Friday, January 10, 2020

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 116 वा पदवीदान समारंभ संपन्न विद्यार्थ्यांनी समाजासह देशाच्या उभारणीत योगदान द्यावे - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी



         पुणे दि. 8 (विमाका): विद्यार्थ्यांनी सुरुवातीपासूनच निश्चित ध्येय डोळ्यासमोर ठेवून उद्दिष्ट  प्राप्तीसाठी पूर्ण क्षमतेने प्रयत्न करावेत. स्व:तावर विश्वास ठेवून आपल्या बौद्धिक संपदेचा वापर  समाजाच्या आणि देशाच्या  उभारणीसाठी करण्याचे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज केले.
             येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा एकशे सोळावा पदवीदान समारंभ विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी फरिदाबाद (हरियाणा) येथील ट्रान्सलेशनल आरोग्य विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेच्या कार्यकारी संचालक प्रा. डॉ. गगनदीप कंग, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर,  प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी,  कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, परीक्षा विभागाचे संचालक अरविंद शाळीग्राम, विज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर उपस्थित होते.
                राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणाले, आपल्या देशात मुबलक मनुष्यबळ आहे.उच्च क्षमतेची बौध्दिक संपदा आहे.त्याचा वापर देशाच्या उभारणीसाठी करण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांनी वाईट विचार व वाईट कृती यांपासून दूर राहावे. चांगल्या लोकांची संगत करावी. चांगल्या संगतीमुळे योग्य मार्ग निश्चितच मिळतो. आज या ठिकाणाहून विविध क्षेत्रातील पदवी प्राप्त  विद्यार्थी नव्या दिशेने निघाले आहेत. या नव्या दिशेने जाताना आत्मविश्वासाने मार्गक्रमण करावे, अपयशाला कधीही घाबरु नका असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
              सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची कामगिरी नेत्रदिपक असल्याचे सांगत श्री. कोश्यारी म्हणाले, विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यापीठाने चांगली प्रगती केली आहे. विद्यार्थी हेच विद्यापीठाच्या प्रगतीचा पाया आहेत. त्यांच्या कामगिरीवरच विद्यापीठाचे मानक ठरत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यापीठाचे नाव उंचाविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
             डॉ. गगनदीप कंग म्हणाल्या, सावित्रीबाई फुले यांच्या नावाचा पुणे विद्यापीठाला मोठा वारसा आहे. विद्यार्थ्यांमध्ये नव्या संकल्पना, ज्ञान आणि कौशल्यांचा विकास करणे हाच शिक्षणाचा मुख्य उद्देश आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्यात समाजभान जागृत करणे आवश्यक आहे. पदवी प्राप्त करून नव्या जगात प्रवेश करताना शूर, जबाबदार आणि स्वयंपूर्ण बनण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
          यावेळी विद्यापीठातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना राज्यपालांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी राज्यपालांच्या हस्ते 'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वार्ता' अंकांचे प्रकाशन करण्यात आले.
            कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. नितीन करमळकर यांनी विद्यापीठाच्या विविध योजनांसह प्रगतीचा आढावा घेतला. या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षण तज्ज्ञ, पालक, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

****






माळशेजघाट येथे 10 जानेवारीपासून "माळशेज पतंग महोत्सव" पर्यटकांनी सहभागी होण्याचे आवाहन




