Friday, April 10, 2020

नवीन कोरोना विषाणू (कोविड-19) सद्य :स्थिती व उपाययोजना दि. 10/04/2020 प्रेसनोट (संध्या 5.00 वाजेपर्यंत)

विभागीय आयुक्त कार्यालय,पुणे
नवीन कोरोना विषाणू   (कोविड-19) सद्य :स्थिती   व उपाययोजना
 दि. 10/04/2020
                     प्रेसनोट (संध्या 5.00 वाजेपर्यंत)

विभागातील  53  कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी.
आज विभागात  15  नवीन रुग्णांचे निदान.
 दि 09/04/2020 रोजी  3 कोरोना बाधीत रुग्णांचा मृत्यू.
‍ विभागातील एकुण रुग्ण संख्या 261.
ॲक्टीव रुग्ण संख्या 182
           आज विभागात 15 नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 261 झाली आहे. तथापी ॲक्टीव रुग्ण संख्या 182 आहे. विभागात कालच्या अहवालानंतर  दि 09/04/2020 रोजी 3 कोरोना बाधीत रुग्णांचा मृत्यू झालाआहे. अहवाल प्राप्त झालेल्या मृत्यूंपैकी सर्व 3 जण  पुणे महानगरपालिका क्षेत्रातील आहेत.
        1) दि 09/04/2020 रोजी ससून हॉस्पीटल येथे पुण्यातील 65 वर्षीय कोरोनाबाधीत  रुग्णाचा  मृत्यू झाला आहे. सदर रुग्णास उच्च रक्तदाब व मधुमेह होता.
2) दि 09/04/2020 रोजी  ससून हॉस्पीटल येथे पुण्यातील 65 वर्षीय कोरोनाबाधीत  रुग्णाचा  मृत्यू झाला आहे. सदर रुग्णास निमोनिआ, मधुमेह विकार होता.
3) दि 09/04/2020 रोजी  ससून हॉस्पीटल येथे पुण्यातील 44 वर्षीय कोरोनाबाधीत  रुग्णाचा  मृत्यू झाला आहे. सदर रुग्णास निमोनिआ विकार होता.
            आजपर्यत  विभागामध्ये एकुण 4137 नमूने तपासणीसाठी पाठविणेत आले होते त्यापैकी 3755 चा अहवाल प्राप्त आहे. 382 नमून्यांचा अहवाल  प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 3494 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 261 चा अहवाल  पॉजिटिव्ह आहे.
                     आजपर्यंत विभागामधील 23,63,202 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 97,06,804 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 772  व्यक्तीना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.
आज विभागीय आयुक्त यांनी विभागातील पोलीस आयुक्त ,जिल्हाधिकारी , मुख्य कार्यकारी अधिकारी , महानगपालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक, सीव्हील सर्जन व ‍
जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या समवेत व्हीडीओ कॉन्फरन्सगींद्वारे सविस्तर चर्चा केली यामध्ये 
1. कोरोना वैद्यकीय सुविधा
2. खाजगी हॉस्पीटलचा सहभाग
3. उपलब्ध क्वारंटाईन / आयासोलेशन सुवीधा
4. मृतदेह दहन / दफन
5. जीवनावश्यक वस्तू / वैद्यकीय उपकरणे/ औषध उत्पादन उद्योग सुरु असणेबाबत खात्री.
6. आरोग्य कर्मचारी / आशा वर्कर प्रशिक्षण , सेवानिवृत्त आरोग्य कर्मचारी उपलब्धता
7. बेघरांसाठीच्या सुविधा
8. सहकारी साखर कारखान्यांच्या मजुरांची व्यवस्था
9. अन्नधान्य / दूध / भाजीपाला पुरवठा स्थिती ,शिधापत्रिका नसलेल्यांसाठीची व्यवस्था
10. Community Kitchen  व तयार अन्न वाटप व्यवस्था
11. स्वयंसेवी संस्थांचा सहभाग व त्यांचे प्रश्न
12. मरकज / तबलीगींची शोध ‍ मोहीम 
         इत्यादी विषयांचा आढावा घेऊन महत्वपूर्ण सूचना केल्या .

