Saturday, December 24, 2016

शैक्षणिक, सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे मेट्रोचे काम गतीने पूर्ण होईल - पंतप्रधान नरेंद्र मोदी















पुणे दि. २४ (विमाका) : पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत असतानाच भविष्याचा विचार करून २५ वर्षाचे नियोजन केले पाहिजे. पुणे हे सांस्कृतिक, शैक्षणिक व औद्योगिक राजधानी म्हणून देशात ओळखले जाते. येथील वाढती लोकसंख्या पाहता मेट्रो कार्यान्वित होणे आवश्यक होते. आज पुणेकरांचे स्वप्न पूर्ण होत असून मेट्रो प्रकल्पाचे काम अधिक गतीने सुरु करून कालमर्यादेत त्याचे काम पूर्ण होईल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुणे मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. त्यावेळी ते बोलत होते. शेती महाविद्यालयाजवळील मैदानावर हा कार्यक्रम झाला. यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार, पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, पुण्याचे महापौर प्रशांत जगताप, पिंपरी-चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे, खासदार अनिल शिरोळे, श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, ‘पुणे शहराची गेल्या काही वर्षात खूप मोठी वाढ झाली आहे. औद्योगीकरण आणि माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्राच्या विकासामुळे पुण्यात रोजगारासाठी देशभरातून लोक येतात. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विकास होण्याची आवश्यकता आहे. पुणे मेट्रो हे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विकसीत करण्यासाठी उचलले महत्वाचे पाऊल आहे.
पुणे मेट्रो प्रकल्प विविध कारणांमुळे रेंगाळला गेला पण केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी सरकार असल्यामुळे पुणे मेट्रो प्रकल्पास मंजुरी देणे आणि आज या प्रकल्पाचे भूमिपूजन करणे शक्य झाले. मेट्रो  प्रकल्प गतीने पूर्ण करून पुण्याच्या विकासाला अधिक गती देऊ, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, देशात नागरीकरणाचा वेग अतिशय झपाट्याने वाढला आहे. शहरावरील ताण कमी होण्यासाठी गावांचाही विकास होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी रुर्बन अभियान राबवले जात आहे. यामुळे ग्रामीण भागात शहरातील सुविधा, संधी उपलब्ध होतील. त्याच बरोबर रोजगारांची संधीही वाढतील. यामुळे गावांकडून शहरांकडे येणाऱ्या नागरिकांचा लोंढा कमी होईल. विकासाचा विचार करताना तात्कालिक फायद्यांचा विचार न करता दूरगामी विकासाचा विचार करायला हवा.’
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, ‘देशातील केवळ शहरांचा विकास चाललेला नाही तर ग्रामीण भागांचाही विकास सुरु आहे. त्यासाठी देशातील अडीच लाख ग्रामपंचायती ऑप्टीकल फायबरने जोडल्या जाणार आहेत. आता विकासाच्या संकल्पना बदलत आहेत. त्यामुळे विकासाची परिमाणेही बदलण्याची आवश्यकता आहे.
निश्चलीकरण करण्याचा घेतलेल्या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या खात्यात मोठ्या प्रमाणात निधी जमा झाला आहे. त्यामुळे हा निर्णय योग्य ठरला असल्याचे सांगून  पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, देशातील काळे धन, भ्रष्टाचार आणि दहशतवादाविरुद्धची ही लढाई आहे. यापुढेही याबाबत अधिक कठोर निर्णय घेतले जातील. या निर्णयामुळे त्रास जरूर झाला पण, भविष्यात त्रास होणार नाही. ज्यांनी अद्यापही काळे धन लपवून ठेवले आहे, त्यांनी नियमांचे पालन न केल्यास त्यांना कठोर परिणामांना सामोरे जावे लागणार आहे.
