Friday, May 19, 2017

इतर गावांनी आदर्श घ्यावा असे झाले आहे धामणेरचे काम ---- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



इतर गावांनी आदर्श घ्यावा 
असे झाले आहे धामणेरचे काम
                                   ----  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

                सातारा दि. 19 (जि.मा.का.) :  राज्यातील कुठल्याही गावांनी मला जर विचारले तर मी म्हणेल आदर्श गाव पाहण्यासठी  धामणेरला जा. राज्यातील इतर गावांनी आदर्श घ्यावा असे पथदर्शी काम या गावाने केले आहे. त्याबद्दल ग्रामस्थांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो,  असे कौतुक  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
                कोरेगाव तालुक्यातील धामणेर येथे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी भेट देऊन प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांची पाहणी केली. यावेळी सहपालकमंत्री सदाभाऊ खोत, आ. बाळासाहेब पाटील, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रविणसिंह परदेशी, पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस अधिक्षक संदीप पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक एन. एल. थाडे आदी उपस्थित होते.
                मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी घन कचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाची पाहणी करुन कम्युनिटी बायोगॅस प्रकल्पाचीही पाहणी केली. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना  माहिती दिली. यानंतर ग्रामस्थांना मार्गदर्शन करतांना मुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले,धामणेरच्या ग्रामस्थांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे. ते पाहण्यासाठी मी आज आलो आहे. खरं तरं मीच गावाचे अभिनंदन आणि आभार मानायला हवेत,असे भावोद्गार काढून, त्यांनी ग्रामस्थांचे मन:पूर्वक अभिनंदन केले. आपली गावं आपण कशी चांगली करु शकतो, याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणले धामणेर आहे, असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले, गावाने गरिबातल्या गरिबाचाही विचार केला आहे. 2022 पर्यंत देशातल्या प्रत्येक गरीबाला घर मिळालं पाहिजे ही प्रधानमंत्री यांची संकल्पना इथे साकार होत आहे. जिल्ह्यातील 7 हजार घरे आम्ही बांधायला घेतली आहेत. याबाबत जिल्हाधिकारी आणि मुख्यकार्यकारी अधिकारी या दोघांचेही मी अभिनंदन करतो. पंडित दिनदयाल उपाध्याय योजना घरकुलांसाठी आणली आहे.  त्यामधून 50 लाखाचे अनुदानही दिले जाते. शासनाची योजना उत्तमपणे यशस्वी केवळ ग्रामस्थांच्या पाठबळावरच होत असते, धामणेरकरांनी आपल्या कामाच्या माध्यमातून राज्यातील इतर गांवांना आदर्श घालून दिला आहे.
                राज्यातल्या उत्तमातील उत्तम गाव ठरणाऱ्या धामणेरकरांनी अन्य गावांसाठी प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव दिला आहे. मी निश्चितपणे केंद्र शासनाला विनंती करुन हे प्रशिक्षण केंद्र धामणेरमध्ये होण्यासाठी मी प्रयत्न करेन. गावाच्या पाठीमागे निश्चितपणे शासन उभं राहील, अशी ग्वाहीही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी शेवटी दिली.
                यावेळी सरपंच शहाजी क्षीरसागर यांनी गावातील केलेल्या प्रकल्पांविषयी माहिती दिली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवी शिवदास, चंद्रशेखर जगताप, आनंद भंडारी, प्रांतांधिकारी हिम्मत खराडे, सामाजिक कार्यकर्ते विक्रम पावसकर, अतुल भोसले, साताराचे नगरसेवक धनंजय जांभळे, आनंदराव कणसे, निवृत्त भारतीय कर अधिकारी अनिल पवार आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गुढ्या उभारुन मुख्यमंत्र्यांचे स्वागत
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी धामणेर ग्रामस्थांनी सर्व घरांवर गुढ्या उभ्या केल्या होत्या. रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांच्या आगमनावेळी ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी करुन त्यांचे आपल्या गावात स्वागत केले.

