Tuesday, January 18, 2022

'दिलखुलास' कार्यक्रमात संयुक्त सुरक्षा सेवा (सीडीएस) परीक्षेत देशातून सर्वप्रथम आलेल्या अपूर्व पडघान याची मुलाखत

 


            मुंबईदि. १८ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासया कार्यक्रमात केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या संयुक्त सुरक्षा सेवा (कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस ) परीक्षेत देशातून सर्वप्रथम आलेल्या अपूर्व पडघान याची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसेच न्यूज ऑन एआयआरया ॲपवर बुधवार दि. १९ आणि गुरूवार दि.२० जानेवारी २०२२ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल साळुंखे यांनी ही मुलाखत घेतली आहे.         

            संयुक्त सुरक्षा सेवा (कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस ) परीक्षेचे स्वरूपत्याचा अभ्यासक्रमपरीक्षेची तयारी कशी करावीआवश्यक संदर्भ साहित्यशारीरिक चाचणी आदि विषयांची सविस्तर माहिती अपूर्व पडघान यांनी 'दिलखुलासया कार्यक्रमातून दिली आहे.                 

00000

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता पुणे व नागपूर साठी 38 कोटी 58 लाख रूपयांचा निधी वितरीत


             मुंबईदि.१८ : राज्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणा-या विविध उपाययोजनांसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विभागीय आयुक्त पुणे व नागपूर यांना ३८ कोटी ५८ लाख रूपयांचा निधी वितरीत करण्यात आलेला आहे.

          विभागीय आयुक्त पुणे यांना २९ कोटी ९६ लाख रूपये वितरीत करण्यात आले असून, या विभागांतर्गत पुणे जिल्ह्याला ९ कोटी ४४ लाखसोलापूर जिल्ह्याला १० कोटीसातारा जिल्ह्याला १० कोटी ५२ लाख तसेच विभागीय आयुक्त नागपूर यांच्या अंतर्गत गडचिरोली जिल्ह्याला ८ कोटी  ६१ लाख रूपये असा एकूण ३८ कोटी ५८ लाख रूपये निधी या जिल्ह्यांना निधी वितरीत करण्यात आला आहे.  राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून निधी मागणीसाठी पुणेसोलापूरसातारा व गडचिरोली जिल्ह्यांनी केलेल्या मागणीनुसार प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छाननी करून राज्य कार्यकारी समितीने दिलेल्या मान्यतेनुसार हा निधी वितरीत करण्यात आला आहे.

0000

Wednesday, November 24, 2021

दुबई वर्ल्ड एक्स्पोमध्ये महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे सादरीकरण सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांची अबुधाबी फिल्म कमिशनला भेट

 



           मुंबईदि. 24 : दुबई येथे सध्या वर्ल्ड एक्स्पोचे आयोजन करण्यात आले असून त्यात महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव वेगवेगळ्या पद्धतीने सादर करण्यात आले आहे. या दरम्यान राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी अबुधाबीचे फिल्म कमिशनर हन्स फारकीन यांची भेट घेऊन उभय देशादरम्यान चित्रपट निर्मितीत लागणाऱ्या तंत्रज्ञानाचे आदान-प्रदान करण्यासंदर्भाततसेच या क्षेत्रात महाराष्ट्रात गूंतवणूक करण्याबाबत चर्चा केली.

              दुबई सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने १८ ते २३ नोव्हेंबर दरम्यान दुबई वर्ल्ड एक्सपोचे आयोजन करण्यात आले. या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभागाच्यावतीने महाराष्ट्रात चित्रीकरणासाठी निर्माण करण्यात आलेल्या सुविधांचे सादरीकरण करण्यात आले. चित्रपटविविध प्रकारच्या मालिकावेब सिरीज यांच्या चित्रीकरणासाठी सुलभ पद्धतीने ज्या सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत त्यांची माहिती जागतिक पातळीवर पोचवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. या अनुषंगानेच आज राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी अबुधाबीचे फिल्म कमिशन येथे भेट दिली.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे आदान-प्रदान व राज्यातील गुंतवणुकीबाबत चर्चा

             अबुदाबीचे फिल्म कमिशनर हन्स फारकीन यांच्याशी महाराष्ट्रातील चित्रपट निर्मिती व्यवसाय संदर्भाने मंत्री श्री.देशमुख यांनी चर्चा केली. मुंबई येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत नव्याने उपलब्ध केलेल्या सोयीसुविधांची माहिती दिली. अबुधाबी फिल्म कमिशन आणि दादासाहेब फाळके चित्रनगरीत दरम्यान आधुनिक तंत्रज्ञानाचे आदान-प्रदान व्हावेया संदर्भाने महाराष्ट्रात दुबई येथून गुंतवणूक व्हावी या बाबतही चर्चा झाली.

