Monday, January 23, 2017

नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन


     
पुणेदि. 23 – स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीदिनानिमित्त आज जिल्हा प्रशासनातर्फे त्यांना अभिवादन करण्यात आले.
             जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमात विभागीय आयुक्त एस.चोक्कलिंगम व जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अपर आयुक्त संपदा मेहता,अपर जिल्हाधिकारी रमेश काळे,महसूल विभागाचे उपायुक्त सुधाकर तेलंग,सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त कविता द्विवेदी,करमणुक कर विभागाचे उपायुक्त निलेश सागर,निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व माहिती कार्यालयातील अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.
0000

दोन दूध संकलन केंद्रावर अन्न औषध प्रशासनाची धाड मंगळवेढा तालुक्यात एक लाख 18 हजार रुपयांचे साहित्य जप्त


सोलापूर दि. 23 :-  अन्न औषध प्रशासनाच्या पथकाने आज मंगळवेढा तालुक्यातील गणेशवाडी आणि आंधळगाव  येथील दूध संकलन केंद्रावर धाड टाकून दूध भेसळीचे गैरप्रकार उघडकीस आणले. या धाडीत सुमारे 1,18,188 रुपयांचा माल जप्त करण्यात आल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय नारागुडे यांनी दिली.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवेढा तालुक्यातील  गणेशवाडी येथील सिध्देश्वर कदम यांच्या श्रीराम दूध संकलन केंद्रावर दूध भेसळ होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार आज सकाळी दूध संकलन केंद्रावर छापा टाकला असता तेथे गाईचे दूध, म्हशीचे दूध, सेरोलॅक मिल्क परमिएट पावडर  असा विविध माल जप्त केला. याची किंमत 52338 रुपये होते. आंधळगाव येथील बंडू सुखदेव लेंडवे यांच्या पांडुरंग दूध डेअरीवर भेट दिली असता तेथे गायीचे दूध, स्कीम मिल्क पावडर, व्हे. परमिएट पावडर यांचा साठा आढळला. यातील स्कीम मिल्क पावडर 323 किलो आहे. दोन्ही ठिकाणी आढळलेले दूध भेसळीच्या संशयावरुन कायद्यातील तरुदीनुसार पंचासमक्ष नष्ट करण्यात आले, असे श्री. नारागुडे यांनी सांगितले.
या कारवाईत अन्न सुरक्षा अधिकारी मसारे, लोंढे आदी सहभागी  झाले.
*****

Friday, January 20, 2017

पेड न्यूजबाबत तात्काळ कार्यवाही करण्यात येणार -- जिल्हाधिकारी सौरभ राव


पुणे, दि. 20: जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये होणाऱ्या पेड न्यूजच्या वापरावर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तालुकास्तरावर पेड न्यूज कक्ष तात्काळ स्थापन करावेत, पेड न्यूज आढळून आल्यास जिल्हा समितीच्या निदर्शनास आणून द्यावे. पेड न्यूजच्या प्रकरणाबाबत तात्काळ कार्यवाही  करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी आज दिला.
जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि समन्वय अधिकारी यांची बैठक झाली, त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. यावेळी अपर जिल्हाधिकारी रमेश काळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक समन्वय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण, जिल्हास्तरीय पेड न्यूज कक्षाच्या सदस्य सचिव तथा प्र. जिल्हा माहिती अधिकारी वृषाली पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन विभागाचे सहायक प्राध्यापक संजय तांबट आणि योगेश बोराटे उपस्थित होते.
            निवडणूक कालावधीमध्ये वृत्तपत्रांमध्ये पेड न्यूज प्रसिद्ध होऊ शकतात असे सांगून, जिल्हाधिकारी श्री. राव म्हणाले की, अशी प्रकरणे आढळून आल्यास निवडणुक निर्णय अधिका-यांनी त्याचा अहवाल त्वरीत जिल्हास्तरीय समितीकडे पाठवून द्यावा. या प्रकरणात त्वरीत कार्यवाही करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिलेले आहेत. उमेदवारांच्या निवडणूक खर्चामध्येही पेड न्यूजचा समावेश करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
            बैठकीमध्ये प्रा. संजय तांबट यांनी पेड न्यूज कशाला म्हणावयाचे याबाबत उपस्थितांना सादरीकरणाव्दारे सविस्तर माहिती दिली. सामान्य मतदाराची दिशाभूल करण्याचे काम पेड न्यूज करते. एकाच प्रकारचा मजकूर, बातमी विविध वृत्तपत्रात वेगवेगळ्या बायलाईनने छापून येणे, एकाच पानावर एकाच मतदार संघातील विविध सर्वच उमेदवारांच्या विजयाविषयी स्पष्ट  भाकीत नोंदविणे, विशिष्ट उमेदवारांना झुकते माप देणारे वृत्त प्रसिद्ध करणे आदी स्वरुपांच्या बातम्या, मजकुरास पेड न्यूज म्हणता येईल, असे त्यांनी सांगितले.
            प्रा. योगेश बोराटे यांनी सोशल मीडियावर होणाऱ्या प्रचाराविषयी सादरीकरण केले. व्हॉट्सॲप, फेसबुक, ट्विटर आदी सोशल मीडियावर होणाऱ्या प्रचारावरही लक्ष ठेवण्याचे आयोगाचे निर्देश आहेत. उमेदवारांनी आपल्या विविध सोशल मीडिया अकाउंटची माहिती प्रतिज्ञापत्रातच भरणे आवश्यक आहे. त्याशिवाय निवडणुकीत जातीय तणाव वाढविणाऱ्या, आचारसंहिता भंगाच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई कराण्यात यावी, असेही श्री. बोराटे यावेळी म्हणाले.