पुण्यात माहिती तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे पुण्यात डिजिटल आणि कॅशलेस व्यवहार मोठ्या प्रमाणावर होतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशभरातील शहरांमध्ये पुणे आंतरराष्ट्रीय शहर आहे. जगभरातील उद्योजकांची गुंतवणुकीसाठी पुणे शहराला पहिली पसंती असते. पुणे शहर लवकरच स्टार्ट-अप कॅपिटल होणार आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी स्मार्ट सिटी सारख्या महत्वकांक्षी योजनेच्या अभियानाची सुरवात पुणे शहरापासून केली. पुणे शहराच्या औद्योगिक विकासासाठी पुरंदर येथे छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधण्यात येणार आहे, त्याच्या कामाला लवकरच सुरवात करण्यात येणार आहे. मेट्रोच्या माध्यमातून पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारणार आहे.
आजचा दिवस हा महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा दिवस असून आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजाच्या स्मारकाचे भूमिपूजन झाले तर दुसरीकडे बऱ्याच वर्षापासून थांबलेले पुण्याच्या मेट्रोचे भूमिपूजनही पंतप्रधानांच्या हस्ते झाले आहे. येत्या मार्चपर्यंत शिवाजीनगर ते हिंजेवाडी मेट्रो मार्गालाही मंजुरी देऊन त्याचेही भूमिपूजन पंतप्रधानाच्या हस्ते करण्यात येणार आहे. पुणे शहराच्या जीवनवाहिनी असणाऱ्या मुळा आणि मुठा नद्यांच्या संवर्धनासाठी सरकारने ९०० कोटी रुपये दिले आहेत. या माध्यमातून या नद्यांचे पुनर्जीवन होणार आहे. पुणे शहराच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असून उत्तम असणाऱ्या पुण्याला सर्वोत्तम करणार असल्याची ग्वाही श्री. फडणवीस यांनी दिली.
केंद्रीय नगर विकास मंत्री व्यंकय्या नायडू आपल्या भाषणात म्हणाले, ‘भारताच्या परिवर्तनाला खऱ्या अर्थाने सुरवात झाली आहे. भ्रष्टाचार आणि काळे धन बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान विशेष प्रयत्न करत आहेत. देशातील प्रत्येक नागरिकाने पंतप्रधानांच्या या निर्णयामागे ठामपणे उभे राहिले पाहिजे. देशातील सामान्य जनता, गरीब तरुण, शेतकरी, स्त्रिया यांच्या विकासाला सरकारचे प्राधान्य आहे. पंतप्रधानांनी सुरु केलेल्या स्वच्छ भारत योजनेला जनआंदोलनाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या अभियानाचे व्याप्ती वाढून तन-मन व धनाचीही स्वच्छताही सुरु आहे. प्रत्येक योजनेत सामान्यांचा सहभाग वाढवण्यावर  सरकारचा भर आहे. पुणे मेट्रोच्या माध्यमातून पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान होणार असून शहराच्या विकासाची ही सुरवात आहे.मुंबई नंतर पुणे हे राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. या शहराच्या विकासासाठी केंद्र सरकार सर्वोतोपरी मदत करणार असल्याची श्री. नायडू यांनी सांगितले.
प्रास्ताविकात पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, विद्येचे माहेरघर अशी ओळख असणाऱ्या पुण्याची ओळख आता विस्तारत आहे. औद्योगिक क्षेत्रातही पुणे अग्रक्रमावर आले आहे.पीएमआरडीएच्या माध्यमातून पुण्याचा सर्वांगीण विकास करण्यात येणार आहे. मेट्रोमुळे शहरातील सार्वजनिक वाहतुक व्यवस्था अधिक गतिमान होऊन त्याचा शहराच्या विकासावर सकारात्मक परिणाम होणार आहे. पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत अभियानाला पुणे शहराने चांगला प्रतिसाद दिला असून या योजनेंतर्गत सर्वात जास्त शौचालय बांधण्याचा विक्रम झाला आहे. केंद्र सरकारच्या मदतीने विविध योजनांच्या माध्यमातून पुणे शहराचा चेहरा मोहरा बदलणार असल्याचे श्री. बापट यांनी सांगितले.
यावेळी खासदार सर्वश्री संजय काकडे, वंदना चव्हाण, अमर साबळे, आमदार सर्वश्री विजय काळे, भीमराव तपकीर, मेधाताई कुलकर्णी, माधुरी मिसाळ, योगेश टिळेकर, विजय काळे, लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, नीलमताई गोऱ्हे, राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त कुणाल कुमार आदी पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
000000

Friday, December 23, 2016

प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत जूनपर्यंतचा शिबीर दौरा जाहीर