मुख्यमंत्र्यांनी साधला लाभार्थ्यांशी संवाद
प्रधानमंत्री आवास योजनेमधून घरकुल मिळालेल्या लाभार्थी  शालिनी पवार यांच्याशी अगदी आस्थेवाईक विचारपूस करुन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी संवाद साधला. शौचालयाचा नियमीत वापर करा. परिसर स्वच्छ ठेवा. अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

पुरस्कार प्राप्त धामणेर
जिल्हा स्मार्ट ग्राम प्रथम पुरस्कार सन 2016-17.
बाबासाहेब आंबेडकर सामाजिक एकता पुरस्कार सन 2016-17
संत गाडगेबाब ग्राम स्वच्छता अभियान जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार सन 2001-02
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार सन  2003-04
संत ग्राडगेबाबा ग्राम स्वच्छताअभियान जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार सन 2004-05
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा विभागस्तरावर द्वितीय  पुरस्कार सन 2004-05
माजी राष्ट्रपती दिवंगत ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते 24 फेब्रुवारी 2005 रोजी निर्मल ग्राम पुरस्कार.
जिल्हास्तरीय अस्पृश्यता निर्मुलन प्रथम पुरस्कार सन 2002
यशवंत पंचायत राज अभियान विभागस्तर प्रथम पुरस्कार सन 2004-05
विभागीयस्तर वसंतराव नाईक पाणी व्यवस्थापन प्रथम पुरस्कार सन 2003-04
शाहु फुले आंबेडकर दलित वस्ती सुधार अभियानात जिल्हास्तरीय द्वितीय पुरस्कार सन 2006-07
राज्यस्तरीय वनश्री प्रथम क्रमांक सन 2006-07

                                                                                                                00000
राष्ट्र कार्य करणऱ्या पवारवाडीकरांना मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा
                                                                  
          सातारा दि. 19 (जि.मा.का.) :  पवारवाडीकरांनी आपल्या श्रमदानामधून राज्य दुष्काळमुक्त करुन जलयुक्त बनविण्यासाठी अतिशय चांगलं काम केलं आहे. या त्यांच्या राष्ट्र कार्याला, समाज कार्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारवाडी ग्रामस्थांचे कौतुक केले.
                कोरेगाव तालुक्यातील पवारवाडी येथे गामस्थांनी केलेल्या श्रमदानातून  विविध जलसंधारणाच्या कामांची पाहणी मुख्यमंत्री        श्री. फडणवीस यांनी आज केली. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी सहपालकमंत्री सदाभाऊ खोत, आ. बाळासाहेब पाटील, मुख्यमंत्र्यांची प्रधान सचिव प्रविणसिंह परदेशी, पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे, रोहयोचे उपजिल्हाधिकारी संजय पाटील आदी उपस्थित होते.
                ग्रामस्थांचे  अभिनंदन करुन मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, अतिशय चांगलं काम पवारवाडी ग्रामस्थांनी केलेले आहे. दुष्काळावर जर मात करायची असेल तर ते श्रमदानातून करण्यात येते,  हे त्यांनी दाखवून दिले आहे. पावसाचा थेंब न् थेंब आपल्या गावचा आपल्या मालकीचा आहे. तो गावातच थांबला पाहिजे आणि मुरला पाहिजे. माथा ते पायथा विविध उपचार करुन आपण पाणी आडवतो त्याबरोबरच मातीही अडविली पाहिजे. या कामामुळे माती थांबते. त्यातून पाणी भूगर्भात जाते आणि गाव जलयुक्त होते. पवारवाडी ग्रामस्थ वॉटर कप स्पर्धेसाठी दावेदार आहे, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही, असेही ते शेवटी म्हणाले.
                यावेळी इंधनाबाबतचा 1 लाख 93 हजाराचा धनादेश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी  सरपंच राजेंद्र पवार यांना दिला.  यावेळी वन विाभागाच्या वतीने मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.
                याप्रसंगी उपवनसंरक्षक अनिल अंजनकर, तालुका कृषी अधिकारी सुनील साळुंखे, रहिमतपूरचे नगरसेवक सुनील माने, साताराचे नगरसेवक धनंजय जांभळे,  आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जलयुक्त शिवार अभियान श्रमदानातून केलेली कामे
डीप सीसीटी 17 हजार मीटर
दगड बांध 2 हजार 700 मीटर
वृक्ष लागवड संख्या 903
लहान माती बांध संख्या 6
सी सी टी  1 हजार 267 मीटर
एल बी एस ( अनघड दगड बांध) 135
विहीर पुनर्भरण  15
ठिबक सिंचन 126 हेक्टर
यांत्रिक कामे
गाळ काढणे  15 हजार घन मीटर
ओढा रुंदीकरण 15 हजार 400 घन मीटर
मोठा माती बांध  5
नाविन्य उपक्रम
जाळी बंधारा 2
टायर बंधारा 1
शोष खड्डा 190

