Monday, January 16, 2023

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जी-२० बैठकस्थळी प्रदर्शनाला भेट




पुणे दि.१६: केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी जी-२० बैठकस्थळी प्रदर्शन दालनांना भेट दिली. त्यांनी विविध दालनात प्रदर्शित विषयांची माहिती घेतली.
'जागतिक भरड धान्य वर्ष- २०२३' च्या निमित्ताने अधिक पौष्टिक तत्वे असलेले बाजरी, ज्वारी, नाचणी आदी भरड धान्यांचे महत्व जागतिक स्तरावर वाढेल यासाठी शासन प्रयत्न करत आहे. त्याअनुषंगाने जी-२० बैठक स्थळीदेखील भरड धान्याचे महत्व सांगणारी माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे. भरड धान्य आणि त्यापासून बनवलेल्या प्रक्रिया पदार्थांची श्री.राणे यांनी विशेष माहिती घेतली.
महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाने राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आखलेल्या पर्यटन उपक्रम, सहलींचे पॅकेजेस आदीविषयी सादरीकरणदेखील त्यांनी पाहिले.
यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आदी उपस्थित होते.
000

Monday, January 2, 2023

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा २०२२-२३ उदयोन्मुख खेळाडूंना चांगल्या कामगिरीसाठी प्रेरणा देण्याचा प्रयत्न-विभागीय आयुक्त सौरभ राव

 




पुणे दि.१: राज्यातील प्रतिभासंपन्न खेळाडूंचे क्रीडा कौशल्य पाहून राज्यातील उदयोन्मुख खेळाडूंना अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी प्रेरणा मिळावी यासाठी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी-म्हाळुंगे येथे २ ते १२ जानेवारी दरम्यान महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा २०२२-२३ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचे औपचारिक उदघाटन ५ जानेवारी रोजी होणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
विधानभवन सभागृह पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सचिव नामदेव शिरगावकर, क्रीडा सहसंचालक चंद्रकांत कांबळे, उपसंचालक संजय सबनीस आदी उपस्थित होते.
श्री. राव म्हणाले, स्पर्धेच्या निमित्ताने राज्यातील खेळाडूंना अधिकाधिक स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल आणि खेळाडूंमधील क्रीडा कौशल्य वाढीस लागण्यास मदत होईल. महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने या क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. स्पर्धेचे आयोजन राज्यातील ८ जिल्ह्यांमध्ये करण्यात येत असून या स्पर्धेमध्ये ३९ क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. राज्यातील १० हजार ४५६ खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक , व्यवस्थापक या स्पर्धेत सहभागी होत आहेत.
स्पर्धेकरीता १८ वर्षांवरील वयोगटातील खेळाडू सहभागी होणार आहेत. प्रत्येक क्रीडा प्रकाराच्या एकविध क्रीडा संघटनेमार्फत त्या-त्या क्रीडा प्रकारातील राज्यातील सर्वोत्कृष्ट आठ संघांची व खेळाडूंची निवड करण्यात आलेली असून हे निवडक आठ जिल्ह्यांचे संघ महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ५ जानेवारी रोजी शिवछत्रपती क्रीडा संकुल पुणे येथे संपन्न होणार असून या समारंभास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रीडामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेकरीता क्रीडा ज्योत तयार करण्यात आली आहे. मुख्य क्रीडा ज्योत ही रायगड येथून प्रज्वलित केली जाईल. राज्याच्या क्रीडा विभागांतर्गत एकूण आठ विभाग आहेत. प्रत्येक विभागीय मुख्यालयाचे ठिकाणापासून क्रीडा ज्योत पुणे येथे आणली जाणार आहे. या सर्व ज्योतींचे एकत्रिकरण करून ही क्रीडा ज्योत मिरवणूकीने पुणे शहरातून शिवछत्रपती क्रीडा संकुलात आणली जाईल व स्पर्धेच्या उद्घाटनाचे वेळी मुख्य कार्यक्रमस्थळी असलेली ज्योत प्रज्वलित केली जाईल. याकरीता आवश्यक ते नियोजन करण्यात आलेले आहे.
सदर स्पर्धेची पूर्वतयारी आता अंतिम टप्प्यात आलेली असून सर्व स्पर्धास्थळे स्पर्धा आयोजनाकरीता सज्ज झालेली आहेत. शासनाचा क्रीडा विभाग आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या नेतृत्वाखाली राज्यातील ३९ क्रीडा प्रकारांच्या क्रीडा संघटना अहोरात्र मेहनत करून ही स्पर्धा यशस्वी करण्याकरीता झटत आहेत. खेळाडूंची निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था, क्रीडांगणे, खेळाडूंची स्पर्धेकरीता वाहतूक, स्वयंसेवक, पदके आदी बाबी सर्वोत्कृष्ट स्वरूपाच्या होतील याकरीता प्रत्येक बाबीकडे जातीने लक्ष पुरविले जाते आहे.
महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके दिली जाणार आहेत. या स्पर्धेत सर्वाधिक पदकांची कमाई करणाऱ्या जिल्ह्यास सर्वसाधारण विजेतेपदाचा बहुमान व ट्रॉफी दिली जाणार आहे. या स्पर्धा आयोजनास राज्य शासनाने मान्यता प्रदान केली असून १९ कोटी रुपये इतकी तरतूद देखील उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचप्रमाणे, या स्पर्धेकरीता कोणत्याही परिस्थितीत निधी कमी पडू दिला जाणार नाही याची ग्वाही शासनाने दिलेली असून राज्यातील खेळाडूंना त्यांची सर्वोत्कृष्ट कामगिरी दाखविण्याकरीता आवाहन केले आहे.
या स्पर्धा आयोजनाच्या माध्यमातून राज्यातील खेळाडूंना त्यांचे क्रीडा कौशल्य प्रदर्शित करण्याकरीता हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होईल. स्पर्धेच्या माध्यमातून राज्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंचा डाटाबेस तयार करण्यात येईल व भविष्यात या खेळाडूंच्या कामगिरीचे ट्रॅक रेकॉर्ड ठेवता येईल, असेही श्री. राव यांनी सांगितले.
श्री.दिवसे म्हणाले, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. अशा खेळाडूंच्या गुणवत्तेला स्पर्धेद्वारे चांगली संधी मिळेल. खेळाडूंची माहिती सॉफ्टवेअरद्वारे संकलित करण्यात येणार आहे. भविष्यात क्रीडा विकासाचे उपक्रम राबविताना याचा उपयोग होऊ शकेल.
श्री.शिरगावकर म्हणाले, ही स्पर्धा राज्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी नवी पहाट ठरणार आहे. स्पर्धेच्या निमित्ताने राज्यात क्रीडा विकासाला पोषक वातावरणाची निर्मिती होईल. महाराष्ट्र ऑलिम्पिक देशातील सर्वात मोठी राज्यस्तरीय स्पर्धा असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना देण्यात येणाऱ्या पदकांचे अनावरण करण्यात आले.
0000