-------------------------

वर्धमानपुरा सोसायटीकडून पंतप्रधान सहायता निधीस 5 लाख 71 हजारांची मदत

                                                     
        पुणे, दि.10 : कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी पंतप्रधान सहायता निधीसाठी बिबवेवाडी येथील वर्धमानपुरा को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने 5 लाख 71 हजार रुपयांचा धनादेश विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
  कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी जिल्हयातील व्यापारी, सामाजिक संस्था, उद्योग तसेच दानशुर व्यक्तींनी पंतप्रधान सहायता निधी व मुख्यमंत्री सहायता निधीस मदत करण्याच्या डॉ. म्हैसेकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत वर्धमानपुरा सोसायटीने ही मदत केली. यावेळस सोसायटीचे अध्यक्ष संजय शिंगवी, सचिव महावीर मांडोत, खजिनदार अमित मुनोत, जितो संस्थेचे उपाध्यक्ष अशोक हिंगड, अभय बोरा, विजय ठक्कर, आनंद दर्शन युवा मंचचे अध्यक्ष महेंद्र सुंदेचा मुथा, उद्योजक नितीन नहार यावेळी उपस्थित होते.
0000

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागातील सर्व जिल्ह्यांचा आढावा - विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी साधला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे संवाद



                                                पुणे, दि.10 : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी आज पुणे महसूल विभागातील सर्व जिल्हयातील प्रशासकीय प्रमुखांसमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे संवाद साधत विभागातील कोरोनावरील उपाययोजना, औषधोपचार, वैद्यकीय सामग्री, अन्नधान्य पुरवठा अशा विविधब बाबतीत  आढावा घेतला.

            केंद्र व राज्य शासनाने  दिलेल्या सूचनांनुसार कोरोना आजारावरील उपचार पध्दतीमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी व या अनुषंगाने लॉकडाऊन कालावधीतील अत्यावश्यक सेवा सुविधा याबाबत विभागातील पाचही जिल्हयातील जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक, वैद्यकीय व प्रशासकीय अधिकारी यांच्याशी विभागीय आयुक्त कार्यालयातून व्हीडीओ कॉन्फरसिंगव्दारे आयुक्तांनी चर्चा करुन सूचना दिल्या. यावेळी पुणे पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल, पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त मितेश गट्टे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर यांची उपस्थिती होती. तसेच सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस प्रशासन व आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

