महाराष्ट्र राज्य शासनाचे विविध कल्याणकारी निर्णय, उपक्रम, वृत्त, लेख, छायाचित्र आदींची माहिती उपलब्ध करून देणे व याद्वारे ते जनतेपर्यंत पोहोचविणे. राज्य शासनाच्या विविध योजनांची व्यापक प्रसिद्धी करणे.
Saturday, January 7, 2017
डीजी धन मेळाव्यामध्ये कादंबरी स्वयं सहाय्यता बचत गटाने पारंपारिक खाद्यपदार्थांचा स्टॉल लावला आहे. या स्टॉलवर वाळवण्याचे पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे पदार्थ स्टॉलला भेट देणाऱ्या नागरिकांनी डेबिट कार्डद्वारे खरेदी केले. विशेष म्हणजे किमान खरेदीची कोणतीही अट नसल्याने नागरिकांनी कमी रक्कमेची खरेदी सुद्धा केली.
Friday, January 6, 2017
“तुम्ही शिका दुसऱ्यांना शिकवा” पालकमंत्र्यांनी दिला युवकांना मंत्र
पुणे दि. ७: रोखरहित अर्थव्यवस्था काळाची गरज आहे. या नव्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी युवकांनी स्वत: रोखरहित अर्थव्यवस्था शिकून इतरांनाही ती शिकवावी असा मंत्र पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज युवकांना दिला.
येथील एस.पी. कॉलेजवर सुरु असणाऱ्या डिजी धन मेळाव्यात पालकमंत्री गिरीश बापट यांनी युवकांशी संवाद साधत त्यांना रोखरहित व्यवहारा विषयी मार्गदर्शन केले.
पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, समाजातील सर्व घटकांना रोखरहित अर्थव्यवस्थेची ओळख होणे आवश्यक आहे. रोखरहित अर्थव्यवस्था ही उद्याच्या अर्थक्रांतीची नांदी आहे.यामुळे काळे धन बाहेर येवून समाज भ्रष्टाचारमुक्त होण्यास मदत होणार आहे. या नव्या अर्थक्रांतीच्या चळवळीत युवकांचा सहभाग महत्वाचा आहे. या नव्या चळवळीला गती देण्यासाठी युवकांनी स्वत:याचे धडे घ्यावेत आणि समाजातील सर्व घटकांमध्ये याची जागृती करण्याचा सल्ला दिला.
******
डीजीधन मेळाव्याला उत्साहपूर्वक वातावरणात सुरुवात पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन
डीजीधन मेळाव्याला उत्साहपूर्वक वातावरणात सुरुवात
पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन
पुणे, दि. 07 (विमाका)– रोखरहित महाराष्ट्राच्या दिशेने यशस्वी वाटचाल करुन डिजीटल अर्थप्रणालीला चालना देण्यासाठीच्या उपक्रमांतर्गत आज येथील सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या प्रांगणात डिजीधन मेळाव्याला उत्साहपूर्वक वातावरणात सुरुवात झाली. पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्याहस्ते या मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी विभागीय आयुक्त एस.चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी सौरभ राव, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, उपविभागीय अधिकारी ज्योती कदम, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दिनकर देशमुख, विविध बँकांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
डिजीधन मेळाव्याचे आयोजन केंद्र सरकार, राज्य सरकार आणि सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील सर्व बँकानी संयुक्तपणे केले आहे. मेळाव्यात इलेक्ट्रॉनिक, हस्तकला, कपडे, खाद्यपदार्थ आदि विविध वस्तूंच्या तसेच बचत गटांचे व विविध बँका,आपले सरकार सेवा केंद्र, आधार केंद्र यांच्या सेवांचा समावेश असलेल्या ६० स्टॉल्सची उभारणी करण्यात आलेली आहे. या ठिकाणी सर्व व्यवहार डिजिटल स्वरूपात करण्यात येणार आहेत. बँकांचे नवीन खाते उघडणे, बँक खात्याशी मोबाईल क्रमांक व आधार क्रमांक संलग्न करणे आदी विविध सेवा देण्यात येणार आहेत.
या मेळाव्यात लावण्यात आलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, अॅक्सीस बँक, बचत गट आदी स्टॉलला पालकमंत्री गिरीश बापट यांनी भेट दिली. तसेच रोखरहित व्यवहारासाठी अंमलात येणाऱ्या विविध सेवांची तसेच मोबाईल अॅपची माहिती घेतली. रोखरहित व्यवहारासाठी भावी काळातील उपक्रमांची माहिती सुद्धा त्यांनी घेतली.
000
वृत्तपत्रांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवावे ..ज्येष्ठ विचारवंत अरुण खोरे
पुणे, दि. 06– समाजामध्ये विषमतेची दरी वाढत आहे. महाराष्ट्रात मुद्रित माध्यमांना मोठा इतिहास आहे. त्यामुळे वृत्तपत्रांनी सर्वसामान्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडावेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत अरुण खेारे यांनी केले.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी,1832 रोजी सुरु केलेल्या दर्पण या पहिल्या मराठी वर्तमानपत्राचे संस्मरण व्हावे यासाठी दरवर्षी हा दिवस दर्पण दिन म्हणून राज्यभर साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने माहिती केंद्राच्या सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी अरुण खोरे बोलत होते. कार्यक्रमाला माहिती उपसंचालक मोहन राठोड, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी वृषाली पाटील, माहिती सहायक सर्वश्री जयंत कर्पे, संग्राम इंगळे, सचिन गाढवे उपस्थित होते.
यावेळी बोलताना अरुण खोरे यांनी माहिती व जनसंपर्क विभाग विविध उपक्रमाद्वारे शासनाची सकारात्मक बाजू नेटाने मांडण्याचे कार्य करीत आहे असे सांगितले. मराठी वृत्तपत्रसृष्टीला 185 वर्षांची प्रदिर्घ परंपरा आहे. माध्यमांनी दलीत, दुबळे व मागासवर्गीयांचे प्रश्न हिरीरीने मांडावेत.
जगामध्ये वर्तमानपत्रांची संख्या कमी होत असतानाच भारतामध्ये मात्र वर्तमानपत्रांची संख्या वाढत आहे. माध्यमांनी दिखावा करण्याचे आणि राजकीय लाभार्थी होण्याचे टाळावे, ही काळाची गरज आहे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. वृत्तपत्रांनी जनतेचे प्रश्न मांडावे आणि शासनाच्या चूका माध्यमांनी दाखवून देणे गरजेचे आहे असे ते म्हणाले. महापुरुषांची शिकवण सर्वांनी आचरणात आणावी असे आवाहन अरुण खेारे यांनी यावेळी केले.
माहिती उपसंचालक मोहन राठोड यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात वृत्तपत्रांनी समाज प्रबोधनाचे कार्य केले, स्वातंत्र्यप्राप्तीमध्ये वृत्तपत्रांचे योगदान मोठे आहे असे सांगितले. सध्याच्या माहिती तंत्रज्ञान युगामध्ये मुद्रीत माध्यमांचे महत्व टिकून आहे असे सांगून प्रसिध्दी माध्यमांमध्ये कार्यरत असणाऱ्यांनी वाचनाची आवड जोपासावी असे सांगितले. माहिती व जनसंपर्क विभाग आणि पत्रकार हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यामुळे समन्वयाने कार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात अला. या कार्यक्रमाला पत्रकार, विभागीय व जिल्हा माहिती कार्यालयांचे कर्मचारी उपस्थित होते.
000
Subscribe to:
Posts (Atom)