Saturday, February 18, 2017

खेड (राजगुरुनगर) उपविभागीय अधिकाऱ्यांकडून कलम 144 (3) नुसार प्रतिबंधात्म्क आदेश जारी


          पुणे, दि.18 : उपविभागीय दंडधिकारी, खेड (राजगुरुनगर )  श्री. सुनिल गाढे  यांनी, त्यांना फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (3) अन्वये मिळालेल्या अधिकारान्वये शांततेस बाधा पोहोचविणाऱ्या इसमांना खेड तालुक्यातून 23 फेब्रुवारी,2017 पर्यत हद्द्पार करण्याचा आदेश दिला आहे.
          या प्रतिबंधात्मक आदेशान्वये हरीभाऊ गोंविद शिंदे, अशोक बापु शिंदे, बाळासाहेब चापाजी शिंदे आणि गणेश सिताराम शिंदे रा.आंबोली ता. जि. पुणे यांच्यावर त्यांच्या मतदानाचा हक्क अबाधित ठेवून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. या प्रतिबंधात्मक कारवाईनुसार संबधितांना खेड तालुका हद्दीत प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
          सदर आदेशाची अवमानता केल्यास संबंधीत व्यक्ती भारतीय दंड विधान काद्याचे कलम 188 प्रमाणे दंडनीय कारवाईस पात्र राहील याची नोंद घ्यावी असे उपविभागीय अधिकारी,भोर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.         
00000



अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांचा पुणे दौरा कार्यक्रम


            पुणेदि. 18: अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षणअन्न  व औषध प्रशासन तसेच पुणे जिल्हयाचे पालकमंत्री गिरीश बापट हे गुरुवार दिनांक 19 फेब्रुवारी,2017 रोजी पुणे दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
रविवार दिनांक19 फेब्रुवारी,2017 रोजी  सकाळी 9-00 वाजता पुणे येथून शिवनेरी गडाकडे प्रयाण.  सकाळी 9-15 वाजता किल्ले शिवनेरी  येथे आगमन. सकाळी 10.00 वाजता किल्ले शिवनेरी येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रमास उपस्थिती. सोयीनुसार पुण्याकडे प्रयाण व  मुक्काम. 
00000

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीसाठी प्रशासन सज्ज ...जिल्हाधिकारी सौरभ राव

·                  मतदानाची टक्केवारी वाढवण्यावर भर
·                  जि.प.निवडणुकीबाबत आकाशवाणीवर मुलाखत

