Friday, September 6, 2019

कुठल्याही किल्ल्यांवर कोणत्याही प्रकारची परवानगी देणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



पुणे दि.6 : छत्रपती शिवाजी महाराज आणि जो मराठयांचा इतिहास आहे, त्यांच्याशी सबंधित कुठल्याही किल्ल्यांवर कोणत्याही प्रकारची परवानगी देणार नाही, अशा किल्ल्यांना आम्ही नखभरही हात लावू देणार नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केली.
मानाच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री पुणे येथे आले असता पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते पुढे म्हणाले, किल्लांसंदर्भात पसरविण्यात आलेली बातमी अत्यंत चुकीची आहे. यासंदर्भात पर्यटनमंत्री जयकुमार रावळ यांनी पत्रकार परिषद घेवून स्पष्टीकरण दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठयांचा जो इतिहास आहे त्यांच्याशी सबंधित कुठल्याही किल्ल्यांवर कुठल्याही गोष्टीची कधीच परवानगी देण्याचा प्रश्नच नाही. हे सर्व संरक्षित किल्ले आहेत.
सरकारने स्वराज्याची राजधानी रायगडचा विकास केला, त्यासाठी छत्रपती संभाजी राजे यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांनी लक्ष घालून ज्याप्रकारे काम रायगड किल्ल्यावर चालू केले आहे. तसाच इतिहास आम्हाला जतन करावयाचा आहे. ऐतिहासिक किल्ल्यांच्या व्यतिरिक्त जे दोन-तिनशे किल्ले आहेत, तिथे पर्यटनाच्या दृष्टीने काही करता येईल का, यासंदर्भातील तो निर्णय होता. कुठले समारंभ, लग्न याला काही अर्थ नाही. छत्रपतींचा आणि हिंदवी स्वराज्याचा, मराठयांच्या साम्राज्याचा इतिहास ज्या किल्ल्यांशी सबंधित आहे, अशा किल्ल्यांना आम्ही नखभरही हात लावू देणार नाही, असेही ते शेवटी म्हणाले.

सर्वांना सुखी समाधानी ठेवून ऐश्वर्य लाभू देवो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणरायाकडे केली प्रार्थना









