Thursday, June 25, 2020

महामार्गाची कामे गतीने करापालकमंत्री भरणे यांच्या सूचना


सोलापूर, दि.25: सोलापूर जिल्ह्यातून मराठवाडा, कर्नाटक, कोकण यांना जोडणारे महामार्ग जातात. वन, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग, राज्य रस्ते विकास महामंडळ व संबंधित महसूल अधिकाऱ्यांनी शिल्लक असलेली भूसंपादनाची कामे मार्गी लावून शहराला जोडणाऱ्या महामार्गांची कामे गतीने पूर्ण करावीत, असे निर्देश पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.
 
जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय महामार्गाच्या आढावा बैठकीत श्री. भरणे यांनी सूचना केल्या. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, भारतीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता संजीव कुलकर्णी, राज्य रस्ते महामंडळाचे कार्यकारी अभियंता अजय भोसले यांच्यासह भूसंपादन अधिकारी, प्रांत उपस्थित होते.
 
श्री. भरणे म्हणाले, पालखी मार्गाच्या कामांसोबत इतर महामार्गाची कामे त्वरित होणे गरजेचे आहे. वन विभागांशी महसूल, सार्वजनिक बांधकाम, राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन कालबद्ध कार्यक्रम तयार करावा. रस्त्यासाठी उत्खनन करताना शेतकऱ्यांच्या तक्रारी येणार नाहीत, याबाबत काळजी घ्यावी.
 
यावेळी उपवन संरक्षक पी.एच. बडगे यांनी वन विभागाच्या अडचणी मांडल्या, त्यावर इतर जिल्ह्यात वापरलेली पद्धत इथेही वापरा, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
 
जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून चौपदरी तर सार्वजनिक बांधकाम आणि राज्य रस्ते विकास महामंडळाकडून दुपदरी रस्त्यांच्या 21 प्रकल्पांचे काम सुरू आहे. यात  61 हजार 459 जमीन मालक बाधित झाले असून त्यांना नियमानुसार भरपाईची रक्कम देण्याचे काम गतीने सुरू असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी दिली. 


                                                       000000

सोलापुरात एक लाख नागरिकांची रॅपिड अँटीजेन डिटेक्शन टेस्ट करणारकोरोनाचा प्रसार रोखण्याठी पालकमंत्री भरणे यांनी बैठकीत घेतला निर्णय



  सोलापूर, दि. 25 : सोलापूर शहरातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सुमारे एक लाख नागरिकांची रॅपिड अँटीजेन डिटेक्शन टेस्ट करण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दिली. त्याचबरोबर शहरात तुर्तास लॉकडाऊन केले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

श्री. भरणे यांच्या अध्यक्षतेखाली आज कोरोना प्रसाराला रोखण्यासाठी विशेष आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या बैठकीनंतर श्री. भरणे यांनी ही माहिती दिली.  बैठकीस  जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी.शिवशंकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव आदी उपस्थित होते.

श्री.भरणे यांनी सोलापूर शहरातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन करायचा का याबाबत सर्व अधिकाऱ्यांशी व्यापक चर्चा करुन सर्वांची मते जाणून घेतली. मात्र सोलापूर शहरामध्ये पुन्हा लॉकडाऊन न करण्याचा निर्णय चर्चेअंती घेण्यात आला, असे सांगितले.

सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरात सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. यातून सुमारे एक लाख नागरिकांना इतर आजार (को-मॉर्बिड) असल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्व नागरिकांची दिवसांत रॅपिड अँटीजेन डिटेक्शन टेस्ट करण्यात येणार आहे. या टेस्टमुळे संबंधित व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली आहे किंवा नाही, याबाबतचा अहवाल अर्ध्या तासात मिळणार आहे. ही टेस्ट आयसीएमआर यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार करण्यात येणार आहेत. तसेच ही टेस्ट करण्यासाठी पोलीस आयुक्तालय आणि महानगरपालिका एकत्रितरित्या आराखडा तयार करणार आहेत. यासाठी पोलीस आयुक्त कार्यालयाला विशेष मनुष्यबळ पुरविले जाईल,असे श्री.भरणे यांनी सांगितले.

टेस्टमध्ये पॉझिटिव्ह असलेल्या नागरिकांचे अलगीकरण केले जाणार असून त्यामुळे कोरोना संक्रमणाची साखळी खंडीत करण्यात निश्चित यश येईल. या टेस्टसाठी जिल्हा प्रशासनाने महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन श्री.भरणे यांनी केले. 

