Monday, September 11, 2017

योग्यता प्रमाणपत्राच्या कारवाईचे व्हिडीओ चित्रीकरण करण्याचे आदेश कायम -परिवहन आयुक्त डॉ.गेडाम



पुणेदि. 11 :-  वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र तपासणीचे काम करण्याबाबत परिवहन आयुक्त कार्यालयाने सर्व अधिनस्त कार्यालये  व अधिका-यांना स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. यात कोणत्याही प्रकारचे बदल करण्यात आलेले नसून योग्यता प्रमाणपत्राच्या कारवाईचे व्हीडीओ चित्रीकरण करण्याचे आदेश कायम आहेत, अशी माहिती राज्याचे परिवहन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
            परिवहन आयुक्त कार्यालयाने सीसीटिव्ही शिवाय वाहनांची योग्यता प्रमाणपत्र देण्याचे आदेशित केल्याच्या प्रसिध्द झालेली बातमी चुकीची आहे. मुंबई उच्च्‍ न्यायालयाने जनहित याचिका क्रमांक 28/2013 श्री. श्रीकांत माधव कर्वे विरुध्द राज्य शासन व इतर याप्रकरणात दिनांक 18 फेब्रुवारी 2016 रोजी व त्यानंतर वेळोवळी दिलेल्या आदेशानुसार वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र तपासणीचे काम करण्याबाबत परिवहन आयुक्त कार्यालयाने सर्व अधिनस्त कार्यालये  व अधिका-यांना स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. त्यात कोणत्याही प्रकारचे बदल करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. त्यानुसार सर्व योग्यता प्रमाणपत्राच्या कारवाईचे व्हीडीओ चित्रीकरण करण्याचे आदेश कायम असल्याचे परिवहन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी स्पष्ट केले आहे.
                                                            0000

‘लोकराज्य’ विशेषांकाचे पालकमंत्री बापट यांच्या हस्ते प्रकाशन


पुणे, दि. 11 : शासनाचे मुखपत्र असलेल्या ‘लोकराज्य’ या मासिकाच्या ‘आपले जिल्हे विकासाची केंद्रे’ या विशेषांकाचे प्रकाशन  अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालक मंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते विधान भवन येथे झाले. यावेळी खा. सुप्रिया सुळे, आ.दत्तात्रय भरणे, जिल्हाधिकारी सौरभ राव, विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक मोहन राठोड, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग तसेच संग्राम इंगळे व रोहित साबळे उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. बापट यांनी हा विशेषांक स्पर्धा परीक्षा देणारे उमेदवार, पत्रकार, अभ्यासक, शिक्षक, सर्वसामान्य नागरिक व विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल, असे सांगून शुभेच्छा दिल्या.
सप्टेंबर महिन्यातील या विशेषांकामध्ये पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी लिहिलेल्या ‘सुबक आणि सुंदर’ या शीर्षकाचा जिल्ह्यातील विकास कामांवरील आधारीत लेखाचा समावेश आहे.
याशिवाय राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या, पूर्णत्वास गेलेल्या व नजीकच्या काळात सुरु होणाऱ्या विविध योजना व विकास कामांची माहिती देण्यात आली आहे. या मध्ये पुणे विभागातील सातारा जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाचे यश, घरकुलासाठी योजना, शेतकरी सन्मान, पुस्तकांचे गाव भिलार, विकास आराखड्याला मंजुरी या योजनांची माहिती देण्यात आली आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र विकास आराखडा, पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास, विकासासाठी ‘जायका’, प्रभावी जलयुक्त शिवार अभियान, छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळा विषयी माहिती देण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील रस्ते विकासातून समृध्दी, दळणवळण सेवांचे बळकटीकरण, सर्वांसाठी आरोग्य, उच्च शिक्षणाचा विस्तार, स्वच्छता अभियानाचे नेत्रदीपक यश, तीर्थक्षेत्र विकास आराखडा, उद्योग विकास, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेल्या योजनांची माहिती देण्यात आली आहे. कार्यक्रमास संजय गायकवाड, चंद्रकांत खंडागळे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
00000


