पुणे, दि. 15 :- युवकांचा विकास होण्यासाठी शासनातर्फे कौशल्य विकासाच्या विविध योजना व कार्यक्रम राबविण्यात येत आहे.रोजगारप्राप्तीसाठी युवकांनी सकारात्मकता अंगिकारावी असे आवाहन कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले.
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व व्यवसाय प्रशिक्षण विभागाच्यावतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यास उपस्थित युवकांना मार्गदर्शन करताना कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री संभाजी पाटील निलंगेकर बोलत होते. यावेळी व्यासपिठावर आमदार योगेश टिळेकर, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे सहसंचालक चंद्रकांत निनाळे, उपसंचालक दिलीप पवार उपस्थित होते.
यावेळी कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले की, चालू शतकात भारत सर्वाधिक तरुण असलेला देश बनणार आहे. तरुण व युवकांना रोजगार मिळावा यासाठी शासनातर्फे कौशल्य विकासाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.तरुणामध्ये कौशल्य विकास व्हावा यासाठी प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियान, मेक इन इंडिया, डिजीटल इंडिया उपक्रम राबविण्यात येत आहेत. युवकांमध्ये असलेल्या कौशल्याचा विकास करुन युवकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. युवक प्रशिक्षीत झाल्यामुळे त्यांना मोठया प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार आहे. शासनातर्फे परदेशी कंपन्यांशी सामंजस्य करार करण्यात येत आहे. याचा फायदा तरुणांना होणार असल्याचे सांगून रोजगार मेळाव्यात नोंदणी झालेल्या सर्वांना रोजगाराची संधी मिळेल यासाठी आयोजकांनी प्रयत्न करावे अशी सूचना यावेळी मंत्रीमहोदयांनी केली.
आमदार योगेश टिळेकर यांनी रोजगार मेळाव्याचा तरुणांनी फायदा घ्यावे असे आवाहन केले. युवकांमधील कौशल्याचा विकास व्हावा व त्यांना रोजगार मिळावा यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे सहसंचालक चंद्रकांत निनाळे यांनी रोजगार मेळावा आयोजित करण्याचा उद्देश सांगितला.व्यावसायीक व कौशल्यपूर्ण शिक्षणासाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाच्यावतीने भरती मेळावे व प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात येतात. प्रमोद महाजन कौशल्य विकास योजनेद्वारे युवकांना मोठया प्रमाणावर कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. युवकांनी याचा लाभ घेऊन देशाला व राज्याला प्रगतीपथावर न्यावे. मुख्यमंत्र्यांनी जाहिर केलेल्या मेक इन महाराष्ट्र योजनेमुळे महाराष्ट्रात मोठया प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे. त्यासाठी युवकांनी व्यावसायीक शिक्षणाला प्राधान्य द्यावे असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे उद्घाटन मंत्री महोदयांनी दिप प्रज्वलीत करुन केले. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उद्योग सुरु करुन सहकाऱ्यांना रोजगार उपलब्ध करुन दिल्याबद्दल यशस्वी उद्योजकांचा यावेळी मंत्रीमहोदयांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या मेळाव्यात सुमारे 26 उद्योजक सहभागी झाले होते. विविध कंपन्यांमध्ये सुमारे 896 पदांसाठी या रोजगार मेळाव्यात भरती करण्यात येणार आहे. कार्यक्रमास महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते.
000

No comments:
Post a Comment