Friday, December 23, 2022

आमदार मुक्ता टिळक यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

 





पुणे, दि. २३ : कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शासनाच्यावतीने पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
यावेळी पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल, माजी मंत्री रमेश बागवे, बाळा भेगडे, विजय शिवतारे, माजी आमदार जगदीश मुळीक, योगेश टिळेकर, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख आदी उपस्थित होते.
यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, आमदार मुक्ता टिळक यांनी सुरुवातीच्या काळात नगरसेवक म्हणून काम केले. नगरसेवक असतांना सभागृह नेता,स्थायी समितीवरही काम केले. पुणे महानगर पालिकेत २०१७ मध्ये त्यांनी पुणे शहराच्या महापौर पदाची जबाबदारी उत्तमरितीने पार पाडली. लोकमान्य टिळकांचा विचार त्या स्वतः जगत होत्या. सामाजिक कार्यात योगदान देताना त्यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी प्रसंगी संघर्षही केला. संघटनेचा आदेश कार्यकर्ता म्हणून आपली भूमिका कशी पार पाडावी हे राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीवेळी मुक्ताताईनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. टिळक कुटुंबियांना दु:ख सहन करण्याची शक्ती ईश्वर देवो, असे ते म्हणाले.
आमदार मुक्ता टिळक यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राजकीय, सामाजिक, उद्योग, कला, साहित्य, सांस्कृतिक आदी क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले आमदार मुक्ता टिळक यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन



पुणे, दि. २३ : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केसरीवाडा येथे आमदार मुक्ता टिळक यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेवून श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार प्रविण दरेकर, माधुरी मिसाळ, माजी मंत्री विजय शिवतारे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आदी उपस्थित होते.
यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना श्री.फडणवीस म्हणाले, आमच्या सगळ्यांकरीता हा अत्यंत दु:खाचा दिवस आहे. पुण्याच्या संपुर्ण सामाजिक-राजकीय पटलावर अत्यंत संघर्षशील व्यक्तिमत्व म्हणून मुक्ताताईंचा परिचय आहे. त्या नगरसेविका, महापौर आणि आमदार म्हणून जनतेशी जोडल्या गेल्या होत्या. टिळक घराण्याचा वारसा समर्थपणे सांभाळत होत्या. गेली तीस वर्षे भारतीय जनता पक्षाच्या एकनिष्ठ कार्यकर्त्या म्हणून स्वत:च्या मेहनतीने आणि जनसंपर्काच्या बळावर सामान्य कार्यकर्तीपासून वेगवेगळ्या पदापर्यंत त्या पोहोचल्या.
मुक्ताताई कल्पक होत्या, चांगल्या वक्त्या होत्या. राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणूकीच्या वेळी प्रकृती बरी नसतानाही त्या मतदान करायला आल्या. त्यांच्या प्रकृतीमुळे त्यांना प्रवास न करण्याची विनंती केली होती. मात्र पक्षासाठी अशा स्थितीतही येऊन त्यांनी मतदान केले. असे समर्पित नेतृत्व, कार्यकर्ता निघून जाणे ही पक्षाची आणि समाजाची न भरून निघणारी हानी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी टिळक कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी शैलेश टिळक, कुणाल टिळक, श्रुतिका टिळक, चैत्राली टिळक-भागवत, हर्षद भागवत, रोहित टिळक, दीपक टिळक, प्रणिती टिळक उपस्थित होते.
खासदार गिरीश बापट यांची भेट
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात खासदार गिरीश बापट यांची भेट घेऊन प्रकृतीविषयी माहिती घेतली. खासदार बापट यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून ते लवकर बरे होऊन घरी परततील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
000

Wednesday, November 30, 2022

शिवप्रताप दिन सोहळा गडकोट व किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवमय वातावरणात किल्ले प्रतापगडावर छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवर्षाव






सातारा दि. 30: शिवकालीन धाडशी खेळाने व शिवमय वातावरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या उपस्थितीत किल्ले प्रतापगड ता. महाबळेश्वर येथे शिवप्रताप दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.  यावेळी शिवकालीन गड किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरण स्थापन करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी यावेळी केले.

            कार्यक्रमाच्या प्रारंभी किल्ले प्रतापगड येथील बुरुजावरील शिवशाहीचे प्रतीक असलेल्या भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण केले. त्यानंतर भवानी मातेची मनोभावे मुख्यमंत्री श्री. शिंदे  यांनी आरती केली.  छत्रपतींची मूर्ती  ठेवण्यात आलेल्या पालखीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या हस्ते पुष्प अर्पण करुन भक्तिभावे पूजन करण्यात आले.  यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी 'क्षत्रिय कुलावतंस, राजाधिराज...., या ललकारींने,  शिवरायांच्या जयजयकाराच्या घोषणांनी वातावरण भारुन गेले होते.  पोलीस दलाच्या बॅण्ड पथकाने विविध धून वाजवून मानवंदना दिली. यानंतर प्रतापगडावर छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधुन पुष्पवर्षाव करण्यात  आला. यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार श्रीनिवास पाटील, रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सर्वश्री महादेव जानकर, भरत गोगावले, श्रीमंत छत्रपती शिवेद्रंराजे भोसले, मकरंद पाटील, महेश शिंदे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

       छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले गडकोट किल्ले आज ही प्रेरणा देणारे स्त्रोत असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले, किल्ल्यांची बांधणी,  पाण्याचा साठा, प्रवेश द्वार स्थापत्य कलेचे उत्तम उदाहरणे आहेत. आज किल्ले प्रतापगडावर ३६३ वा शिवप्रताप दिन सोहळा मोठया उत्साहात साजरा होत आहे. किल्ले प्रतापगडाच्या संवर्धनाचा १०० कोटींचा आराखडा सादर केला आहे. या आराखड्यानुसार २५ कोटींचा निधी तात्काळ दिला जाईल.
   
  राज्य शासन छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन काम करत आहे. प्रत्येक मंत्रिमंडळाच्या बैठकीत लोकहिताचे निर्णय घेण्यात येत आहेत. हे सरकार सर्व सामान्य कष्टकऱ्यांचे सरकार आहे, असे सांगून राज्यातील गडकोट किल्ल्यांवर झालेले अतिक्रमण काढण्यात येईल असेही मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी सांगितले.

    शिवप्रताप दिनला महत्त्व असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, किल्ले प्रतापगडाच्या संवर्धन आराखड्यास निधी मिळाल्यास संवर्धनाचे काम वेळेत पूर्ण होईल. डोंगरी विभागाचे प्रश्न, पुनर्वसनाचे प्रश्न व भूकंग्रस्तांना दाखले यासह अन्य प्रश्न तत्काळ राज्य शासन सोडवत आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र यावे, असेही श्री. देसाई यावेळी म्हणाले

     किल्ले प्रतापगड परिसरात अफजलखानाच्या वधाचे शिल्प उभारण्यात येऊन त्याचे लोकार्पण मोठया उत्साहात करण्यात येईल असे पर्यटन मंत्री श्री लोढा यांनी यावेळी सांगितले.

