Wednesday, March 22, 2017

जिल्हाधिकारी कार्यालय आयोजित महिला आरोग्य शिबिराचे उदघाटन संपन्न


पुणे दि.22: जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन विधान भवन सभागृहात करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्या हस्ते झाले.
अधिकाधिक महिला कर्मचार्यांनी  शिबिराचा लाभ घ्यावा आपल्या आरोग्याबाबत जागरूक  रहावे असे आवाहन विभागीय आयुक्त चोक्कलिंगम यांनी यावेळी केले.
या शिबिरात विभागीय कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व महिला कर्मचाऱ्यांची तपासणी जहागीर हॉस्पिटल यांच्या सौजन्याने 22 ते 30 मार्च 2017 दरम्यान करण्यात येणार आहे. यासाठी महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या सोईनुसार वेळ देण्यात येणार आहे अशी  माहिती  जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी यावेळी दिली.
आजच्या धकाधकीच्या आयुष्यात कॅन्सरसारख्या दुर्धर आजारांचे प्रमाण बळावत चालले आहे. या आजाराचे वेळीच निदान झाले तर,त्यावर आपण सहज मात करू शकतो,त्यासाठी आवश्यक ते  सर्व उपचार उपलब्ध आहेत असे प्रतिपादन जहांगीर हॉस्पिटलचे संचालक सरकवासजी जहांगीर यांनी केले.
या कार्यक्रमास ,सामान्य प्रशासन उप आयुक्त कविता द्विवेदी, पुरवठा उप आयुक्त निलिमा धायगुडे,निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे,उपजिल्हाधिकारी मोनिका सिंग तसेच  जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व महिला कर्मचारी उपस्थित होते.
                  00000



Tuesday, March 21, 2017

विभागीय आयुक्त चोक्कलिंगम यांच्याकडून पी ओ एस मशीनची पाहणी


पुणे दि. २१ -स्वस्त धान्य दुकानांमध्ये बसविण्यात आलेल्या पहिल्या पी ओ एस मशीनची पाहणी   विभागीय आयुक्त चोक्कलिंगम यांनी केली.पुणे येथील नवीन नाना पेठ भागातील सत्यज्योती सावित्रीबाई फुले महिला बचत गटातर्फे चालविण्यात येणाऱ्या स्वस्त धान्य दुकानात ही मशीन बसविण्यात आली आहे.
या मशीनमुळे ग्राहकांना फक्त अंगठा दाबून धान्य मिळणार आहे. सदर मशिनशी आधार कार्ड संलग्न असल्यामुळे याद्वारे व्यवहारामध्ये अधिक पारदर्शकता येणार आहेतसेच यामुळे रास्त भाव दुकानदारांनाही अधिक फायदा होणार आह.
          याप्रसंगी  विभागीय आयुक्त श्री. चोक्कलिंगम यांनी दुकानदार यांच्याकडून पी..एस मशीनबद्दल माहिती घेतली तसेच ग्राहकांना धान्य वितरण करून संवाद साधला व अभिनंदन केलेया कार्यक्रमास पुरवठा उपआयुक्त निलीमा धायगुडेअन्नधान्य वितरण अधिकारी शहाजी पवार तसेच परिसरातील नागरिक व रहिवाशी उपस्थित होते.
0000



तलाठी कार्यशाळा संपन्न

पुणेदि.21 जिल्ह्यातील महसूल प्रशासनातील कर्मचारी यांना अधिकाधिक संगणकीय ज्ञान देणे,महसूल प्रशासनाला संगणीकृतकरणे,-प्रशासन जागृती या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालय पुणे मार्फत जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचारी यांच्यासाठी तलाठी कार्यशाळाआयोजित करण्यात आली होती.
अल्प बचत भवन सभागृह येथे  ही कार्यशाळा संपन्न झालीया कार्यशाळेत 7/12 चा अद्यावत फॉरमॅट सुलभ पद्धतीने नागरिकांना कसाउपलब्ध होईल-फेरफार पूर्वतयारी,नवीन आज्ञावली संदर्भात ट्रेनिंगऑनलाईन कागदपत्रे काढण्यावर भरसायबर सेलचे नियम ,आय टी ऍक्ट,जमीन महसूल कायद्यातील सुधारणा या बाबींवर प्रकाश टाकण्यात आला.
कर्मचाऱ्यांनी अपडेट राहणे  गरजेचे  आहे  कारण  नवीन  तंत्रज्ञान  आत्मसात  केले तरच  आपण  गुणवत्तापूर्ण  सेवा  देऊ  शकतो  असे  प्रतिपादन  कुळकायदा  शाखा  कोल्हापूरचे उपजिल्हाधिकारी रामदास  जगताप  यांनी  उपस्थितांना  मार्गदर्शन  करताना केले.
याकार्यशाळेचे उद्घाटन अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे यांच्या हस्ते झाले. कुळ कायदा शाखेच्या उपजिल्हाधिकारी मोनिका सिंग,जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी,तहसीलदार, नायब तहसीलदार,मंडळ अधिकारी,तलाठी तसेच महसूल विभागातील सर्व कर्मचारीवृंद मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