            डॉ. म्हैसेकर म्हणाले, कोरोनाबाधित रुग्णांवर केंद्र सरकार व राज्य सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार रुग्णाची कोवीड केअर, कोवीड आरोग्य केंद्र व कोवीड हॉस्पिटल अशी त्रिस्तरीय विभागणी करुन रुग्णांवर वैद्यकीय उपचार करावेत. यामुळे उपचारावरील ताण कमी होऊन रुग्णांची सौम्य ते गंभीर अशा स्तरावर विभागणी होऊन उपचार करण्यास सुलभता येईल. विभागांतर्गत सर्व जिल्हयातील औषध पुरवठा, वैद्यकीय उपकरणे, औषधांचा साठा याबाबत त्यांनी यावेळी माहिती घेतली. विभागात अडकलेले प्रवासी, मजूर यांची अन्न व निवासाची व्यवस्था करण्याच्या सूचना देऊन बेघर नागरिकांचीही नाईट शेल्टर अथवा शाळेत निवारा व भोजनाची व्यवस्था करावी, असे सांगितले. साखर कारखाना क्षेत्रातील मजूर स्थलांतरीत होणार नाही, याची दक्षता घेऊन त्यांचीही निवास व भोजनाची व्यवस्था करण्याच्या त्यांनी सूचना दिल्या. ‘आशा ’वर्कर, अंगणवाडी सेविका तसेच सेवानिवृत्त आरोग्य कर्मचारी ज्यांचे स्वास्थ्य उत्तम असून त्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह अथवा कोणताही गंभीर आजार नाही, अशा कर्मचाऱ्यांकडून तपासणीची कामे करुन घेण्याबाबत सूचना केल्या.
       14 एप्रिल नंतर केद्र व राज्य सरकार लॉकडाऊन वाढविणार की टप्प्याटप्पयाने यामध्ये शिथिलता आणणार, याबाबत सध्या कोणतेही निश्चित धोरण नसल्याने विभागामध्ये या दोन्ही संभाव्य बाबींची  परिस्थिती लक्षात घेऊन लॉकडाऊनबाबत प्रशासकीय तयारी ठेवावी. ग्रामीण भागातील पाण्याचे रोटेशनप्रमाणे योग्य वाटप होईल ,याबाबत सर्व जिल्हाधिकारी यांनी निर्णय घ्यावा. पुणे जिल्हयातील उप बाजार, आठवडी बाजार पूर्णत: बंद केले असून आजवर आवक झालेल्या मालाची विक्री होईपर्यंतच भाजीपाला नागरिकांना उपलब्ध करुन द्यावा. अन्नधान्य,जीवनावश्यक वस्तू , औषधे, लिक्वीड सोप, साबण, तेल, दूध यांचा सुरळीत पुरवठा ठेवण्याबाबतच्या सूचना आयुक्तांनी केल्या.

            कोरोनामुळे मृत पावलेल्या रुग्णावर गॅस अथवा विद्युत दाहिनीमध्येच अंत्यसंस्कार करावेत. कारण कोरोना विषाणू  बाधित मृत व्यकतीमुळे विषाणुचा प्रादुर्भाव वाढण्याची मोठी शक्यता असते. कोरोनाबाधित शव हाताळणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीपीई किट, सॅनिटायझर अशा सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. कोणत्याही नातेवाईकाला कोरोनाबाधित शव ताब्यात मिळणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.कोरोनाबाधित शव दफन करावयाचे असल्यास शहरापासून दूर अशा ठिकाणी 6 फूट खोल खड्डा खणून त्यामध्ये निर्रजंतूक लिक्वीड टाकूण हे शव प्लॅस्टीकच्या दोन बॅगात घालून त्याचे दफन करावे, अशाही सूचना डॉ.म्हैसेकर यांनी केल्या.

0000

कोरोनाचा धोका टाळण्यासाठी मुख्य बाजारासह खडकी, मोशी, उत्तमनगर आदी उपबाजार आजपासून बंद राहणार - विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर


पुणे,दि.१०: पुण्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा धोका टाळण्यासाठी पुण्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील मुख्य बाजार सह खडकी, मोशी,उत्तमनगर आदी उपबाजार आजपासून बंद राहणार आहेत. या सर्व मार्केट मधील फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा बाजार आजपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.

       कोरोना चा धोका टाळण्यासाठी पुण्यातील या सर्व मार्केट मधील विविध विभाग बंद राहणार आहेत. फळे, भाजीपाला विभागासह कांदा-बटाटा बाजार पूर्णपणे बंद राहतील.  या सर्व बाजारातील भुसार आणि कडधान्य विभाग मात्र सुरु राहणार आहेत. सर्व शेतकरी आडते, व्यापारी, कामगार व टेम्पो चालक या सर्व बाजार घटकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन डॉ.म्हैसेकर यांनी केले आहे.
000000

Thursday, April 9, 2020

'कोरोना' बाधित 7 रुग्णांचा मृत्यू विभागात 53 नवीन रुग्णांचे निदान


'कोरोना' बाधित 7 रुग्णांचा मृत्यू
विभागात 53 नवीन रुग्णांचे निदान
Ø  विभागात 40 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
Ø  विभागात एकूण रुग्ण संख्या 246