आज सकाळी सातारा जिल्ह्याचे   जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात आई भवानी मातेची मंत्रोच्चाराच्या गजरात षोड्शोपचार पूजा बांधण्यात आली.  त्यानंतर   जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांच्या हस्ते आई भवानीची मनोभावे आरती करण्यात आली.

                भवानी मातेच्या मंदिरासमोरील ध्वजस्तंभाचे मान्यवरांच्या ह्रस्ते विधिवत पूजन करुन शिवशाहीचे प्रतिक असणाऱ्या भगव्या ध्वजाचे रोहण कुंभरोशीचे सरपंच कांचन सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.  त्यावेळी ढोल, तुताऱ्या, लेझीम यांच्या गजराने परिसर दुमदुमून गेला.   त्यानंतर मानाच्या पालखीची मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली.  छत्रपतींची मूर्ती असलेल्या या पालखीची वाजत गाजत मिरवणूक सुरु झाली.   जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, यांच्यासह सर्व उपस्थित मान्यवरांनी पालखी घेऊन मिरवणूक मार्गस्थ केली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जावली, वाडा कुंभरोशीच्या विद्यार्थी, विद्यार्थीनींचे लेझीम- तुताऱ्या, ढोल ताशा पथक, काठीवर चालणारी मुले, आई भवानी मातेचा व शिवरायांचा जयजयकार करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घेाषणांनी मिरवणूक मार्ग दुमदूमून गेला.
 मर्दानी खेळात तल्लख असलेल्या विद्यार्थ्यांनी लाठी चालवणे, तलवारबाजी, दांडपट्टा, कुऱ्हाडबाजी आदी ऐतिहासिक खेळांचे प्रात्यक्षिके करुन उपस्थितांची मने जिंकली. यावेळी शाहीरांनी  प्रतापगडचा रणसंग्राम हा जोशपूर्ण पोवाडा सादर केला.
               या नेत्रदीपक सोहळ्यास विविध शासकीय अधिकारी, शिवप्रेमी नागरिक आणि विद्यार्थी- विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000


Friday, October 7, 2022

कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी घेतला पुणे विभागातील कामाचा आढावा कामगार भवन बांधकाम कालबद्धरित्या पूर्ण करण्याचे नियोजन करा- कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे

 