बैठकीस डॉ.वैश्यंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.संजीव ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदिप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भीमाशंकर जमादार, महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. मंजिरी कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी हेमंत निकम, गजानन गुरव, धनराज पांडे आदी उपस्थित होते. 

                                                               00000

पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर



        पुणे, दि. 25 :  पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा झाला आहे. विभागात  अंदाजे     23 हजार 118 क्विंटल अन्नधान्याची,  32 हजार 924  क्विंटल  भाजीपाल्याची, 7 हजार 787  क्विंटल फळांची तर  कांदा / बटाट्याची  18   हजार 156   क्विंटल इतकी आवक झाली आहे.
पुणे विभागात 24 जून 2020 रोजी 97.899  लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 25.284   लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. तर उर्वरित दूध सुट्टया स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
             
( टिप : - सदरची आकडेवारी दुपारी 1.00 वा. पर्यंतची आहे )

14 जणांचा अहवाल आला पॉझिटिव्ह


सातारा दि. 24 ( जि. मा. का ) : कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड व एन. सी.सी.एस. पुणे यांच्याकडून प्राप्त  झालेल्या अहवालानुसार 14 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
यामध्ये पाटण तालुक्यातील शितापवाडी  येथील 72 वर्षीय पुरुष, पालेकरवाडी (बहुले ) येथील 50 वर्षीय पुरुष व 65 वर्षीय महिला.
कराड तालुक्यातील रेठरे खुर्द येथील 45 वर्षीय महिला, तारुख येथील 20,40,56,40 व 45वर्षीय पुरुष व 7 वर्षीय मुलगी.
वाई तालुक्यातील कवठे येथील 20 वर्षीय पुरुष, एकसर येथील 25 वर्षीय पुरुष.
कोरेगांव तालुक्यातील पिंपोडे येथील 35 वर्षीय पुरुष.
सातारा तालुक्यातील   लिंब (शेरे) येथील 36 वर्षीय पुरुष.

Wednesday, June 24, 2020

कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाच्या प्रतिबंधक उपाययोजनेच्या अनुषंगाने लग्नसमारंभ साजरा करण्यास जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी अटी शर्तींच्या अधीन राहून परवानगी दिली आहे.


    आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे व त्यातील पोट कलम २ (अ) नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हे उक्त प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत.
राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ दिनांक १३ मार्च २०२० पासून लागू करुन  अधिसूचना निर्गमित केलेली आहे.
 कोविड १९ विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने आपत्कालीन उपाय योजनेचा भाग म्हणून मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रात लॉकडाऊनची घोषणा यापूर्वी केलेली असून त्यास ३० जून २०२० पर्यंत मुदतवाढ आणि टप्पे निहाय लॉकडाऊन समाप्त करणे आणि निर्बंध कमी करण्यासाठी "मिशन बिगीन अगेन" (MISSION BEGIN AGAIN) बाबत अधिसूचना जाहीर केलेली आहे.
 कोरोना विषाणूचा राज्यातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लॉकडाऊन दरम्यान, गर्दी टाळण्याच्या दृष्टीने केवळ ५० लोकांच्या मर्यादेत सोशल डिस्टंसिंग पाळत लग्न समारंभ साजरा करण्याची परवानगी  देण्यात आलेली आहे. तथापि, हे लग्न समारंभ कोणकोणत्या ठिकाणी पार पाडता येतील याबाबतचा उल्लेख सदर आदेशामध्ये नाही. ५० लोकांच्या मर्यादेत घराच्या परिसरात लग्न समारंभ साजरे करणे अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे ५० लोकांच्या मर्यादेतच सोशल डिस्टसिंग पाळून खुले लॉन, विना वातानुकुलित मंगल कार्यालय/हॉल/सभागृह येथे समारंभ पार पाडण्यास परवानगी देण्याबाबतच्या विविध मागण्या शासनाकडे प्राप्त झाल्या. या सूचना व मागणी विचारात घेता तसेच आता पावसाळा सुरु झाला असल्यामुळे खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालय/हॉल/सभागृह, घर व घराच्या परिसरात ५० लोकांच्या मर्यादेत सोशल डिस्टंसिंग तसेच कोव्हीड -१९ संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या सुचनांचे पालन करण्याच्या अटीवर लग्न समारंभ पार पाडण्यास  नागरिकांकडून मागणी प्राप्त झाल्यास परवानगी देण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
 जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, शासन अधिसूचना सुधारणा पुणे जिल्हा कार्यक्षेत्रात लागू करण्यात आल्या असून
सर्व संबंधित प्रशासकिय विभाग यांनी या आदेशाची अंमलबजावणी करावी. पुणे जिल्हा कार्यक्षेत्रात महाराष्ट्र शासन अधिसूचनेत पुढील अटी व शर्तींच्या अधीन राहून परवानगी देण्यात येईल.
अटी व शर्ती :
१. लग्न समारंभाच्या ठिकाणी सर्व नागरिकांनी मास्क वापरणे बंधनकारक राहील.
२. लग्न समारंभाच्या ठिकाणी थुंकण्यास सक्त मनाई आहे आणि त्याचे उल्लंघन केल्यास सदरील व्यक्ती दंडनीय कारवाईस पात्र राहील.
३. लग्न समारंभाच्या ठिकाणी जास्तीत जास्त ५० व्यक्ती उपस्थित राहतील व त्यांच्यामध्ये सामाजिक अंतर (सोशल डिस्टेंसिंग) सहा फूट राखणे बंधनकारक राहील.
४. लग्न समारंभाच्या ठिकाणी गुटखा, पान, तंबाखू खाण्यास व मद्यपानास सक्त मनाई राहील.
५. लग्न समारंभाची जागा, वारंवार हाताळले जाणारे भाग निर्जंतुकीकरण करण्यात यावे.

