Tuesday, February 19, 2019

जुन्नर परिसराच्या विकासासाठी दाऱ्या घाटाचा आराखडा तयार करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस











२८० कोटी अष्टविनायक रस्त्याच्या विकास कामांचा शुभारंभ

            पुणे, दि. १९: जुन्नर तालुक्यातील दाऱ्या  घाटाचे सर्वेक्षण करून बोगद्याच्या माध्यमातून जुन्नर हे मुंबईच्या जवळ आणण्यासाठी आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसराचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुन्नर तालुक्यातील ओझर येथे केले. 
            हायब्रीड अॅन्युईटी अंतर्गत २८० कोटी रुपयांच्या अष्टविनायक रस्त्यांच्या विकास कामांचा शुभारंभ आज ओझर  येथे करण्यात आला,त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
     कार्यक्रमास  पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार शरद सोनवणे, पत्रकार उदय निरगुडकर, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर उपस्थित होते.
            मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस पुढे म्हणाले ,जुन्नर तालुक्यात  मोठी अर्थव्यवस्था निर्माण होऊन वन्य प्राण्यांच्या संख्येत वाढ होईल, त्यासाठी आंबेगव्हाण येथे बिबट सफारीसाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे.  जुन्नर तालुका पर्यटन तालुका घोषित करण्यात आला आहे.  यासाठी आराखडा तयार करण्यात येईल.
      तालुक्यातील बुडीत  बंधाऱ्याला मान्यता देण्यास प्राधान्य देण्यात येईल.  अष्टविनायक हे आपले वैभव आहे. अष्टविनायकाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी विकास आराखडा तयार करण्यात आला असून त्यानुसार परिसरातील रस्त्यांचा विकास करण्यात येणार आहे. यामुळे पर्यटकांना चांगल्या दर्जाच्या सुविधा मिळतील,असे सांगितले.
    या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या हस्ते शिवनेरी भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. ओझर गणपती मंदिर ट्रस्टतर्फे एक लाख रुपये मदतीचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी  मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला. तसेच पुरस्कार्थी राहुल बनकर यांच्यातर्फे दहा हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीस देण्यात आला.
            खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व आमदार शरद सोनवणे  यांनी तालुक्याच्या विकासास सहाय्य्यभूत ठरणाऱ्या विकास कामांना मान्यता द्यावी, अशी विनंती केली. पत्रकार उदय निरगुडकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
   कार्यक्रमाची सुरवात श्री गणेश पूजन व शिवप्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.    कार्यक्रमाला परिसरातील नागरिक,सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