       पुणे,दि.6 - सर्वांना जीवनात सुखी समाधानी ठेवून ऐश्वर्य लाभू देवो, अशी प्रार्थना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गणरायाकडे केली.
            सध्या सर्वत्र गणेशपर्व सुरू असून पुण्यातील मानाच्या गणपतीच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
            केसरीवाडा सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट येथे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, गणेशोत्सवाच्या निमिताने श्री गणेशाचे दर्शन घेण्याकरीता आणि त्यासोबत लोकमान्यांना वंदन करण्यासाठी  मला येथे येण्याची संधी मिळाली, याचा मला खरोखर आनंद आहे. गणेशोत्सवाची  ही  परंपरा लोकमान्य टिळकांनी उभ्या महाराष्ट्राला आणि देशाला करून दिली. परिणामी  त्यातूनच या उत्सवाला सामाजिक अभिसरणाचे स्वरुप प्राप्त झाले. तेच स्वरुप पुण्यामध्ये अनेक मंडळानी जतन केले आहे.  सर्वांना  गणोशोत्सवाच्या शुभेच्छा देऊन ते म्हणाले, श्री गणेशाला प्रार्थना करतो की, आपल्या सर्वांना सुखी समाधानी ठेवून ऐश्वर्य लाभू देवो व  श्री गणेशाच्या आशीर्वादाने महाराष्ट्र देखील प्रगतीपथावर जात राहो, अशी प्रार्थना केली असल्याचे त्यांनी सांगितले .
            यावेळी महापौर मुक्ता टिळक, खा. गिरीश बापट, खा.संजय काकडे, . दिलीप कांबळे, .भीमराव तापकीर, . माधुरी मिसाळ, पुणे मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे आदी उपस्थित होते.
विविध मंडळांच्या गणपतींचे घेतले दर्शन
            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वप्रथम मानाचा पहिला कसबा गणपती यांचे दर्शन घेवून आरती केली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी मुख्यमंत्री यांचे स्वागत केले. त्यानंतर दगडुशेठ हलवाई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीला भेट देवून दर्शन घेतले व आरती केली. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष अशोक गोडसे व उत्सव प्रमुख हेमंत रासने यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी दि विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीस 5 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.
            यानंतर मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेतले.  यावेळी अध्यक्ष प्रवीण परदेशी यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी मंडळाच्या व  सिध्देश्वर ट्रस्टच्यावतीने मुख्यमंत्री सहायता निधीस प्रत्येकी रुपये 51 हजाराचा धनादेश देण्यात आला. यानंतर मानाचा चौथा गणपती  तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेतले.
            यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेऊन आरती केली. यावेळी  महापौर मुक्ता टिळक व दैनिक केसरीचे संपादक दिपक टिळक यांनी  त्यांचे स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्री सहायता निधीस दि जनता सहकारी बँक यांच्याकडून रुपये 21 लाख व उद्यम विकास बँक व चरणजीत सहाणी यांनीही मुख्यमंत्री सहायता निधीस धनादेश दिला.
            यानंतर साने गुरुजी तरुण मंडळ येथील गणपतीचे दर्शन घेवून मंडळामार्फत उभारण्यात आलेल्या देखाव्याचे उद्घाटन केले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष धिरज घाटे यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर मुख्यमंत्री यांनी कोथरुड येथील श्री साई मित्र मंडळ यांच्यावतीने उभारण्यात आलेल्या श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मीणी मंदिराच्या प्रतिकृतीचे उद्घाटन  केले. तसेच गणपतीचे दर्शन घेऊन आरती केली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी त्यांचे स्वागत केले.

Thursday, September 5, 2019

भारत निवडणूक आयोगाने घेतला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा


दिव्यांगासाठी व्यवस्था करणार  - डॉ. दीपक म्हैसेकर

पुणे दि. 5: महाराष्ट्रात होऊ घातलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आज राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व पोलिस अधिकाऱ्यांशी भारत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करून कामाचा आढावा घेतला.
 मुंबई मुख्यालयातून घेतलेल्या आढाव्याच्यावेळी भारत निवडणूक आयोगाचे वरिष्ठ उपनिवडणूक आयुक्त उमेश सिंन्हा, उपनिवडणूक आयुक्त सर्वश्री. संदीप सक्सेना, चंद्रभूषण कुमार, महासंचालक (संदेशवाहन आणि समन्वयक) धिरेंद्र ओझा, दिलीप शर्मा व महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह उपस्थित होते.
 त्यांनी पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, कोकण विभागाच्या विभागीय आयुक्तांबरोबरच विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केलेली तयारी व येत असलेल्या अडचणीबाबत त्यांची मते जाणून घेतली.
 ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींना विनासायास मतदान करता यावे, यासाठी तळमजल्यावर मतदान केंद्र निर्माण करावे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी त्याभागातली स्वयंसेवी संस्था, शिक्षण संस्था व प्रतिष्ठित व्यक्तींशी चर्चा करावी. त्यांना विश्वासात घ्यावे, असे निर्देश श्री. उमेश सिन्हा यांनी दिले. मतदानासाठी आल्यानंतर त्यांना आनंद वाटेल व समाधानाने परत जातील, याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यांना अडचणीचे वाटणारे मतदान केंद्र बदलून घ्यावे. हे काम आव्हान म्हणून स्वीकारावे, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सुरु असलेल्या कामांची माहिती दिली. तसेच कोल्हापूर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांनी विभागातील कायदा व सुव्यवस्थेबाबत माहिती दिली.
यावेळी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर माहिती देताना म्हणाले, विभागातील कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे मतदान केंद्राचे नुकसान झाले. त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. तसेच पहिल्या व दुसऱ्या मजल्यावरील मतदान केंद्र तळमजल्यावर आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. आमच्यासाठी ते आव्हान असले तरी अशक्य नाही. दिव्यांग व्यक्ती व ज्येष्ठ नागरिकांना त्रास होणार नाही, यादृष्टीने प्रयत्न केले जातील. संवेदनशील मतदान केंद्रावर लक्ष केंद्रित करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे येथील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याबरोबरच पोलीस आयुक्त व्यंकटेशम, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, पोलीस उपायुक्त मितेश घट्टे, उपायुक्त संजयसिंह चव्हाण आदी उपस्थित होते.
00000