0000

Friday, March 10, 2017

यशदामध्ये जलजागृती सप्ताहासंदर्भात विचार विनिमय कार्यशाळा संपन्न जलसाक्षरतेसाठी जनसहभाग महत्वपूर्ण : जलसंपदा विभागाचे उपसचिव स. को. सब्बीनवार


पुणे, दि. 4 : पाण्याचे योग्य नियोजन, सुनियोजित वापर आणि व्यवस्थापन याबाबतच्या जलसाक्षरतेसाठी जनसहभाग हाच सर्वाधिक महत्त्वपूर्ण घटक असणार आहे. त्या दृष्टीने जलसाक्षरता गावपातळीपर्यंत पोहचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन जलसंपदा विभागाचे उपसचिव स. को. सब्बीनवार यांनी जलजागृती सप्ताहाच्या नियोजनासाठी आयोजित कार्यशाळेत केले.
            यशदामध्ये आयोजित या कार्यशाळेत श्री. सब्बीनवार यांनी सादरीकरणासह मार्गदर्शन केले. यावेळी पुणे विभागाचे उपायुक्त (विकास) चंद्रकांत गुडेवार, तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता वि. गी. राजपूत, औरंगाबाद येथील जल व भूमि व्यवस्थापन संस्थेच्या सामाजिक शास्त्रे विद्याशाखेचे प्रमुख प्रा. डॉ. राजेश पुराणिक,  यशदाच्या जलसाक्षरता केंद्राचे (वाल्मी) संचालक आनंद पुसावळे, कार्यकारी संचालक डॉ. सुमंत पांडे आदी उपस्थित होते.
            जलसाक्षरतेसाठी इस्त्रायलचे उदाहरण आदर्श असल्याचे सांगून श्री. सब्बीनवार म्हणाले की, जलसाक्षरतेमुळेच तेथे 60 ते 70 टक्के पाण्यावर प्रकिया करुन पुनर्वापर केला जातो. जलसाक्षरतेसाठी त्या देशात मोठे अभियान राबविले जाते. आपल्या देशात पाणीसाठे निर्माण करण्याबरोबरच समांतर पद्धतीने पाण्याचा योग्य वापर कसा करावा यासाठी जनजागृतीची गरज आहे. जागतिक जलदिन 22 मार्च रोजी राबविला जातो. त्यादृष्टीने महाराष्ट्र शासनाने गतवर्षीपासून 16 ते 22 मार्च यादरम्यान जलजागृती सप्ताह राबविण्याचा निर्णय घेतला. यावर्षी यशदा येथे राज्य पातळीवरील तर चंद्रपूर येथील वन अकादमी (वनामती), औरंगाबाद येथील वाल्मी आणि अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ विकास प्रशासकीय प्रशिक्षण प्रबोधिनी येथे विभागीय पातळीवरील जलसाक्षरता केंद्रे स्थापन करण्यात आली. या माध्यमातून त्या- त्या विभागात जलसाक्षरतेचे कार्यक्रमाची रुपरेषा, प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत.
            श्री. सब्बीनवार पुढे म्हणाले की, गतवर्षी पाण्याशी संबंधित कृषी, पाणीपुरवठा, उद्योग, पर्यावरण, ग्रामविकास, नगरविकास अशा विभागांना लजागृती सप्ताहाच्या निमित्ताने जोडले गेले. जलसंपदा व कृषी विभागाच्या माध्यमातून किमान 10 टक्के सिंचनक्षमता वाढविणे, पाणीपुरवठा क्षेत्रामध्ये जलसाक्षरतेच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्यात किमान 10 टक्के बचतीचे उद्दिष्ट साध्य करणे या बाबींना प्राधान्य देण्यात येत आहे. सिंचनक्षमता वाढविण्यासाठी पंतप्रधान सिंचन कार्यक्रमात किमान 30 टक्के क्षेत्रावर ठिबक सिंचन करण्यात येणार आहे. यापुढील काळात सिंचनाचे पाणी कालव्याद्वारे न देता बंद पाईपलाईनने देण्याबाबत नियोजन करण्यात येणार आहे.
            जलसाक्षरतेसाठी सर्व जनतेचा सहभाग घेण्यासाठी गावपातळीवर दोनशे व्यक्तींमागे एका जलसेवक निवडण्यात येणार असून जलसाक्षरतेसाठी लोकांना उद्युक्त करण्याचे काम तो करणार आहे. जलजागृती सप्ताहाचे आयोजनासाठी जिल्हा पातळीवर जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता नोडल अधिकारी म्हणून काम करणार असून सप्ताहाचे सर्व नियोजन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक धरणे असताना जलजागृतीच्या माध्यमातून पाण्याचा योग्य वापराचे महत्व लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम आपणाला करावयाचे आहे. यापुढील काळात सिंचनाच्या पाणीपट्टीची रक्कम शासनाला जमा न करता त्या रक्कमेतून त्याच धरण प्रकल्पाची दुरुस्ती व व्यवस्थापन केले जाणार आहे.