       पुणे दि. 18 : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती  निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्याचा जिल्हा प्रशासनाचा भर आहे,त्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुक्ष्मपध्दतीने नियोजन केले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ राव यांनी दिली.
      आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरुन जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीबाबत जिल्हाधिकारी सौरभ राव यांची मुलाखत नुकतीच प्रसारित झाली. या मुलाखतीत श्री. राव यांनी ही माहिती दिली. प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी ही मुलाखत घेतली. आकाशवाणीच्या कार्यक्रम अधिकारी ज्योत्स्ना केतकर यांनी मुलाखतीचे संयोजन केले. या मुलाखतीसाठी निवडणूक समन्वयक तथा उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांनी पुढाकार घेतला.
           जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले की, ‘ भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला मतदानाचा पवित्र हक्क दिला आहे. हा हक्क नागरिकाने बजावयाला हवा त्यासाठी प्रशासन मतदार जनजागृतीचे विविध उपक्रम राबवत आहे. मतदारांनी निर्भीड आणि निपक्षपणे मतदान करावे यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार विविध समित्या आणि गटांची नियुक्ती करण्यात आली आहे.
      जिल्हाधिकारी राव म्हणाले, ‘ पुणे जिल्हा परिषदेच्या 75 गटांसाठी आणि जिल्ह्यातील 13 पंचायत समितींच्या  150 गणांसाठी निवडणूक घेतली जाणार आहे. जिल्हा परिषदेसाठी  सुमारे 28 लाख मतदार आहेत. हवेली तालुक्यात सर्वाधिक मतदार आहेत. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी तेरा तालुक्यांसाठी उपजिल्हाधिकारी दर्जाचे  13 निवडणूक निर्णय अधिकारी तसेच तहसिलदार दर्जाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. याचबरोबर जिल्हास्तरावर निवडणूक संनियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमध्ये विविध विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. याचबरोबर आचारसंहिता कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षाकडे नागरिक आचारसंहिता भंगाबाबत तक्रार नोंदवू शकतात. निवडणूक योग्य व पारदर्शक वातावरणात पार पडावी यासाठी आचारसंहिता कक्ष, एक खिडकी कक्ष, आराखडा कक्ष, मतदार मदत केंद्र, वाहतुक व्यवस्थापक कक्ष, वाहन अधिग्रहण समिती, निवडणूक निरिक्षण कक्ष, इ.व्हि.एम.मॅनेजमेंट कक्ष, प्रसार माध्यम कक्ष, पेड न्युज कमिटी स्थापन करण्यात आली आहे. मतदानासाठी जवळपास 10 हजार इ.व्हि.एम. उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तसेच सुमारे 500 वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.
             आचारसंहिता भंगाची तक्रार आल्यास त्याबाबत तत्काळ कार्यवाही केली जाणार असल्याचे सांगून श्री.राव म्हणाले कीनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याबरोबर सर्व राजकीय पक्षांची बैठक घेऊन आचारसंहिताच्या तरतूदीबाबत कल्पना देण्यात आली आहे. त्याचबरोबर शासकीय यंत्रणांनी काय पध्दतीने काम करावे यासाठी योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. आचारसंहिता कक्ष अहोरात्र सुरु ठेवण्यात येणार असून या पथकात महसूलपोलीस आणि अन्य विभागाचे अधिकारीकर्मचारी यांचा समावेश आहे. संवेदनशिल मतदान केंद्रावर विशेष लक्ष ठेवण्यात आले असून तेथे आवश्यक सुरक्षा बल नेमण्यात आले आहे.
       जिल्ह्यात एकूण 3369 मतदान केंद्र आहेत. सर्व केंद्रावर पिण्याचे पाणीवीजपुरवठासुरक्षा भिंत शौचालय आदी बाबींची सुविधा असल्याची खात्री करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी सौरभ रांव यांनी सांगितले.
      राज्य निवडणूक आयोगाने या निवडणूकीत तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्यावर भर दिला आहे. ट्रू व्होटरच्या सहाय्याने मतदार आपले मतदार यादीतील नांव शोधू शकतो. त्याचबरोबर तरुण मतदारांनी मतदान करावे यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे जनजागृती करण्यात येत आहेअशी माहिती श्री. सौरभ राव यांनी दिली.
उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत. उमेदवारांच्या अर्जातील माहितीच्या आधारे फ्लेक्स तयार करुन मतदान केंद्राबाहेर लावली जाणार आहे. त्यामूळे मतदाराला उमेदवाराच्या बाबत नीट माहिती मिळू शकेलअसेही  श्री.सौरभ राव यांनी सांगितले. या निवडणूकीत आदर्श मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. याद्वारे मतदारांनी मतदानाकडे आकर्षित व्हावे असे प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
                                                                                0000

Friday, February 17, 2017

हवेली तालुक्याचे मतदान साहित्य वाटप शिवाजीनगर गोदामातून होणार



पुणे, दि. 17 : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच्या अनुषंगाने हवेली तालुक्यातील मतदान साहित्यवाटप दिनांक 20 फेब्रुवारी 2017 रोजी सकाळी 9 वाजता शिवाजीनगर धान्य गोदाम येथे तर मतदान साहित्य स्वीकृती शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे मैदान येथे होणार आहे, अशी माहिती हवेलीचे निवडणूक निर्णय अधिकारी शहाजी पवार यांनी दिली आहे.
            या अनुषंगाने सर्व मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, शिपाई व पोलीस आदी कर्मचाऱ्यांनी दिनांक 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे मैदान, शिवाजीनगर येथे उपस्थित रहावे, असे आवाहनही श्री. पवार यांनी केले आहे.
00000