सक्षम पिढी घडविण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये.. -विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर


पुणे दि. 5 : शिक्षक हा समाज परिवर्तन करणारा घटक असून सक्षम व आदर्श पिढी घडविण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये असल्याच्या भावना विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी व्यक्त केल्या.
शिक्षक दिनानिमित्त आज येरवडा येथील पुणे महानगरपालिकेच्या कै. गेनबा सोपानराव मोझे प्राथमिक विद्यालयात आयोजित शिक्षक गौरव कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पुणे महानगर पालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी श्रीमती. मीनाक्षी राऊतसहायक प्रशासकीय अधिकारी श्री. विजय आवारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
 आपले शिक्षक केवळ पुस्तकी ज्ञान शिकवत नाहीत तर जगण्याची कला शिकवत असतात. विद्यार्थ्यांवर संस्कार, संस्कृतीआदर असे पैलू पाडण्याचे काम गुरुजन करतात असे सांगून श्री. म्हैसेकर म्हणाले ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देऊन एखादी कलाकृती साकारतो अगदी त्याचप्रमाणे शिक्षक बालकांच्या कोऱ्या मनावर योग्य संस्कार करून जबाबदार नागरिक घडवीत असतात. आपले शिक्षक आपल्या आईवडीलानंतर आपले पालकच असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंचा नेहमी आदरपूर्वक सन्मान केला पाहिजे.
 यावेळी विभागीय आयुक्तांनी शाळेतील शिक्षकांचा पुष्प व पुस्तके देऊन सत्कार केला. याप्रसंगी मुख्याध्यापिका श्रीमती नीलिमा कदमसंभाजी बांडेसुभाष सातवराधिका बडगुजरशिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

कस्तुरबा विद्यालयातील शिक्षकांचा विभागीय आयुक्तांच्या हस्ते सत्कार
शिक्षक दिनानिमित्त आज विभागीय आयुक्तांनी कोरेगाव पार्क येथील पुणे महानगरपालिकेच्या कस्तुरबा गांधी प्राथमिक इंग्लिश विद्यालयातील शिक्षकांचा सत्कार केला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत गिरीशिक्षक मोनिका शिरसाट, रुपाली सोनवणे, महादेव कोळी, नितीन कांबळे तसेच विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
000000











Wednesday, August 28, 2019

अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची केंद्रीय पथकाने जाणून घेतली माहिती