            जलजागृती सप्ताहाचे उद्घाटन 16 मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करावयाचे असून यावेळी जलदिंडी काढून जिल्ह्यातील नद्यांचे पाणी जलकुंभात भरुन त्याचे पूजन करण्यात येणार आहे. 19 मार्च रोजी जलदौड (वॉटर रन) आयोजित करण्यात येणार आहे, याबरोबरच विविध विभागांचा सहभाग घेत कार्यक्रम राबविण्यात येणार असून 22 मार्चला जलदिनी या सप्ताहाचा समारोप करण्यात येणार आहे, असेही श्री. सब्बीरवार यांनी यावेळी सांगितले.
            डॉ. राजेश पुराणिक यांनी संगणकीय सादरीकरण करुन माहिती दिली की, जलजागृती सप्ताहानिमित्त्‍ गतवर्षी घेण्यात आलेल्या कार्यक्रमांची फलनिष्पत्ती वाल्मीकडून एका अभियानातून तपासण्यात आली. त्यात चांगले परिणाम आढळून आले. वाल्मीकडून माहिती, शिक्षण, संवाद (आयईसी) साहित्य तयार करण्यात आले. त्यामध्ये चित्रफीती, ध्वनीफीती विविध माध्यमातून प्रसारित करण्यात आल्या. यावर्षी तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी जलसंपदा विभागाबरोबच इतर विभागांचे मोठा सहभाग घेण्याची आवश्यकता असून अधिकाऱ्यांनी त्यासाठी प्रयत्न करावेत.
            ते पुढे म्हणाले की, जलसाक्षरता केवळ एका सप्ताहापुरती मर्यादित न ठेवता वर्षभर राबविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने विभागीय जलसाक्षरता केंद्राकडून प्रयत्न होणार आहेत. केवळ शासनाचे अधिकारी नव्हे तर सर्व जनता यामध्ये सहभागी होतील यादृष्टीने प्रयत्न करायचे आहेत. जलसाक्षरतेसाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्थांना गुण पद्धतीने सन्माणित करण्यात येणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. वाल्मीने केलेल्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांनी पाणीवापर संस्था स्थापन केल्या असून त्या माध्यमातून पाणी मोजून घेण्या- देण्यासाठी मोजमाप यंत्रे बसविण्यास सुरुवात केली आहे. असेच प्रयत्न सर्वत्र व्हावेत.
            मुख्य अभियंता श्री. राजपूत म्हणाले की, आपण पाणीसाठे मोठ्या प्रमाणात निर्माण केले. मात्र, पाणीवापराची परिणामकता योग्य प्रमाणाता साधली गेली नाही. शेतीतील भाग हा समाजशास्त्राशी निगडीत असल्याने जलसंपदा विभागाचे अभियंते यात काही प्रमाणात कमी पडले. हे पाहता केवळ शेतकऱ्यांमध्ये जलसाक्षरता आणून चालणार नाही तर अभियंत्यांमध्येही जलसाक्षरता आणणे गरजेचे आहे. जलसाक्षरतेचा कार्यक्रम वर्षभर सुरु राहील यादृष्टीने प्रयत्न केल्रे जातील. शालेय विद्यार्थ्यांचा अधिकाधिक सहभाग वाढविण्यासाठी ऑक्टोबर- नोव्हेंबरपासूनच विविध उपक्रमात त्यांचा सहभाग घेतला जाईल. शालेय वयातच विद्याथ्यांवर पाणीबचतीचे संस्कार केल्यास ते आयुष्यभर पाणी जपून वापरतील, असेही श्री. राजपूत म्हणाले.
            कार्यशाळेत गटचर्चा आयोजित करुन यावर्षीच्या जलसप्ताहाच्या नियोजनासाठी विविध सूचना अधिकाऱ्यांनी सादर केल्या. त्या शेवटी श्री. सब्बीनवार यांच्याकडे लिखीत स्वरुपात देण्यात आल्या.
            प्रास्ताविकात आनंद पुसावळे यांनी कार्यशाळेच्या आयोजनामागची भूमिका विषद केली. स्वागत आणि सूत्रसंचालन डॉ. सुमंत पांडे यांनी केले. यावेळी अभियंता आणि कवि प्रशांत आडे यांनी ‘जलसाक्षर भारत होवो’ ही उत्कृष्ट कविता सादर केली.
            कार्यशाळेस राज्यभरातून जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, गटविकास अधिकारी यांच्यासह इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
0000