६. लग्न समारंभाच्या आत व बाहेर जाण्याच्या ठिकाणी थर्मल स्कॅनिंग, हात धुणे,सॅनिटायझरचा वापर या करिता संंबंधित विनावातानुकूलित मंगल कार्यालय /हॉल/खुले लॉन/सभागृह व्यवस्थापक/मालक यांच्यामार्फत व्यवस्था करण्यात यावी. कोणत्याही परिस्थितीत वातानुकूलित सेवेचा (एसी) वापर करण्यात येऊ नये.
७. लग्न समारंभाच्या ठिकाणी बसण्याच्या जागा सामाजिक अंतर राहील अशा पद्धतीने खुणा (मार्किंग) करुन निश्चित करण्यात याव्यात.
८. लग्न समारंभाच्या ठिकाणी पार्किंग व्यवस्था मंगल कार्यालयाच्या व्यवस्थापक / मालक यांच्या मार्फत करण्यात यावी.
९. लग्न समारंभाच्या ठिकाणी नागरिकांनी सामाजिक अंतराचे पालन करत नसल्याचे निदर्शनास आले तर सदर भागातील खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालय/हॉल/सभागृह तात्काळ बंद करण्यात येतील.

या आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था आणि संघटना विरूध्द भारतीय साथ अधिनियम १८९७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, व भारतीय दंड संहिता (४५ऑफ १८६०) कलम १८८ आणि या संदर्भातील शासनाचे प्रचलित इतर अधिनियम व नियमान्वये योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिला आहे.

मृत्यूदर कमी करण्यासाठी अँटीजेन टेस्टचा वापर कराआढावा बैठकीत विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांच्या सूचना

सोलापूर, दि. २४ : कोरोना विषाणूने बाधित होणाऱ्या व्यक्तींची संख्या आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी नव्या अँटीजेन टेस्टचा वापर करा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज येथे केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज आढावा बैठक झाली त्या मध्ये  त्यांनी या सूचना दिल्या,  बैठकीस जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी.शिवशंकर, पोलिस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ,  पोलिस उपायुक्त बापू बांगर, उपायुक्त राजाराम झेंडे,  आरोग्य संचालक नंदकुमार देशमुख, कोविड टास्क गटांचे प्रमुख डॉ. दिलीप कदम आदी उपस्थित होते. 

       बैठकीच्या सुरवातीस महापालिकेचे आयुक्त पी.शिवशंकर यांनी सादरीकरणाद्वारे शहरातील कोरोना बाबतची सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, शहरातील दाट वस्तीच्या आणि लोकसंख्येच्या भागात कोरोना विषाणूचा प्रसार होत आहे. या प्रसाराला रोखण्यासाठी महापालिकेने उपाययोजना केल्या आहेत.

डॉ.म्हैसेकर यांनी सांगितले की, शहराच्या दाट लोकवस्तीच्या भागातील  नागरिकांची अँटीजेन टेस्ट करा. या चाचणीमुळे कोरोनाची बाधा झाल्याचे अर्ध्या तासात कळते. त्यामुळे बाधा झालेल्या पण लक्षणे नसलेले आणि सौम्य लक्षणे असलेल्या नागरिकांना वेगळे काढता येईल आणि त्यांच्यावर उपचार करणे शक्य होईल. 