पुणे, दि.७ : कामगार विभागाची सर्व कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन बांधण्यात येणार असून हे काम कालबद्धरित्या पूर्ण करण्यासाठी योग्य नियोजन करा, असे निर्देश कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले.
साखर संकुल येथे आयोजित कामगार विभागाच्या पुणे विभागीय आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंघल, कामगार आयुक्त सुरेश जाधव, अपर कामगार आयुक्त अभय गिते, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे संचालक एम. आर. पाटील, अपर संचालक अ. धो. खोत उपस्थित होते.
कामगार भवनसाठी प्रत्येक जिल्ह्यात किमान एक ते दोन एकर जागा निवडणे आवश्यक असून जागा निवडताना कामगारांची सोय पहावी. या इमारतीत जिल्हा कार्यालये व विभागीय कार्यालये अशी स्वतंत्र व्यवस्था असावी. शक्यतो एमआयडीसी सारख्या ठिकाणी जागा निवडा. कामगार भवनचे भूमीपूजन या वर्षातच होईल असे नियोजन सर्व अधिकाऱ्यांनी करा असे डॉ. खाडे यावेळी म्हणाले.
कामगार मंत्री डॉ. खाडे यांनी विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. पुणे विभागातील कामगार विभागाच्या जिल्हा तसेच अन्य कार्यालयांची जागा, विभागातील रिक्त पदे, प्रलंबित प्रकरणे व निपटारा झालेल्या प्रकरणांचा आढावा घेऊन प्रलंबित प्रकरणे, वैयक्तीक प्रकरणे लवकरात लवकर मार्गी लावा अशा सूचना दिल्या.
मंत्री डॉ. खाडे म्हणाले, साखर कारखान्यातील कामगारांची प्रकरणे तातडीने निकाली काढावीत. काही कारखाने बंद पडल्यामुळे कामगारांच्या देय रकमांबाबत ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने सकारात्मक प्रयत्न करण्यात येतील,
एमआयडीसी तसेच औद्योगिक क्षेत्राबाहेरीलही सर्व कंपन्या नोंदणीकृत असल्याबाबत खात्री करावी. नोंदणी न झालेल्या कारखान्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी. कामगारांच्या नोंदणीसाठी मोहीमस्तरावर काम करावे. एकही कामगार नोंदणीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश त्यांनी दिले. कामगार नोंदणीबाबतच्या अडचणीही यावेळी मंत्री महोदयांनी जाणून घेतल्या.
*ई-श्रम कार्ड नोंदणीला गती द्यावी*
श्री. खाडे यांनी ई-श्रम कार्ड नोंदणीचा आढावा घेतला. ते म्हणाले, ई-श्रम नोंदणी काळाजी गरज असून प्रत्येक जिल्ह्याने नोंदणी कालबद्धरितीने पूर्ण करावी. नोंदणी वाढवण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करावे. यामध्ये केलेल्या कामाची नोंद अधिकाऱ्यांच्या गोपनीय अहवालात केली जाईल, असे ते म्हणाले.
यावेळी ई-श्रम कार्ड नोंदणीसाठी ऑनलाईन प्रक्रियाबाबत प्रात्यक्षिकाचे सादरीकरण करण्यात आले.
*धोकादायक कारखान्यांचे निरीक्षण वेळच्यावेळी पूर्ण करा*
औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचा आढावा घेताना डॉ. खाडे यांनी अतिधोकादायक कारखाने व धोकादायक कारखान्यांचे निरीक्षण वेळच्यावेळी पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसचे कामगारांच्या वैद्यकीय तपासणीसाठी ऑनलाईन प्रक्रिया राबवा अशाही सूचना दिल्या.
यावेळी औद्योगिक सुरक्षा विभागांतर्गत देण्यात येणाऱ्या ऑनलाईन सेवा, कामगारांची वैद्यकीय तपासणी, प्राणघातक अपघातांची माहिती, सानुग्रह अनुदान व नुकसान भरपाई आदींबाबत आढावा घेण्यात आला.
प्रधान सचिव श्रीमती सिंघल म्हणाल्या, कामगार कार्यालय आणि कामगार यांचा थेट संवाद असावा. मध्यस्थीला वाव देता कामा नये. प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करा. वीटभट्टी कामगार, शेतात काम करणारे कामगार यांची ई- श्रम कार्ड साठी नोंदणी करा. प्रलंबित वैयक्तिक प्रकरणे प्राथम्याने निकाली काढावीत असेही त्या म्हणाल्या.
अतिधोकादायक कारखाने, धोकादायक कारखाने, रासायनिक कारखाने आदी कारखाने असे एकूण १ हजार ५७६ कारखाने नोंदणीकृत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी पुण्याचे कामगार उप आयुक्त, उपसंचालक बाष्पके, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली व इचलकरंजी येथील सहायक कामगार आयुक्त, सरकारी कामगार अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
000000

Thursday, October 6, 2022

पुणे येथे ‘नैसर्गिक शेती’ राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन नैसर्गिक शेतीसाठी लोकचळवळ उभी करून शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवा-गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत राज्यातील २५ लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 





