Wednesday, November 8, 2017

राज्य शासकीय महिला अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबतचे निवेदन जिल्हा प्रशासनाकडे सादर


                पुणे, दि. 8: राज्य शासकीय महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील सर्व महिला अधिकारी कर्मचाऱ्यांनी बुधवार दि. 8 नोव्हेंबर, 2017 रोजी लक्षवेध दिन पाळला. महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सर्व महत्वाच्या मागण्यांकडे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी तत्परतेने व्यक्तिगत लक्ष घालून, त्याबाबत संबंधित विभागांचे अभिप्राय प्राधान्याने घेऊन, येत्या जागतिक महिला दिना पुर्वी म्हणेज दि. 8 मार्च, 2018 पर्यंत याबाबत निर्णय घ्यावेत, यासाठी महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्यांचे निवेदन पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात दुर्गा महिला मंचच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांच्याकडे सुपुर्द केले. यावेळी संघटनेच्या उपाध्यक्ष (महिला) सि.च.सेवतकर, महिला सहसचिव सविता नलावडे आदि पदाधिकारी उपस्थित होते.  
         राज्य शासनातील महिला अधिकाऱ्यांचे प्रश्न हाताळण्यासाठी अधिकारी महासंघांतर्गत दुर्गा महिला मंच कार्यरत आहे. महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे शासन-प्रशासन स्तरावर दखल घेण्यासाठी अधिकारी महासंघाच्या महिला पदाधिकारी व अन्य महिला कर्मचाऱ्यांची अधिकारी महासंघाच्या कार्यालयात बैठक झाली होती. यामध्ये महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांबाबत 12 प्रस्ताव संमत करण्यात आले. या सर्व प्रश्नांबाबत कार्यवाही होण्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव निवेदनाव्दारे जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला.
         यामध्ये बालसंगोपन रजा मंजूरी, वार्षिक वैद्यकीय तपासणी, ग्रॅच्युईटी गणना महागाई भत्ता धरुन करणे, प्रसूती रजेला जोडून बालसंगोपनासाठी घेतलेली असाधारण रजा अर्हताकारी सेवा म्हणून मान्य करणे, ताण व्यवस्थापन बाबत शिबिरांचे शासनस्तरावरुन आयोजन होणे, पाळणा घराची सुविधा शासकीय कार्यालयात तसेच जिल्ह्यातील/तालुक्यांतील महत्वाच्या ठिकाणी उपलब्ध करुन देणे अशा 12 विषयांचा समावेश आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ, पुणे जिल्हा समन्वय समितीने दिली.
00000

Sunday, November 5, 2017

सशक्त लोकशाहीसाठी मन की बात संवाद महत्वाचा
मन की बात प्रमाणेच मी मुख्यमंत्री बोलतोय हा उपक्रमही स्तुत्य
-    राज्यपाल चे. विद्यासागर राव
पुणे दि. 5 (वि.मा.का.) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा कार्यक्रम सर्वसामान्य जनतेशी संवाद साधण्याचे चांगले साधन आहे. सशक्त लोकशाहीसाठी हा संवाद महत्वाचा असून याच धर्तीवर आधारीत असणारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मी मुख्यमंत्री बोलतोय हा कार्यक्रमही स्तुत्य असल्याचे गौरोद्गार राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज काढले.
येथील बालगंधर्व रंगमंदीरात नवभारत निर्मिती संकल्प सिध्दी व भारतीय विचार साधना प्रकाशन पुणेच्यावतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आकाशवाणीवरील प्रसारीत भाषणावर आधारीत मन की बात” च्या मराठी अनुवादीत पुस्तकाच्या पहिल्या भागाचे प्रकाशन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक, खासदार विनय सहस्रबुध्दे, खासदार अनिल शिरोळे,  नवभारत निर्मिती संकल्प सिध्दीचे समन्वयक योगेश गोगावले, भारतीय विचार साधनेचे अध्यक्ष किशोर शशितल, कार्यवाह राजन ढवळीकर उपस्थित होते.
राज्यपाल चे. विद्यासागर राव म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा कार्यक्रम देशातील सर्व सामान्य जनतेशी साधलेला संवाद आहे. या कार्यक्रमात सर्व सामान्य जनतेच्या आशा, आकांक्षांचे प्रतिबिंब असते. संवादा शिवाय लोकाशाही बळकट होवू शकत नाही. सशक्त लोकशाही साठी मन की बात सारखा संवादाचा कार्यक्रम अत्यंत महत्वाचा आहे. सामान्य जनता आणि शासन यांच्यातील सेतूचे काम या कार्यक्रमामुळे होत आहे. देशाच्या नवनिर्मितीसाठी हा कार्यक्रम अत्यंत महत्वाचा आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वसामान्य जनतेला कामाची प्रेरणा मिळते. मन की बात प्रमाणेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घेत असलेला “ मी मुख्यमंत्री बोलतोय” हा उपक्रमही शासनाच्या आणि शासनकर्त्यांच्या संवेदनशीलतेचे प्रतिक आहे. हा कार्यक्रम स्तुत्य आहे. मन की बात हा कार्यक्रम मराठी सारख्या प्रादेशिक भाषेत पुस्तक स्वरूपा अनुवादीत करण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. यामुळे प्रधानमंत्र्यांचे विचार व्यापक स्वरूपात सामान्य लोकांपर्यंत पोहोचतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
खासदार विनय सहस्रबुध्दे म्हणाले, मन की बात हा कार्यक्रम एका कुटुंब प्रमुखाने कुटुंबातील सदस्यांशी केलेली हितगूज आहे. सामान्य लोकांकडून येणाऱ्या सुचनांनुसार मन की बातमध्ये संवाद साधला जातो. तसेच हा कार्यक्रम एकाच वेळी देशातील 27 जनता ऐकते. त्यामुळे खऱ्या अर्थाने हा जन संवाद आहे. हा कार्यक्रम म्हणजे भारतातील विविधतेतील एकतेचे प्रतिबिंब आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगेश गोगावले यांनी केले. तर आभार राजन ढवळीकर यांनी मानले. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*****