पुणे, दि.२३ (विमाका):  पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील सर्व प्रकारच्या वाहन मालक व चालकांसाठी मोटार वाहन निरीक्षकांचा १ जानेवारी ते ३० जून २०१७ या कालावधीतील शिबीर दौरा प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी  यांनी जाहीर केला आहे.
तालुक्याचे ठिकाण वा तालुक्यातील महत्त्वाचे ठिकाण येथे दरमहा एक दिवसाचा शिबीर दौरा असणार आहे. यावेळी शिकाऊ अनुज्ञप्ती, पक्की अनुज्ञप्तीची चाचणी, हलक्या मोटार वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण आदी  कामे केली जातील. दौऱ्याच्या दिवशी शासकीय सुट्टी जाहीर झाल्यास त्या दिवसाचा दौरा नियोजित दिवसाच्या आधी किंवा पुढे घेण्यात येईल.
शिबीर दौऱ्याचा कार्यक्रम याप्रमाणे: वेल्हे तालुक्यात जानेवारी ते जून २०१७ या कालावधीत प्रत्येक महिन्याच्या ३ तारखेस, शिरूर – ५ जानेवारी, फेब्रुवारी ते एप्रिलच्या ६ तारखेस,  मे आणि जूनच्या ८ तारखेस, भोर -  जानेवारी ते मार्चच्या ९ तारखेस, १० एप्रिल, ११ मे, १२ जून, हडपसर - १२ जानेवारी, १३ फेब्रुवारी, १४ मार्च, १५ एप्रिल, मे आणि जूनमध्ये १६ तारखेस, सासवड - जानेवारी ते मार्चमध्ये १६ तारखेस, १७ एप्रिल, १८ मे, १९ जून, पिरंगुट -  जानेवारी ते मार्चमध्ये १८ तारखेस, १९ एप्रिल, २० मे, २१ जून, उरुळी कांचन –जानेवारी ते एप्रिलमध्ये २० तारखेस, मे आणि जूनमध्ये २२ तारखेस, कोंढापुरी (शिक्रापूर) - जानेवारी ते मार्चमध्ये २३ तारखेस, एप्रिल आणि मेमध्ये २४ तारखेस, २७ जून तर जेजुरी येथे जानेवारी ते एप्रिलच्या २७ तारखेस आणि २९  मे तसेच २९ जून २०१७ रोजी  मोटार वाहन निरीक्षकांचा दौरा होईल.   
००००
Attachments area