पुणे, दि. 29: जुलै अखेर आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अतिवृष्टीसह पूरामुळे झालेल्या जीवित व आर्थिक नुकसानीची माहिती जाणून घेण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकासमोर राज्याचे मदत व पुनर्वसन सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी सादरीकरण करून नुकसानीची माहिती दिली.
                राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या धोरण व नियोजनचे सहसचिव डॉ. थिरुपुगाज यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय पथक पाहणी दौऱ्यावर आले आहे. काल संध्याकाळी त्यांचे पुण्यात आगमन झाले. आज सकाळी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात सर्व संबंधित अधिकाऱ्यांची त्यांनी आढावा बैठक घेतली. या पथकात चित्तरंजन दास, आर.पी. सिंग, व्ही.पी. राजवेदी, मिलींद पनपाटील, संजय जैस्वाल, ओमकिशोर या केंद्रीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ते पुणे विभागातील सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांची दोन दिवस पाहणी करून दि. 31 ऑगस्ट रोजी पथक कोकण विभागात जाणार आहे.
                समितीसमोर झालेल्या नुकसानीची माहिती सादर करताना सचिव किशोरराजे निंबाळकर म्हणाले, या आपत्तीत प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेवून बचाव व मदत कार्य युध्द पातळीवर केले. यावर्षी मान्सूनचे राज्यात उशीरा आगमन झाले. त्यानंतर दि. 3 ते 10 ऑगस्ट या कालावधीत कोकण आणि पुणे विभागात अतिवृष्टी झाली. या दोन्ही विभागातील भीमा आणि कृष्णा नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. पूरामुळे बाधित झालेल्या राज्यातील 7 लाखांहून अधिक लोकांना सुरक्षीत स्थळी हलविण्यात आले. या बाधित लोकांची 1 हजारहून अधिक शिबीरात व्यवस्था करण्यात आली. या बाधित लोकांना शासनाच्यावतीने 10 किलो तांदूळ आणि गहू तसेच रॉकेलचे वाटप करण्यात आले. तसेच बाधित झालेल्या ग्रामीण कुटुंबाला प्रत्येकी 10 हजार तर शहरी भागातील कुटुंबांना 15 हजार रुपयाचे सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले. या अतिवृष्टीमुळे जीवित हानी बरोबरच वित्तीय हानीही मोठ्या प्रमाणावर झाली आहे. शेतीचे देखील नुकसान झाले आहे. या आपत्तीमध्ये बाधित अत्यावश्यक सेवा सुरळीत करण्यासाठी राज्य शासनाने प्राधान्य दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
                पुणे विभागातील नुकसानीची माहिती देताना डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, विभागातील 58 तालुक्यांपैकी 38 तालुक्यांना पूराचा आणि अतिवृष्टीचा फटका बसला. यामध्ये 727 गावे बाधित झाली असून 1 लाख 80 हजार 448 कुटुंबातील 7 लाख 59 हजार 595 लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. या आपत्तीत विभागातील 60 लोकांचा मृत्यू झाला त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील 10, सातारा जिल्ह्यातील 6, सांगली जिल्ह्यातील 28, सोलापूर जिल्ह्यातील 3 तर कोल्हापूर जिल्ह्यातील 13 लोकांचा समावेश आहे. या आपत्तीत सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे आलेल्या पूराचे पाणी नद्यांच्या धोकापातळीपेक्षा 7 ते 8 फुटांनी अधिक होते. कोल्हापूर जिल्ह्याचा रस्ते संपर्क पूर्णत: तुटला होता. सांगली व कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागालाही याचा मोठा फटका बसला. या दोन्ही जिल्ह्यात बागायती क्षेत्र अधिक असून या पूरामुळे या पीकांचे पुर्णत: नुकसान झाले आहे. तसेच इचलकरंजी या शहरात असणाऱ्या हॅण्डलूम आणि पॉवरलूम या उद्योगाला याचा फटका बसला असून या ठिकाणचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर घरांची पडझड झाली. शेतीसह शेतकऱ्यांच्या पशूधनाचे ही मोठे  नुकसान झाले आहे.
कोकण विभागातील नुकसानीची माहिती देताना विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड म्हणाले, 27 जुलै रोजी महालक्ष्मी या रेल्वेला पूराचा फटका बसल्याने ही रेल्वे पूराच्या पाण्यात आडकली होती. त्या दरम्यान कोकण विभागात अतिवृष्टी झाली. महाड, चिपळूण या शहरात पाणी घुसले होते. या अतिवृष्टीमुळे शेती, रस्ते, पूल आदींचे मोठ्या प्रमाणात झाले. तसेच सिंधुदूर्ग आणि रायगड जिल्ह्यालाही अतिवृष्टीचा फटका बसला. या काळात प्रशासनाने बचाव व मदत कार्यावर भर दिला. त्यांनी यावेळी झालेल्या आर्थिक नुकसानीची माहिती दिली.   
या बैठकीला जिल्हाधिकारी नवल किशारे राम, कृषी आयुक्त सुहास दिवसे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
*****







Thursday, August 15, 2019

राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते पुणे विधानभवन प्रांगणात मुख्यध्वजारोहण स्वातंत्र्य सैनिक व उपस्थितीतांना दिल्या शुभेच्छा.







राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते
पुणे विधानभवन प्रांगणात मुख्यध्वजारोहण
स्वातंत्र्य सैनिक व उपस्थितीतांना दिल्या शुभेच्छा..
         
             पुणे दि 15 : भारतीय स्वातंत्र्याचा 72 वा वर्धापनदिन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते ध्वजारोहण करून उत्साहात पार पडला. पुणे विधानभवनाच्या प्रांगणात मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बरोबर नऊ वाजता त्यांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाले.
         यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते, माजी मंत्री खासदार गिरीश बापट, संजयकाका पाटील, संजय काकडे, अमर साबळे,  माजी राज्यमंत्री आमदार दिलीप कांबळे, माधुरी मिसाळ, भिमराव तापकीर, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पुणे पोलीस आयुक्त डॉ के. व्यंकटेशम, पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन, यशदाचे महासंचालक आनंद लिमये, नोंदणी महानिरीक्षक अनिल कवडे, कृषी आयुक्त सुहास दिवसे, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, पुणे महानगर पालिका आयुक्त सौरभ राव,जिल्हाधिकारी नवलकिशोर राम ,पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अतिरिक्त आयुक्त सुभाष डुंबरे, जिल्ह्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, निवृत्त अधिकारी, नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते. 
            ध्वजारोहणानंतर राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी पोलीस पथकाची मानवंदना स्वीकारली. त्यानंतर त्यांनी ध्वजारोहण समारंभाला उपस्थित असणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांची भेट घेऊन स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.याशिवाय अन्य मान्यवर व अधिकारी यांना शुभेच्छा दिल्या .
राजभवन येथे राज्यपालांच्या हस्ते वृक्षारोपण
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते आज सकाळी राजभवन येथे वृक्षारोपण करण्यात आले.
             यावेळी पालकमंत्री तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यपालांचे सचिव वेणूगोपाल रेड्डी, उपसचिव रणजितकुमार, खासदार संजय काकडे, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्यासह वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.
0000000


Tuesday, August 13, 2019

मदत व पुनर्वसन यावर लक्ष केंद्रित करणार - विभागीय आयुक्त डॉ म्हैसेकर


प्रमुख विभागांच्या अधिकाऱ्यांना युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देश