राज्यपाल चे. विद्यासागर राव यांची कॉसमॉस बँकेला भेट 'आय एम बँकींग ॲप'चा शुभारंभ


पुणे दि.: महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज कॉसमॉस बँकेच्या कॉसमॉस पॉवर या प्रशासकीय कार्यालयास भेट दिली. यावेळी राज्यपाल श्री. राव यांच्या हस्ते कॉसमॉस बँकेच्या 'आय एम बँकींग ॲप'चा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बँकेचे अध्यक्ष मिलींद काळे, उपाध्यक्ष गोविंद क्षीरसागर तसेच बँकेच्या संचालक मंडळाचे सदस्य, व्यवस्थापकीय संचालक तसेच वरिष्ठ पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
राज्यपाल श्री. राव यांनी कॉसमॉस बँकेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये माहिती व तंत्रज्ञान विभागास भेट दिली. तसेच बँकेच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबाबत  कौतुक केले. ते म्हणाले, बँक कामकाजात  सातत्याने  सुधारणा करत आहे. माहिती तंत्रज्ञानावर भर देवून तयार केलेले हे मोबाईल ॲप वापरण्यास सुलभ व सुरक्षित आहे. यामुळे डिजीटल इंडियाकडे वाटचाल करणे सोपे होईल.
बँकेचे अध्यक्ष श्री. काळे म्हणाले,  बँकेचे आय एम बँकींग मोबाईल ॲपव्दारे खातेदारांना बँकींग सेवा- सुविधा अत्यंत सोप्या, सुरक्षित तसेच कुठेही व कधीही उपलब्ध होणार आहेत. या ॲपव्दारे ठेव खाते उघडणे, धनादेश पुस्तक मागणी, रक्कम वर्ग करणे, इतर बील्स रक्कम अदा करणे इ. सर्व सेवा सुविधाही उपलब्ध होणार आहेत. या सर्व गोष्टी मोबाईल हँडसेटव्दारेही होणार आहेत, अशी माहिती  श्री. काळे यांनी यावेळी दिली. बँकेचे उपाध्यक्ष गोविंद क्षीरसागर यांनी आभार मानले.
                                 




राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची अपेक्षा : राजभवनातील प्रकल्पाचे उद्घाटन


 पुणेदि. ५ (विमाका):  सौरऊर्जा निर्मिती आणि वापरात महाराष्ट्राने आघाडीवर राहावे त्यासाठी राज्य शासनाने अधिकची आर्थिक तरतूद करावी, अशी अपेक्षा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज येथे व्यक्त केली.
पुणे येथील राजभवन परिसरात एक मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पाचे उद्घाटन आज राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी राज्यपाल बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री गिरीश बापट, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, खासदार संजय काकडे, मेडाचे महासंचालक राजाराम माने,  राज्यपालांचे सचिव वेणुगोपाल रेड्डी आदी मान्यवर उपस्थित होते.
            राजभवनच्या इतिहासात आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. कारण हे देशातील सर्व राजभवनापैकी सर्वोच्च क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्पाचे आज उद्घाटन होत आहे, असे सांगून राज्यपाल म्हणाले, ‘केंद्र सरकारने सौरऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात नवनवीन उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यामध्ये राष्ट्रीय सोलर मिशनच्या अंतर्गत २०२२ पर्यंत २० हजार मेगावॅटवरून एक लाख मेगावॅट सौरऊर्जा निर्मिती करण्याचे उद्दिष्ट आहे. ऊर्जा टंचाईवर मात करण्याचे प्रयत्न करीत असतानाच आपण स्वच्छ, शाश्वत आणि नवीनीकरण ऊर्जा स्त्रोतांचा वापर करायला हवा. आपल्या देशातील लोकांची आणि औद्योगिकरणाची वाढती गरज भागविण्यासाठी आपल्याला सौरऊर्जेकडे वळावेच लागेल. कारण आता सौरऊर्जा हा अनिवार्य पर्याय उरला आहे, असे राज्यपाल राव यांनी सांगितले.
            आपल्या देशात सौरुर्जेची प्रचंड निर्मिती होऊ शकते. देशाच्या प्रत्येक भागात वर्षातून २५० ते ३०० दिवस स्वच्छ सूर्यप्रकाश असतो. त्यामुळे आपली उर्जेची गरज सौरनिर्मितीतून भागवू शकतो. मात्र, सौरऊर्जा निर्मितीच्या यंत्रसामग्रीत सातत्याने संशोधन होऊन त्याचे दर कमी होण्याची आवश्यकता आहे. पारंपारिक ऊर्जा निर्मिती क्षेत्राकडून सौरऊर्जा निर्मिती क्षेत्राला स्पर्धक म्हणून पाहिले जाऊ लागले आहे. या क्षेत्राचा विकास होण्यासाठी पूरक असे धोरण आखणे आणि त्याची अंमलबजावणी करणे हे आता शासनासमोरील आव्हान आहे, असे राज्यपाल विद्यासागर राव यांनी सांगितले.
वीजनिर्मितीबरोबर बचतीचेही धोरण-मुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘राज्यपाल विद्यासागर राव यांनी राजभवन सामान्य माणसाला खुले करून त्याला लोकभवनचे रूप दिले. अपारंपारिक ऊर्जाच्या वापरला चालना देण्यासाठी राज्यातील तीनही राजभवनात सौरऊर्जा प्रकल्प उभे केले आहेत. या प्रकल्पामुळे राजभवनाच्या एकूण वापराहूनही जास्त वीज निर्मिती होईल.’
राज्य शासनाने वीज निर्मिती बरोबरच वीज बचतीचेही धोरण आखले आहे. याद्वारे एक हजार मेगावॅट वीज बचत केली जाऊ शकते. एलईडी बल्बचा वापर आणि ऊर्जा कार्यक्षम उपकरणांचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. राज्यात आठ कोटी एलईडी बल्ब लावले आहेत. शेतीचे फिडर सौरऊर्जेवर रुपांतरीत करणार आहोत. त्यामुळे विजेपोटी द्यावी लागणाऱ्या अनुदानात बचत होईल. राळेगणसिद्धी येथे पहिल्या फिडरचे भूमिपूजन झाले आहे. उपसा सिंचन योजनाही सौरऊर्जेवर चालवण्याचा विचार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
वेणुगोपाल रेड्डी यांनी प्रास्ताविक केले तर मेडाचे महासंचालक राजाराम माने यांनी आभार मानले.
यावेळी खासदार अमर साबळे, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, जिल्हाधिकारी सौरभ राव, राज्यपालांचे उपसचिव रणजित कुमार आदी पदाधिकारी उपस्थित होते.