वन विभागाचे एक्सलंट काम
वन विभागाच्यावतीने  मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी वृक्षारोपण केले. गतवर्षी लावण्यात आलेल्या वृक्षारोपणाची पाहणी करुन वन विभागाचे एक्सलंट काम आहे असे गौरवोद्गार काढून उप वनसंरक्षक अनिल अंजनकर यांचे त्यांनी अभिनंदन केले.

                                                                                0000000









Saturday, May 13, 2017

सिव्हील हॉस्पिटलच्या आधुनिकीकरणास भरीव निधी देणार – पालकमंत्री देशमुख





                   सोलापूर दि.13 :- श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालयाच्या सिव्हील हॉस्पिटल आधुनिकीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून भरीव निधी देऊ,असे आज पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सांगितले.
                   पालकमंत्री देशमुख यांच्या हस्ते आज रूग्णालयात रक्तघटक विलीगीकरण यंत्रणेचे लोकार्पण आणि राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमातंर्गत टू डी इको तपासणी  शिबीराचे उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर शोभा बनशेट्टी ,आमदार सिध्दराम म्हेत्रे, मुख्यमंत्री कार्यालयातील विशेष कार्य अधिकारी ओमप्रकाश शेट्ये, अधिष्ठता डॉ. राजाराम पोवार , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मल्लिकार्जुन पट्टणशेट्टी, जिल्हा आरोग्य अधिकारी शीतलकुमार जाधव आदी उपस्थित होते.
                   पालकमंत्री देशमुख म्हणाले , ‘सिव्हील हॉस्पिटल सोलापूरसह इतर चार-पाच जिल्ह्यातील रूग्णांना आधार आहे. सिव्हील हॉस्पिटलमध्ये अनेक रूग्ण येतात. त्यांना चांगली सेवा देता यावी यासाठी गेली दोन वर्षे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी दिला आहे. यापुढे गेल्या वर्षी पेक्षा जास्त निधी देऊ .या निधीतून सिव्हील हॉस्पिटलच्या परिसरातील रस्ते विकास पण केला जाईल,असे सांगितले’.
                   श्री. ओमप्रकाश शेट्ये यांनी गरीब रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासन नेहमी तत्पर आहे. गरीबांवर उपचार होण्यासाठी शासकीय रूग्णालये बळकट होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी सर्वत्र निधी दिला जात आहे. सोलापूरलाही निधी दिला जाईल.
                   विकृतीशास्त्र विभागचे प्रमुख डॉ. जी. ए. पंडीत यांनी प्रास्ताविक केले. रक्त विलीगीकरण यंत्रणेमुळे रक्तातील विविध घटक स्वतंत्र करता येतात. त्याचा फायदा अनेक रूग्णांना होऊ शकतो. रक्तातील आवश्यक घटक स्वतंत्र करून योग्य मात्रेत प्रत्येक रूग्णाला देता येणे शक्य आहे. त्यामुळे रक्ताच्या एका बाटलीतील घटकांचे विलीगीकरण करून अनेक रूग्णांवर उपचारासाठी वापरणे शक्य आहे.
000000