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे आज भूमिपूजन




        
            मुंबईजवळच्या अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे जलपूजन व भूमिपूजन मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या दि. 24 डिसेंबरला होत आहे. त्या निमित्ताने .
राजभवनापासून जवळच असणाऱ्या समुद्रातील  बेटावर जगातील सर्वात उंच असे हे स्मारक असेल. हा कार्यक्रम अधिक संस्मरणीय ठरावा यासाठी राज्यातील सुमारे 70 हून अधिक प्रमुख नद्यांचे जल आणि गड किल्ल्यांवरची पवित्र माती या ठिकाणी आणली जाणार आहे. यामध्ये स्वराज्याची राजधानी असणाऱ्या सातारा जिल्ह्यातून पदस्पर्शाने पावन झालेल्या प्रतापगडावरील मातीसह पंचगंगा तीर्थ कलश मोठ्या उत्साहात उद्या मुंबईतील सोहळ्यासाठी जात आहे.
   राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक मुंबई लगत अरबी समुद्रात उभारण्याचा निर्णय 2002 मध्ये घेतला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने याबाबत कार्यवाही पूर्ण करून स्मारकाच्या कामास गती दिली.त्यानंतर सर्व परवानग्या तातडीने प्राप्त करण्यात आल्या.
या स्मारकास राज्य व केंद्र शासनासह महापालिकेच्या विविध विभागाच्या परवानग्या आवश्यक होत्या. यामध्ये केंद्रीय पर्यावरण मंत्रालय, नौदल पश्चिम विभाग, तटरक्षक दल, सागरी किनारा अधिनियम,मुंबई पोलीस, मुंबई महानगरपालिका, बेस्ट, मुंबई पोर्ट ट्रस्ट, बी.एन.एच.एस.इंडिया,मत्स्यव्यवसाय विभाग,राष्ट्रीय सुरक्षा दल, दिल्ली, भारतीय विमानपत्तन प्राधिकरण अशा बारा विभागांची  ना हरकत प्रमाणपत्रे शासनास प्राप्त झाली आहेत.
            आपल्या असामान्य कामगिरीने महाराष्ट्राची पताका जगभरात फडकवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्राच्या वतीने हे अनोखे वंदन असेल. महाराष्ट्राच्या तेजस्वी आणि गौरवशाली इतिहासाचे प्रतिबिंब या स्मारकाच्या माध्यमातून अनुभवता येणार आहे.  त्यामुळे प्रकल्पाचे अनोखे व विशिष्ट स्वरुप लक्षात घेऊन प्रकल्पाचा आराखडा, निविदा कागदपत्रे तयार करणे, प्रकल्पावर देखरेख करणे यासाठी दिनांक 11 एप्रिल 2016 रोजी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नेमणूक करून त्यानंतर प्रकल्प आराखडा मंजूर करण्यात आला आहे. 
या आंतरराष्ट्रीय प्रकल्पामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा 192 मीटर उंचीचा पुतळा उभारण्याचे प्रारंभी नियोजन होते. आता या पुतळ्याची उंची 210 मीटर इतकी वाढविण्यासाठी पर्यावरण विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.  या स्मारकात  महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित कला दालन, प्रदर्शन  गॅलरी, महाराजांच्या चरित्रावर आधारित पुस्तकांचे सुसज्ज  वाचनालय, प्रेक्षक गॅलरी, उद्यान, हेलीपॅड, अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी व जनतेसाठी जेट्टी (धक्का), सुरक्षाविषयक व्यवस्थेचा समावेश आहे.
36 महिन्यातच स्मारक पूर्ण करण्याचे सरकारचे नियोजन असून ते भावी पिढ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे. महाराजांची जीवनमूल्ये प्रदर्शित करणारे देशभक्तीपर माहिती केंद्रही या स्मारकात असेल. तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी पर्यटनस्थळ असणार आहे.
             
                                                                                                                                                - प्रशांत सातपुते
                                                                                                                                                जिल्हा माहिती अधिकारी, सातारा