पुणे दि.9 : पुणे विभागात आज 53 नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे विभागातील 'कोरोना'  बाधित रुग्णांची संख्या 246 झाली आहे. आज विभागात 7 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 24 तासामध्ये अहवाल प्राप्त झालेल्या मृत्यू पैकी 6 पुणे महानगरपालिका क्षेत्रातील असून 1 बारामती मधील रहिवासी असल्याचे विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
सहयाद्री हॉस्पीटल,कर्वेरोड येथे पुण्यातील 42 वर्षीय कोरोना बाधित पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सदर रुग्णास श्वसन संस्थेतील जंतू संसर्ग, अल्कोहोलीक लिवर व मधुमेहाचा विकार होता.
 ससून हॉस्पीटल येथे पुण्यातील 63 वर्षीय कोरोना बाधित महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सदर रुग्णास निमोनिया व किडनीचा विकार होता.
पुण्यातीलच 60 वर्षीय कोरोना बाधित पुरुष रुग्णाचा ससून हॉस्पीटल येथे मृत्यू झाला आहे. सदर रुण्गास निमोनिया व किडनी विकार होता.
 बारामतीमधील 65 वर्षीय पुरुष रुण्गाचाही मृत्यू ससून हॉस्पीटल येथे झाला आहे. सदर रुग्णास निमोनिया विकार होता. तर नोबल हॉस्पीटल येथे पुण्यातील 62 वर्षीय कोरोना बाधित पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सदर रुग्णास निमोनिया, मधूमेह व या रुग्णाचे बहू अवयव निकामी झाली होते. जहांगीर हॉस्पीटल येथे पुण्यातील 62 वर्षीय कोरोना बाधित महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सदर रुग्णास मधूमेह व अल्सरचा विकार होता. ससून हॉस्पीटल येथे 58 वर्षीय कोरोना बाधित महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या रुग्णास निमोनिया व तीव्र श्वसन विकार होता, असे म्हटले आहे.
पुणे विभागातील बाधित रुग्ण व मृत्यू यांची संख्या
क्र
जिल्हा/मनपा
बाधीत रुग्ण
मृत्यू
1
पुणे (पुणे मनपा)
176
21
2
पुणे पिंपरीचिंचवड मनपा)
22
0
3
पुणे ग्रामीण
12
1
4
सोलापूर
0
0
5
कोल्हापूर
4
0
6
सातारा
6
1
7
सांगली
26
0
एकुण
246
23


कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विभागातील पुणे महानगरपालिका क्षेत्रामधील एकूण 35 चौरस कि.मी. क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. एकूण 15 वार्ड पैकी 2 वार्डमध्ये पूर्ण संचार बंदी लागू करण्यात आली असून 7 वार्डामधील प्रत्यकी 1 प्रभागामध्ये संचार बंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे सुमारे 10 लाख 50 हजार इतकी लोक संख्या प्रभावित झाली आहे. नागरिंकासाठी पुणे महानगरपालिका व पुणे सिटी कनेक्ट यांच्या वतीने आणि कनेक्टींग संस्थेच्या सहकार्याने मुख्यत्वे वसत्यामधील नागरिकांसाठी 'कोरोना विरुध्द वसती मित्र हेल्प लाईन' सुरु करण्यात आली असून सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वा.यावेळेमध्ये 020-65506923/24/25 या दुरध्वनी क्रमांकावर नागरिकांना संपर्क साधता येईल.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये 4 ठिकाणी, बारामती नगर परिषद क्षेत्रामध्ये 2 ठिकाणी व इस्लामपूर नगरपरिषद क्षेत्रामध्ये 1 ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असून याठिकाणी संचार बंदी लागू करण्यात आली आहे. आजपर्यंत विभागामध्ये एकूण 3 हजार 754 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 3 हजार 599 नमून्यांचा अहवाल प्राप्ता झाला आहे. 155 नमून्यांचा अहवाल प्रतिक्षेत आहे. प्राप्त अहवाला पैंकी 3 हजार 297 नमून्यांचा अहवाल  निगेटिव्ह असून 246 नमून्यांचा अहवाल पॉझीटिव्ह आहे.
आजपर्यंत विभागातील 22 लाख 34 हजार 974 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 92 लाख 440 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 732 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
000000