            अबुधाबी सांस्कृतिक आणि पर्यटन विभागाचे अध्यक्ष मोहम्मद-खलिफा-अल-मुबारक  यांचीही अमित देशमुख यांनी शिष्टमंडळासह भेट घेतली. दोन्ही देशांना उपयुक्त ठरेल या पद्धतीने मुंबई येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत संयुक्त प्रकल्प उभारण्याबाबत यावेळी चर्चा झाली. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय आणि दादासाहेब फाळके चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक कैलास पगारे यांच्यासह विस्टास मीडिया अबुधाबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी इंत्तीखाब चौगुलेअबुधाबी फिल्म कमिशनचे व्हाईस प्रेसिडेंट संजय रैना हेही सहभागी झाले होते.

            अबुधाबी येथे चित्रीकरण झालेल्या ‘एक था टायगर’‘विक्रम वेध’ या चित्रपटांच्या सेटला मंत्री श्री.देशमुख यांनी शिष्टमंडळासह भेट देऊन पाहणी केली. या ठिकाणी चित्रीकरणाच्या आधुनिक व्यवस्था व कार्यपद्धतीचा अनुभव घेतलाअशा प्रकारच्या अद्ययावत माहितीचे आदान-प्रदान झाले तर भविष्यात दोन्ही देश या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करू शकतील, अशी भावना श्री. देशमुख यांनी यावेळी व्यक्त केली.

००००

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची मुलाखत

  मुंबईदि. 24 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्रया कार्यक्रमात मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. वरिष्ठ सहाय्यक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.

         गुरूवार दि. 25 नोव्हेंबर 2021  रोजी सायंकाळी 7.30 वाजता ही मुलाखत महासंचालनालयाच्या पुढील लिंकवर पाहता येईल.

यू ट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर - https://twitter.com/MahaDGIPR

         भारतात मतदारांचे प्रकारमतदार होण्यासाठी आवश्यक पात्रतामतदार यादीत नाव नोंदवणेवगळणे व दुरुस्तीफॉर्म नंबर 6 सोबत आवश्यक असणारी कागदपत्रेदावा अर्ज आणि आक्षेपांची पडताळणीमतदारयादीमध्ये नोंदवलेल्या नावामध्ये मुद्रणदोष असल्यास तो दुरुस्त करण्यासाठीची पद्धती आदी विषयांची माहिती श्रीमती चौधरी यांनी 'जय महाराष्ट्रया कार्यक्रमातून दिली आहे.

0000



Monday, October 4, 2021

देशाचे भूषण असलेल्या रयत शिक्षण संस्थेचा इतर संस्थांनी आदर्श घ्यावा - उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत

 देशाचे भूषण असलेल्या रयत शिक्षण संस्थेचा  इतर संस्थांनी आदर्श घ्यावा

- उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत
  सातारा दि.4 (जिमाका) : रयत शिक्षण संस्थेत सर्वसामान्यांची मुले शिकत आहेत. या शिक्षण संस्थेत काळाच्या गरजेनुसार कौशल्यपूर्ण शिक्षण देण्यासोबतच शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुलांना रोजगारही उपलब्ध करुन दिला जात आहे. ही संस्था देशाचे भूषण असून या संस्थेचा आदर्श देशातील इतर संस्थांनी घ्यावा, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले.

 यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्युट ऑफ यासन्स येथे रयत शिक्षण संस्थेचा 102 वा वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.  कार्यक्रमास आमदार बाळाराम पाटील, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, सचिव डॉ. विठ्ठल शिवणकर, रामशेठ ठाकूर आदी उपस्थित होते.