पालकमंत्री बापट यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न


पुणे, दि. 11: खडकवासला, चासकमान व पवना प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक येथील विधान भवनात अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालक मंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीस खा. सुप्रिया सुळे, आ. अजित पवार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, आ. दत्तात्रय भरणे, आ. बाळा भेगडे, आ. बापू पाचर्णे, आ. भिमराव तापकीर, आ. सुरेश गोरे, जिल्हाधिकारी सौरभ राव, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर , पुणे महानगरपालिकेचे आयुक्त कुणाल कुमार, सिंचन विभागाचे अधीक्षक   अभियंता चोपडे आदि अधिकारी उपस्थित होते.
प्रारंभी पालकमंत्री गिरीश बापट यांनी जिल्ह्यातील खडकवासला, चासकमान व पवना प्रकल्पातील उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याचा आढावा घेतला. शेतकऱ्यांना शेतीसाठी व शहरातील लोकांना पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन करा अशा सूचना पालकमंत्री  बापट यांनी सिंचन विभागाला दिल्या.
खडकवासला प्रकल्पांतर्गत पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला ही धरणे येतात. खडकवासला प्रकल्पांतर्गत सिंचनासाठी 25 हजार हेक्टर क्षेत्र तर अनुज्ञेय पाणीवापर 5.46 द.ल.घ.मी. आहे. जनाई शिरसाई उपसा सिंचन योजना वरवंड व शिर्सुफळ तलाव भरण्यासाठी 0.28 द.ल.घ.मी. , दौंड, इंदापूर नगरपालिकेतील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी 0.14 द.ल.घ.मी., पुणे महानगरपालिकेसाठी 2.95 द.ल.घ.मी.पाणी आवश्यक असल्याची माहिती  बैठकीत देण्यात आली.  बैठकीला जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
00000



Sunday, September 10, 2017

सहकारातील चांगल्या संस्थाच्या मागे सरकार ठामपणे उभे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