Saturday, May 6, 2017

नागरिकांना वेळेत सेवा देण्यावर भर द्या : नोंदणी महानिरीक्षक कवडे


नागरिकांना वेळेत सेवा देण्यावर
भर द्या : नोंदणी महानिरीक्षक कवडे
हवेली सहदुय्यम निबंधक कार्यालयाचे उदघाटन
पुणे, 6 – नागरिकांना वेळेत आणि अचूक सेवा देण्यावर भर द्या, अशा सूचना नोंदणी महानिरीक्षक अनिल कवडे यांनी आज येथे दिल्या.
सह दुय्यम निबंधक, हवेली क्रमांक दोनच्या कार्यालयाचे आज नूतन वास्तूत स्थलांतर आणि उदघाटन झाले. त्यावेळी श्री. कवडे बोलत होते. यावेळी नोंदणी उपमहानिरीक्षक चिंतामणी भुरकुंडे, पुणे विभागाचे नोंदणी उपमहानिरीक्षक सोनप्पा यमगर, सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी अनिल पारखे प्रशासकीय अधिकारी बी.के. खांडेकर आदी उपस्थित होते.
दस्त नोंदणीची वाढती संख्या लक्षात घेता बिबवेवाडी येथे प्रशस्त जागेत आणि संगणकीकृत यंत्रणेनेयुक्त असे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयातून नागरिकांना कोणत्याही अडचणीशिवाय सेवा मिळावी. हे कार्यालय नोंदणी कार्यालयांचे आदर्श कार्यालय ठरावे, अशी अपेक्षाही श्री. कवडे यांनी व्यक्त केली. यावेळी श्री. कवडे यांनी कार्यालयातील अभिलेख्यांची आणि संगणकीय व्यवस्थेचेही पाहणी केली.
बिबवेवाडी येथील पुष्पा हाईटस इमारतीत पाच हजार चौरस फुटाच्या प्रशस्त जागेत हे कार्यालय स्थलांतरित करण्यात आले आहे. या कार्यालयात आय सरिता प्रणालीच्या माध्यमातून संगणकीकृत नोंदणी करण्याचे कामकाजही सुरू करण्यात आले आहे. कार्यालयात दस्त ठेवण्यासाठी स्वतंत्र अभिलेख कक्ष आहे. या अभिलेख्यांचे संगणकीकरण करण्यात  आले आहे. नागरिकांना कार्यालयात बसण्यासाठी प्रशस्त जागा असून कार्यालयापासून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही उपलब्ध आहेत.
कार्यालयाचा पत्ता असा- सह दुय्यम निबंधक, हवेली क्रमांक दोन, पुष्पा हाईटस, बिबवेवाडी कॉर्नर, पुणे-सातारा रोड, पुणे. दूरध्वनी क्रमांक - 8275090071

----

Thursday, May 4, 2017

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पाचगणी पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे उद्घाटन

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पाचगणी पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे उद्घाटन
सातारादि. 4 (जि.मा.का) :   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पाचगणी येथील पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे  उद्घाटन फित कापून आज झाले यानंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी पोलीस ठाण्याच्या डायरीत  संदेश लिहून पोलीसांना शुभेच्छा दिल्या.
पोलीस विभागाकडून स्थापन करण्यात आलेल्या पर्यटन पथकाला मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले.  यानंतर दक्ष या पुस्तकाचे प्रकाशनही  मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी  शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडेसार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदेपदुम मंत्री महादेव जानकरपालकमंत्री विजय शिवतारेआमदार मकरंद पाटीलविभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटीलजिल्हाधिकारी श्वेता सिंघलपोलीस अधीक्षक संदीप पाटील, अपर पोलीस अधीक्षक‍ विजय पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, पोलीस उपअधीक्षक आर.आर. पाटील यांच्यासह  पोलीस विभागातील अधिकारीकर्मचारी,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000
 

पुस्तकाचे गाव ‘भिलार’ने देशात इतिहास रचला
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         साहित्यिक व प्रकाशकांनी याठिकाणी येऊन प्रकाशन समारंभ घ्यावा.
·         भिलारचा आदर्श अन्य गावांनीही घ्यावा.
·         सुंदर संकल्पनेबद्दल शिक्षणमंत्री व ग्रामस्थांचे मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक.
·         भिलार येथे साहित्यिक व प्रकाशकांची मांदियाळी
·         साहित्यिकांनी प्रकाशन समारंभ ठेवल्यास आपण येऊ-मुख्यमंत्री.