           यावेळी बोलताना श्री. सामंत म्हणाले, पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शिक्षण क्षेत्रातील काम अमुल्य असे आहे. या संस्थेत साडेचार लाखहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.  संस्थेचे काम आदर्शवत असून संस्थेसाठी शासनाकडून सर्व सहकार्य करण्यात येईल
.
         देशातील विद्यार्थी बाहेरील देशातील विद्यापीठ पाहण्यासाठी, तेथे शिक्षण घेण्यासाठी जातात. भविष्यात रयत शिक्षण संस्था पाहण्यासाठी बाहेरील विद्यार्थी इथे येतील,  तसेच मुंबई, पुणे येथील विद्यार्थी रयत शिक्षण संस्थेत शिक्षणासाठी येतील असा विश्वासही श्री. सामंत यांनी व्यक्त केला.
        यावेळी डॉ. पाटील म्हणाले, रयत शिक्षण संस्थेचा वर्धापनदिन समाजाने दिलेल्या योगदानाचे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जात आहे. रयत शिक्षण संस्थेच्या जडण-घडणीत प्रबोधनकार ठाकरे यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. संस्थेकडून काळाच्या गरजेनुसार मुलांना शिक्षण देत असल्याचे त्यांनी सांगितले.

   
श्री. सामंत यांच्या हस्ते रयत विज्ञान पत्रिकेचे प्रकाशन व ई-रयत ॲपचा शुभारंभ करण्यात आला.
00000


वाई सुधारित पाणी पुरवठा योजनेसाठी ३५ कोटी-उपमुख्यमंत्री अजित पवार वाई नगर परिषदेच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन

 सातारा दि.4 (जिमाका) :वाई शहरासाठी सुधारित पाणी पुरवठा योजनेसाठी प्रस्ताव सादर करावा, त्यासाठी ३५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल,असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  केले.

वाई येथे आयोजित विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, सहकार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, जि. प.अध्यक्ष उदय कबुले, आमदार शशिकांत शिंदे, दीपक चव्हाण, मकरंद पाटील,  नगराध्यक्ष अनिल सावंत, जि.प. उपाध्यक्ष प्रदीप विधाते आदी उपस्थित होते.

श्री.पवार म्हणाले, वाई शहराचा विस्तार लक्षात घेता आवश्यक सुविधांची निर्मिती करण्यासाठी शासनाकडून सहकार्य करण्यात येईल. वाई, महाबळेश्वर, खंडाळा, लोणंद, पाचगणीतील विविध सुविधासाठी १० कोटी रुपये देण्यात येतील. वाई शहरातील भूमिगत गटार योजनेबाबत लवकरच बैठक घेण्यात येईल. कृष्णा घाट विकास आणि नदी सुधार योजनेचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात येईल. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या समवेत होणाऱ्या बैठकीत सुरुर-पोलादपूर राज्य महामार्गाचा राष्ट्रीय महामार्ग म्हणून समावे करण्याबाबत विनंती करण्यात येईल.

ते म्हणाले, शहरांचा विकास करताना ती स्वछ आणि नीटनेटकी असायला हवी. शहरातील सांडपाणी व्यवस्थापन चांगल्यारितीने होणे गरजेचे आहे. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी आग्रही भूमिका घ्यावी. नव्याने उभारण्यात येणाऱ्या शाळेच्या इमारतीमधून दर्जेदार शिक्षण देण्यात यावे. पुलाचे काम देखणे आणि दर्जेदार  व्हावे. भविष्यातील वाहतुकीची गरज लक्षात घेऊन डिसेंबर पर्यंत चार पदरी पुलाचा प्रस्ताव सादर करावा, येत्या अंदाजपत्रकात त्यासाठी मान्यता देण्यात येईल, असे श्री.पवार म्हणाले.

नगर परिषदेचे व्यापारी संकुल शहराच्या वैभवात भर घालणारे आणि नागरिकांना सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध जर  देणारे ठरावे असेही त्यांनी सांगितले.

कोविड योद्ध्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करताना उपमुख्यमंत्री म्हणाले, मानव जातीवर कोविडचे संकट आले असताना नागरिकांचा जीव वाचविण्याला या योद्ध्यांनी प्राधान्य दिले. त्यांनी खऱ्या अर्थाने मानवसेवेचे कार्य केले. आमदार मकरंद पाटील यांच्यासारख्यांचा सन्मान केल्याने  काम करणाऱ्याला प्रेरणा मिळते, असे त्यांनी सांगितले. वाई परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांचे पुनर्वसन करण्यास कुठलीही कमतरता भासू देणार नाही असेही श्री.पवार म्हणाले.