00000

Thursday, December 22, 2016

छत्रपती शिवाजी महाराज स्मारक भूमीपूजन व जलपूजन समारंभ


 समारंभासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे
- शासनाचे आवाहन
* छत्रपती शिवाजी महाराजांचे मुंबईत जागतिक किर्तीचे स्मारक व्हावे ही जनतेची इच्छा
* स्मारकासाठीच्या सर्व परवानग्या प्राप्त
* 24 डिसेंबर रोजी स्मारकाचे मा. पंतप्रधानांच्या हस्ते जलपूजन व भूमिपूजन
* संपूर्ण महाराष्ट्र या कार्यक्रमात सहभागी व्हावा यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील प्रमुख नद्यांचे पाणी व गड
    किल्ल्यांची माती कलशातून आणण्यात येणार
* सर्व जिल्ह्यांचे कलश शिवाजी चौक, चेंबूर येथे जमा करण्यात येणार
* कलश ठेवण्यासाठी भव्य रथ  
* कलशांची मिरवणूक चेंबूर ते गेट वेपर्यंत काढण्यात येणार
* गेट वे ऑफ इंडिया येथे सर्व कलश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करणार
* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कलश गिरगाव चौपाटी येथे मा. पंतप्रधानांच्या स्वाधीन करणार
* मान्यवरांच्या हस्ते कलशातील माती व पाणी नियोजित स्मारकाच्या ठिकाणी टाकून भूमीपूजन व जलपूजन  करणार
 * बीकेसी येथे जाहीर सभा व विविध उपक्रमांचे भूमीपूजन
मुंबईदि. 22 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचा भूमिपूजन-जलपूजन समारंभांचा मुख्य कार्यक्रममेट्रो मार्ग 2मेट्रो मार्ग 4कुर्ला-वाकोला उन्नत मार्ग आणि मुंबई पारबंदर प्रकल्प या विविध प्रकल्पांचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 24 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे होणार आहे. या समारंभास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केले. यावेळी स्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे हे उपस्थित होते.
 छत्रपती शिवाजी महाराजांचे मुंबईमध्ये जागतिक किर्तीचे भव्य स्मारक व्हावे ही तमाम जनतेची ईच्छा होती. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक अरबी समुद्रात उभारण्याचे निश्चित केले आहे. या स्मारकाच्या उभारणीसाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या शासनाने घेतल्या असून या स्मारकाचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. तसेच स्मारकाच्या कामाचे टेंडर काढण्यात आले असून भूमिपूजन समारंभानंतर लगेचच कामास सुरुवात करण्यात येणार आहे. स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम 2019 पर्यंत करण्यात येणार असल्याचेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.
स्मारकाच्या भूमिपूजन-जलपूजन समारंभ कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्र सहभागी व्हावाही शासनाची इच्छा आहे. यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील प्रमुख गडकिल्ल्यांची माती व नद्यांचे पाणी कलशातून मुंबईत आणण्यात येणार आहे. माती व पाण्याचे कलश घेऊन राज्यातील जिल्ह्याजिल्ह्यातून नागरिक मिरवणुकीने 23 डिसेंबर रोजी सकाळी नऊपासून शिवाजी चौकचेंबूर येथे येत आहेत. याठिकाणी शासनाच्या वतीने सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटीलशिक्षणमंत्री विनोद तावडेगृहनिर्माण मंत्री प्रकाश महेतास्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे हे त्यांचे स्वागत करणार आहेत.
या ठिकाणी भव्य रथ तयार करण्यात आला आहे. या रथावर महाराष्ट्राचा नकाशा तयार आहे. सर्व जिल्ह्यांचे कलश ठेवता येतील अशी नकाशाची रचना करण्यात आली आहे. त्यानंतर या कलशांची मिरवणूक चेंबूर- सायन-दादर टीटी-परळ-लालबाग-चिंचपोकळी-ऑर्थररोडसातरस्ता-मुंबई सेंट्रलगिरगांव-मेट्रो सिनेमा-छत्रपती शिवाजी टर्मिनस-महात्मा गांधी मार्ग- हुतात्मा चौक-रिगल चौक मार्गे गेटवे ऑफ इंडिया येथे येणार आहे. याठिकाणी हे सर्व कलश जिल्हानिहाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत. या कलशांमधील माती व पाणी एकत्र करण्यासाठी या ठिकाणी दोन स्वतंत्र कलश ठेवण्यात आले आहेत.
 स्मारकाच्या भूमिपूजन-जलपूजन समारंभाच्या दिवशी अर्थात 24 डिसेंबरला मुख्यमंत्री श्री. फडणवीस हे कलश गिरगाव चौपाटी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द करणार आहेत. याठिकाणी भव्य समारंभ आयोजित करण्यात आला असून गिरगाव चौपाटी सजविण्यात येणार आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विविध मान्यवरांसह हावरक्राफ्टने हे कलश घेऊन अरबी समुद्रातील स्मारकाच्या नियोजित स्थळी जाऊन भूमीपूजन-जलपूजन करणार आहेत. राज्यपाल सी. विद्यासागर रावमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसखासदार उदयनराजे भोसलेखासदार संभाजी राजे भोसलेशिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यावेळी उपस्थित असतील. यानिमित्त गिरगांव चौपाटी ते स्मारक स्थळ या मार्गावर शिवकालीन आरमाराचे चित्र उभे केले जाणार आहे.
यानिमित्त गिरगांव चौपाटी ते बीकेसी या मार्गावर सी-लिंककलानगर चौक आदी स्थळे सजविण्यात येणार आहेत, तसेच शिवराज्याभिषेक सोहळ्याप्रसंगी सादर करण्यात आलेल्या विविध कला सादर करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री श्री. तावडे यांनी यावेळी दिली. तसेच, गडकिल्ल्यांची दुरुस्ती गडकिल्ले संवर्धन समितीमार्फत करण्यात येत आहे. त्याचबरोबर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाविषयी काही सूचना असल्यास तर त्या शासनाला कळविण्याचे आवाहनही श्री. तावडे यांनी यावेळी केले. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्पाच्या ठिकाणी स्थानिक मच्छिमारांना पर्यटनाशी संबंधित व्यवसाय करण्यास प्राधान्य देणार असल्याचे मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या भूमिपूजन-जलपूजन समारंभास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मंत्री श्री. पाटीलश्री. तावडे यांनी यावेळी केले.       
                                               000000

सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह मान्यवरांकडून नियोजित कार्यक्रमस्थळांची पाहणी

छत्रपती श्री शिवाजी महाराज स्मारक भूमीपूजन समारंभ 

मुंबईदि 22 : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचा भूमिपूजन समारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 24 डिसेंबर रोजी होणार असून, या समारंभाच्या पार्श्वभूमीवर गेट वे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटी येथील नियोजित कार्यक्रमस्थळांची पाहणी व तयारीचा आढावा आज सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह मान्यवरांनी घेतला.
शिक्षणमंत्री विनोद तावडे व गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांच्यासह खासदार रावसाहेब दानवेशिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटेआमदार राज पुरोहित यावेळी उपस्थित होते. या समारंभासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांतील प्रमुख गडकिल्ल्यांची माती व नद्यांचे पाण्याचे कलश आणण्यात येणार आहेत.
विविध संस्था व संघटनांनी आणलेल्या या कलशांचे स्वागत शुक्रवारी (दिनांक 23 डिसेंबर) सकाळी 10 वाजता चेंबूर नाकामुंबई येथे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटीलशिक्षणमंत्री विनोद तावडेगृहनिर्माण मंत्री प्रकाश महेताशिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत केले जाणार आहे. चेंबूर येथून मिरवणूकीने माती व पाण्याचे कलश सायंकाळी 5 वाजता गेटवे ऑफ इंडिया येथे आणले जाणार आहेत. हे कलश मंत्री महोदय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करणार आहेत.
विविध जिल्ह्यांमधून आणण्यात आलेली पवित्र माती व पाणी मुख्यमंत्री कलशात जमा करतील व 24 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री श्री. फडणवीस हे पवित्र कलश गिरगांव चौपाटीवर  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पवित्र कलश घेऊन स्मारकाच्या भूमिपूजन-जलपूजनासाठी स्मारकाच्या जागेवर जाणार आहेत, अशी माहिती यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. पाटील यांनी दिली. या समारंभासाठी करण्यात येत असलेल्या तयारीची पाहणीही आज या मंत्री महोदयांनी केली. 
०००००


भीमा - सीना कुडल संगमावरील जलकलश मुंबईला रवाना होणार





सोलापूर दि.22:- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाच्या भूमिपूजन आणि जलपूजनासाठी आज कुडलसंगम येथील पाणी नेण्यात आले. सहकारमंत्री सुभाष देशमुख, सरपंच सौ. बिराजदार आणि तहसिलदार रघुनाथ पोटे यांच्या हस्ते कुडलसंगमावरील जलाने भरलेल्या कुंभाची आज सकाळी विधीवत पूजा करुन मिरवणूक काढण्यात आली.
            छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे भूमिपूजन, जलपूजन येत्या शनिवारी होणार आहे. प्रतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणा-या या कार्यक्रमाला राज्यातील विविध गड- किल्ले आणि नद्यांचे पाणी नेले जाणार आहे. सोलापूर जिल्ह्यातून यापूर्वीच पंढरपूर येथील चंद्रभागा नदीच्या पात्रातील पाणी नेण्यात आले आहे.
            सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे आज सकाळी अकरा वाजता कुडलसंगम हत्तरसंग येथे आगमन झाले. तहसिलदार रघुनाथ पोटे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर भीमा आणि सीना नद्यांच्या संगमावरील पाण्याने भरलेल्या कलशाचे पुजन करण्यात आले. जल कलशाची मिरवणूकही काढण्यात आली. हा कलश उद्या मुंबईत पोहोचणार आहे.
******


अरबी समुद्रातील छत्रपतींच्या भव्य स्मारकाचे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते २४ डिसेंबरला भूमिपूजन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे पालकमंत्री देशमुख यांचे आवाहन


