Wednesday, January 4, 2017

इंग्रजी निवासी शाळांतील प्रवेशासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना संधी



पुणे, दि. 4 (विमाका): आदिवासी विकास विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत नामांकित इंग्रजी निवासी शाळांमध्ये 2017-18 या वर्षात अनुसूचित जमातीच्या मुला- मुलींना इयत्ता पहिली व पाचवीत प्रवेश देण्यात येणार असून इच्छुकांनी आपल्या पाल्यांच्या प्रवेशासाठी 30 जानेवारी 2017 पर्यंत प्रवेश अर्ज द्यावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी आर. आर. सोनकवडे यांनी केले आहे.
राज्याच्या आदिवासी विकास विभागाने अनुसूचित जमातीच्या मुलां-मुलींना इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत इंग्रजी शाळेत प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 2017-18 या शैक्षणिक वर्षात प्रत्येक प्रकल्पासाठी अनुसूचित जमातीच्या  एक हजार मुलां-मुलींना नामांकित इंग्रजी निवासी शाळेत प्रवेश देण्याचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे. त्या अनुषंगाने घोडेगाव प्रकल्पांतर्गत नामांकित निवासी इंग्रजी शाळेत इयत्ता पहिली व इयत्ता पाचवीत प्रवेश देण्यासाठी पुढील अटी व शर्तींच्या अधीन राहून प्रवेश देण्यात येणार आहे. इच्छुक पालकांकडून आपल्या पाल्याची नाव नोंदणी करण्यासाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगाव (ता. आंबेगाव) जि. पुणे प्रवेश अर्ज मागवीत आहेत. प्रवेश अर्ज प्रकल्प कार्यालयातील शिक्षण शाखेत विनामूल्य उपलब्ध आहेत.
अर्जासोबत पुढील कागदपत्रे जोडणे आवश्यक राहील. पालकांचा अनुसूचित जमातीचा सक्षम अधिकाऱ्याने दिलेला जातीचा दाखला. इयत्ता पाचवीच्या प्रवेशासाठी चौथीतील विद्यार्थ्यांची 100 गुणांची परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. पाल्याची नजीकच्या काळातील दोन छायाचित्रे, जन्मनोंदणीचा दाखला जोडणे आवश्यक राहील. पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये एक लाख रुपयाच्या आत असल्याबाबतचा तहसीलदारांनी दिलेला दाखला जोडावा. इतर नातेवाईकांचा उत्पन्नाचा दाखला जोडू नये. पालक दारिद्र्यरेषेखालील असल्यास त्यांच्या पाल्यास प्राधान्याने प्रवेश देण्यात येईल. महिला पालक, विधवा, घटस्पोटीत, निराधार, परितक्त्या असल्यास त्यांच्या पाल्यास प्रथम प्राधान्याने प्रवेश देण्यात येईल. पालक महाराष्ट्रातील रहिवाशी असणे आवश्यक असून तसा रहिवाशी दाखला जोडावा. पाल्यांची वैद्यकीय तपासणी केली असल्याचे व त्यास कोणताही गंभीर आजार नसल्याचे अलीकडील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मराठीत प्रमाणपत्र जोडावे.
संपर्कासाठी व अधिक माहितीसाठी ०२१३३-२४४२६६ किंवा २४४२७७ या क्रमांकावर संपर्क साधावा. अपूर्ण अर्जाचा विचार केला जाणार नाही. प्रवेश मंजूर करणे किंवा नाकारण्याचा अधिकार प्रकल्प अधिकारी यांनी राखून ठेवला आहे, असेही श्री. सोनकवडे यांनी कळविले आहे.
००००


भ्रष्टाचार निर्मुलन समितीची त्रैमासिक सभा सोमवारी


पुणे दि. 4 : विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची त्रैमासिक सभा विभागीय लोकशाही दिनी सोमवार दिनांक 9 जानेवारी 2017 रोजी  सकाळी ११.15 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, नवीन इमारत, तळमजला मिटींग हॉल, पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे, असे विभागीय आयुक्त तथा विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे अध्यक्ष एस. चोक्कलिंगम यांनी कळविले आहे.
या दिवशी सभेमध्ये समितीकडे डिसेंबर 2016 अखेरच्या तिमाहीत आलेल्या तक्रारी व त्यावर केलेल्या उपाययोजनांबाबत आढावा घेण्यात येणार आहे. ही बैठक सर्वसाधारण तीन महिन्यानंतरच्या पुढील महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय लोकशाही दिनादिवशी आयोजित केली जाते, असेही श्री. चोक्कलिंगम यांनी कळविले आहे.
*****