००००

निवडणुका शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नियोजनबध्द काम करावे --जिल्हाधिकारी सौरभ राव


पुणे, दि. 20: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नियोजनबध्द आणि चोख काम करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिल्या.
            जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि समन्वय अधिकारी यांची बैठक झाली, त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. यावेळी अपर जिल्हाधिकारी रमेश काळे,निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, जिल्हा परिषद व पंचायत समिती समन्वय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण उपस्थित होते.
            यावेळी जिल्हाधिकारी श्री. राव  यांनी मतदार यादी, मतदान केंद्रासाठी नियुक्त करण्यात येणारे कर्मचारी, मतदान केंद्र तपासणी, मतदार जनजागृती प्रभावीपणे करण्यासाठीच्या नियोजनाचा तालुकानिहाय आढावा घेतला. तसेच विविध माध्यमांचा वापर  करुन  मतदानाचे प्रमाण वाढविण्यास सांगितले. आचारसंहितेच्या अनुषंगाने बॅनर्स, पोस्टर्स, भित्तीपत्रके तात्काळ काढावीत. मतदान यंत्रांची प्राथमिक तपासणी तसेच मतदान केंद्रांची तपासणी करुन त्याचा अहवाल निवडणूक शाखेला तात्काळ देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. मतदान केंद्रांवर सर्व मूलभूत सुविधा असल्याची खात्री करुन घ्यावी. तसेच प्रत्येक मतदार संघातील किमान १० मतदान केंद्रे आदर्श मतदान केंद्रे म्हणून तयार करावीत, जेणेकरुन मतदानाचे प्रमाण वाढण्यास मदत होईल,असेही त्यांनी सांगितले. 
            श्री. राव  म्हणाले, आचारसंहिता भंगांच्या प्रकरणांवर लक्ष ठेवण्यासाठी विविध भरारी पथके तैनात ठेवावीत. यात प्रत्येक गटनिहाय किमान एक पथक नेमावे. तसेच आचारसंहिता प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करावा.      आचारसंहितेची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. विविध कार्यक्रम, सभा इ. संबंधी विविध राजकीय पक्षांना देण्यात येणाऱ्या परवानग्यांबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्वरीत निर्णय  घेऊन तो संबंधितांना कळवावा, कायदा व सुव्यवस्थाबाबतची प्रकरणांवर गुणवत्ता तपासून त्वरीत निर्णय घ्यावा, मतदार जनजागृतीसाठी तालुकापातळीवर आवश्यक विविध कक्ष तात्काळ स्थापन करावेत व नियोजनबध्द काम करावे.
            पेड न्यूज मध्ये मोडणाऱ्या बातम्या प्रसिध्द होत असल्याचे दिसून आल्यास यासंदर्भात जिल्हास्तरीय पेड न्यूज समितीला तात्काळ कळवावे, जेणेकरुन या खर्चाचा समावेश संबंधित उमेदवाराच्या निवडणूक खर्चात करता येईल व पुढील कार्यवाही करणे शक्य होईल, असेही त्यांनी सांगितले. 
            बैठकीला विविध खात्याचे अधिकारी, संबधित कर्मचारी उपस्थित होते.