आकाशवाणी पुणे केंद्रावर जिल्हाधिकारी सौरभ राव यांची आज मुलाखत निवडणूक कामकाजाबाबत देणार सविस्तर माहिती


पुणे, दि. 17 : पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक तयारीविषयक माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी सौरभ राव यांची मुलाखत उद्या शनिवारी सकाळी 10.30 वाजता प्रसारित होणार असून याच मुलाखतीचे पुन:प्रसारण रविवारी सकाळी 9.30 वाजता पुणे आकाशवाणीच्या मिडीयम वेव्ह 792 किलोहर्टझ् केंद्रावरुन प्रसारीत होणार आहे.
            या मुलाखतीमध्ये निवडणूक व मतमोजणी, आचारसंहितेच्या अनुषंगाने नेमलेली पथके व केलेली कारवाई, मतदान व मतमोजणी प्रक्रियेसाठी नेमलेले कर्मचारी, मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदारांची जनजागृती यासाठी करण्यात आलेले प्रयत्न आदी विषयांबाबत जिल्हाधिकारी श्री. राव हे सविस्तर माहिती देणार आहेत. मुलाखत प्र. जिल्हा माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी घेतली आहे.
0000

Thursday, February 16, 2017

दुकाने, व्यापारी संस्था व औद्दोगिक आस्थापनांसाठी सुचना


            पुणे, दि. 16 : महानगरपालिका, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकी करीता मंगळवार दिनांक 21 फेब्रुवारी, 2017 रोजी पुणे जिल्ह्यातील सर्व दुकाने, आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्दगृहे, अन्नगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्दोगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनामधे कामास असलेल्या कामगारांना मतदानाचा हक्क बजापण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी. मतदानाच्या दिवशी अनुपस्थितीमुळे धोका अथवा मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल, अशा उद्दोगातील कामगारांना सदर आदेश लागू राहणार नाहीत, तथापी सदर कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी 2 तासांची विशेष सवलत देण्यात यावी, असे आदेश अपर कामगार आयु्क्त (प्र) पुणे विभाग, पुणे यांनी दिले आहेत.

00000

पुणे शहर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी



            पुणे, दि.16: पुणे शहराचे पोलीस सह आयुक्त सुनिल रामानंद यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दिनांक 20  फेब्रुवारी 2017 रोजी सकाळी 06-00  वा जेपर्यंत  मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 36 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी  केला आहे.
            यानुसार कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ, द्रव्य बरोबर नेणे, शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठ्या बंदुका व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे अथवा बाळगणे, कोणत्याही इसमाचे, चित्राचे, प्रतीकात्मक प्रेताचे, पुढाऱ्यांचे चित्रांचे, प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे, सभ्यता अगर नितिमत्ता राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल असे वर्तन करणे यास मनाई करण्यात येत आहे. तसेच मोठ्याने घोषणा देणे, मिरवणूक काढणेभाषण करणे, अविर्भाव करणे, सभा घेणे, पाच किंवा पाचपेक्षा अधिक इसमांचा जमाव करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. आदेशाचे उल्लघंन करणारी व्यक्ती कायद्यानुसार शिक्षेस पात्र राहील, असे आदेशात नमूद केले आहे.
            जमावबंदीचे आदेश लग्नकार्य, धार्मिक विधी, प्रेतयात्रा, सिनेमागृह इत्यादी कारणांकरीता लागू राहणार नाही.  तसेच हा आदेश हा शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे त्यांना लागू होणार नाही, असेही आदेशात नमूद केले आहे.

00000000