श्री.रामराजे नाईक निंबाळकर यांनी आमदार मकरंद पाटील यांनी कोरोना काळात सेवा भावनेने कार्य केले असे सांगितले. कृष्णा नदीवरील पुलामुळे वाईसाठी चांगली सुविधा होईल. पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपणावर भर देणे अवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

        पालकमंत्री पाटील म्हणाले, बाहेरील जिल्ह्यातील नागरिक वाई येथे येतात. ही सांस्कृतिक नगरी असल्याने पुलाचे बांधकाम करताना त्याचे जुने सौंदर्य कायम ठेवण्यात येत आहे. मुलांसाठी शाळेच्या चांगल्या इमारती उभ्या राहणार आहेत. कोविड काळात आरोग्य सुविधांना प्राधान्य देण्यात आल्याने विकासासाठी निधीची कमतरता भासत होती. मात्र आता जिल्हा नियोजन समिती आणि शासनाच्या माध्यमातून विकासाला वेग देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार मकरंद पाटील यांच्या कार्याचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.

0000





उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोविड आढावा बैठक संपन्न, महिलांसाठी चांगल्या आरोग्य सुविधा निर्माण करण्याचे निर्देश

 सातारा दि.४ (जिमाका) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकीत जिल्ह्यातील कोविड परिस्थिती, विकासकामे आणि अतिवृष्टीबाबत आढावा घेतला.

                यावेळी आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे आदी उपस्थित होते.

                जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या कोविड प्रतिबंधक उपाययोजनांची माहिती घेऊन श्री. पवार म्हणाले, कोविडसाठी निर्माण करण्यात आलेल्या आरोग्य सुविधा पुढील काळासाठी उपयुक्त ठरणार आहेत. ऑक्सिजन प्रकल्पासारख्या सुविधांच्या देखभालीकडे विशेष लक्ष द्यावे. त्यासाठी कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात यावे.  आरोग्य विभागासाठी अधिकचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयामुळे चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत. महिलांसाठी स्वतंत्र आणि चांगल्या दर्जाच्या सुविधा निर्माण कराव्यात.

                राज्यात काही ठिकाणी डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढतो आहे.  जिल्ह्यात प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शहरी व ग्रामीण भागात फवारणीची मोहिम हाती घ्यावी. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या १०० बेड्सच्या रुग्णालयासाठी जागा उपलब्ध करून द्यावी.  कोविड चाचण्या कमी होणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

                जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सदरणीकरणाद्वारे जिल्ह्यातील कोविड परिस्थितीची माहिती दिली.  जिल्ह्यातील पॉझिटिव्हीटी दर कमी होत असून तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता आवश्यक पूर्वतयारी करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

 

*जिल्ह्यातील अतिवृष्टीबाबत आढावा*

                उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत झालेले नुकसान आणि देण्यात आलेल्या मदतीची माहिती घेतली. पीक नुकसानीबाबत शेतकऱ्यांना लवकर मदत मिळावी यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. पुरात बेपत्ता झालेल्या ३ व्यक्तींच्या कुटुंबियांना शासनाची मदत मिळावी यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, आपणही त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करू असे त्यांनी संगितले. शेतजमिनीचे नुकसान होणाऱ्या भागात पुराच्या पाण्यामुळे यापुढे अधिक नुकसान होऊ नये म्हणून मनरेगाच्या माध्यमातून कामे घेण्याबाबत अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येईल. पुरापासून रक्षण करण्यासाठी गावाचे पुनर्वसन करावयाचे असल्यास त्यासाठी जागा निश्चित करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

                श्री.पवार यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या रस्त्यांच्या नुकसानाची आणि प्रकल्पातील पाणीसाठ्याची माहिती घेतली.

                बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी राधाकिशन पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सं.गो.मुंगीलवार, कार्यकारी अभियंता शंकर दराडे,  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी  देविदास ताम्हाणे उपस्थित होते.

                                                                                                                00000