पुणे दि.६: नैसर्गिक शेतीमुळे जलप्रदूषण होणार नाही, पर्यावरणाचे रक्षण होईल, पाण्याची बचत व जमिनीचा पोत चांगला राहील, गोधन वाचेल, नागरिकांचे आरोग्य चांगले राहील, देश आत्मनिर्भर बनून शेतकऱ्यालादेखील लाभ होईल. त्यामुळे देशात नैसर्गिक शेतीसाठी लोकचळवळ उभी करून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत त्याबाबतची माहिती पोहोचवावी, असे आवाहन गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.
पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात राज्य शासनाच्या कृषि विभागातर्फे आयोजित ‘नैसर्गिक शेती’ राज्यस्तरीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषि आयुक्त धीरज कुमार आदी उपस्थित होते.
राज्यपाल श्री.देवव्रत म्हणाले, हरितक्रांतीमुळे उत्पादनात निश्चितपणे वाढ झाली. मात्र रासायनिक खतांचा उपयोग किती प्रमाणात करायचा हे न कळल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नैसर्गिक शेतीमुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढेल आणि या समस्यातून बाहेर पडता येईल. त्यामुळे नैसर्गिक शेती व्यायसायिकदृष्टीने करून जमिनीची उत्पादनक्षमता वाढवावी आणि नैसर्गिक शेतीसाठी मार्गदर्शकांची साखळी तयार करून प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवावी. नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात प्रत्येकाने सहभागी व्हावे.
*नैसर्गिक शेतीत सोप्या घटकांचा विचार*
जंगलात सर्व वनस्पतींना आवश्यक सेंद्रीय घटक पुरेशा प्रमाणात मिळतात. हेच तत्व अनुसरून नैसर्गिक शेतीचा विचार करण्यात आला आहे. नैसर्गिक शेतीत थोडे वेगळे तंत्र वापरण्यात आले आहे. यात बीजामृत, जीवामृत, घनजीवामृत, पीकांचे आच्छादन, वाफसा पद्धत, आंतरपीक आणि बहुपीक पद्धती, वाफे तयार करणे अशा सोप्या गोष्टींचा विचार यात आहे.
*शेतीवरील खर्च कमी करण्यासाठी नैसर्गिक शेती उपयुक्त*
खतांच्या अधिक वापरामुळे शेतीवरचा खर्च वाढला आहे. शेतकरी कर्जाच्या बोज्याखाली दबला जात आहे. परदेशातून हे खत आयात केले जाते. शिवाय मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याने आरोग्य सुविधांवरील खर्च वाढत आहे. याचा देशाच्या आर्थिक प्रगतीवर परिणाम होत आहे. हा खर्च कमी केल्यास देशाची वेगाने प्रगती होईल. नैसर्गिक शेतीमुळे हे सहज साध्य करता येईल. माझ्या स्वत:च्या शेतात अशा प्रयोगामुळे उत्पादनात वाढ झाली आहे, असे त्यांनी सांगितले.
*रासायनिक व जैविक शेतीत समस्या अधिक*
ग्लोबल वॉर्मिग, पाण्याचा अधिक वापर, जमिनीचा पोत बिघडणे, भूजलस्तर खालवणे, शेतकऱ्याचे उत्पन्न कमी होणे, मानवी आरोग्यावर दुष्परिणाम अशा अनेक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागत आहे. अन्नसाखळीतून येणारे रासायनिक घटक मानवी आरोग्यावर परिणाम होत आहे. देशातील एकूण उपयोगात आणणारे रासायनिक खतांपैकी २५ टक्के वापर महाराष्ट्रात होत आहे. हरितक्रांतीपूर्वी जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण २.५ टक्के होते, हे प्रमाण आता ०.५ टक्क्यापेक्षा कमी झाले आहे. यामुळे जमिनीची उत्पादकता कमी झाली आहे. त्यामुळे खतांचा अधिक उपयोग करूनही उत्पादन वाढत नाही.
आज जागतिक तापमानवाढीसाठी रासायनिक आणि जैविक शेती कारणीभूत आहे. जैविक शेतीत उपयोगात आणले जाणारे गांडूळ परदेशातून आलेले आहे. गहू आणि धान पिकाला एक एकरात ६० किलो नायट्रोजनची गरज आहे आणि जैविक शेतीसाठी आवश्यक शेणखताच्या एक टनामध्ये २ किलो नायट्रोजन असते. त्यामुळे गरजेची पूर्तता करताना अधिक शेणखत वापरल्यास मिथेन वायू अधिक प्रमाणात तयार होऊन वातावरणातील तापमान वाढीला मदत होईल. म्हणून नैसर्गिक शेतीला चालना देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे, असे राज्यपाल देवव्रत म्हणाले.
महाराष्ट्र ऐतिहासिकदृष्टीने, देशाला कृषि आणि आर्थिक क्षेत्रात पुढे नेणारे राज्य आहे. राज्यातील शेतकरी प्रगतीशिल आणि मेहनती आहे. राज्यातील शेतकऱ्यांसमोर समस्या असल्याने त्यावर एकत्रितपणे विचार करण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.
*राज्यातील २५ लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणणार-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*
