Wednesday, February 15, 2017

जिल्हा परिषद पंचायत समिती उमेदवारांच्या प्रचार सीडी तपासणीचे अधिकार आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना


पुणे दि. 14 : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये उमेदवारांच्या टेलिव्हीजन, रेडिओ, केबल व अन्य इलेक्ट्रॉनिक माध्यमावरील प्रचारासाठीच्या श्राव्य (ऑडिओ) आणि दृकश्राव्य (व्हीडिओ) जाहिरात सी. डी. तपासणीचे व प्रमाणपत्र देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी एका आदेशानुसार संबंधित तालुक्यांच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना प्रदान केले आहेत.
            या आदेशानुसार उमेदवारांनी आपले इलेक्ट्रॉनिक प्रचारसाहित्य तपासणीसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करावयाचे आहे. संबंधित ऑडिओ वा व्हिडीओ सी. डी. व मजकुराची तपासणी  निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर उपसमिती स्थापन करुन करण्यात येणार आहे. त्यानंतर तपासणीअंती निवडणूक निर्णय अधिकारी प्रमाणपत्र देण्याबाबत योग्य तो निर्णय घेतील, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
0000

Sunday, February 5, 2017

जिल्हा परिषदेसाठी आज 173 आणि पंचायत समितीसाठी 314 नामनिर्देशन पत्रे दाखल




पुणे दि. 5 : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2017 अंतर्गत जिल्ह्यातून आज पाचव्या दिवशी जिल्हा परिषद विभागासाठी 173 तर पंचायत समिती निर्वाचक गणांसाठी 314 नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत. नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याच्या पाचव्या दिवस अखेर जिल्हा परिषद विभागासाठी  279 तर पंचायत समिती निर्वाचक गणांसाठी 490 नामनिर्देशन पत्रे दाखल झाली असल्याची माहिती जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक समन्वय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांनी दिली.
            आज दिनांक 5 फेब्रुवारी 2017 रोजी जिल्हा परिषद विभागासाठी व पंचायत समिती निर्वाचक गणांसाठी (कंसात) दाखल करण्यात आलेल्या तालुकानिहाय नामनिर्देशन पत्राबाबतची सविस्तर माहिती खालील प्रमाणे आहे. जुन्नर – जिल्हा परिषद विभागासाठी 15 (पंचायत समिती निर्वाचक गणासाठी 38), आंबेगाव – 11 (21), शिरुर – 13 (26), खेड – 12 (33), मावळ – 3 (14), मुळशी – 5 (18), हवेली – 38 (51), दौंड – 14 (18), पुरंदर – 13 (26), वेल्हे – 2 (5), भोर – 5 (10), बारामती – 14 (21), इंदापूर – जिल्हा परिषद विभागासाठी 28 (पंचायत समिती निर्वाचक गणासाठी 33) याप्रमाणे नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत. नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याचा उद्याचा शेवटचा दिवस आहे, अशीही माहिती श्री. चव्हाण यांनी दिली.
                                                            00000

२५ ते २७ मे दरम्यान जी.डी.सी. अँड ए परीक्षा ऑनलाईन अर्ज १० फेब्रुवारी पासून



पुणे, दि. ४ (विमाका):  सहकार विभागामार्फत घेण्यात येणारी जी.डी.सी. अँड ए व सी.एच.एम. या परीक्षा दि. २५, २६ व २७ मे २०१७ रोजी राज्यातील १६ परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार असून परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत १० फेब्रुवारी ते १० मार्च २०१७ अशी आहे, अशी माहिती जी.डी.सी. अँड ए बोर्डाचे सचिव तथा उपनिबंधक सहकारी संस्था (परीक्षा व प्रशिक्षण) यांनी दिली आहे.
राज्यातील मुंबई, ठाणे, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सोलापुर, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, अकोला, अमरावती, नागपूर आणि चंद्रपूर या १६ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. परीक्षा अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याबाबतचे मार्गदर्शन आणि ऑनलाईन परीक्षा अर्जhttps://www.mahasahakar.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर १० फेब्रुवारी २०१७ पासून उपलब्ध करून देण्यात येतील. परीक्षेच्या सविस्तर माहितीसाठी उपरोक्त संकेतस्थळासह सहकार आयुक्त कार्यालयाच्या https://sahakarayukta.maharashtra.gov.in/  या संकेतस्थळाला भेट द्यावी, असेही आवाहन सचिवांनी केले आहे.
****

Friday, February 3, 2017

डेव्हिस कप टेनिस स्पर्धेचा ड्रॉ राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत संपन्न




महाराष्ट्राची स्पोर्टस् कॅपीटल म्हणून
पुणे शहर ओळखले जाईल
                                                                    ... राज्यपाल सी.विद्यासागर राव