शहरातील एकूण 15 प्राथमिक आरोग्य केंद्रापैकी सहा आरोग्य केंद्राच्या अखत्यारित मृत्यूदर जास्त आहेत. या सहा प्राथमिक आरोग्य केंद्रावरच आता जादा लक्ष दिले जाईल, असे श्री.म्हैसेकर यांनी सांगितले. त्यांनी कोविड केअर सेंटरची क्षमता वाढवा म्हणुनही सांगितले. खाजगी दवाखान्यात नियंत्रित दरानेच आकारणी केली जाते का असे यावर लक्ष द्या. डॅशबोर्डवर कोरोना बाधित, आयसोलेशन, क्वारंटाईन कक्षात ठेवलेले रुग्ण अथवा मृत्यू झालेले रुग्णांची माहिती अचूक करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ.मंजिरी कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, अनिल कारंडे, महिला बाल विकास अधिकारी विजय खोमणे, सहाय्यक कामगार आयुक्त निलेश येलगुंडे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी चंचल पाटील, परमेश्वर राऊत आदी उपस्थित होते. 
                                                         0000000

पीक कर्ज वाटपाचे उद्द‍िष्टय वेळेत पुर्ण कराविभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या सूचना


सोलापूर, दि. २४ : पीक कर्ज वाटपाचे उद्द‍िष्टय वेळेत पुर्ण करा, अशा सूचना  विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज पीक कर्ज वाटप आणि खरीप हंगामाबाबत बैठक झाली. बैठकीस महापालिका आयुक्त पी.शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, अतिरिक्त जिल्हाधिकारी  संजीव जाधव, उपायुक्त त्रिगुण कुलकर्णी,  उपायुक्त राजाराम झेंडे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रशासक शैलेश कोतमिरे उपस्थित होते.
  विभागीय आयुक्त म्हैसेकर यांनी खरीप हंगाम आणि पीक कर्ज वाटपाबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून सादरीकरणाद्वारे माहिती घेतली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार यांनी खरीप हंगामाबाबत तर जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी कर्ज वाटपाबाबत सादरीकरण केले. 
डॉ.म्हैसेकर यांनी सांगितले की, बँकांनी पीक कर्ज वितरणासाठी शेतकऱ्यांकडून फार कागदपत्रांची मागणी करु नये. शेतीचा 7/12 आणि 8-अ चे ऑनलाईन उतारे ग्राह्य धरण्यात याव्यात. महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजनेत कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांनाही नव्याने कर्ज  देण्यात यावे. पीक कर्जाचे कमी  उद्द‍िष्टय साध्य केलेल्या बँकांनी 15 जुलैपर्यंत कर्ज वाटप करण्यासाठी गतीने काम करावे.
बैठकीत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाचे प्रशासन शैलेश कोतमिरे यांनी जिल्हा बँकेची परिस्थिती आणि पीक कर्ज वाटपाबाबतची माहिती दिली. जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी बँकानी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी. मात्र ही प्रक्रिया पूर्ण करताना फिजिकल टिस्टन्सिंग, मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे आदी सुध्दा उपाय योजनांचा अवलंब करावा, असे सांगितले. 
आयसीआयसीआय आणि एचडीएफसी बँकाने पीक कर्जवाटपात उद्द‍िष्टापेक्षा जास्त कर्ज वाटप केल्याबद्दल विभागीय आयुक्त म्हैसेकर यांनी या दोन्ही बँकांच्या प्रतिनिधींचे अभिनंदन केले.                                                              *बियाणे, खते यांची                                               गुणवत्ता तपासावी*
जिल्हायातील खरीप हंगामाचे नियोजन काटेकोर करा, त्याची अंमलबजावणी करा, अशा सूचना डॉ.म्हैसेकर यांनी दिल्या. शेतकऱ्यांना खते आणि बियाण्यांचा पुरवठा होईल याची काळजी घ्यावी. बियाणे खते यांची गुणवत्ता तपासून घ्या. तक्रार आल्यास कारवाई करा, अशा सूचना त्यांनी दिल्या. 
  या बैठकीस बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक अजय कडू, अग्रणी बँक व्यवस्थापक संतोष सोनवणे, कृषी उपसंचालक रवींद्र माने, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे आदी उपस्थित होते.