Tuesday, January 3, 2017

बार्शी येथे तूर खरेदी केंद्राचे उद्घाटन संपन्न




              सोलापूर दि. 03 :-   बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असणाऱ्या महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोडावून स्थळी आज सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते तूर दाळ खरेदी केंद्राचे व शेतमाल तारण  कर्ज योजनेचे उद्घाटन मोठ्या थाटात करण्यात आले.
          जिल्ह्यात यापूर्वी अक्कलकोट, दुधनी, सोलापूर या ठिकाणी तूर दाळ खरेदी सुरु करण्यात आली आहेत. जिल्ह्यात सध्या या तिन्ही केंद्रात सुमारे 1050 क्विंटल तुरदाळ 5 हजार 50 रुपये इतक्या हमीभावाने खरेदी करण्यात आली असून त्याची रक्कमही संबंधितांना अदा करण्यात आली आहे.
          महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे, महाराष्ट्र स्टेट को – ऑप मार्केटिंग फेडरेशन व नाफेड यांच्या संयुक्त विद्यमाने हे तूरदाळ खरेदी केंद्र सुरु करण्यात आले असून बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले.
या तूर दाळ खरेदी केंद्र व शेतमाल तारण कर्ज योजनेच्या शुभारंभ प्रसंगी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे (पुणे) सरव्यवस्थापक मिलींद आकरे, जिल्हा उपनिबंधक नारायण आघाव, जिल्हा मार्केटिंग अधिकारी डी. आर. पाटील, शहाजी पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक राजेंद्र मिरगणे, भाऊसाहेब आंधळकर, जिल्हा अधिक्षक कृषी  अधिकारी बसवराज बिराजदार यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी- कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*****

Monday, January 2, 2017

अल्पसंख्याक समाजातील उमेदवारांना मोफत भरतीपूर्व प्रशिक्षण शिबीर


सातारा दि. 2 (जि.मा.का.):  जिल्ह्यातील मुस्लीमख्रिश्चनबौद्धपारसीशीख व जैन या अल्पसंख्याक समाजातील उमेदवारांसाठी मोफत भरतीपूर्व प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहेअशी माहिती पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे.
ज्या उमेदवारांना भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी नाव नोंदवायची आहेत त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयातील राखीव पोलीस निरीक्षक श्रीसूर्यवंशी यांच्याशी संपर्क  साधून12 वी प्रमाणपत्र तसेच आधारकार्डसह   दि.7 जानेवारी 2017 पर्यंत नाव नोंदणी करावी  सामाजिक संस्था यांनी आपल्या संपर्कात असणाऱ्या अल्पसंख्याक समाजातील महिला व पुरुष उमेदवारांना प्रशिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करावेअसे आवाहनही पोलीस अधीक्षक श्रीपाटील यांनी केले आहे.
                                                                      000

उत्कृष्ठ पत्रकारिता पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन


  सोलापूर दि. 02 :-  राज्य शासनाच्या महिती  व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे उत्कृष्ट पत्रकारिता        तसेच पत्रकारितेच्या अनुषंगाने वृत्तकथा, छायाचित्र, उत्कृष्ट दुरचित्रवाणी, सोशल मिडीया तसेच स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती आदी पुरस्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी जास्तीत जास्त पत्रकारांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
            या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या पत्रकारांनी दिनांक 1 ते 31 डिसेंबर 2016 या कालावधीत बातम्या, लेख, यशकथा, वृत्त चित्रकथा, सोशल मिडीया आदी संदर्भात लिखाण केलेले असावे. हे लिखाण संबंधित जिल्हा माहिती कार्यालयात दिनांक 31 जानेवारी 2017 पर्यंत पाठवावे.  मुदती नंतर आलेल्या प्रवेशिकांचा कोणत्याही  परिस्थितीत विचार केला जाणार नाही.
    या पुरस्काराबाबत अर्जाचे नमुने तसेच माहितीपत्रक www.maharashtra.gov.indgipr.maharashtra.gov.in  तसेच  mahanews.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्याबरोबर संबंधितांना जिल्हा माहिती कार्यालयातही प्रवेशिकेचा नमुना मिळू शकेल.
            या स्पर्धेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त पत्रकारांनी, छायाचित्रकारांनी तसेच लिखाणाच्या अनुषंगाने  सोशल मिडीयावर त्याचबरोबर स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पर लिखाण करणाऱ्यांनी सहभागी  व्हावे, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
*****