००००



Thursday, January 19, 2017

अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत गुटखा व अनुषंगिक पदार्थाचा साठा जप्त


सोलापूर दि. 20 :-  अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत  गुटखा, पानमसाला, सुगंधीत तंबाखू आणि सुपारीचा साठा जप्त करण्यात आला असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त सं. भा. नारागुडे यांनी कळविले आहे.
अन्न  व औषध प्रशासन विभागास मिळालेल्या माहितनुसार  अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती न. त. मुजावार व नि. सु. मासारे यांनी  मे. एम. एस. कोठावळे, 28 पूर्व मंगळवार पेठ सोलापूर यांच्या दुकानावर धाड टाकून तपासणी केली असता या ठिकाणी  विविध प्रकारचे प्रतिबंधित अन्न पदार्थ गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू, सुगंधित सुपारीचा रुपये 40 हजार 790 साठा, मे. बालाजी ट्रेडर्स, 27 जोडभावी पेठ, सोलापूर येथे धाड टाकून तपासणी केली असता येथेही रुपये तीन लाख  चार हजार 800 रुपयांचा साठा, मे. महेश ट्रेडर्स, 35 जोडभावी पेठ येथे तपासणी केली असता येथेही चार हजार 949 रुपयांचा साठा विक्रीसाठी साठविल्याचे आढळून आले.  हा साठा अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत जप्त करुन ताब्यात घेण्यात आला. मे. एम.एस. कोठावळे 218 पूर्व मंगळवार पेठ, सोलापूरचे पेढी मालक भारत कोठावळे आणि पेढी विक्रेता महादेव कोठावळे, मे. बालाजी ट्रेडर्स, 27 जोडभावी पेठ, सोलापूरचे पेढी मालक विजय संतोषकुमार निरंकारी आणि मे. महेश ट्रेडर्स, 35 जोडभावी पेठेचे पेढी मालक संतोष लक्ष्मण भिंगारे यांनी सदरचा साठा कोणाकडून आणला याबाबतचा तपास अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.  मे. एम. एस. कोठावळे यांच्या विरुद्ध वारंवार प्रतिबंधित पदार्थ्याची विक्री व साठवणूक केल्यामुळे त्यांच्या विरुद्ध कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सर्व परवाना नोंदणीधारकांनी प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, सुगंधीत तंबाखू आणि सुपारी इत्यादी विक्री अथवा साठा  करु नये. अशा प्रकारचा साठा आढळून आल्यास त्यांच्या विरुद्ध अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत योग्य कारवाई करण्यात येईल असेही सहायक आयुक्त सं. भा. नारागुडे यांनी कळविले आहे.
00000

अनुकंपा नियुक्ती प्रारुप सूची संकेतस्थळावर प्रसिध्द


सोलापूर दि. 20 :-  जिल्ह्यातील शासकीय कार्यालयाच्या नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे    31 ऑगस्ट 2016 अखेर देण्यात आलेली अनुकंपा नियुक्तीची प्रारुप सामाईक ज्येष्ठता सूची solapur.nic.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
ही यादी सर्व नियुक्ती अधिकारी यांनी आपल्या कार्यालयातील सर्व संबंधित उमेदवारांच्या निदर्शनास आणावी. या यादीबाबत काही हरकती असल्यास त्या दिनांक 25 जानेवारी 2017 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवाव्यात. मुदतीनंतर आलेल्या हरकतींचा विचार केला जाणार नाही. तसेच ज्या मयत कर्मचाऱ्यांच्या वारसाने एक वर्षापेक्षा जास्त कालावधीत झाल्यानंतर अर्ज दिलेले आहे, अशा गट क  व ड  या संवर्गाची स्वतंत्र यादीही उपरोक्त संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. याबाबतचे अभिप्राय नियुक्ती प्राधीकारी यांनी 25 जानेवारी पर्यंत सादर करावेत.
तसेच ज्या शासकीय कार्यालयाच्या अधिकारी  नियुक्ती प्राधिकारी नाहीत त्यांनी त्यांच्या नियुक्ती प्राधिकाऱ्यांकडे याबाबत पाठपुरावा करावा, असे निवासी उपजिल्हाधिकारी अजित रेळेकर यांनी कळविले आहे.
****

पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण जाहिर


पुणे, दि. 19 : जिल्हा परिषद पुणे अंतर्गत येणाऱ्या तेरा पंचायत समिती सभापती पदाची आरक्षण सोडत जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या हस्ते आज काढण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीचे समन्वय अधिकारी विक्रांत चव्हाण, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजीत बढे उपस्थित होते.
पंचायत समिती सभापती पदाचे सन 2017 चे आरक्षण पुढीलप्रमाणे आहे.बारामती-अनुसूचित जाती, खेड-अनुसूचित जमाती (महिला), मुळशी-नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), दौंड-नागरिकांचा मागासप्रवर्ग,आंबेगाव-नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), मावळ- नागरिकांचा मागास प्रवर्ग, वेल्हा-सर्वसाधारण महिला, भोर-सर्वसाधारण महिला, हवेली-सर्वसाधारण महिला, जुन्नर-सर्वसाधारण महिला, शिरुर- सर्वसाधारण, पुरंदर- सर्वसाधारण आणि इंदापूर- सर्वसाधारण.
                                                      ******