·        भारत-न्यूझीलंड दरम्यान डेव्हिस कप स्पर्धा सामन्यांना उद्यापासून सुरुवात
·         43 वर्षानंतर डेव्हिस कप स्पर्धेचे पुण्यामध्ये आयोजन

          पुणेदि02– पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असून वाहन उद्योगाचे सर्वात मोठे केंद्र आहे. गेल्या काही वर्षापासून पुणे माहिती तंत्रज्ञानाचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जात आहे. शिक्षण क्षेत्रातील योगदानामुळे पुण्याला पूर्वेचे ऑक्सफर्ड म्हटले जाते. आता यापुढे पुणे महाराष्ट्राची स्पोर्टस् कॅपीटल म्हणून उदयास येईल, असा विश्वास राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी आज येथे व्यक्त केला.
          बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा नगरीत आशिया-ओशेनिया गटातील भारत-न्यूझीलंड संघादरम्यान खेळण्यात येणाऱ्या डेव्हीस कप टेनिस स्पर्धेचा ड्रॉ राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत काढण्यात आला,  त्यावेळी ते बोलत होते. यावेळी डेव्हीस कप स्पर्धा आयोजन समितीचे अध्यक्ष आणि प्रधान सचिव डॉ.नितीन करीर, विभागीय आयुक्त एस.चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी सौरभ राव, आंतरराष्ट्रीय पंच अँड्री कॉरनिलोव्ह, भारतीय टेनिस महासंघाचे  उपाध्यक्ष प्रशांत सुतार, स्पर्धेचे संचालक सुंदर अय्यर, भारत व न्युझीलंड संघाचे खेळाडू उपस्थित होते.
          यावेळी राज्यपाल सी.विद्यासागर राव म्हणाले की, कुशल संघटक, युध्दकौशल, मुत्सदी शासक, दूरदृष्टी व शौर्याचे प्रतिक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना मी अभिवादन करतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे बांधण्यात आलेल्या क्रीडानगरीत ही स्पर्धा होत आहे, याचा मला आनंद आहे. सन 2006 साली मुंबई येथे पार पडलेल्या डेव्हिस कप स्पर्धेचा ड्रॉ राजभवन येथे काढण्यात आला होता. सन 2006 मधील स्पर्धा व पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये भारताचा टेनिस स्टार लियांडर पेस हा समान दुवा आहे. गेली सुमारे पंचवीस वर्षे लियांडर पेसने भारतीयांच्या टेनिस खेळाबद्दलच्या अपेक्षा पूर्ण केल्या, असे सांगून, तो भारताचा रॉजर फेडरर आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
          डेव्हिस कप स्पर्धेला 117 वर्षांचा इतिहास असून, जवळपास 135 देश या स्पर्धेमध्ये सहभागी होतात. या खेळामुळे जनतेमध्ये व खेळाडुंमध्ये देशभक्ती निर्माण होते.  शारीरिक व मानसिकदृष्टया परिपूर्ण खेळाडूच या स्पर्धेमध्ये यशस्वी होतात. पुणे येथे 43 वर्षांनी डेव्हिस कप स्पर्धा पार पडत आहे, याबद्दल राज्यपालांनी समाधान व्यक्त केले. पुणेकरांनी नेहमीच खेळ व खेळाडूंना प्रोत्साहन दिले आहे. या स्पर्धेतून स्थानिक खेळाडूंनी प्रोत्साहन घेऊन क्रीडा नैप्युण्य वाढवावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
          महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशन व महाराष्ट्र शासनाचा क्रीडा विभाग यांनी एकत्र येऊन टेनिस व इतर खेळांच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करावेत व उदयोन्मुख खेळाडूंसाठी राज्यभर प्रशिक्षणाचे आयोजन करावे, असे आवाहन यावेळी राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी केले.
          खेळामध्ये जय-पराजय होत असतात. मात्र खेळ, डेव्हिस कप स्पर्धा आणि स्पर्धकांची खेळाडूवृत्ती नेहमी विजयी होईल, असा विश्वास राज्यपाल सी.विद्यासगर राव यांनी यावेळी व्यक्त केला.
          कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र टेनिस संघटनेचे सचिव राहुल क्षीरसागर यांनी केले.
          कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारत व न्युझीलंड संघातील खेळाडूंचे फेटा बांधून व औक्षण करुन पारंपारिक पध्दतीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांची मिरवणूक काढण्यात आली.  मिरवणूकीदरम्यान शालेय विद्यार्थ्यांनी खेळाडूंचे टाळयांच्या गजरात स्वागत केले.
डेव्हिस स्पर्धेचे ड्रॉ
          प्रथम एकेरी मॅच-युकी भांबरी (भारत) विरुध्द फिन टिअरर्नी (न्युझीलंड), द्वितीय एकेरी-रामकुमार रामनाथन (भारत) विरुध्द जोस स्टॅथम (न्युझीलंड), प्रथम दुहेरी-लियांडर पेस-विष्णु वरदान (भारत) विरुध्द आर्टेम सीटाक व मायकेल व्हिनस (न्युझीलंड), द्वितीय दुहेरी-युकी भांबरी व रामकुमार रामनाथन (भारत)  विरुध्द फिन टिअरनी व जेास स्टॅथम (न्युझीलंड)
000