Wednesday, October 25, 2017

भ्रष्टाचार विरोधी जनजागृती सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन


          पुणे दि.२५ : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने दि. ३० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत 'भ्रष्टाचार विरोधी दक्षता जनजागृती सप्ताह' आयोजीत करण्यात आला आहे. भ्रष्टाचार विरोधात जनजागृती करण्यासाठी या सप्ताहात विविध कार्यक्रम आयोजित करण्यातयेणार आहेत, अशी माहिती प्र. जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी दिली.
          'भ्रष्टाचार विरोधी जनजागृती सप्ताह' आयोजनाबाबत श्री. काळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली, यावेळी त्यांनी ही माहिती दिली. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस अधीक्षक प्रसाद हसबनीस, पोलीस उप अधीक्षक जगदीश सातव तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
           केंद्रीय दक्षता आयोगाच्या निर्देशानुसार दरवर्षी 'भ्रष्टाचार विरोधी जनजागृती सप्ताह' देशभरात सर्व शासकीय कार्यालयात आयोजित केला जातो. या माध्यमातून नागरिकांमध्ये भ्रष्टाचार विरोधी जनजागृती करण्यात येते. सोमवार पासून सुरु होणाऱ्या या सप्ताहात याविषयीच्या जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
 'समाजाचा विकास व भ्रष्टाचार, भ्रष्टाचार प्रतिबंध करण्यासाठीच्या उपाययोजना, भ्रष्टाचार प्रतिबंध संदर्भात मी काय करु शकतो?, भ्रष्टाचार समाजाला लागलेली एक कीड, भ्रष्टाचार संपवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर, भ्रष्टाचारमुक्त भारत माझे स्वप्न' या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.
          शहरातही सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ देऊन सप्ताहाला सुरुवात करण्यात येईल. या सप्ताहामध्ये शहर व जिल्ह्य़ातील सर्व शाळामहाविद्यालये, सहकारी गृहनिर्माण सोसायटी, सरकारी रुग्णालये तसेच मोक्याच्या ठिकाणी भ्रष्टाचाराविरुद्ध जनजागृतीसाठी फलकस्टीकर्स लावण्यात येणार आहेत. तालुका व गाव पातळीवर देखील भ्रष्टाचाराविरुद्ध जनजागृती करण्याचे नियोजन लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत करण्यात येत आहे, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या श्री. हसबनीस यांनी दिली. 
०००००००

Wednesday, October 18, 2017

पुणे जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप कर्जमाफी तर सुरूवात शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हेच शासनाचे अंतिम उद्दिष्ट - पालकमंत्री गिरीश बापट