Wednesday, April 8, 2020

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपचार पध्दतीचे निश्चितीकरण -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर


कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपचार पध्दतीचे निश्चितीकरण
                           -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे दि.8 : 'कोरोना' बा‍धित रुग्ण व विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी उपचार पध्दतीचे निश्चितीकरण करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी केल्या.
विभागीय आयुक्त कार्यालयात 'कोरोना' बाधित रुग्णांवर उपचार सुरु असलेल्या शासकीय व खाजगी वैद्यकीय व्यावसायायिकांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रीमती रुबल अगरवाल, राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे माजी‍ संचालक डॉ.सुभाष साळुंखे, बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अजय चंदनवाले, नवले वैद्यकीय महाविद्यालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ.डी.बी.कदम तसेच ससून कोवीड हॉस्पीटल, नायडू हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
आजवर 'कोरोना' बाधित रुग्ण उपचार घेत असलेले व घरी गेलेल्या रुग्णावरील वैद्यकीय उपचार औषधे आणि त्यांच्या प्रकृतीबाबतचा आढावा बैठकीत घेण्यात आला. डॉ. म्हैसेकर म्हणाले, केंद्र शासनाने दिलेल्या सूचनांनूसार रुग्णांची वर्गवारी कोवीड काळजी केंद्र, समर्पित आरोग्य केंद्र व कोवीड हॉस्पीटल अशा तीन स्‍तरावर करणे आवश्यक आहे. (कोवीड केयर सेंटर) मध्ये प्राथमिक लक्षणे आढळलेल्या रुग्णास रुग्णालयात दाखल न करता हॉस्टेल,लॉज अथवा हॉटेल्स, जी 'कोरोना' रुग्णांच्या आयसोलेशनसाठी ताब्यात घेण्यात आली आहेत.अशा ठिकाणी ॲडमिट करुन रुग्णास निरिक्षणाखाली ठेवावे. 'कोरोना' बाधित संशयित रुग्णास (डेडीकेटेड हेल्थ सेंटर) दाखल करावे. अशा केंद्रात आयसोलेशनची, रुग्णवाहिकेची सुविधा आवश्यक आहे. 'कोरोना' बाधित गंभीर रुग्णांना कोवीड हॉस्पीटमध्ये दाखल करावे. याठिकाणी व्हेंटिलेटर, डायलेसिस यंत्रणा, तज्ञ डॉक्टर्स, ऑपरेशन थेटर,सर्जन व नर्सेस अशा अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा  व वैद्यकीय अधिकारी कर्मचारी आवश्यक आहेत. 'कोरोना' बाधित रुग्णांचे अशा प्रकारे वर्गकरण केल्यामुळे वैद्यकीय यंत्रणेचा भार कमी होऊन प्रभावीपणे उपचार करणे सोईचे होईल असे सांगून आयुक्त्तांनी वैद्यकीय उपचारांचा आढावा घेवून सूचना दिल्या.
            पुणे विभागामध्ये रक्त संकलनाची शिबीरे घेतली जात असून आवश्यकतेनुसार  रुग्णास रक्त पुरवठा करण्यात अडचण येणार नाही.
00000


'कोरोना' च्या पार्श्वभूमीवर मनपाचे ठराविक दवाखाने सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरु राहणार


'कोरोना' च्या पार्श्वभूमीवर मनपाचे  ठराविक दवाखाने
सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरु राहणार