पुणे दि. १० : राज्यातील ११ हजार विविध कार्यकारी संस्थांना पुनर्जीवित करुन सहकार समाजाच्या तळापर्यंत नेण्यासाठी सरकारचे काम सुरू आहे. सहकार क्षेत्रातील अपप्रवृत्तींवर अंकुश लावण्यासाठी सरकारने कडक पावले उचलली असली तरी सहकारातील चांगल्या संस्थांच्यामागे सरकार ठामपणे उभे असल्याची ग्वाही देत येत्या ऑक्टोबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.
            येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शताब्दी वर्ष सांगता कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात श्री. देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार उपस्थित होते. यावेळी सहकार मंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री गिरीष बापट, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, खासदार सुप्रिया सुळे, खासदार वंदना चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते, सहकार विभागाचे अप्पर मुख्य सचिव एस. एस. संधू, बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, नाबार्डचे मुख्य महाव्यवस्थापक राजेंद्र कुलकर्णी, कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रतापसिंह, सहकार आयुक्त डॉ. विजय झाडे, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, बँकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे, बँकचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय भोसले उपस्थित होते.
            देवेंद्र फडणवीस म्हणाले, आर्थिक संकटात अडकलेला शेतकरी आत्महत्येकडे वळतो अशा अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना उभारी देण्याचे काम सहकारी संस्था करत असतात. राज्यातील ४४ लाख शेतकरी संस्थात्मक कर्ज घेण्यास अपात्र होते. अशा शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देऊन त्यांना संस्थात्मक कर्जास पात्र करण्यासाठी राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आखली आहे. या कर्जमाफी योजनेत थकीत कर्जदाराबरोबरच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही लाभ होणार आहे. मात्र, ही कर्जमाफी करताना चुकीच्या आणि अपात्र लोकांना कर्जमाफी मिळू नये यासाठी ऑनलाईन अर्जांची प्रक्रिया करण्यात आली आहे. राज्यभरातून ऑनलाईन कर्जमाफी प्रक्रीयेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक ही ऑनलाईन कर्जमाफीचे अर्ज स्वीकारण्यात आघाडीवर आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा करून त्यांची दिवाळी गोड करण्याचे काम सरकार करणार आहे.
            कर्जमाफी हा शेतकऱ्यांच्या उत्थानाचा उपाय नाही. त्यासाठी शेतीमधील गुंतवणूक वाढविण्याची गरज आहे. शेतीमधील गुंतवणूक वाढवून शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला चांगला दर देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीने सरकार पावले उचलत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात सावकारांच्या पाशातून मुक्ती मिळविण्यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची स्थापना झाली. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्यात आर्थिक स्थैर्य आणि समृद्धी आणण्यात पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचा मोठा वाटा आहे. माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक करत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे लेस कॅशसह कॅश लेसचे स्वप्न साकारण्यासाठी हे उपयुक्त आहे.
केंद्रीय मंत्री अरुण जेटली म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळात जागतिक स्तरावर सुरु असणाऱ्या पहिल्या महायुद्धाच्या कालावधीत पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची स्थापना झाली. अशा कठीण काळात सुरु झालेल्या बँकेचे काम योग्य नियोजनामुळे चांगल्या प्रकारे सुरु आहे. या यशस्वीतेमागे संस्थेचा सचोटीचा व्यवहार कारणीभूत आहे. शेतकऱ्यांना कमी व्याजदराने पैसे देण्याचे काम या बँकेने केले आहे.
देशातील ग्रामीण भागांना रस्त्यांनी जोडण्याचे काम केंद्र व राज्य सरकारने हाती घेतले आहे. त्याचबरोबर प्रत्येक घरात वीज पोहोचविण्याच्या कामालाही प्राधान्य देण्यात आले आहे. देशातील ५५ टक्के जनता ही कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. सिंचन व्यवस्था हीच कृषी क्षेत्रासमोरील प्रमुख समस्या आहे. या सिंचन क्षेत्रावर केंद्र व राज्य सरकार अधिक खर्च करत असून सिंचन क्षेत्र वाढविण्यावर भर देण्यात आला आहे.
पद्मभूषण शरद पवारांचे काम हे राजकारण्याच्या पलीकडचे असून त्यांनी कायमच देशहिताला प्राधान्य दिले आहे. शेती आणि शेतकऱ्यांसाठी त्यांचे योगदान मोठे असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे काम चांगल्या प्रकारे सुरु असल्याचे श्री. जेटली यांनी सांगितले.
            श्री. शरद पवार म्हणाले, लोकमान्य टिळकांचे अनुयायी न. चि. केळकर यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची स्थापना केली. धनंजयराव गाडगीळांसारख्या मोठ्या व्यक्तींचे नेतृत्त्व या बँकेला लाभले. त्यामुळे या बँकेची वाटचाल योग्य प्रकारे सुरु आहे. या बँकेने सहा हजार कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा जिल्ह्यातील सर्वसामान्यांपर्यंत  केला आहे. या बँकेमुळे जिल्ह्याची अर्थव्यवस्था बदलली. दुष्काळासह इतर संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सहकारी बँकाच उभ्या राहतात. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी सरकारने सहकारी बँकेच्या पाठीशी उभे राहावे.
            सुभाष देशमुख म्हणाले, सहकाराच्या माध्यमातून महाराष्ट्र समृद्ध व्हावा हेच शासनाचे धोरण आहे. त्यासाठी शासन विविध स्तरावर प्रयत्न करत आहे.राज्यातील अडचणीत असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकांना सुस्थितीत असलेल्या इतर बँकांनी हात देण्याचे गरज आहे. राज्यातील सहकार टिकविण्यासाठी शासन सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
            यावेळी बँकेच्या शताब्दी स्मरणिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. ‘को-ऑपरेशन बियोंड बँकिंग’ या पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच पद्मविभूषण सन्मान मिळाल्याबद्दल शरद पवार यांचे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्यावतीने श्री. जेटली यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एटीएम मोबाईल व्हॅनचे उद्घाटन आणि ‘गाथा पीडीसीसी बँकेची’ या ध्वनीचित्रफितीचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते पोस्ट कार्यालयाच्यावतीने काढण्यात आलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विशेष पाकिटाचे प्रकाशन करण्यात आले.
            यावेळी माजी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार, रमेश थोरात यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संजय भोसले यांनी केले. तर आभार अर्चना घारे यांनी मानले

******






राज्यस्तरीय विकास परिषद राज्यातील सर्व जिल्हा परिषदेत झीरो पेंडन्सी अभियान राबविणार -ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे


पुणे दि. 8 (विमाका): ग्रामविकास विभाग हा राज्याच्या विकासाचा केंद्रबिंदू असून राज्यस्तरीय विकास परिषदेमुळे राज्याच्या विकासाला दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त करत ग्रामविकास विभागाचा कारभार अधिक गतीमान आणि पारदर्शक करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा परिषदेत झीरो पेंडन्सी अभियान राबविणार असल्याची माहिती ग्रामविकासमहिला व बाल‍ विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज दिली.
येथील जिल्हा परिषदेच्या शरदचंद्र सभागृहात राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाच्यावतीने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांचे अध्यक्ष,उपाध्यक्षविषय समिती सभापतीसर्व विभागीय आयुक्तमुख्य कार्यकारी अधिकारीउपायुक्त (आस्था/विकास), अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रकल्प संचालक यांच्या दोन दिवसीय राज्यस्तरीय विकास परिषद-2017चे उद्घाटन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते व पालकमंत्री गिरीष बापट यांच्या अध्यक्षतेखाली झाले. त्यावेळी श्रीमती पंकजा मुंडे बोलत होत्या. यावेळी पशूसंवर्धन मंत्री महादेव जानकर,ग्रामविकास राज्यमंत्री दादासाहेब भुसेपुण्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकातेग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता,विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी उपस्थित होते.
पंकजा मुंडे म्हणाल्याग्राम विकास विभागात कामाच्या अने‍क संधी आहेत. सामान्य लोकांच्या कल्याणासाठी हा विभाग अत्यंत महत्वाची भूमीका निभावतो. ग्रामविकास विभागाच्यावतीने मुख्यमंत्री ग्रामसडक योजना ही अत्यंत महत्वाची योजना राबविण्यात येत आहे. येत्या पाच वर्षात या योजनेंतर्गत राज्यातील 30 हजार किलोमीटर लांबीचे रस्ते पूर्ण करण्याचे उद्दीष्ट आहे. या योजनेमुळे ग्रामीण भाग हा विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी मदत होणार आहे. संबंधित विभागातील मानवी निर्देशकांची तपासणी करून रस्त्याच्या कामांचे वाटप करण्यात येत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने समन्यायी पध्दतीने या रस्त्यांचे काम सुरू आहे. या योजनेंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांचा दर्जा अत्यंत चांगला असून ग्रामीण भागातील लोकांच्यातून याबाबत चांगल्या प्रतिक्रीया येत आहेत.
राज्यातील शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या करण्याचे धोरण घेतल्यामुळे अनेक वंचित शिक्षकांना न्याय मिळाला आहेया निर्णयाचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे. राज्यातील पूनर्वसीत गावांना तसेच लहान तांड्यांना नवीन ग्रामपंचायतींचा दर्जा देण्याचे सरकारचे धोरण आहे. त्यामुळे ही गावे विकासाच्या प्रवाहात येणार आहेत. राज्यातील ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी केवळ त्याठिकाणी रस्ते बांधून उपयोग नाही तर त्या ठिकाणी गाव बांधण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी शासनाच्या विविध योजना सामान्यांपर्यंत पोहोचवून त्यांच्या हाताला रोजगार मिळवून देण्याचे काम अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी समन्वयाने करण्याचे आवाहन श्रीमती मुंडे यांनी केले.
ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट ग्राम योजनेच्या माध्यमातून राज्यातील ग्रामीण भागाचा चेहरा-मोहरा बदलून जाणार आहे. आता गावच्या विकासासाठी ग्रामपंचायतींना शासनाचा निधी थेट मिळत असल्याने सरपंचांची ताकद वाढली आहे. त्यामुळे सरपंचांची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. हा निर्णय ही दूरगामी परिणाम साधणारा आहे. कोणत्याही योजना या केवळ कागदावर असून चालणार नाहीत तर त्यासाठी त्याची यशस्वी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. राज्यातील सर्व जिल्हा परिषदांचा कारभार स्वच्छपारदर्शक आणि गतीमान करण्यासाठी सर्व जिल्हा परिषदांमध्ये झीरो पेंन्डसी योजना राबविण्यात येणार आहे. पुणे जिल्हा,राज्याचा सहकार विभाग आणि आता पुणे विभाग झीरो पेन्डसी करण्यात यशस्वी झालेल्या येथील विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांचे या कामासाठी मार्गदर्शन घेतले जाणार असल्याचे श्रीमती मुंडे यांनी सांगितले.
गिरीष बापट म्हणालेशासनाच्या योजना गरजूंपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. या राज्यस्तरीय विकास परिषदेच्या माध्यमातून राज्याच्या विकासासाठी काही धोरणात्मक निर्णय घेतले जातील.
महादेव जानकर म्हणालेग्रामीण भागाच्या विकासासाठी पशूसंवर्धन विभाग आणि ग्रामविकास विभाग यांनी समन्वयाने काम करण्याची आवश्यकता आहे. ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनात आर्थिक बदल घडवून आणण्यासाठी हे आवश्यक आहे.
दादासाहेब भुसे म्हणालेमहाराष्ट्रातील 55 टक्के जनता ही ग्रामीण भागात राहते. त्यामुळे राज्याचा विकास करण्यासाठी ग्रामीण विकासावर अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. त्यासाठी ग्रामविकास विभाग काम करत असून ग्रामीण भागातील सामान्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम सुरु आहे. ग्रामीण भागाचा आणि राज्यातील सर्व सामान्यांचा विकास करणे हेच ग्राम विकास विभागाचे उद्दीष्ट आहे.
दिवसभर चाललेल्या या परिषदेत पंतप्रधान ग्राम सडक योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेवर सादरीकरण करण्यात आले. तसेच ग्रामीण गृहनिर्माण योजना राज्य व्यवस्थापन कक्षाचे संचालक भारत शेंडगे यांनी स्मार्ट ग्रामरूरबन व पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेचे, एमएसआरएलएमच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमल यांनी महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानावर तर यशदाच्या एसआयआरडीचे संचालक अजय सावरीकर यांनी पदाधिकारीअधिकारी क्षमता बांधणी या विषयाचे सादरीकरण केले.
यानंतर या परिषदेसाठी राज्यभरातून आलेल्या सर्व जिल्हा परिषदांचे अध्यक्षउपाध्यक्षविषय समिती सभापतीसर्व विभागीय आयुक्त,मुख्य कार्यकारी अधिकारीउपायुक्त (आस्था/विकास), अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रकल्प संचालकांशी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेराज्यमंत्री दादासाहेब भुसेविभागाचे सचिव आसीम गुप्ता यांनी संवाद साधला.
*****