रासायनिक खतांमुळे जमिनीचा पोत खराब झाला असून ग्लोबल वॉर्मिंगचा वाढता धोका लक्षात घेता राज्यात डॉ.पंजाबराव देशमुख जैविक शेती अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात सन २०२५ पर्यंत राज्यातील २५ लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणली जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते म्हणाले,२०१६-१७ मध्ये नैसर्गिक शेतीचे अभियान सुरू केल्यानंतर ९.५ लाख हेक्टर शेती नैसर्गिक पद्धतीने होत आहे. दुसऱ्या टप्प्यात हे क्षेत्र वाढविण्यासाठी कृषि व फलोत्पादन विभागाने आखलेल्या कार्यक्रमाला आवश्यक निधी देण्यात येईल. यामुळे शेतकरी सुजलाम-सुफलाम होईल.
*नैसर्गिक शेती प्रकल्पास मुदतवाढ*
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नैसर्गिक शेतीसाठी २०१५-१६ मध्ये केंद्र स्तरावर मिशन सुरू केले. महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात २०१६-१७ मध्ये सुरू केलेले डॉ.पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन यशस्वी ठरले. या माध्यमातून शेतकऱ्यांचे गट तयार झाले. केंद्र व राज्य शासनाच्या योजनांना एकत्र करून उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आणि त्यांना सेंद्रीय शेतीकडे वळविण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. या मिशनचा कालावधी संपत असला तरी त्यास नव्याने मुदतवाढ देण्यात येईल. यात अजून काही जिल्हे समाविष्ट करण्यात येतील आणि नैसर्गिक शेतीला चालना दिली जाईल.
*नैसर्गिक शेतीचे उद्दीष्ट ठेवून गाव जलस्वयंपूर्ण करणार*
राज्यात मागील काळात जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून रब्बीचे पीक वाढविण्याचा प्रयत्न केला. या योजनेमुळे ३९ लाख हेक्टर जमीन रब्बी पिकाखाली आली, २७ टीएमसी पाणी थांबवू शकलो आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला त्याचा फायदा झाला. हे फायदे लक्षात घेऊन नव्या स्वरुपात ही योजना आणली जाईल. पुढच्या टप्प्यात गाव जलस्वयंपूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. त्या पाण्याचा योग्य उपयोग गावात व्हावा आणि नैसर्गिक शेतीला चालना मिळावी हे ध्येय ठेवून ही योजना राबवायची आहे.
*’स्मार्ट’ प्रकल्पाला गती देण्यात येईल*
मागील काळात नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना सुरू केली. विविध गावांमध्ये केंद्रीत पद्धतीने राबविण्यास सुरुवात केले. जागतिक बँकेने साडेचार हजार कोटी रुपयांचा निधी यासाठी दिला. या मिशनला गती देण्याचे काम शासन करणार आहे. स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने सुरू करण्यात आलेला‘स्मार्ट’ प्रकल्प महाराष्ट्रातल्या १० हजार गावांमध्ये सुरू करण्यात आला. या प्रकल्पावर २ हजार १०० कोटी खर्च करून व त्यांच्या माध्यमातून बाजारपेठेची श्रृंखला तयार करून शेतकऱ्याला योग्य भाव देण्यासाठी राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून साठवणूक व्यवस्था, विविध श्रृंखला तयार करणे, मार्गदर्शन, बाजाराशी लिंकेज याद्वारे शेतकऱ्यांचे सक्षमीकरण करून त्यांना निधी उपलब्ध करून देण्याचे काम करण्यात येत आहे. या प्रकल्पालाही गती देण्यात येत आहे.
*पारंपरिक शेतीत चक्रीय अर्थव्यवस्था*
विविध माध्यमातून शेतकऱ्यांसाठी योजना राबविण्यात येत आहे. नैसर्गिक शेती हा शेतकऱ्यांसाठी महत्वाचा विषय आहे. १९०५ मध्ये इंग्रज सरकारने अल्बर्ट हॉवर्ड यांना कृषि सल्लागार म्हणून पाठविले. त्यांनी पारंपरिक शेती विज्ञानाधारीत असून त्यात चक्रीय अर्थव्यवस्था आहे असे नमूद केले आहे. आपण नंतरच्या काळात अन्नधान्याच्या संदर्भात स्वयंपूर्ण करण्यासाठी उपयोगात आणलेल्या रासायनिक खतांमुळे उत्पादन वाढले, पण चक्रीय अर्थव्यवस्था मंदावली. निविष्ठा, त्यासाठी खरेदी आणि बाजारावर अवलंबून रहावे लागत आहे. त्यामुळे शेतमालाचा भाव वाढताना उत्पादनखर्चही वाढत आहे. त्यामुळे शेती फायद्याची होत नाही.
*मानवजातीच्या कल्याणासाठी नैसर्गिक शेतीचा विचार आवश्यक-पालकमंत्री श्री.पाटील*
पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, पुण्यातील शेतकरी प्रगतीशील आहेत. नैसर्गिक शेतीचे महत्व सर्वांना कळले आहे. रासायनिक खते वापरून जमिनीचा पोत खराब झाला आहे. शिवाय रासायनिक खतांमुळे माणसाच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. रासायनिक खतांमुळे पाण्याचे प्रदूषण वाढते आहे. नैसर्गिक शेती शेतकऱ्याच्या उत्पन्न वाढीसोबतच माणसाच्या आरोग्याच्यादृष्टीने महत्वाची आहे.