जी.डी.सी.ॲण्ड ए. व सी.एच. एम. परिक्षेचा निकाल जाहीर

  
पुणे दि०२ : मे २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या जी.डी.सी.ॲण्ड ए. व सी.एच.एम. परिक्षेचा निकाल दिनांक १९ डिसेंबर २०१६ रोजी घोषित करण्यात आला आहे. या परिक्षेतील फेरगुण मोजणी करण्यासाठी दि. १९ जानेवारी २०१७ पर्यंत मुदत असल्याची माहिती जी.डी.सी.ॲण्ड ए. बोर्ड सचिव तथा उपनिबंधक समृता जाधव यांनी पत्रकाव्दारे दिली आहे.
पत्रकात म्हटले आहे, दि. २८, २९ व ३०  मे २०१६ रोजी घेण्यात आलेल्या जी.डी.सी.ॲण्ड ए. व सी.एच.एम. परिक्षेचा निकाल दिनांक १९ डिसेंबर २०१६ रोजी घोषित करण्यात आला आहे.हा निकाल दि. ३० डिसेंबर २०१६ पासून www.mahasahakar.maharashtra.gov.in  https://gdca.maharashtra.gov.in या वेबसाईटवर पहावयास उपलब्ध राहतील. फेरगुण मोजणी करण्यासाठी दि. १९ जानेवारी २०१७ रोजी रात्री १२ पर्यंत https://gdca.maharashtra.gov.in या वेबसाईटवर परिक्षार्थिंनी आपले लॉगइन व पासवर्डचा वापर करुन अर्ज करावा.
फेरगुण मोजणी करण्यासाठी विद्रयार्थ्यांनी प्रत्येक विषयासाठी ७५ रुपये या प्रमाणे फेरशुल्क मोजणी ऑनलाईन भरावे. तसेच भारतीय स्टेट बँक या बँकेच्या कोणत्याही जवळच्या शाखेत प्रत्येक विषयासाठी ७५ रुपये अधिक बँक चार्जेस या प्रमाणे चलनाव्दारे भरावे. बँक चलन ऑनलाईन प्राप्त करुन घेण्याची मुदत दि. ३० डिसेंबर २०१६ ते दि. १९ जानेवारी २०१७ मध्यरात्री १२ पर्यंत राहील. सदर चलन भरुन घेण्यासाठी शेवटची मुदत दि. २० जानेवारी २०१७ (बँकेच्या कालावधीत) विहित तारखेनंतर प्रात्प होणाऱ्या अर्जावर विचार करण्यात येणार नसल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

००००००


पंतप्रधान पीक विमा योजनेला १० जानेवारी पर्यंत मुदतवाढ


पुणे दि०२ : पंतप्रधान पीक विमा योजना राज्यात रब्बी हंगाम २०१६-१७ मध्ये राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत रब्बी हंगाम २०१६-१७ करिता कर्जदार व ‍बिगर कर्जदार शेतकरी सहभागाची अंतिम मुदत दि. १० जानेवारी २०१७ अशी करण्यात आल्याची माहिती कृषि उपसंचालक यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.
            पत्रकात म्हटले आहे, पंतप्रधान पीक विमा योजना राज्यात रब्बी हंगाम २०१६-१७ मध्ये राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत रब्बी हंगाम २०१६-१७ करिता ज्या पिकांकरिता मुदत दि. ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत होती त्याच पिकांसाठी ही मुदतवाढ करण्यात आली आहे. दि. १० जानेवारी २०१७ पर्यंत ही अंतिम मुदत वाढ करण्यात आली आहे.
            या योजनेच्या अधिकमाहितीसाठी नॅशलन इन्शुरन्स कंपनी लिमीटेड यांचे जिल्हानिहाय प्रतिनिधी तसेच संबंधित विभागीय कृषि सह संचालक, जिल्हा कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांच्या कार्यालयाशी तसेच नजीकच्या बँकेशी संपर्क साधावा.या योजनेचा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन कृषि विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

००००००