पुणे दि.8 : पुणे शहरातील 'कोरोना' विषाणूचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी पुणे महानगरपालिकेमार्फत प्रतिबंधात्मक वैद्यकीय उपाययोजना करण्यात येत असून त्या अनुषंगाने नागरिकांना वैद्यकीय सुविधा सुलभपणे प्राप्त होण्यासाठी पुणे महानगरपालिका क्षेत्रातील ठराविक दवाखाने सकाळी 8 ते रात्री 8 यावेळेत सुरु ठेवण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.
महानगरपालिका क्षेत्रातील पुढीलप्रमाणे दवाखाने सकाळी 8 ते रात्री 8 यावेळेत सुरु राहतील. बाई भिकायजी पेस्तनजी बम्मनजी दवाखाना भवानी पेठ, कै. आनंदीबाई नरहर गाडगीळ दवाखाना दत्तवाडी, कै. बाळाजी रखमाजी  गायकवाड दवाखाना गंजपेठ, हिंदु ह्दयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे दवाखाना मित्र मंडळ चौक, कै. कलावतीबाई मावळे दवाखाना नारायण पेठ, कै. मामासाहेब बडदे दवाखाना नाना पेठ, हुतात्मा बाबुगेनू दवाखाना रविवार पेठ, कै. शिवशंकर पोटे दवाखाना सहकारनगर, कै. मुकुंदराव लेले दवाखाना शनिवार पेठ, कै. रोहिदास किराड दवाखाना गणेशपेठ, ग. भा. हिंदुमती मणिलाल खन्ना दवाखाना महर्षी नगर, कै. बापुसाहेब गेणुजी कवडे पाटील दवाखाना कोरेगाव पार्क, डॉ. बाबासाहेब आंबेडकर दवाखाना डायसप्लॉट, जनता वसाहत दवाखाना जनता वसाहत, युगपुरुष राजा शिवछत्रपती बिबवेवाडी (अप्पर) पुणे मनपा दवाखाना, पुणे मनपा दवाखाना वडगाव, स्व. विलासराव तांबे दवाखाना धनकवडी, कै. कलावतीबाई तोडकर दवाखाना सोमवार पेठ, श्री सद्गुरु शंकर महाराज दवाखाना बिबवेवाडी, स्व. प्रेमचंद ओसवाल दवाखाना अप्पर इंदिरानगर, हजरत मौलाना युनुस साहब रहेमतुल्ला अलेही दवाखाना संतोष नगर कात्रज, कै. रखमाबाई तुकाराम थोरवे दवाखाना जांभूळवाडी रोड आंबेगाव खुर्द, कै.जंगल राव कोंडिंबा अमराळे दवाखाना शिवाजी नगर, डॉ. दळवी रुग्णालय शिवाजीनगर, पुणे मनपा दवाखाना पांडवनगर.
पुणे महानगरपालिकेच्या आठ क्षेत्रिय कार्यालयाकडे वैद्यकीय पथकामार्फत 'कोरोना' बाधित भागांमध्ये वैद्यकीय तपासणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी या वैद्यकीय पथकांना रुग्णवाहिका, आवश्यक औषधे, साधन सामुग्री आवश्यक प्रमाणात उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
'कोरोना' विषयक नागरिकांचे प्रश्न, औषधोपचार अथवा शंका यांचे निरसन करण्यासाठी पुणे महानगरपालिका व पुणे सिटी कनेक्ट यांच्यावतीने आणि कनेक्टींग संस्थेच्या सहकार्याने 'कोरोना विरुध्द वस्तीमित्र हेल्पलाईन' सुरु करण्यात आली आहे. 'कोरोना' बाबत माहिती हवी असल्यास नागरिकांनी 020- 25506923/ 24/25 या दूरध्वनी क्रमांकावर या संपर्क साधण्याचे आवाहन पुणे आरोग्य विभाग यांनी केले आहे. 
****