राज्याच्या लोकसंख्येचा ५२ टक्के भाग शेतीवर अवलंबून आहे. शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे वळविण्यासाठी त्यांना प्रोत्साहन आणि सहकार्य करावे लागेल. या शेतीपद्धतीमुळे कमी झालेल्या उत्पन्नाचा काही भाग त्याला मदतीच्या स्वरुपात देण्याबाबतही विचार करावा लागेल. मानवजातीच्या कल्याणासाठी नैसर्गिक शेतीचा विचार करावा लागेल. नैसर्गिक शेती परिषदेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना याविषयीची दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
*शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी परिषद उपयुक्त -कृषि मंत्री अब्दुल सत्तार*
कृषि मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले,शेतकरी नैसर्गिक शेतीकडे वळविण्यासाठी कृषि विभागातर्फे प्रयत्न करण्यात येईल. जमिनीचे आरोग्य बिघडल्यास अन्नसुरक्षा धोक्यात येईल. नैसर्गिक शेतीच्या सहाय्याने भरड धान्याचे उत्पादन घेतल्यास शेतकऱ्यांना फायदा होईल. विषमुक्त शेतीविषयीचे शासनाचे धोरण लवकरच ठरविण्यात येईल आणि त्याची अंमलबजावणी कृषि विभागामार्फत राज्यात करण्यात येईल. सेंद्रीय शेतीचे प्रमाणिकरण करण्यासाठी शासनाची स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात येईल.
या प्रकारच्या शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी मूल्यसाखळीच्या विकासावर भर द्यावा लागेल, अशी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करावा लागेल, शेतकऱ्याला आर्थिक लाभाची हमी देणे गरजेचे आहे. नैसर्गिक शेतीविषयीची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे लागेल. 'एक दिवस बळीराजासाठी’ उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अडचणी समजवून घेण्यात आल्या आहेत. त्यांना नैसर्गिक शेतीसाठी मदत करता येण्याविषयी विचार करण्यात येईल. भविष्यात शेतकरी सक्षम व्हावा आणि त्याचे उत्पन्न वाढावे यासाठी ही परिषद उपयुक्त ठरेल, असे त्यांनी सांगितले.
*भौगलिक मानांकन पिकांचा महोत्सव आयोजित करणार- फलोत्पादन मंत्री श्री.भुमरे*
फलोत्पादन मंत्री श्री.भुमरे म्हणाले, महाराष्ट्र राज्य फळे व भाजीपाला उत्पादन व निर्यातीमध्ये देशात अग्रेसर राज्य आहे. राज्याचे स्वंतत्र कृषी निर्यात धोरण तयार करणारे महाराष्ट्र प्रथम राज्य आहे. देशाच्या निर्यातीमध्ये ६५ टक्के फळे, ५० टक्के भाजीपालाचा वाटा असून यामध्ये शेतकऱ्यांचे फार मोठे योगदान आहे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुधारित मनरेगा योजना घेण्यात आल्यामुळे फळपिकाखालील क्षेत्राचे प्रमाण वाढत आहे.
आरोग्याच्या दृष्टीकोनातून ग्राहकाला सुरक्षितेची हमी देण्यासाठी नैसर्गिक शेतीला महत्व प्राप्त झाले आहे. विषमुक्त फळे, भाजीपाला नागरिकाला उपलब्ध करुन देण्यासाठी फलोत्पादन विभागाचा विशेष भर आहे. विषमुक्त फळे, भाजीपाला यांना देशात बाजार व निर्यातीत प्रचंड मागणी आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्टया संपन्न होत आहे. अपेडा या संस्थेमार्फत फलोत्पादन पिकाच्या निर्यातीत फळबागाची नोदंणी करण्यात येत आहे. २२ पिकांना भौगोलिक मानांकन मिळाले आहे. त्यामुळे देशात राज्याची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. येत्या काळात फलोत्पादन विभागातर्फे भौगलिक मानांकन पिकांचा महोत्सव आयोजित केला जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात श्री.डवले यांनी परिषदेच्या आयोजनाबाबत माहिती दिली. किमान खर्चात अधिकाधिक उत्पादन देणे, विषमुक्त शेतीकडे शेतकऱ्याला वळवायचे आणि निविष्टेचा खर्च कमी करण्यासाठी नैसर्गिक शेतीवर भर देण्यात येत आहे. फलोत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर आहे. निर्यातीतही ८ प्रकाराच्या कृषी उत्पादनात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. हरितक्रांतीनंतर किटकनाशकाच्या वापरामुळे पिकांची उत्पादकतेत स्थिरता आली आहे. जमिनीच्या पोषक मूल्यांचा ऱ्हास होत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांपर्यंत नैसर्गिक शेतीचे महत्व पोहोचविण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी आयोजित नैसर्गिक शेती उत्पादने व प्रक्रिया पदार्थांच्या स्टॉल्सला मान्यवरांनी भेट देऊन शेतकरी, बचत गटांच्या प्रतिनिधींकडून उत्पादनांची माहिती घेतली.
०००