महाराष्ट्र राज्य शासनाचे विविध कल्याणकारी निर्णय, उपक्रम, वृत्त, लेख, छायाचित्र आदींची माहिती उपलब्ध करून देणे व याद्वारे ते जनतेपर्यंत पोहोचविणे. राज्य शासनाच्या विविध योजनांची व्यापक प्रसिद्धी करणे.
Monday, February 14, 2022
सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण गोरगरीब वर्गाच्या सुधारणेसाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी सावित्रीबाई फुले यांच्या नावाला साजेसे अभ्यासक्रम राबवा-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Thursday, January 27, 2022
डॉ. अनिल अवचट यांच्या निधनाने कृतीशील विचारवंत हरपला - उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि 27 :- "ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांच्या निधनाने कृतीशील विचारवंत हरपला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. अनिल अवचट यांना श्रद्धांजली वाहिली.
उपमुख्यमंत्री आपल्या शोक संदेशात म्हणतात, समाजातील संवेदनशील प्रश्नांवर त्यांनी स्पष्ट विचार मांडले. लोकहितासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. 'मुक्तांगण'च्या माध्यमातून हजारो बांधवांना व्यसनमुक्त केले. व्यसनमुक्ती चळवळीतील त्यांचे कार्य, त्यांनी केलेले प्रयोग अन्य देशांसाठी प्रेरणादायी, मार्गदर्शक ठरले. वैद्यकीय तज्ज्ञ, पत्रकार, लेखक, चित्रकार, शिल्पकार, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ता असे बहुआयामी जीवन समरसून जगणाऱ्या हरहुन्नरी डॉ. अनिल अवचट यांचे निधन ही महाराष्ट्राच्या सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक चळवळीची मोठी हानी आहे. डॉ. अवचट यांच्या कुटुंबियांच्या, 'मुक्तांगण' परिवाराच्या दुःखात मी सहभागी आहे.
0000
Tuesday, January 18, 2022
ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
'दिलखुलास' कार्यक्रमात संयुक्त सुरक्षा सेवा (सीडीएस) परीक्षेत देशातून सर्वप्रथम आलेल्या अपूर्व पडघान याची मुलाखत
मुंबई, दि. १८ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' या कार्यक्रमात केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या संयुक्त सुरक्षा सेवा (कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस ) परीक्षेत देशातून सर्वप्रथम आलेल्या अपूर्व पडघान याची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसेच ‘न्यूज ऑन एआयआर' या ॲपवर बुधवार दि. १९ आणि गुरूवार दि.२० जानेवारी २०२२ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल साळुंखे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
संयुक्त सुरक्षा सेवा (कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस ) परीक्षेचे स्वरूप, त्याचा अभ्यासक्रम, परीक्षेची तयारी कशी करावी, आवश्यक संदर्भ साहित्य, शारीरिक चाचणी आदि विषयांची सविस्तर माहिती अपूर्व पडघान यांनी 'दिलखुलास' या कार्यक्रमातून दिली आहे.
00000कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता पुणे व नागपूर साठी 38 कोटी 58 लाख रूपयांचा निधी वितरीत
मुंबई, दि.१८ : राज्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणा-या विविध उपाययोजनांसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विभागीय आयुक्त पुणे व नागपूर यांना ३८ कोटी ५८ लाख रूपयांचा निधी वितरीत करण्यात आलेला आहे.
विभागीय आयुक्त पुणे यांना २९ कोटी ९६ लाख रूपये वितरीत करण्यात आले असून, या विभागांतर्गत पुणे जिल्ह्याला ९ कोटी ४४ लाख, सोलापूर जिल्ह्याला १० कोटी, सातारा जिल्ह्याला १० कोटी ५२ लाख तसेच विभागीय आयुक्त नागपूर यांच्या अंतर्गत गडचिरोली जिल्ह्याला ८ कोटी ६१ लाख रूपये असा एकूण ३८ कोटी ५८ लाख रूपये निधी या जिल्ह्यांना निधी वितरीत करण्यात आला आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून निधी मागणीसाठी पुणे, सोलापूर, सातारा व गडचिरोली जिल्ह्यांनी केलेल्या मागणीनुसार प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छाननी करून राज्य कार्यकारी समितीने दिलेल्या मान्यतेनुसार हा निधी वितरीत करण्यात आला आहे.