ठळक वैशिष्ट्ये: 
            प्रकल्पातील अष्टविनायक परिक्रमा मार्ग हा पुणे जिल्ह्यातील मोरगाव, सिध्दटेक, रांजणगाव, ओझर,
 लेण्याद्री व थेऊर या सहा अष्टविनायक तीर्थक्षेत्र जोडणा-या राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग आहे.
            दरवर्षी या रस्त्यांवरून १० लक्ष भाविक यात्रा करतात. हे रस्ते ग्रामीण तसेच शहरी भागातून जाणारे महत्त्वाचे रस्ते आहेत.
            या रस्त्यांवर पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील जेजुरी हे खंडोबाचे देवस्थान, बारामती तालुक्यातील मोरगाव, दौंड तालुक्यातील पाटस दौंड मार्गे सिध्दटेक, शिरूर तालुक्यातील रांजणगाव, जुन्नर तालुक्यातील ओझर व लेण्याद्री व हवेली तालुक्यातील थेऊर ही महत्त्वाची तीर्थस्थाने व बाजारपेठेची गावे आहेत.
            या रस्त्यांवर वाहतूक वर्दळ बऱ्याच प्रमाणात असते व त्यामानाने डांबरी पृष्ठभागाची रुंदी अपुरी पडते. त्यामुळे या रस्त्यांची सुधारणा करण्यात येत आहे.  या भागातील पर्यटन व शेतीमालाच्या वाहतुक वाढीस चालना मिळणार आहे.
           या प्रकल्पामुळे जेजुरी, मोरगाव, सुपे, पाटस, दौंड, सिध्दटेक, पारगाव, न्हावरा, रांजणगाव, मलठण, 
पारगाव शिंगवे,नारायणगाव, ओझर, ओतूर, लेण्याद्री, जुन्नर, लोणीकंद, केसनंद, थेऊर ही गावे व तालुक्याची ठिकाणे एकमेकांशी ७.०० मीटर व १.०० मीटर रुंदीच्या दुपदरी डांबरी रस्त्याने जोडली जाणार आहेत.
    या प्रकल्पामधील सितवाडी, बनकर फाटा, ओतूर ही गावे रा.म.मा. २२२वरील असून ओझर व लेण्याद्री येथे जाण्यासाठी तसेच मुंबईहून कल्याण मार्गे येणारी औद्योगिक अवजड वाहतुकीत नारायणगाव ते रांजणगाव मधील एम.आय.डी.सी. क्षेत्रांना जोडणारा जवळचा थेट मार्ग आहे.
     या प्रकल्पात समाविष्ट करण्यात आलेले रस्ते रा.म.मा. २२२ (नगर -कल्याण), रा.म.मा. ७५३ (पुणे औरंगाबाद) रा.म.मा. ६५(पुणे- सोलापूर) व रा.म.मा. ५०(पुणे- नाशिक) तसेच नव्याने घोषित झालेले तळेगाव चाकण- शिक्रापूर- न्हावरा -ईनामगाव रा.म.मा. ५४८ डी (तळेगाव जामखेड -नांदेड) मनमाड -शिर्डी- अहमदनगर- दौंड- बारामती या रा.म.मा. १६० या सहा राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा रस्ता आहे.
    या पर्यायी रस्त्यांमुळे पुणे शहरातील वाहतुकीचा भार कमी होऊन हे मार्ग अष्टविनायक परिक्रमा मार्ग म्हणून वापरात आहे.
            हा रस्ता भविष्यातील वाहतूक वर्दळ लक्षात घेता सन २०३३ पर्यंत (१५ वर्षे) पुरेसा पडेल, असे गृहीत धरून रस्ता संकल्पित करण्यात आला आहे.
**
            

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा शिवछत्रपतींच्या मार्गावरच हा महाराष्ट्र पुढे जाईल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस











पुणे दि. १९ : सामान्य रयतेच्या कल्याणासाठी शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली. दीन, दलित, आदिवासी, शोषीत, शेतकरी, शेतमजूर, महिलांच्या कल्याणाची प्रेरणा शिवछत्रपतींच्या कार्यातूनच आम्हाला मिळाली असून त्यांनी दाखविलेल्या मार्गानेच महाराष्ट्र पुढे जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.
      किल्ले शिवनेरी ता. जुन्नर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव सोहळा पार पडला. त्यानंतर मराठा सेवा संघाच्यावतीने शिवजन्मोत्सवाच्या निमित्त आयोजित अभिवादन सभेत मुख्यमंत्री श्री फडणवीस बोलत होते.
            यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, आमदार शरद सोनवणे, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे, जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप पाटील, अभिवादन कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष राजेंद्र कुंजीर, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे उपस्थित होते. 
             मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ज्या काळात भारतातील अनेक राजे गुलामगिरी पत्करून होते, त्या काळात मॉ जिजाऊंच्या प्रेरणेने शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. समाजातील आठरापगड जाती-धर्मातील मावळ्यांना एकत्र करून रयतेच्या स्वराज्याची निर्मिती महाराजांनी केली.
             छत्रपतींच्या प्रेरणेनेच शासनाने विविध प्रश्न मार्गी लावल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, मराठा आरक्षणासह विविध प्रश्न शासनाने सोडविले आहेत. मराठा समाजाच्या आंदोलनातील आंदोलनकर्त्यांवरील ८० टक्के गुन्हे मागे घेतल्या असून उर्वरीत केसेस मागे घेण्याची कायदेशीर प्रक्रीया सुरू आहे.
            छत्रपती शिवाजी महाराज हे जगातील सर्वात महान राजांपैकी एक होते. त्यांची प्रत्येक गोष्ट पथदर्शी असून त्यांचे स्मारकही त्यांच्या कार्याएवढेच भव्य दिव्य स्वरूपात अरबी समुद्रात उभारण्यात येत आहे.   
            महाराजांच्या स्मारकाला प्रत्येक सामान्य माणूस भेट देवू शकेल अशी व्यवस्था शासनाच्यावतीने करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले
      शासनाच्यावतीने खासदार छत्रपती संभाजीमहाराज यांच्या नेतृत्वाखाली प्राधिकरणाच्या माध्यमातून रायगडाच्या संवर्धनाचे चांगले काम सुरू आहे. आतापर्यंत या कामासाठी शासनाच्यावतीने ६०६ कोटी रूपयांचा निधी देण्यात आला असल्याचे सांगत त्याच धर्तीवर राज्यातील इतर महत्वाच्या गडकोटांच्या संवर्धनाचे काम सूरू असून शासन याकामासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सांगितले. तसेच शिवनेरीच्या पर्यटन विकासाचा प्रश्न मार्गी लावणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
      सुरुवातीला शिवनेरी किल्ल्यावरील शिवजन्माच्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सवाचा सोहळा पार पडला. यावेळी पारंपारिक वेशातील महिलांनी शिवछत्रपतींची महिती सांगणारा पाळणा म्हटला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शिवछत्रपतींची पालखी आपल्या खांद्यावर घेत काही अंतर पार केले. यावेळी आदिवासी महादेव कोळी समाजाच्या श्री तळेश्वर लेझिम पथकाच्यावतीने पारंपारिक लेझिम खेळाच्या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात आले. पोलीस बँड पथकाच्यावतीने राष्ट्रगीत सादर केले. पोलीसांच्या पथकाने हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडत छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्यात आली.
      शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने राज्यभरातून शिवप्रेमी मोठ्या संख्येने शिवनेरी किल्यावर आले होते.
०००००