पुणे, दि. ४ (विमाका): थंड हवेच्या ठिकाणी वसलेले भिलार हे गाव यापूर्वी स्ट्रॉबेरीच्या नावाने ओळखले जायचे. आता पुस्तकाचे गाव म्हणून ओळखले जाणार असून, भिलार वासियांनी या निमित्ताने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशात आपली आगळी वेगळी ओळख प्रस्थापित केली आहे. यापुढे सहलीसाठी पसंतीचे ठिकाण म्हणून या गावाकडे निश्चितपणे पाहिले जाईल. तथापि, वाचन संस्कृती रुजविण्यासाठी व समृद्ध करण्यासाठी साहित्यिक व प्रकाशकांनी या ठिकाणी येऊन कार्यक्रम घडवून आणावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
भारतातील पहिल्या पुस्तकाच्या गावाचे उद्घाटन आज भिलार येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण व मराठी भाषा विभागाचे मंत्री विनोद तावडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, पशु संवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, साताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतारे, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, आमदार मकरंद पाटील, मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी श्रीमती श्वेता सिंघल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, सभापती रुपाली रासपुरे, सरपंच वंदना भिलारे, बाळासाहेब भिलारे, विक्रम पावसकर, अतुल भोसले  आदी उपस्थित होते.
देशातील पहिले पुस्तकाचे गाव ही आगळी-वेगळी सुंदर संकल्पना राबवून ती कार्यान्वित केल्याबद्दल मराठी भाषा विभागाचे मंत्री विनोद तावडे व भिलार गावच्या ग्रामस्थांचे  अभिनंदन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘भिलार ने देशात या निमित्ताने वेगळा इतिहास रचला आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात एकीकडे वाचन संस्कृती कमी होते की काय? अशी भीती व्यक्त होत असताना, भिलार वासियांनी , नाही.. आपल्याला वाचन संस्कृती ही पूर्वजाने दिलेली आहे. ती कमी होऊ देणार नाही असा संदेश या निमित्ताने दिला आहे. आज गावामध्ये उत्साह व आनंदाचे वातावरण आहे. महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिक गावात आले आहेत. प्रत्येकाच्या घरासमोर रांगोळीने गाव सजले आहे. भिंतीवर बोलके चित्र काढलेले आहे. जो कोणी गावात येईल, तो या गावाच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही, असा आशावाद व्यक्त करून मुख्यमंत्री म्हणाले, या गावातील प्रत्येक घर सदासर्वकाळ पुस्तकाचे घर असणार आहे. या गावातल्या लोकांनी पुस्तकालाच आपले कुटुंब मानले आहे. संत तुकारामांनी म्हंटल्याप्रमाणे ‘आम्हा घरी धन, शब्दाचीच रत्ने’ याचा प्रत्यय या गावातल्या लोकांनी आपल्या कृतीतून दाखविला आहे. या ठिकाणी येणाऱ्यांसाठी यापुढे स्ट्रॉबेरीची चव व वाचनाची भूक भागविण्याची नामी संधी मिळणार आहे.
महाराष्ट्रात वाचन संकृती नवीन नाही. मराठी ही भाषा समृद्ध आहे. या भाषेचे आकर्षण अन्य भाषिकांनाही राहिलेले आहे. मराठीची प्रशंसा अन्य भाषेतील साहित्यकांनी वेळोवेळी केली आहे. मराठी भाषेवर जेवढी चर्चा होते तेवढी चर्चा अन्य भाषेवर होत नसावी, असे स्पष्ट करून ते पुढे म्हणाले,मराठी भाषेत जेवढी संमेलने होतात, तेवढी अन्य भाषेत पाहायला मिळत नाहीत. आज भिलार वासियांनी नवीन पाउल टाकत असताना इतिहास देखील रचलेला आहे. महाबळेश्वर व पाचगणीला येणारा पर्यटक भिलारला भेट दिल्याशिवाय जाणार नाही. एवढं कर्तृत्व या गावाने करून दाखविले आहे. साहित्यातून ज्ञानाची कक्षा रुंदावत असते. वाचन केल्याने माणूस प्रगल्भ बनतो. आपल्या देशात स्वातंत्र्याच्या काळात साहित्याने मोठी भूमिका बजावलेली आहे. तसेच जगात जेवढ्या राज्यक्रांती झाल्या, त्यातही साहित्याचे मोठे योगदान आहे. आपण डिजिटल जगात वावरत असलो तरी वाचनाची सवय मात्र कमी होत नसते. ज्ञान वाचनातून मिळते, कीर्तनातूनही मिळते. त्यामुळे साहित्य संस्कृतीही संपू शकत नाही, असेही ते यावेळी म्हणाले.