सोलापूर, दि. 21  :  मुंबईजवळच्या अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे जलपूजन भूमिपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 24 डिसेंबरला होत आहे. या भूमिपूजन सोहळ्यासाठी  सोलापुरातील जनतेने उपस्थित राहावे, असे आवाहन   पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी आज येथे  केले.
शिवस्मारकाच्या भूमिपूजनाबाबत माहिती देण्यासाठी श्रमिक पत्रकार संघ येथे आज पत्रकार परिषद झाली. त्या पत्रकारपरिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी सहकार मंत्री सुभाष देशमुख, खासदार शरद बनसो़डे  आदी मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सांगितले की, राजभवनापासून जवळच असणाऱ्या समुद्रातील  बेटावर जगातील सर्वात उंच असे हे स्मारक असेल. हा कार्यक्रम अधिक संस्मरणीय ठरावा यासाठी राज्यातील सुमारे 70 हून अधिक प्रमुख नद्यांचे जल आणि गड किल्ल्यांवरची पवित्र माती  मुंबईत आणली जाणार आहे.
त्यांनी सांगितले की,  राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक मुंबई लगत अरबी समुद्रात उभारण्याचा निर्णय 2002 मध्ये घेतला.  परंतु उभारणीसाठी फारशा हालचाली झाल्या नाहीत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्याची सुत्रे हाती घेतल्यानंतर तातडीने याबाबत कार्यवाही पूर्ण करून स्मारकाच्या कामास गती दिली. त्यानंतर सर्व परवानग्या  प्राप्त करण्यात आल्या. या स्मारकास राज्य केंद्र शासनासह महापालिकेच्या विविध विभागाच्या परवानग्या आवश्यक होत्या. यामध्ये केंद्रीय पर्यावरण मंत्रालय, नौदल पश्चिम विभाग, तटरक्षक दल, सागरी किनारा अधिनियम,मुंबई पोलीस, मुंबई महानगरपालिका, बेस्ट, मुंबई पोर्ट ट्रस्ट, बी.एन.एच.एस.इंडिया,मत्स्यव्यवसाय विभाग, राष्ट्रीय सुरक्षा दल, दिल्ली,  भारतीय विमानपत्तन  प्राधिकरण अशा बारा विभागांची  ना हरकत प्रमाणपत्रे शासनास प्राप्त झाली आहेत.
            आपल्या असामान्य कामगिरीने महाराष्ट्राची पताका जगभरात फडकवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्राच्या वतीने हे अनोखे वंदन असेल. महाराष्ट्राच्या तेजस्वी आणि गौरवशाली इतिहासाचे प्रतिबिंब या स्मारकाच्या माध्यमातून अनुभवता येणार आहे.  त्यामुळे प्रकल्पाचे अनोखे विशिष्ट स्वरुप लक्षात घेऊन प्रकल्पाचा आराखडा, निविदा कागदपत्रे तयार करणे, प्रकल्पावर देखरेख करणे यासाठी दिनांक 11 एप्रिल 2016 रोजी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नेमणूक करून त्यानंतर प्रकल्प आराखडा मंजूर करण्यात आला आहे, असेही त्यांनी नमूद केले.
आंतरराष्ट्रीय प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यामध्ये 2300 कोटी रूपयांची  कामे प्रस्तावित आहेत. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा 192 मीटर उंचीचा पुतळा उभारण्याचे प्रारंभी नियोजन होते. आता या पुतळ्याची उंची 210 मीटर इतकी वाढविण्यासाठी पर्यावरण विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.  या स्मारकात  महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित कला दालन, प्रदर्शन  गॅलरी, महाराजांच्या चरित्रावर आधारित पुस्तकांचे सुसज्ज वाचनालय, प्रेक्षक गॅलरी, उद्यान, हेलीपॅड, अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी जनतेसाठी जेट्टी (धक्का), सुरक्षाविषयक व्यवस्थेचा समावेश आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
प्रकल्पासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धात्मक निविदा मागविण्यात आल्या असून 30 जानेवारीपर्यंत त्यांची स्वीकृती केली जाईल. त्यानंतर  19फेब्रुवारीपर्यंत कार्यादेश देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. काम सुरु झाल्यानंतर 36 महिन्यातच स्मारक पूर्ण करण्याचे सरकारचे नियोजन असून ते भावी पिढ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे. महाराजांची जीवनमूल्ये प्रदर्शित करणारे देशभक्तीपर माहिती केंद्रही या स्मारकात असेल, असे त्यांनी सांगितले.
----०००-----