Monday, January 14, 2019

“खेलो इंडिया”च्या माध्यमातून देशभरातील क्रीडा क्षेत्रातील हिरे सापडतील - पालकमंत्री गिरीश बापट



पुणे दि. 14: खेलो इंडिया स्पर्धेच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यातील खेळाडूंना आपली प्रतिभा दाखविण्यासाठी मोठा मंच उपलब्ध झाला आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रातील हिरे सापडतील, असा विश्वास पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज व्यक्त केला.
महाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात खेलो इंडिया युथ गेम्स मधील वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारातील पदकांचे वितरण पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते बोलत होते. श्री बापट यांनी खेलो इंडियातील स्पर्धेतील कबड्डीसह इतर मैदानाला भेट देवून खेळाडूंना प्रोत्साहन दिले. तसेच मैदानातील व मैदाना बाहेरील व्यवस्थेची माहिती घेवून पाहणी केली.
पालकमंत्री श्री बापट म्हणाले, खेलो इंडिया स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. या माध्यमातून देशभरातील मुलांना क्रीडा प्रकारात आपले नैपुण्य दाखविण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. खेलो इंडियामध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंना अत्याधुनिक व तंत्रशुध्द प्रशिक्षण उपलब्ध होत आहे. त्यामुळे येणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी हे खेळाडू तयार होवून आपल्या देशाची कामगिरी उंचावेल.
केंद्र सरकारने खेलो इंडिया स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी महाराष्ट्राला दिल्यामुळे क्रीडा क्षेत्राविषयी चांगले वातावरण राज्यात निर्माण झाले आहे. या वातावरणाचा लाभ राज्यातील मुलांना होईल, तसेच इतर युवकही आता खेळांकडे आकर्षित होतील असा विश्वास व्यक्त करत या स्पर्धेच्या नियोजनाबाबत समाधान व्यक्त केले.
*****

Thursday, January 10, 2019

खेलो इंडीया -यूथ गेम्स -2019 पत्रकारांसाठी अद्यावत मिडीया सेंटर

खेलो इंडीया -यूथ गेम्स -2019
पत्रकारांसाठी अद्यावत मिडीया सेंटर

पुणे दि. १० : पुणे येथे आयोजित खेलो इंडीया युथ गेम्ससाठी विविध माध्यामातील क्रीडा पत्रकार वार्तांकनासाठी आले असून त्यांना एकाच ठिकाणी सुलभतेने वृत्त पाठविण्याची सुविधा होण्याच्या दृष्टीने अद्यावत मिडीया सेंटर उभारण्यात आले आहे.
नाशिकचे जिल्हा क्रीडा अधिकारी तथा माध्यम समन्वयक रविंद्र नाईक व माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या पुणे विभागातर्फे समन्वय साधण्यात येत आहे.
म्हाळूंगे-बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या मुख्य इमारतीतील दुसऱ्या माळ्यावर हे मिडीया सेंटर आहेदेशभरातून आलेल्या पत्रकारांना कोणतीही अडचण येवू नयेयासाठी इमारतीत प्रवेश करताच मदत तथा स्वागत केंद्र आहेहे मिडीया सेंटर 8 जानेवारीपासून सुरु झाले आहे.
या संबंधी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना मिलींद ढमढेरे म्हणतात ,प्रत्येक मोठ्या स्पर्धेचा प्रसिध्दी विभाग हा नेहमीच गजबजलेला असतोही स्पर्धा सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक वृत्तपत्र व विविध वृत्त वाहिन्यांचे प्रतिनिधी कसोशीने प्रयत्न करत असतातया दृष्टीने मोठ्या स्पर्धेचा प्रसिध्दी विभाग म्हणजे मिडीया सेंटर.. सकाळपासून रात्री पर्यंत सतत कार्यरत असतेप्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना प्रत्येक माहिती वेळोवेळी अद्यावत देण्यासाठी या विभागासाठी नियुक्त करण्यात आलेल्या स्वयंसेवक मनापासून काम करत असतातयेथे देखील खेलो इंडीयाच्या विविध स्पर्धाचे अद्यावत निकाल देण्यासाठी 50 स्वयंसेवकांची फौज कार्यरत आहे.खऱ्या अर्थाने प्रसिध्दी विभाग ही स्पर्धेचा कणाच असतो.

ठळक वैशिष्टये
·        या ठिकाणी वाय-फायवायर इंटरनेट, कॉम्पुटर्स, प्रिंटर्स, मिडीया प्रतिनिधींना याच ठिकाणी स्पर्धेचे लाईव टेलीकास्ट बघण्याची सोय करण्यात आली आहे.
·        मिडीयाच्या प्रतिनिधींना प्रवासाकरिता बसेसची सोय केली आहे.
·        मिडिया प्रतिनिधीसाठी चहानाश्ताभोजन सोय केली आहे.
·        प्राविण्य प्राप्त खेळाडूंची मुलाखात घेणेकरीता खास दालन तयार करण्यात आले आहे.
·        सोशल मिडीयामध्ये संपूर्ण माहिती प्रसारित करण्याकरीता फेसबूक पेज केले आहे.
·        सर्व मिडियाशी संपर्क करण्याकरिता व्हॉट्सअप चे ग्रुप तयार केले आहे.त्यामुळे संपूर्ण स्पर्धेची माहिती छायाचित्र व निकाल सर्व मिडिया प्रतिनिधीपर्यत तात्काळ पोहचते.



खेलोत्सव प्रदर्शनात लोकराज्यच्या स्टॉलचे क्रीडा मंत्राच्या हस्ते उद्घाटन

खेलोत्सव प्रदर्शनात लोकराज्यच्या स्टॉलचे क्रीडा मंत्राच्या हस्ते उद्घाटन

पुणे दि. १० : महाळुंगे-बालेवाडी येथे सुरू असणाऱ्या खेलो इंडीया २०१९ स्पर्धे दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या खेलोत्सव प्रदर्शनातील लोकराज्यच्या स्टॉलचे उद्घाटन क्रीडा मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते आज झाले. 
महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असणाऱ्या लोकराज्यचा जानेवारीचा अंक खेलो इंडीया विशेषांक म्हणून प्रकाशित करण्यात आला आहे. या विशेषांकाचे खेलो इंडीया स्पर्धेच्या उद्घाटनावेळी त्याच मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकेंद्रीय क्रीडा मंत्री राजवर्धनसिंग राठोडपालकमंत्री गिरीश बापटक्रीडा मंत्री विनोद तावडेसामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या विशेषांकाचे अतिथी संपादक क्रीडा मंत्री विनोद तावडे हे आहेत.