Wednesday, February 1, 2017

सेवानिवृत्तांनी बँकेकडे केवायसी फॉर्म जमा करावे


        पुणेदि.1 : राज्य शासकीय तसेच निमशासकीय वेतनधारक व निवृत्तीवेतनधारकांचे निवृत्ती वेतन बँकेतील खात्यावर जमा करण्यात येते. भारत सरकार– आयकर विभाग यांच्या मार्गदर्शक सुचनांनूसार सर्व बँक खातेदारांना बँक व्‍यवहारांसाठी PAN कार्ड क्रमांक अनिवार्य करण्यात आलेला आहे. यासाठी सर्व खातेधारकांनी  बॅकेकडे  केवायसी (KYC) फॉर्म भरुन सादर करणे आवश्यक आहे. सर्व वेतनधारक व  निवृत्तीवेतनधारकांनीही त्यांच्या बँक खात्यासाठी PAN  क्रमांक देणे बंधनकारक आहे.
          अदयापही बऱ्याच वेतनधारक व निवृत्तीवेतनधारकांनी त्यांचे PAN कार्ड क्रमांक किंवा फॉर्म 60/61 बँकेमध्ये सादर केलेले नसल्याचे निदर्शनास आले आहे. बँक प्रणालीमध्ये ऑनलाईन व्यवहार करताना  PAN कार्ड क्रमांक नसल्याने ऑनलाईन व्यवहार पूर्ण होत नाही. त्यामुळे संबंधितांना वेतन किंवा निवृत्तीवेतन मिळण्यास अडचण किंवा विलंब होऊ शकेल. सर्व राज्य शासकीय वेतनधारक व निवृत्तीवेतनधारकांनी त्यांचे  PAN कार्ड क्रमांक किंवा 60/61 संबधित बँकेकडे त्वरीत सादर करावे, असे आवाहन वरिष्ठ कोषागार अधिकारी संजय राजमाने यांनी केले आहे. 
                                                                                  
000000

पंचायत समिती गणासाठी एक नामनिर्देशनपत्र दाखल


पुणेदि. 1  : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2017 अंतर्गत जिल्ह्यातून आज पहिल्या दिवशी हवेली तालुक्यातील क्रमांक 74- वाडेबोल्हाई या गणासाठी अमित तानाजी गोते (अपक्ष) यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे, अशी माहिती जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक समन्वय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांनी दिली. जिल्हा परिषद विभागासाठी आज जिल्ह्यातून एकही नामनिर्देशनपत्र दाखल झाले नाही, असेही त्यांनी सांगितले.
0000

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक नामनिर्देशनपत्र सुट्टीच्या दिवशीही स्वीकारण्यात येणार : जिल्हाधिकारी सौरभ राव


पुणेदि. 1  : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2017 साठीच्या निवडणूक कार्यक्रमानुसार दिनांक 1 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी 2017 दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 3 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार आहेत. रविवार दिनांक 5 फेब्रुवारी या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीदेखील सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार आहेत, असे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी स्पष्ट केले आहे.
            नामनिर्देशनपत्राची छाननी 7 फेब्रुवारी 2017 रोजी सकाळी 11 वा. पासून केली जाणार आहे. छाननीनंतर लगेचच दिनांक 7 फेब्रुवारी रोजी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. नामनिर्देशनपत्राचा स्वीकार करण्याबाबत किंवा ते नामंजूर करण्याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने दिलेल्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायाधिशांकडे अपील करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2017 अशी राहील. अपीलांवरील निकालाची संभाव्य तारीख 13 फेब्रुवारी असणार आहे. अपील नसल्यास नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा दिनांक 13 फेब्रुवारी तर अपील असलेल्या ठिकाणी नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचीतारीख 15 फेब्रुवारी असणार आहे. मतदान केंद्रांची यादी दिनांक 15 फेब्रुवारी 2017 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मतदानाची तारीख 21 फेब्रुवारी 2017 रोजी सकाळी 7.30 ते सायं. 5.30 अशी राहील. मतमोजणी दिनांक 23 फेब्रुवारी 2017 रोजी होईल, अशी माहितीही श्री. राव यांनी दिली आहे.
0000