पुणे, दि. 6 (विमाका) : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्यावतीने (एमटीडीसी) माळशेजघाट (जि. पुणे) येथील पर्यटक निवास येथे माळशेज पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 10, 11 12 जानेवारी 2020 रोजी होणाऱ्या या महोत्सवात पर्यटकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यांनी केले आहे.
येणाऱ्या संक्रात सणाचे औचित्य साधून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 10 ते 12 जानेवारी दरम्यान सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत विविध कार्यक्रम आयोजित होतील. महोत्सवामध्ये सहभागी होण्याकरिता प्रति व्यक्ती 50 रूपये प्रवेश शुल्क आहे. महोत्सवाच्या ठिकाणी पतंग, मांजा व इतर साहित्य खरेदीसाठी स्टॉल असेल. महोत्सव पर्यावरणपूरक असून परिसरामधील पशु, पक्षी यांना कोणतीही हानी अथवा इजा होणार नाही याची संपूर्ण खबरदारी व दक्षता घेण्यात येणार आहे. प्रतिबंध करण्यात आलेल्या कोणत्याही प्रकारच्या मांज्याचा महोत्सवामध्ये वापर करण्यात येणार नाही. हा महोत्सव प्रथमच आयोजित होत असून महोत्सवामध्ये बिन मांज्याचे पतंग, ड्रोन पतंगबाजी ही प्रमुख वैशिष्ट्ये असणार आहेत.
एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे म्हणाले की, राज्यातील एमटीडीसीच्या रिसॉर्टस् तथा पर्यटक निवासांचा आता कायापालट होत असून पर्यटकांना त्याकडे आकर्षित करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहीमेअंतर्गत माळशेजघाट येथे आतापर्यंत द्राक्षे महोत्सव, आंबा महोत्सव यांचे आयोजन करुन पर्यटकांना आकर्षित करण्यात आले आहे. आता पतंग महोत्सवाच्या माध्यमातून या पर्यटनस्थळाकडे पर्यटकांना पुन्हा आकर्षित करुन तेथील पर्यटनाला चालना देण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.    
महोत्सवामध्ये पर्यटकांना महिला बचतगटांच्या माध्यमातून बनविण्यात येणाऱ्या विविध स्थानिक खाद्य पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. ग्रामीण कलाकारांच्या कलाकृतींचे स्टॉलही उभारण्यात येणार आहेत. त्याचबरोबर सेंद्रीय खताद्वारे उत्पादीत शेतमालाची विक्री करण्यात येणार आहे. आदीवासी नृत्य, महिला लेझीम पथक, गोफ कला या विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून पर्यटकांना बैलगाडी सफारीचाही आनंद घेता येणार आहे.
पर्यटकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन पतंग महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे, वरिष्ठ व्यवस्थापक क्षिप्रा बोरा, माळशेजघाट पर्यटक निवासचे व्यवस्थापक विष्णू गाडेकर यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी माळशेजघाट पर्यटक निवासचे व्यवस्थापक विष्णु गाडेकर यांना 9373808151, 7768036332, 9881143180, 7038890500, 9823714878 या क्रमांकावर संपर्क साधावा.

*****





सार्वजनिक बांधकाम कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्यावतीने सभासदांच्या गुणवंत पाल्यांसह अभियंता-कर्मचाऱ्यांचा सत्कार



पुणे, दि.4 (विमाका): सार्वजनिक बांधकाम कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्यावतीने संस्थेच्या सभासदांच्या पाल्यांचा तसेच गुणवंत अभियंता व कर्मचाऱ्यांच्या सत्कार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या "भारतरत्न डॉ. सर विश्वेश्वरय्या सभागृहात करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता सदाशिव साळुंखे उपस्थित होते.
या कार्यक्रमा दरम्यान 46 गुणवंत विद्यार्थी व 16 कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यकारी अिभियंता मिलींद बारभाई, जे. आर. विभुते, पतसंस्थेचे अध्यक्ष प्रताप धापटे, अधिक्षक अभियंता प्रशांत औटी, उपमुख्य वास्तुशास्त्रज्ञ चेतन आक्रे, प्रभारी अधिक्षक अभियंता जयकर थोरात, अधिक्षक अभियंता सुरेश नलावडे उपस्थित होते.
यावेळी डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, सरकारी अधिकारी व कर्मचारी यांची मुलं म्हटल्यानंतर अनेकदा समाजाकडून जास्त अपेक्षा केल्या जातात व त्याचे दडपण निर्माण होते, परंतु अपेक्षांच्या ओझ्याखाली दडपून न जाता त्यावर उभे राहत स्वत:ला सिध्द करावे. डॉ. कोल्हे पुढे म्हणाले, लोकप्रतिनिधी या पदाकडे मी पाच वर्षांचा जॉब म्हणून पहातो. विकासकामे करण्यासाठी मला तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाची गरज आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने माझ्यासारख्या नव्याने आलेल्या लोकप्रतिनीधीला दिशा दाखविण्याचे काम केले, त्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अजीम नवाज राही यांनी केले, तर आभार प्रशांत वाघ यांनी मानले. या कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*****

सार्वजनिक बांधकाम कर्मचारी सहकारी पतसंस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थी व कर्मचाऱ्यांचा सन्मान



पुणे, दि.3 (विमाका) :-  सार्वजनिक बांधकाम कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वतीने संस्थेच्या सभासदांच्या पाल्यांचा तसेच गुणवंत अभियंता व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रताप धापटे यांनी पत्राद्वारे दिली आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिरुरचे खासदार व अभिनेते डॉ.अमोल कोल्हे उपस्थित रहाणार आहेत.
पत्रात नमूद केल्याप्रमाणे, हा कार्यक्रम 4 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता कॅम्पमधील भरतरत्न सर विश्वेश्वराय्या सभागृहात होणार असून या कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता सदाशिव साळुंखे अध्यक्ष म्हणून लाभणार आहेत. इयत्ता पाचवी ते बारावीच्या उत्तीर्ण पाल्यांचा शैक्षणिक गुणवत्तेचा गुणगौरव तसेच सार्वजनिक बांधकाम  विभागामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त गुणवंत अभियंते व कर्मचाऱ्यांचाही सन्मान करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
*****

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम प्रभावीपणे राबवा - डॉ दीपक म्हैसेकर



         पुणे दि. 2 (विमाका): युवा वर्गात उद्योजकतेची प्रेरणा निर्माण होण्यासाठी सहाय्यभूत ठरणारी सर्वसमावेशक स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देणारी महत्वाकांक्षी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज केल्या.
येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात विभागीय आयुक्त कार्यालय आणि महाराष्ट्र उद्योजकता केंद्र (एमसीइडी) शिवाजीनगर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत विभागीय कार्यशाळेचे उदघाटन विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुणे विभागाचे उद्योग सहसंचालक सदाशिव सुरवसे, उपायुक्त (महसूल) प्रताप जाधव, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट तज्ज्ञ विजय जाधव,  उद्योग संचालनालयाचे  अधीक्षकीय उद्योग अधिकारी सुरेश लोंढे, पी. डी. रेंदाळकर, बँक ऑफ महाराष्ट्रचे असिस्टंट जनरल मॅनेजर अभिनव  काळे, एमसीइडीचे विभागीय अधिकारी मदनकुमार शेळके, यु. डी. क्षीरसागर, उपस्थित होते. 
डॉ दीपक म्हैसेकर म्हणाले, मोठया प्रमाणावर रोजगार निर्मिती होण्यासाठी, सुलभ वित्तपुरवठा उपलब्ध करुन स्थानिक तरुणांना स्वयं-रोजगाराकडे आकर्षित करुन सुक्ष्म लघु उपक्रम स्थापित करणे हा मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (सीएमईजीपी) योजनेचा उद्देश आहे. ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे.
प्रास्ताविकात सदाशिव सुरवसे म्हणाले, राज्यातील युवक-युवतींना स्वयंपूर्ण आत्मनिर्भर बनविण्यासाठी, त्यांचे स्वयंरोजगार प्रकल्प राज्य शासनाच्या आर्थिक सहाय्यातून सुलभतेने निर्माण होण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना राबविण्यात येत आहे. पुढील पाच वर्षात सुमारे 1 लाख सुक्ष्म लघु उपक्रम स्थापित करून त्या माध्यमातून एकूण 10 लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याचे प्रमुख उद्दीष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी अभिनव काळे, सरेश लोंढे, पी.डी. रेंदाळकर यांनी सादरीकरण केले. या कार्यशाळेस अंमलबजावणी यंत्रणा, बँकेचे अधिकारी संबंधित अधिकारी उपस्थित होते.
*****









Thursday, December 12, 2019

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब घेतले आई एकवीरेचे दर्शन



पुणे दि.12 : मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब आपले कुलदैवत असलेल्या वेहेरगाव कार्ला येथील आई एकवीरेचे दर्शन घेतले. त्यांच्या समवेत पत्नी सौ. रश्मी ठाकरेपुत्र आ. आदित्य ठाकरे होते.मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री श्री.ठाकरे हे आपले कुलदैवत असलेल्या देवीच्या दर्शनासाठी आले.
यावेळी मावळचे आमदार सुनील शेळकेमाजी महापौर अनंत तरेमदन भोईनवनाथ देशमुखविलासराव कुटेकोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाडप्रांताधिकारी संदेश शिर्केतहसिलदार मधुसूदन बर्गे व इतर उपस्थित होते. दर्शनानंतर मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांचा देवस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला.






Wednesday, November 6, 2019

दोन दिवसात नुकसानीचे पंचनामे पूर्ण करणार -विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर




          पुणे दि. 6: पुणे विभागात अतिवृष्टीमुळे 1 लाख 89 हजार हेक्टर क्षेत्र बाधीत झाले असून बुधवार सकाळ पर्यंत 90 हजार हेक्टरवरील पिकाचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. येत्या दोन दिवसात सर्व बाधीत क्षेत्राचे पंचनामे पूर्ण करण्यात येणार असून ते शासनाला सादर करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांनी आज दिली.
          डॉ म्हैसेकर यांनी आज पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागातील पिकांची पाहणी केली. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल, उपजिल्हाधिकारी अजय पवार, उपविभागीय कृषी अधिकारी संगीता माने, आंबेगावच्या तहसीलदार रमा जोशी, जुन्नरचे तहसीलदार हनुमंत कोळेकर, आंबेगावचे गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, जुन्नरचे गटविकास अधिकारी विकास दांगट,  तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब मांदळे, टी. के. चौधरी, सतीश शिरसाट उपस्थित होते.
          डॉ. म्हैसेकर म्हणाले, पुणे विभागात सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक 74 हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे, त्या खालोखाल सांगली जिल्ह्याला फटका बसला आहे. सोलापूर जिल्ह्यात सोयाबीनचे, सांगली जिल्ह्यात द्राक्ष-डाळिंबाचे, सातारा जिल्ह्यात भाताचे तर पुणे जिल्ह्यात कांदा, बटाटा, सोयाबीन, भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या सर्व क्षेत्राचे पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, त्यानुसार वेगाने काम सुरू आहे. दोन दिवसात पंचनामे पूर्ण करण्यात येणार असून त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळू शकेल.
जिओ टॅगिंगचा वापर
       शेतकऱ्यांना विमा कंपन्याकडून भरपाई मिळण्यासाठी अडचण येऊ नये यासाठी जिओ टॅगिंगचा वापर करून फोटो काढून पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच याबाबत विमा कंपन्याच्या अधिकारी-प्रतिनिधींची बैठक घेऊन शेतकऱ्यांना योग्य ते सहकार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


रब्बीसाठी तातडीने कर्ज
          अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, त्यांना रब्बी हंगामासाठी तातडीने कर्ज देण्याच्या बँकांना सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी बँकांच्या प्रतिनिधीची बैठक घेण्यात आली असल्याचे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले. 
         डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज  खेड तालुक्यातील वडगाव (घेनंद) येथील संपत भिकू बवले, ज्ञानेश्वर बवले, रामचंद्र मधुकर कुलकर्णी, बबन नरहरी घेनंद-पाटील यांच्या शेतातील कोबी, मका, सोयाबीन, भुईमूग, बीट या पिकांच्या नुकसानीची पहाणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.
तसेच आंबेगाव तालुक्यातील पेठ  येथील सुरेश धोंडिबा धुमाळ आणि जयंत काशिनाथ थिटे यांच्या शेतातील बटाटा, कांदा, मका या पिकांची पहाणी केली. एकलहरे गावातील प्रमोद ढमाले यांच्या शेतीची पाहणी केली.
             जुन्नर तालुक्यातील सावरगाव-आर्वी येथील शांताराम कोरडे, पिंपळगाव तर्फे नारायणगाव येथील विठ्ठल खांडके, हिराबाई खांडके, गुंजाळवाडी येथील तुळशीराम ढवळे यांच्या शेतीची पाहणी केली.
***