क्रीडा मंत्रीही म्हणाले, “बस पाच मिनीट और..!”

क्रीडा मंत्रीही म्हणाले, बस पाच मिनीट और..!
·        क्रीडामंत्री कबड्डी खेळले अन् खेळाडूंचा उत्साह वाढला.
·        गगन नारंगच्या स्टॉलला भेट देताना नेम धरण्याचा मोह मंत्र्यांना आवरला नाही.
·        खेळाडुंबरोबर टेबल टेनिसही खेळले..
पुणे दि. 10 : कबड्डीटेबल टेनीसलगोरनेमबाजी या सारख्या आवडीच्या खेळांचा आस्वाद घेताना क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनाही बस पाच मिनीट औरम्हणण्याचा मोह आवरला नाहीनिमित्त होते खेलो इंडीया स्पर्धे दरम्यान राष्ट्रीय युवा को ऑपरेटिव्ह सोसायटीतर्फे (एन.वाय.सी.एस.) आयोजित इंडीया का खेलोत्सव उपक्रमाच्या भेटीचे.
महाळुंगे-बालेवाडी येथे युवकांसाठी  राष्ट्रीय स्तरावरील खेलो इंडीया 2019 स्पर्धा सुरु आहेतया स्पर्धेच्या ठिकाणी मुलांना खेळा विषयी आवड निर्माण व्हावीक्रीडा क्षेत्रातील करीअरची ओळख व्हावी यासाठी खेलोत्सव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेया उपक्रमला क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी भेट दिली.
यावेळी श्री विनोद तावडे यांनी कबड्डीटेबल टेनीसलगोर आणि नेमबाजी या खेळाचा आनंद घेतलातसेच रिले धावणेवॉल क्लायंबींगतिरंदाजीफुटबॉल या खेळांच्या मैदानावर जावून त्या संबंधी माहिती घेतली.  खेळ खेळण्यासाठी आलेल्या मुलांना योग्य मार्गदर्शन करात्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तेथे उपस्थित असलेल्या क्रीडा प्रशिक्षकांनी देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
या ठिकाणी आलेल्या विविध शाळेतील विद्यार्थ्यांशी श्री तावडे यांनी संवाद साधलाखेलो इंडीया बघून काय वाटतेकोणते खेळ खेळायला आवडतात.. यांसारखे प्रश्न विचारून श्री तावडे यांनी मुलांशी संवाद साधलाखेलोत्सवात लावलेल्या प्रत्येक स्टॉलला जावून क्रीडा मंत्री श्री तावडे यांनी माहिती घेतलीखलोत्सवाच्या मैदानावर बराच वेळ रमलेल्या क्रीडा मंत्र्यांनाही या निमित्त बस पाच मिनीट और… म्हणण्याचा मोह आवरला नाही



0000000

Wednesday, January 9, 2019

पोलीस दलाने अधिकाधिक लोकाभिमूख होऊन लोकसेवेला प्राधान्य द्यावे -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


पोलीस दलाने अधिकाधिक लोकाभिमूख होऊन लोकसेवेला प्राधान्य द्यावे
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विकास प्रकल्पांचे
ई- भूमिपूजन आणि उद्घाटन