आपण खूप काही करतो पण डॉक्युमेंटेशनमध्ये कमी पडतो. तेव्हा यापुढे यादृष्टीने देखील आपण प्रयत्न करावे, अशी अपेक्षा व्यक्त करून, वाचन संस्कृती जपून ठेवल्यास येणाऱ्या पिढीसाठी ते पोषक असणार आहे. पुस्तकाच्या भिलार या गावात सर्वच प्रकारची पुस्तके उपलब्ध आहेत. त्यामुळे पर्यटकांना निखळ आनंद मिळेल आणि जाताना तो काहीतरी ठेवा घेऊन जात आहे. अशी त्याची भावना होईल, अभिरुची वाढावी यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे, जेणेकरून भिलार सारख्या अन्य गावांनाही प्रेरणा मिळेल. यापुढे साहित्यिक व प्रकाशकांनी याठिकाणी येऊन प्रकाशन समारंभ घ्यावा, मी सुद्धा त्या कार्यक्रमाला निश्चित येईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
शालेय शिक्षण व मराठी भाषा विभागाचे मंत्री विनोद तावडे यांनी पुस्तकाचे गाव भिलार याविषयी आपल्या संकल्पना विषद करताना म्हणाले, ‘परदेशात अशा प्रकारची संकल्पना रुजू शकते तर आपल्या देशात का नाही? या जाणीवेतून हे विचार पुढे आले. भिलार गावचे सरपंच आणि ग्रामस्थ यांचा प्रतिसाद मिळाल्यामुळे पुस्तकाचे गाव ही संकल्पना साकार झाली. या गावाच्या परिसरात महाबळेश्वर व पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण आहे. याचा लाभ पर्यटकांना निश्चितच होईल, या जाणीवेतून या गावाची निवड केली. भविष्यात भिलार सारखे अन्य गावही पुढे यावेत, असे आमचे प्रयत्न असणार आहेत. याठिकाणी देश-विदेशातील साहित्य देखील उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील. महाराष्ट्रातील मुलांची सृजनशीलता वाढावी यासाठी सहलीचे नियोजनदेखील केले जाईल. मुलं या गावात  येतील. इथली साहित्य व संस्कृती सोबत घेऊन जातील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आता स्ट्रॉबेरीबरोबरही पुस्तकेही या गावात राहील. येणाऱ्या पर्यटकांच्या सूचनांची दखल घेण्यात येईल, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल आणि ग्रामस्थांनी दाखविलेल्या उत्साहाबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.
मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात अशा प्रकारचा उपक्रम हा देशातील पहिला आहे. मराठी साहित्य आणि मराठी माणसं याचं अतूट अस नात आहे. भविष्यात अन्य गावही भिलारच अनुकरण करतील, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब भिलारे यांनी आपल्या भाषणात स्ट्रॉबेरीची ओळख असणारे भिलार आता पुस्तकाचं गाव म्हणून नावलौकिक मिळवणार आहे. याचा आम्हाला अत्यंत आनंद होत असून, आता आमची जबाबदारी अधिक वाढली आहे. यापुढेही परिसराच्या विकासासाठी आम्ही प्रयत्न करू असा विश्वास व्यक्त केला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन आगळ्या-वेगळ्या पद्धतीने झाले. याशिवाय ‘पुस्तकाच गाव भिलार’ यावर आधारित चित्रफित दाखविण्यात आली. या चित्रफितीतून भिलारवासियांनी दाखविलेल्या औदार्याची माहिती मिळते.
प्रारंभी भिलारच्या सरपंच वंदना भिलारे यांच्या निवासस्थानी जाऊन आणि काही घरांना भेटी देऊन मुख्यमंत्र्यांनी माहिती जाणून घेतली. आजचा कार्यक्रम आगळा-वेगळा असल्याने साहित्यिक व रसिक मोठ्या संख्येने आले होते. कार्यक्रमाचे सूत्र-संचालन अंनत खासबारदार यांनी केले.

*****