकेल वितरीत करण्यात येणार आहे.
                   शहरातील शिधापत्रिका धारकांनी  या सुधारीत दरानुसार केरोसीन प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
                                                                      0 0 0 0 

प्लास्टिक शीट अस्तरीकरणासाठी अर्ज करावेत


      पंढरपूर,दि.4: राष्ट्रीय कृषि विकास अभियानाच्या योजनेतंर्गत शेततळ्यांना प्लास्टिक शीट अस्तरीकरण या घटकाचा लाभ मिळवण्यासाठी  तालुक्यातील शेतक-यांनी संबंधीत मंडळ कृषि अधिकारी यांच्याकडे दिनांक 9 नोव्हेंबर 2016 पर्यंत अर्ज करावेत असे अवाहन तालुका कृषी अधिकारी एम.यु.कौलगे यांनी केले आहे.              
          राष्ट्रीय कृषि विकास अभियान सन 2016-17 मध्ये प्राप्त लक्षांकानुसार तालुक्यातील 38 शेततळ्यांना प्लास्टिक शीट अस्तरीकरण या घटकाचा लाभ मिळणार असून, यामध्ये खुला प्रवर्ग 19, अनुसूचित जाती-6, अनुसूचित जमाती-2 व महिलासांठी 11 या प्रवर्गातील लाभार्थ्यांची सोडत पद्धतीने निवड करण्यात येणार  आहे. अधिक माहितीसाठी संबधित शेतक-यांनी मंडळ कृषि अधिकारी कार्यालय व तालुका कृषी अधिकारी कार्यालय पंढरपूर येथे  संपर्क साधावा असे अवाहनही तालुका कृषी अधिकारी श्री.कौलगे यांनी केले आहे.
                                                                   000000      
                                             

                                                                                

Thursday, November 3, 2016

बोगस डॉक्टरांवर कार्यवाहीसाठी विशेष पथक स्थापन करावे अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे यांची सूचना

पुणे, दि. 03 –जनतेची फसवणूक करुन त्यांच्या आरोग्याला धोका उत्पन्न होईल असे उपचार बोगस डॉक्टर करतात. हे बेकायदेशीर असून अशा बोगस डॉक्टरांवर प्रभावी आणि त्वरित कायदेशीर कार्यवाही व्हावी यासाठी सर्व संबधितांनी एकत्र येऊन विशेष पथक स्थापन करावे अशी सूचना अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी केली.
            बोगस डॉक्टरांवर करण्यात आलेल्या कारवाईचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत जिल्हयात बोगस डॅाक्टरांवर करण्यात आलेल्या कारवाईचा आढावा घेण्यात आला. पोलीस प्रशासन आणि जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी बोगस डॉक्टरांवर दाखल करण्यात आलेले खटले त्याची प्रगती याबद्दल बैठकीत माहिती दिली. बोगस डॉक्टरांवर कारवाई करतानाच बोगस पदव्या देणाऱ्या संस्थांविरुध्द कायद्यातील तरतुदीनुसार कडक कारवाई करण्याच्या सूचना यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी संबधितांना दिल्या.
            बैठकीत बोगस डॉक्टरांवर कारवाई करताना येणाऱ्या अडचणी त्यावरील उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे न्यायालयीन प्रकरणे पोलीसांत दाखल करण्यात आलेल्या प्रकरणांचा आढावा घेण्यात आला.
            बैठकीला जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी, जिल्हयातील गट विकास अधिकारी, पोलीस निरिक्षक, बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयाचे सहायक अधिक्षक उपस्थित होते.  

000



मुरघास योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन



सोलापूर दि. 03: - जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयामार्फत मुरघास युनिटची  स्थापना करण्यासाठी लाभार्थींची निवड केली जाणार आहे. यासाठी इच्छुक लाभार्थी तसेच जिल्हयातील गोशाळा, पांजरपोळ, गोरक्षण संस्थांनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या उपायुक्तांनी केले आहे.
                       त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे की, या योजनेसाठी 77 सर्वसाधारण, 10 अनुसूचीत जातीचे लाभार्थी निवडले जाणार आहेत. एकूण लाभार्थींपैकी 30 टक्के महिला आणि तीन टक्के अपंग लाभार्थींना प्राधान्याने लाभ दिला जाईल.
                      यासाठी संबंधित पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी अथवा लगतचा पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 1 किंवा 2 यांच्याशी संपर्क साधावा. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 21 नोव्हेंबर 2016 आहे. अधिक माहितीसाठी 0217-2342696 या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या उपायुक्तांनी केले आहे.
                                          0 0 0 0