पुणे,दि.9:- पोलीस दल हे लोकसेवा करण्यासाठी असून त्यांनी अत्याधूनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन अधिकाधिक लोकाभिमुख होवून लोकसेवेला प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
    प्राध्यापक रामकृष्ण मोरे सभागृहात आयोजित पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विकास प्रकल्पांचे ई- भुमिपूजन आणि उद्घाटन समारंभात ते  बोलत होते.
            पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीचे उद्घाटन आज मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्याहस्ते फीत कापून करण्यात आले. तसेच दीपप्रज्वलन करुन कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. यावेळी पिंपरी-चिंचवड पोलीस दलाच्या वतीने मुख्यमंत्री यांना मानवंदना देण्यात आली. यानंतर सादरीकरणाद्वारे पोलीस आयुक्तालय कामकाजाची पाहणी केली. 
यानंतर झालेल्या मुख्य समारंभात पोलीस आयुक्तालय इमारतीचे उद्घाटन, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी पहिला टप्पा, प्रधानमंत्री आवास योजना तसेच अर्बन स्ट्रीट डिझाईन अंतर्गत विकसीत रस्त्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते कळ दाबून ई-भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर राहुल जाधव, खासदार सर्वश्री शिवाजीराव आढळराव पाटील, श्रीरंग बारणे, आमदार सर्वश्री लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, गौतम चाबुकस्वार, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक संदीप पाटील यावेळी उपस्थितीत होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने स्वतंत्र पोलीस आयुक्तालय स्थापन करुन नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले आहे. यासाठी सीसी-टीव्ही तसेच इतर तांत्रिक बाबी देण्यावर भर देण्यात आलेला आहे. आयुक्तालयाचे काम प्रभावीपणे पार पाडण्यसाठी आवश्यक मनुष्यबळ व अन्य सेवा सुविधा लवकरच देण्यात येतील. नागरी व ग्रामीण भाग समाविष्ठ करुन आयुक्तालयाचे कार्यक्षेत्र वाढविण्यात आले आहे. पोलीसांच्या कामाचे मोजमाप करतांना केवळ गुन्हांच्या प्रमाणाचा विचार न करता किती गुन्हे उघडकीस आणले, किती लोकांना शिक्षा झाली. तसेच किती मुद्देमाल जप्त करण्यात आला, याबाबींचा विचार करणे आवश्यक आहे. अपराध सिध्दतेचे प्रमाण नऊ टक्क्यावरुन पन्नास टक्क्यापर्यंत वाढले, ही पोलीस विभागासाठी अभिमानाची बाब आहे.
यावेळी मुख्यमंत्री श्री फडणवीस पुढे म्हणाले, स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत विविध सेवा सामान्य लोकांपर्यंत गतिमानतेने पोहचविण्यासाठी प्रयत्नशील आहे. पिंपरी-चिंचवड ही श्रमिकांची नगरी असल्यामुळे येथील श्रमिकांसाठी मोठ्याप्रमाणात घरे उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. प्रधानमंत्री यांचे 2022 पर्यंत सर्वांसाठी घरे देण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना महत्वपूर्ण ठरेल. अनधिकृत बांधकामांना समर्थन दिले जाणार नाही. परंतु शास्ती कराच्याबाबतीत सामान्य नागरिकांना दिलासा देण्याच्यादृष्टीने लवकरच मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल.
शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा करण्याबरोबरच मावळमधील आंदोलनग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात येईल, त्यांच्या शेतीसाठी मायक्रो इरिगेशन करण्यात येईल, नुकसानग्रस्त कुटुंबाच्या पाठिशी सरकार संवेदनशीलतेने उभे राहून सदस्यांना नोकरीत सामावून घेण्यात येईल, असे यावेळी ते म्हणाले.
            पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ही राज्यातील आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. या नगरपालिकेने आजवर विविध लोकाभिमुख निर्णय घेवून त्यादृष्टीने यशस्वी उपक्रम राबविल्याबद्दल महापालिकेच्या कामाचे श्री. फडणवीस यांनी कौतुक केले.
            कायदा, सुव्यवस्था राखणे हे पोलीसांचे कर्तव्य असते. सामन्यांच्या संरक्षणासाठी पोलीसांनी प्राधान्य द्यावे, असे आवाहन पालकमंत्री श्री बापट यांनी केले.
            यावेळी महापौर राहुल जाधव, आमदार सर्वश्री महेश लांडगे, लक्ष्मण जगताप यांची समयोचित भाषणे झाली.
            पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला तर एकनाथ पवार यांनी महानगरपालिकेच्या योजना व उपक्रमांची माहिती प्रस्ताविकातून दिली.
 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी केले. आभार अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी मानले. यावेळी लोकप्रतिनिधीसह पोलीस विभाग व महानगरपालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह सामान्य नागरिक उपस्थित होते.





00000