Ø  जिल्ह्यातील 25 पात्र शेतकऱ्यांचा प्रातिनिधीक सन्मान.
Ø  जिल्ह्यात एकूण 2 लाख 98 हजार 56 लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती अपलोड.
Ø  जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अंदाजे साडे पाचशे कोटींचा मिळणार लाभ.
पुणे दि. 18: बळीराजा हा आपल्या सर्वांचा पोशिंदा आहे. या पोशिंद्याच्या मागे सरकार ठामपणे उभे आहे. आजचा दिवस राज्याच्या दृष्टीने ऐतिहासिक असून कर्जमाफी ही तर केवळ सुरुवात असून राज्यातील सर्व शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हेच शासनाचे अंतिम उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज केले.
            येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या मुख्य सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 कर्जमुक्ती प्रारंभ कार्यक्रमात जिल्ह्यातील प्रातिनिधीक स्वरुपात पात्र 25 शेतकऱ्यांचा कर्जमाफी प्रमाणपत्र, सन्मानपत्र, साडीचोळी, दिवाळी फराळ देवून पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी सौरभ राव, आमदार बाबुराव पाचर्णे, आमदार जगदीश मुळीक, पुणे बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे, विभागीय सहनिबंधक दीपक तावरे, जिल्हा उपनिबंधक आनंद कटके उपस्थित होते.
            श्री. गिरीश बापट म्हणाले, राज्यातील शेतकरी निसर्गाच्या दुष्टचक्रात अडकला आहे. या दुष्टचक्रामुळे त्याच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. शेतकरी आपला सर्वांचा पोशिंदा असल्याने त्याला या संकटातून बाहेर काढण्याची आपली जबाबदारी आहे. आजचा दिवस हा राज्याच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस आहे. कर्जमाफी ही तर सुरूवात असून राज्यातील शेतकऱ्याला संपुर्ण कर्जमुक्ती द्यायची आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने सरकारची कार्यवाही सुरु असून शेतकऱ्यांना शेतीच्या बरोबर शेतीपुरक उद्योग उभारण्यासाठी सरकार मदत करत आहे. त्यासाठी सर्वंकश आराखडा तयार करण्याचे काम राज्य शासनाने हाती घेतले आहे.  
            राज्यातील शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करण्यावर शासनाचा भर राहणार आहे. त्यासाठी शासनाच्यावतीने विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना करुन देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. जलयुक्त शिवार अभियानाचे चांगले परिणाम राज्यभर दिसत आहेत. त्यामुळे राज्यातील अनेक गावे टँकरमुक्त झाली आहेत. पुणे जिल्ह्यातून एकूण 2 लाख 98 हजार 56 लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्याचे काम पूर्ण झाले आहे. या  योजनेचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अंदाजे साडे पाचशे कोटी रुपयांचा फायदा होणार आहे. या योजनची ही सुरूवात आहे, त्यामुळे या यादीत कोणाचे नाव नसेल तरी तो पात्र असेल तर त्याला त्याचा लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्री महोदयांनी जाहिर केल्या प्रमाणे राज्यातील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला लाभ मिळेपर्यंत ही योजना सुरू राहणार आहे.
            चंद्रकांत दळवी म्हणाले, राज्य शासनाने जाहीर केलेला कर्ज माफीचा निर्णय हा अत्यंत महत्वाचा आणि ऐतिहासिक आहे. यापूर्वी करण्यात आलेल्या कर्जमाफीमध्ये केंद्र सरकारने योगदान दिले होते. मात्र यावेळची कर्जमाफी ही संपुर्णपणे राज्य शासनाने केलेली आहे. या नवीन धोरणामुळे राज्यातील अपात्र लोकांना याचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे खऱ्या आणि योग्य लाभार्थ्यापर्यंत या योजनेचा लाभ जाणार आहे. राज्याने जाहीर केलेली 34 हजार कोटींची कर्जमाफी ही अत्यंत मोठी आहे. राज्य शासनाने हा निर्णय अत्यंत कमी वेळेत घेतला आहे. कर्जमाफीमध्ये गैरप्रकार होवू नये यासाठी शासनाने योग्य खबरदारी घेतली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीमुळे शेतकऱ्यांवरील मोठा बोजा कमी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा उपनिबंधक आनंद कटके यांनी केले तर आभार विभागीय सहनिबंधक दीपक तावरे यांनी मानले. या कार्यक्रमाला जिल्ह्यातून विविध संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुरू असणाऱ्या कर्जमाफी प्रारंभ कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण मोठ्या पडद्यावर दाखविण्यात आले.
*****
पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रीया
आमच्या आयुष्याला नवी उभारी मिळेल
शासनाने केलेल्या कर्जमाफीमुळे डोक्यावरचा मोठा बोजा कमी झाला आहे. निसर्गाचा कोप झालेला असताना शासनाने दिलेला मदतीचा हात आम्हाला नक्कीच मदतीला येणार आहे. यामुळे आमच्या आयुष्याला नवी उभारी मिळेल. या कर्जमाफी बद्दल आम्ही शासनाचे मन:पूर्वक आभार मानतो.
-    शशीकांत रंगनाथ गोटे – झगडेवाडी, ता. इंदापूर .
डोक्यावरचा बोजा उतरला
गेल्या काही वर्षापासून निसर्गाच्या बदललेल्या चक्रामुळे आम्ही अडचणीत आलो होतो. त्यामुळे कुटुंब चालविताना मोठी दमछाक होत होती. निसर्गाच्या कोपामुळे उत्पन्नात मोठी तुट झाली होती, त्यामुळं डोक्यावर मोठा कर्जाचा बोजा वाढला होता. या कर्जमाफीमुळं डोक्यावरचा बोजा उतरला आहे.  
-    शमशुद्दीन नबीराज शेख  – कडबनवाडी  ता. इंदापूर
आता नव्या दमाने कामाला लागणार
डोक्यावर कर्जाचा बोजा असल्यामुळे दुसऱ्या बँका कर्जासाठी दारात उभ्या करत नव्हत्या. त्यामुळं सगळच ठप्प झाल होतं. आता या कर्जमाफीमुळं डोक्यावरचा कर्जाचा बोजा तर उतलाच आहे. आता थकीत नसल्यामुळे पुढच्या हंगामासाठी बँकाही कर्ज देतील. त्यामुळं आता नव्या दमानं कामाला लागणार आहे.  
-    शमशुद्दीन नबीराज शेख  – कडबनवाडी  ता. इंदापूर
*****






विधानभवन : पुणे जिल्ह्यातील छ. शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ या कर्जमाफी योजनेचा प्रारंभ पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाला