Tuesday, April 28, 2020

कोरोनाच्या प्रतिबंधासाठी नियुक्त अधिकाऱ्यांबरोबर विभागीय आयुक्तांची चर्चा





          पुणे, दि. 28 :-  पुणे शहरातील कोरोना प्रतिबंधक कार्यवाही अधिक प्रभावी व गतिमान करण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार सहकार आयुक्त श्री.अनिल कवडे, साखर आयुक्त श्री,सौरभ राव, पशुसंवर्धन आयुक्त श्री. सचिंद्र प्रतापसिंग आणि भूजल सर्व्हेक्षण संचालक श्री.कौस्तुभ दिवेगावकर या चार वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची पुणे शहरासाठी विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे विभागीय आयुक्त आणि पुणे महापालिका आयुक्तांना कोरोनाविरुद्धच्या लढाईत हे अधिकारी सहाय्य करणार आहेत,. आज विभागीय आयुक्त् डॉ. दीपक म्हैसेकर व जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी कोरोना प्रतिबंधक कार्यवाहीच्या दृष्टीने या अधिका-यांशी चर्चा करून पुढील नियोजनाची दिशा ठरविण्यात आली.
         पुणे शहरातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी आणि व्यापक होऊन शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव लवकर नियंत्रणात येण्याच्या दृष्टीने या बैठकीत चर्चा करण्यात आली. पुणे शहरातील कोरोना बाधित रुग्ण अधीक असलेल्या परिसरात आणखी काय उपाययोजना करता येतील, त्यादृष्टीनेही चर्चा झाली. डायबेटीस, ब्लड प्रेशर, हृदयरोग, किडनी विकार किंवा अस्थमा यासह वेगवेगळ्या विकारांमुळे मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक आणि असे विकार असणा-या व्यक्ती कोरोनाबाधित होवून तो रोग त्यांच्यासाठी जीवघेणा ठरत आहे. त्यामुळे झोपडपट्टी किंवा दाटीवाटीच्या वस्त्या आहेत,त्या भागात गतीने आरोग्य तपासणीच्या नियोजन तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने केल्या जात असलेल्या साईसुविधा, क्वारंटाईन सुविधा, तपासणी केंद्रे आदी विषयांबाबतही सविस्तर चर्चा झाली. 
                                                                     0000000

पुणे विभागात 34 हजार 930 क्विंटल अन्नधान्याची तर 13 हजार 33 क्विंटल भाजीपाल्याची आवक -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर



        पुणे, दि.28 : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे 34 हजार 930 क्विंटल अन्नधान्याची तर 13 हजार 33  क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये झाली आहे. विभागात 2 हजार 784 क्विंटल फळांची आवक तसेच कांदा-बटाटयाची आवक 5 हजार 82 क्विंटल इतकी झाली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.
            पुणे विभागात 27 एप्रिल 2020 रोजी 97.80 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 24.55 लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. तर उर्वरित दूध सुट्टया स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

पुणे विभागात 33 हजार 81 स्थलांतरित मजुरांची सोय 1 लाख 4 हजार 890 मजुरांना भोजन

       सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत 154 कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत 260 कॅम्प असे  पुणे विभागात एकुण 414 रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत.    या कॅम्पमध्ये 33 हजार 81 स्थलांतरित मजूर असून 1 लाख  4 हजार 890 मजुरांना भोजन देण्यात येत आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
0000

Monday, April 27, 2020

उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथिगृह येथे मंत्रीमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)
दि २७ एप्रिल २०२० 

मंत्रीमंडळ बैठक
उपमुख्यमंत्री  श्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथिगृह येथे मंत्रीमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत खालील निर्णय घेण्यात आले.  
(एकूण निर्णय ६)

निर्णय-१ 
*४ कोटी लिटर दुधाचे रुपांतर भुकटीत करून दुध उत्पादकांना दिलासा*

कोरोनामुळे बाजारात पिशवीबंद दुधाच्या मागणीत घट आली असून दुधाची विक्री १७ लाख लिटरने कमी झाली आहे. हॉटेल्स, रेस्टॉरंट, मिठाई भांडार मोठ्या प्रमाणावर बंद आहेत. त्यामुळे दुध उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून २ महिन्याकरिता ४ कोटी लिटर दुधाचे रुपांतर दुध भुकटीत करण्यास मान्यता देण्यात आली. ही योजना राबविण्यासाठी १२७ कोटी रुपये इतका निधी आकस्मिकता निधीद्वारे खर्च करण्यात येईल.
 अतिरिक्त दुध भुकटी व लोणी एनसीडीएफआयच्या ई पोर्टलवर विक्रीसाठी उपलब्ध करण्यास आणि त्यासाठी सेवा शुल्कापोटी  ०.३% खर्चास देखील मान्यता देण्यात आली. 
ही योजना महाराष्ट्र राज्य सहकारी दुध महासंघ (महानंद) यांच्यामार्फत राबविली जाईल. शासन आणि सहकारी संथा यांच्याकडून दुध संकलित केले जाईल. अतिरिक्त दुधाचे रूपांतरण करण्यासाठी दुध भुकटी प्रकल्पांना पॅकिंग व जीएसटीसहा 25 रुपये प्रती किलो व लोण्याच्या पॅकिंगसाठी १५ रुपये असा दर देण्यात येईल. 
ooo

निर्णय-२ 
*कोविडच्या पार्श्वभूमीवर व्यापारी वर्गाला दिलासा
जीएसटी कायद्यात आवश्यक त्या सुधारणा करणार*

कोविड १९ साथीच्या प्रादुर्भावामुळे वस्तू व सेवा कर कायद्यातील काही तरतुदींचे विहित मुदतीत कायदेशीर पालन करणे व्यापारी व कर प्रशासनास अवघड झाले असल्याने महाराष्ट्र वस्तू व सेवा कर कायदा २०१७ यामध्ये “१६८ अ” हे कलम नव्याने समाविष्ट करण्यास आज मान्यता देण्यात आली. यासंदर्भात राज्यपालांच्या मान्यतेने अध्यादेश काढला जाईल. 
सदरहू “१६८ अ” हे कलम केंद्रीय वस्तू व सेवा कर अधिनियम २०१७ मध्ये ३१ मार्च २०२० रोजीच दाखल करून घेण्यात आले आहे. 
यानुसार कुठल्याही आपत्तीत जसे की युद्ध, साथ रोग, पूर, दुष्काळ, आग, वादळ, भूकंप यामध्ये सरकार विविध कर भरणा व इतर सेवांच्या बाबतीत निश्चित केलेल्या  वेळेची मुदत वाढवू शकते.  
ooo

निर्णय-३ 
*कोविडमुळे सहकारी संस्थांच्या बाबतीत अधिनियमात सुधारणा*

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमांच्या विविध कलमांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आज घेण्यात आला.
कोविडच्या आजारामुळे सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा वेळेवर होऊ शकणार नाही आणि त्यामुळे  सभासद क्रियाशील वर्गवारीत न आल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागेल. निवडणुका पुढे ढकलण्यासंदर्भात  शासन आदेश व अधिनियमात सुसूत्रता आणणे, लेखा परीक्षण विहित वेळेत करणे शक्य नसणे, यासाठी विविध पोटकलमांमध्ये सुधारणा आवश्यक असल्याने हा निर्णय घेण्यात आला. १८ मार्च २०२० पासून सहकारी संस्थांच्या निवडणुकाही ३ महिन्यांसाठी स्थगित आहेत. 
५ वर्षांची मुदत संपलेल्या संस्थांच्या समितीच्या सदस्यांना तरतुदीनुसार अधिकार पदे रिक्त करावी लागतील. आणि प्रशासक नेमावे लागतील. संस्थांचे लेखापरीक्षण कोरोनामुळे शक्य नाही. ते पूर्ण करण्यासाठी कालावधीत सूट द्यावी लागेल मात्र ते अधिकार शासनास नसल्याने देखील या सुधारणा करणे गरजेचे होते    
ooo

निर्णय-४ 
*खरीपासाठी बँकांनी शेतकऱ्यांना थकबाकीदार न समजता पिक कर्ज द्यावे*

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ मधील पात्र परंतु सध्या निधी अभावी लाभ मिळू न शकलेल्या खातेदारांना बँकांनी थकबाकीदार न मानता खरीप २०२० साठी नवीन पिक कर्ज द्यावे अशी विनंती केंद्र शासनाच्या माध्यमातून भारतीय रिझर्व्ह बँकेस करण्याचा निर्णय झाला. 
कोविडमुळे २०२९-२० मध्ये घेतलेल्या पिक कर्जाची परतफेड करण्यासाठी शेतकऱ्यांच्या पिक कर्जाचे पुनर्गठन करणे व या पुनर्गठीत पिक कर्जाच्या परतफेडीच्या पहिल्या ह्प्त्याला एक वर्षाची मुदतवाढ द्यावी, आणि ज्यांचे पुनर्गठन झालेले नाही अशांच्या कर्जास देखील 31 मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ द्यावी अशी विनंती करण्याचा निर्णय झाला
 महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत आत्तापर्यंत १८.९४ लाख शेतकऱ्यांना ११ हजार ९८९ कोटी रुपये लाभ देण्यात आला आहे. अद्यापही ११.५९ लाख शेतकऱ्यांना ९ हजार ८६६ कोटी रुपये लाभ देणे बाकी आहे. आकस्मिकता निधीतून या योजनेसाठी १२ हजार कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत.  
ooo

निर्णय-५ 
*नांदेड महापौर, उपमहापौर निवडणुका पुढे ढकलल्या*

नांदेड महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर यांच्या निवडणुका कोविडच्या संक्रमणामुळे ३ महिने किंवा राज्य शासन ठरवेल त्या तारखेपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भातील अध्यादेश मान्यतेसाठी राज्यपालांकडे पाठविण्यात येईल. 
या महापौर व उपमहापौर यांचा कालावधी तरतुदीनुसार अडीच वर्षे आहे. 
ooo

निर्णय -६
*विधानपरिषद रिक्त जागेबाबत राज्यपालांना केलेल्या विनंतीचा पुनरुच्चार*

महाराष्ट्र विधान परिषदेच्या एका रिक्त जागेवर विद्यमान मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची नियुक्ती करण्याची शिफारस करण्याचा निर्णय घेतला होता व तशी शिफारस माननीय राज्यपाल महोदयांकडे करण्यात आली होती. 

 सध्या कोरोनाच्या संकटकाळात शासन-प्रशासन जोमाने संकटाचा मुकाबला करत आहे. कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत राज्यातील अस्थिरता दूर होणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाने आज महाराष्ट्र विधान परिषदेच्या एका रिक्त जागेवर विद्यमान मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची नियुक्ती करण्याच्या शिफारशींवर माननीय राज्यपाल महोदयांनी तातडीने कार्यवाही करावी या विनंतीचा पुनरुच्चार केला.
OooO

ट्रेसिंग आणि टेस्टिंग वाढवण्यावर भर द्या केंद्रीय आरोग्य पथक प्रमुख डॉ. गडपाले यांच्या सूचना


 सोलापूर दि.27- कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी  प्रतिबंधित क्षेत्रामध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याबरोबरच तातडीने  सर्व्हेक्षण,  तपासणी (ट्रेसिंग) आणि वैद्यकीय चाचणी (टेस्टींग) करण्यावर भर देण्यात यावा, अशा सूचना केंद्रीय पथकाचे प्रमुख तथा आरोग्य सेवा विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. ए. के. गडपाले यांनी आज येथे दिल्या. 
 डॉ. गडपाले यांच्या नेतृत्वाखालील पथक आज सोलापूर शहरातील कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी केंद्रीय  स्तरावरील पथक सोलापूर जिल्ह्यात आले होते.  या केंद्रीय पथकाने सकाळी पाच्छा पेठ, हिंगलाज माता बॉईस मॅटर्निटी होम, वैशंपायन मेडिकल कॉलेज येथे भेट दिली. त्यानंतर शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठक झाली. त्या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या.  
 केंद्रीय पथकामध्ये लेडी हार्डिग्ज मेडिकल कॉलेज मधील प्रोफेसर डॉ. व्ही. एस. रंधवा. प्रो. डॉ. अंशू गुप्ता, राममनोहर लोहिया, मेडिकल कॉलेजमधील डॉ. सागर बोरकर यांचा समावेश आहे. बैठकीस जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका  आयुक्त दीपक तावरे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ आदी उपस्थित होते. 
  

 श्री. गडपाले म्हणाले, 'सर्व विभाग समन्वयाने काम करीत आहेत, ही समाधानाची बाब असली तरी जिल्ह्यात  कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जास्तीत जास्त संशयितांची तपासणी करण्यात यावी. तसेच  संस्थात्मक क्वारंटाईन वाढविण्याबरोबरच अधिक  चाचण्या करण्यावर भर देण्यात यावा. विशेषत: झोपडपट्टीच्या अथवा जास्त घरांची गर्दी असलेल्या भागांवर विशेष लक्ष केंद्रित करावे. शहरात अठ्ठावीस  दिवस दररोज सर्व्हेक्षण करण्यात यावे. प्रतिबंधित  क्षेत्रामध्ये दररोज सॅनिटायझर फवारण्यात यावे. सार्वजनिक शौचालये सॅनिटायझेशन करा. त्याचबरोबर संचारबंदी प्रभावीरित्या अमलात आणावी.' 
 कोविड केअर सेंटर, कोविड हेल्थ सेंटर आणि डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल सज्ज ठेवा. बाधित  रुग्णांना  हॉस्पिटल मध्ये भरती करण्यासाठी सनियंत्रण कक्ष सुरु करावा. या कामात स्वयंसेवी संस्था, कॉर्पोरेट सेक्टर, सहकारी संस्था यांचा सहभाग घ्या. कोविड व्यतिरिक्त इतर रुग्णांनादेखील उपचार मिळावेत यासाठी आवश्यक ते नियोजन करावे,   अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. 
 खासगी डॉक्टरांची सेवा उपलब्ध  करुन घ्या. खासगी डॉक्टर  सेवा देण्यास तयार नसल्यास त्यांच्याशी चर्चा करा. तरीही तयार न झाल्यास कारवाई करा, असे डॉक्टर गडपाले यांनी सांगितले. आरोग्य कर्मचारी आणि सेवक यांच्या सुरक्षितेची काळजी घ्या, असे त्यांनी सांगितले. कोरोना विषाणूच्या प्रसाराबाबत जाणीव जागृती करा. नागरिकांना अद्यापही कोरोना विषाणूबाबत योग्य माहिती नाही. सोलापूर सारख्या बहुभाषक शहरात कोरोना विषाणूबाबत विविध भाषांतून जाणीव जागृती करा. त्यासाठी विविध माध्यमांचा वापर करा, अशा सूचना त्यांनी दिल्या. 
 यावेळी बैठकीस  जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ. प्रदिप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी भीमाशंकर जमादार, आरोग्य अधिकारी  डॉ. संतोष नवले, डॉ. मोहन शेगर, डॉ. सागर गायकवाड, उपजिल्हाधिकारी किशोर पवार, हेमंत निकम, पोलीस उपायुक्त बापू बांगर आदी उपस्थित होते.   
0000

ससून रुग्णालयाला प्लाझ्मा फोरेसेस मशीन भेट-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

ससून रुग्णालयाला प्लाझ्मा फोरेसेस मशीन भेट-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

प्लाझ्मा फोरेसेस मशिन वापरण्यासाठीचा प्रस्ताव आयसीएमआरकडे सादर

  पुणे दि.27:- कोरोनाच्या रुग्णांवर प्रायोगिक तत्वावर प्लाझ्मा उपचाराबाबत प्रशासनाच्या वतीने प्रयत्न सुरु आहेत. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर मात करण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ससून रुग्णालयाला उद्योजक अविनाश भोसले यांनी प्लाझ्मा फोरेसेस मशीन भेट दिली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी आज दिली.
  प्लाझ्मा फोरेसेस मशिन वापरण्यासाठी परवानगी देण्याबाबतचा प्रस्ताव आयसीएमआरकडे पाठविण्यात आला असून परवानगी प्राप्त झाल्यावर उपचार सुरु करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे. या मशिनव्दारे प्लाझ्मा वेगळा काढला जावू शकतो आणि हा प्लाझ्मा कोविड रुग्णाच्या उपचारासाठी वापरला जावू शकतो. असा प्लाझ्मा 18 वर्षावरील पुरुष  किंवा महिला व्यक्ती देवू शकते. तथापी संबंधित महिला अद्यापर्यंत गर्भवती राहिलेली नसावी.  तसेच त्या व्यक्तीचे वजन 55 किलो पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
  प्लाझ्मा देणाऱ्या व्यक्तीच्या कोविड-19 च्या शेवटच्या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह असणे आवश्यक आहे. यानंतर 14 दिवसांनी संबंधित व्यक्ती कोरोनाच्या रुग्णाला प्लाझ्मा देवू शकतात. तथापी प्लाझ्मा डोनेट करण्यापूर्वी  मागील 28 दिवसात या व्यक्तीमध्ये कोविड-19 ची कोणतीही लक्षणे आढळलेली नसावीत. संबंधित व्यक्ती हिपॅटाइटिस- बी  तसेच एचआयव्ही बाधित नसणे आवश्यक आहे. त्याचबरोबर रक्तदान करताना तपासणी करण्यात येणारा  रक्तगट व आवश्यक  त्या सर्व बाबींची  काळजी देखील घेण्यात येईल असेली डॉ.म्हैसेकर यांनी सांगितले.

00000000

पुणे विभागातील 230 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 1 हजार 457 रुग्ण -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे विभागातील 230 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी 
विभागात कोरोना बाधित 1 हजार 457 रुग्ण
-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
  पुणे दि.27:- पुणे विभागातील 230 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 हजार 457 झाली आहे.  तर ॲक्टीव रुग्ण 1 हजार 139 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 88 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 48 रुग्ण  गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
  विभागात 1 हजार 457 बाधित रुग्ण असून 88 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात 1 हजार 319 बाधीत रुग्ण असून 80 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात 33 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात 65 बाधीत रुग्ण असून 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात 29 बाधीत रुग्ण असून  एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर  जिल्हयात 11 बाधीत रुग्ण आहेत.
  आजपर्यत विभागामध्ये एकुण  15 हजार 811 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी 14 हजार 935 चा अहवाल प्राप्त झाला आहे. 877 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 13 हजार 428 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 1 हजार 457 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
  आजपर्यंत विभागामधील 54 लाख 35 हजार 546 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 2 कोटी 6 लाख 3 हजार 94 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 1 हजार 131 व्यक्तींना अधीक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.
                                 0000

पुण्यातील परिस्थिती पाहता खाजगी रुग्णालयाने पुढाकार घेण्याची गरज -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर


  ▪शहरातील प्रमुख रुग्णालयाबरोबर झाली बैठक..
  ▪उपचार व नियमाप्रमाणे शुल्क अदा करण्यात येईल.
  ▪मनपाबरोबर करार केला जाईल.
  ▪भविष्यातील परिस्थिती बघून नियोजन करावे लागणार आहे.

  पुणे,दि.२७:-कोरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी विविध आघाड्यांवर प्रयत्न सुरू असले तरी पुण्यातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.त्यामुळे शहरातील रुग्णालयांचे मोठे सहकार्य आवश्यक आहे.तेव्हा आपण पुढे येऊन सहभागी व्हावे. रुग्णांच्या उपचाराप्रमाणे व नियमानुसार शुल्क अदा करण्यात येईल, असे विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.
        आज विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात  शहरातील प्रमुख रुग्णालयाच्या डॉक्टरांबरोबर  बैठक झाली.
  डॉक्टरांशी चर्चा करताना डॉ.म्हैसेकर म्हणाले,दवाखान्यात येणाऱ्या प्रत्येकांनी मास्क वापरणे आवश्यक आहे. छोटया -छोट्या बाबी फार महत्त्वाच्या असतात.कोरोना विषाणूची लागण होणार नाही ,याची दक्षता सर्वांनी घेण्याची गरज आहे.सामाजिक बांधिलकी म्हणून सर्वांनी एकदिलाने काम करण्याची आवश्यकता आहे.कारण दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात  आणणे गरजेचे आहे.आपल्याकडे येणाऱ्या रुग्णांना चांगली सेवा द्या.प्रशासनाकडून सहकार्य केले जाईल.
      पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांनी पुढील काळात डोळ्यांत तेल घालून काम करावे लागणार आहे. सिम्बॉयसिस व भारती विद्यापीठाच्या हॉस्पिटलबरोबर मनपाने करार केलेला आहे. रुग्णांच्या उपचारार्थ शासनाच्या योजनेअंतर्गत निधी मिळेल आणि उर्वरित रक्कम मनपा देईल.फक्त आपल्याकडे आय.सी.यु.बेड किती आहे.शिल्लक किती आहे, याबाबत अद्ययावत माहिती रुग्णालयाने देत राहावी.आलेल्या रुग्णांची गैरसोय होऊ नये. भविष्याचे नियोजन करून निर्णय घ्यावे लागणार असल्याचे त्यांनी  सांगितले.
    जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुणे शहरातील गंभीर परिस्थितीबाबत जाणीव करून दिली.तसेच आरोग्याच्या संबंधाने शासनाच्या योजनेबाबत माहिती दिली.
      निवृत्त आरोग्य महासंचालक डॉ.सुभाष साळुंके यांनी कांही उपयुक्त सूचना केल्या.
   उपस्थित डाॕक्टरांनी कांही सूचना व शंका उपस्थित केल्या.त्यावर बैठकीत निरसन करण्यात आले.

0000