Thursday, September 7, 2017

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन राज्यातील 10 जिल्ह्यात प्रौढ साक्षरता कार्यक्रम राबविण्यात येणार


पुणे दि. 7: आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त  8 सप्टेंबर 2017 रोजी राष्ट्रीय साक्षरता मिशन प्राधिकरण स्कूल शिक्षा व साक्षरता विभागमानव संसाधन विकास मंत्रालयाच्यावतीने विज्ञान भवननवी दिल्ली येथे  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. साक्षर भारत योजनेंतर्गत महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यात प्रौढ साक्षरता कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती अल्पसंख्यांक व प्रौढ शिक्षण विभागाच्या प्रभारी उपसंचालक प्रिया शिंदे यांनी पत्रकाव्दारे दिली आहे.
पत्राकात म्हटले आहे, नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच मानव संसाधन मंत्री प्रकाश जावडेकरयांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडणार असून यावेळी मानव संसाधन राज्यमंत्री  उपेंद्र कुशवाहा, डॉ. सत्यपाल सिंह उपस्थित राहणार आहेत.
साक्षर भारत योंजनेंतर्गत महाराष्ट्रातील जालना,   हिंगोली,   गडचिरोली,   परभरणी,   बीड,  उस्मानाबाद, लातूर, नांदेड, नंदुरबार व गोंदिया या 10 जिल्हयातील प्रौढ निरक्षरांना साक्षर करण्याचे उद्दीष्ट आहे. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाचे औचित्य साधून दि. 8 सप्टेंबर 2017 रोजी या 10 जिल्हयामध्ये साक्षरता दिन साजरा करण्यात येणार आहे. याबाबत स्थानिक पातळीवर निरक्षर प्रौढ महिला व पुरुषांमध्ये निरंतर शिक्षणाचा प्रचार करण्यासाठी प्रभात फेरीसह  विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याच बरोबर आपले शिक्षण व आपला विकास आणि अक्षरधारा पुस्तक निरक्षरांना वाटणे, स्थानिक कलाकारांच्या निरंतर शिक्षणाबाबत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करुन समाजातील निरक्षरांना साक्षर होणेसाठी प्रोत्साहन देणे आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमांना अल्पसंख्यांक व प्रौढ शिक्षण विभागाचे प्रभारी संचालक टी.एन. सुपेप्र. उपसंचालक प्रिया शिंदेअधीक्षक  नितीन अलकुंटे, समाज शिक्षणाधिकारी डॉ. बी.एस. कारेकर उपस्थित राहणार असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
00000

Friday, September 1, 2017

विदयार्थ्यांनी अवांतर वाचनावर भर द्यावा -जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग




        पुणे, दि. 1 : पत्रकारिता क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थांनी अवांतर वाचन तसेच लिखाणाला जास्त महत्व द्यावे. शुध्दलेखन शब्दांचा योग्य प्रभावी वापर केल्यास विद्यार्थी पत्रकारितेच्या क्षेत्रात नाव कमावू शकतो, असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी आज येथे केले.
            बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या वृत्तपत्रविद्या जनसंवाद विभागाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा माहिती कार्यालयास भेट दिली, त्यावेळी त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी प्रा.जयप्रकाश पाटील, प्रा.रणजित पंडित उपस्थित होते.
            वृत्तपत्रविद्या जनसंवाद विभागाच्या विद्यार्थ्यांना, माहिती जनसंपर्क महासंचालनालय तसेच जिल्हा माहिती कार्यालयाच्या कामकाजाची ओळख व्हावी यासाठी भेटीचे आयोजन करण्यात आले होते. श्री.सरग यांनी यावेळी जिल्हा माहिती कार्यालयाच्या कामकाजाची माहिती विद्यार्थ्यांना दिली. शासनाचे मुखपत्र असलेल्या तसेच पाच भाषांतून प्रसिध्द होणाऱ्या लोकराज्य मासिकाबद्दल माहिती, आकाशवाणीवरुन प्रसारित होणारा दिलखुलास कार्यक्रम, जनसंपर्काची विविध माध्यमे, सोशल मिडीयाचा जनसंपर्कासाठी वापर याबद्दल मार्गदर्शन केले. दर्शनी वर्गिकृत जाहिराती आणि त्याचे महत्व याबद्दल माहितीसुध्दा विद्यार्थ्यांना देण्यात आली.
            प्रा.जयप्रकाश पाटील यांनी, जिल्हा माहिती कार्यालयास भेट तेथील कामाची प्रत्यक्ष पाहणी याचा विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात उपयोग होईल असे सांगितले. यावेळी जयंत कर्पे, रोहित साबळे, नितीन सोनवणे, मिलिंद भिंगारे, सुगतकुमार जोगदंड ,जिल्हा माहिती कार्यालयाचे कर्मचारी तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.
संवाद पर्व
            शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या लोककल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी माहिती जनसंपर्क महासंचालयानाच्यावतीने गणेशोत्सव काळात संवाद पर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. आज  विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती यानिमित्ताने देण्यात आली.

000000