0000
Wednesday, November 24, 2021
दुबई वर्ल्ड एक्स्पोमध्ये महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे सादरीकरण सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांची अबुधाबी फिल्म कमिशनला भेट
मुंबई, दि. 24 : दुबई येथे सध्या वर्ल्ड एक्स्पोचे आयोजन करण्यात आले असून त्यात महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव वेगवेगळ्या पद्धतीने सादर करण्यात आले आहे. या दरम्यान राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी अबुधाबीचे फिल्म कमिशनर हन्स फारकीन यांची भेट घेऊन उभय देशादरम्यान चित्रपट निर्मितीत लागणाऱ्या तंत्रज्ञानाचे आदान-प्रदान करण्यासंदर्भात, तसेच या क्षेत्रात महाराष्ट्रात गूंतवणूक करण्याबाबत चर्चा केली.
दुबई सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने १८ ते २३ नोव्हेंबर दरम्यान दुबई वर्ल्ड एक्सपोचे आयोजन करण्यात आले. या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभागाच्यावतीने महाराष्ट्रात चित्रीकरणासाठी निर्माण करण्यात आलेल्या सुविधांचे सादरीकरण करण्यात आले. चित्रपट, विविध प्रकारच्या मालिका, वेब सिरीज यांच्या चित्रीकरणासाठी सुलभ पद्धतीने ज्या सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत त्यांची माहिती जागतिक पातळीवर पोचवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. या अनुषंगानेच आज राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी अबुधाबीचे फिल्म कमिशन येथे भेट दिली.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे आदान-प्रदान व राज्यातील गुंतवणुकीबाबत चर्चा
अबुदाबीचे फिल्म कमिशनर हन्स फारकीन यांच्याशी महाराष्ट्रातील चित्रपट निर्मिती व्यवसाय संदर्भाने मंत्री श्री.देशमुख यांनी चर्चा केली. मुंबई येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत नव्याने उपलब्ध केलेल्या सोयीसुविधांची माहिती दिली. अबुधाबी फिल्म कमिशन आणि दादासाहेब फाळके चित्रनगरीत दरम्यान आधुनिक तंत्रज्ञानाचे आदान-प्रदान व्हावे, या संदर्भाने महाराष्ट्रात दुबई येथून गुंतवणूक व्हावी या बाबतही चर्चा झाली.
अबुधाबी सांस्कृतिक आणि पर्यटन विभागाचे अध्यक्ष मोहम्मद-खलिफा-अल-मुबारक यांचीही अमित देशमुख यांनी शिष्टमंडळासह भेट घेतली. दोन्ही देशांना उपयुक्त ठरेल या पद्धतीने मुंबई येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत संयुक्त प्रकल्प उभारण्याबाबत यावेळी चर्चा झाली. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय आणि दादासाहेब फाळके चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक कैलास पगारे यांच्यासह विस्टास मीडिया अबुधाबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी इंत्तीखाब चौगुले, अबुधाबी फिल्म कमिशनचे व्हाईस प्रेसिडेंट संजय रैना हेही सहभागी झाले होते.
अबुधाबी येथे चित्रीकरण झालेल्या ‘एक था टायगर’, ‘विक्रम वेध’ या चित्रपटांच्या सेटला मंत्री श्री.देशमुख यांनी शिष्टमंडळासह भेट देऊन पाहणी केली. या ठिकाणी चित्रीकरणाच्या आधुनिक व्यवस्था व कार्यपद्धतीचा अनुभव घेतला, अशा प्रकारच्या अद्ययावत माहितीचे आदान-प्रदान झाले तर भविष्यात दोन्ही देश या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करू शकतील, अशी भावना श्री. देशमुख यांनी यावेळी व्यक्त केली.
००००
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची मुलाखत
मुंबई, दि. 24 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र' या कार्यक्रमात मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. वरिष्ठ सहाय्यक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.
गुरूवार दि. 25 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी 7.30 वाजता ही मुलाखत महासंचालनालयाच्या पुढील लिंकवर पाहता येईल.
यू ट्यूब - https://www.youtube.com/
फेसबुक - https://www.facebook.com/
ट्विटर - https://twitter.com/MahaDGIPR
भारतात मतदारांचे प्रकार, मतदार होण्यासाठी आवश्यक पात्रता, मतदार यादीत नाव नोंदवणे, वगळणे व दुरुस्ती, फॉर्म नंबर 6 सोबत आवश्यक असणारी कागदपत्रे, दावा अर्ज आणि आक्षेपांची पडताळणी, मतदारयादीमध्ये नोंदवलेल्या नावामध्ये मुद्रणदोष असल्यास तो दुरुस्त करण्यासाठीची पद्धती आदी विषयांची माहिती श्रीमती चौधरी यांनी 'जय महाराष्ट्र' या कार्यक्रमातून दिली आहे.
0000