पुणे दिनांक 13 : कोल्हापूर, सांगली, सातारा व अन्य जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने संबंधित विभाग प्रमुखांची बैठक घेतली असून परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देश दिले आहेत. धरणक्षेत्रात अतिवृष्टीचा इशारा असला तरी पर्जन्यमान सामान्य आहे. या आपत्तीत आत्तापर्यंत 48 जण मृत्युमुखी पडले असून पूरग्रस्तांना मदत वाटप करण्याचे व सर्वेक्षणाचे काम सुरू असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी दिली.
 आता पूर ओसरलेला आहे, आमच्यापुढे आव्हान आहे, ते मदत व पुनर्वसनाचे! या पार्श्वभूमीवर पुणे विभागातील सार्वजनिक बांधकाम, कृषि विभाग, विद्युत विभाग, पशुसंवर्धन, आरोग्य विभाग, परिवहन विभाग, महसूल विभाग आदी महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली.  दिनांक 13 मे 2015 च्या शासन निर्णयात आपत्ती प्रसंगी करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार प्रत्येक विभागाने काम करावे आणि परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी अहोरात्र काम करावे, असे सांगितले असल्याचे सांगून डॉ. म्हैसेकर पुढे म्हणाले, सध्या पूरपरिस्थिती  निवळत आहे. सध्या सांगली येथे नदी पातळी धोका पातळीच्या केवळ 4 इंचावरुन वाहत आहे तर कोल्हापूरमध्ये धोका पातळीच्या 1 फूट 11  इंचावरून वाहत आहे.  मात्र सध्या धरणक्षेत्रात पाऊस सामान्य असल्याने ही पूर पातळी झपाट्याने उतरणार आहे.
धरण क्षेत्रातील पाऊस कमी झाल्याने कोयना धरणात पाण्याची आवक 25 हजार 287 क्युसेक असून 27 हजार 265 क्येसेक इतका पाण्याचा विसर्ग आहे. कर्नाटक मधील अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग 5 लाख 70 हजार क्युसेक असून धरणात 6 लाख 11 हजार 970 क्युसेक इतकी आवक आहे .दोन्ही जिल्ह्यातील पूरस्थिती पुढच्या काही तासात सामान्य होईल.
 या पूरस्थितीत पुणे विभागात एकूण 48 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील 21, कोल्हापूर जिल्ह्यात 10, सातारा व पुणे जिल्ह्यात प्रत्येकी 7 तर सोलापूर जिल्ह्यातील 3 व्यक्तींचा समावेश आहे. या आपत्तीमध्ये पडझड झालेल्या घरांचे सर्वेक्षण सुरू असून प्राथमिक अंदाजानुसार सांगली जिल्ह्यात 1 हजार 448 घरांची अंशत: पडझड झाली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील 8 हजार 236 घरांची अंशतः 268 घरांची पूर्णतः तर 313 गोठ्यांची पडझड झाली आहे.
 कोल्हापूर मधील काही भागात हेलिकॉप्टरच्या सहाय्याने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला आहे. शासनाच्या आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून विभागीय आयुक्त कार्यालयात जमा झालेली मदत पूरग्रस्त भागांना पाठवण्यात आली आहे.  यामध्ये 24 ट्रक कोल्हापूरला, 19 ट्रक सांगली जिल्ह्याला पाठवण्यात आली आहे. तसेच पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाकडे जमा झालेली 6 लाख 25 हजार रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कडे जमा करण्यात आली आहे
बाधित क्षेत्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील 1 लाख 25 हजार 732 वीज ग्राहकांची तर सांगली जिल्ह्यातील 48 हजार 255 वीजग्राहकांच्या खंडित वीज पूर्ववत करण्यात महावितरणला यश आले आहे. महावितरणाची विविध पथके वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी कार्यरत आहेत. त्याचबरोबर दोन्ही जिल्ह्यातील बँकिंग सेवा ही पूर्ववत होत आहेत, सर्व बँकेत व एटीएममध्ये  आवश्यक असणाऱ्या रकमेचा भरणा करण्यात आला आहे.  त्याचबरोबर बाधित क्षेत्रातील बंद रस्ते व पुलांवरील वाहतूक पूर्ववत करण्यात मोठ्या प्रमाणात यश येत आहे तसेच एसटीची सांगली जिल्ह्यातील 22 मार्ग व कोल्हापूर जिल्ह्यातील 20 मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
 सध्या पूरस्थिती सामान्य होत असून शासनाच्या माध्यमातून सानुग्रह अनुदान व पाच हजार रोख रक्कम सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात देण्यात सुरुवात केली आहे, उर्वरित ठिकाणी ही रक्कम देण्यात येणार आहे. स्वच्छतेबरोबरच आरोग्यावरही लक्ष केंद्रित करण्यात आले असून 302 वैद्यकीय पथकांच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा पुरवण्यात येत आहे. पूर ओसरताच बाधीत क्षेत्रातील शेतीचा पंचनामा करण्याचे आदेश कृषी विभागाला देण्यात आले आहेत. पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून मृत जनावरांच्या सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. जनावरांची विल्हेवाट लावण्यात येत असून जनावरांच्या आरोग्य तपासणी शिबिरे घेण्यात येत असल्याचे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले
000000