Wednesday, March 8, 2017

एतदर्थ मंडळामार्फत मराठी लघुलेखन व टंकलेखन परीक्षेचे वेळापत्रक जाहीर


मुंबई, दि. 08 : महाराष्ट्र शासनाच्या एतदर्थ मंडळामार्फत शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एप्रिल व मे, 2017 मध्ये घेण्यात येणाऱ्या मराठी लघुलेखन व टंकलेखन परीक्षेबाबतचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
मराठी लघुलेखन (80 शब्द प्रतिमिनिट गती) परीक्षाही इंग्रजी लघुलेखक (निवडश्रेणी, उच्चश्रेणी, निम्नश्रेणी) व इंग्रजी लघु-टंकलेखक यांच्यासाठी दि. 25 एप्रिल रोजी मुंबई, पुणे, नागपूर व औरंगाबाद या चार विभागीय ठिकाणी घेण्यात येईल.
मराठी टंकलेखन परीक्षा दि. 04 मे, 2017 रोजी (30 शब्द प्रति मिनिट गती) इंग्रजी टंकलेखनाचे काम करणारे टंकलेखक व लिपिक-टंकलेखक-तसेच इंग्रजी लघुलेखक, इंग्रजी लघुटंकलेखक यांच्यासाठी गुरुवार दि. 04 मे, 2017 रोजी मुंबई, पुणे, नागपूर, व औरंगाबाद या ठिकाणी घेण्यात येईल. मराठी टंकलेखन परीक्षा संगणकावर घेण्यात येणार असून ती 30 श.प्र.मि.गतीची असेल. यासाठी आय.एस.एम. (ISM V६) सॉफ्टवेअरमध्ये DOVT-Surekh MR हा फाँट टंकलेखनासाठी वापरण्यात येईल. संगणकाची व्यवस्था परीक्षा केंद्रावर मंडळामार्फत करण्यात येणार आहे.
या परीक्षांना बसू इच्छिणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्यांची विहित नमुन्यातील आवेदनपत्रे त्यांच्या कार्यालय प्रमुखांमार्फत त्या त्या विभागातील भाषा संचालनालयाच्या अंतर्गत असलेल्या (नवी मुंबई, पुणे, नागपूर व औरंगाबाद) विभागीय कार्यालयांकडे मराठी लघुलेखन व टंकलेखन परीक्षेची आवेदनपत्रे दि. 31 मार्च, 2017 पर्यंत पोहचतील असे पाठवणे आवश्यक आहे. परीक्षेची आवेदनपत्रे विहित मुदतीत न पाठविल्यास परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही.
विभागीय कार्यालयांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.
मुंबई व कोकण विभाग : विभागीय सहाय्यक भाषा संचालक, भाषा संचालनालय, विभागीय कार्यालय, कोकण विभाग, कोकण भवन, 3 रा मजला, नवी मुंबई-400 614, दुरध्वनी क्र.022-27573542
पुणे व नाशिक विभाग : विभागीय सहाय्यक भाषा संचालक, भाषा संचालनालय, विभागीय कार्यालय, नवीन मध्यवर्ती इमारत, 2 रा मजला, पुणे-411 001, दुरध्वनी क्र.020-26121709
नागपूर व अमरावती विभाग : विभागीय सहाय्यक भाषा संचालक, भाषा संचालनालय, विभागीय कार्यालय, प्रशासकीय इमारत, 2 रा मजला, सिव्हिल लाईन्स, नागपूर-440001, दुरध्वनी क्र.0712-2564956
औरंगाबाद विभाग : विभागीय सहाय्यक भाषा संचालक, भाषा संचालनालय, विभागीय कार्यालय, औरंगाबाद विभाग, जुने जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर, औरंगाबाद-431001, दुरध्वनी क्र.0240-2361372.
 मराठी टंकलेखन परीक्षेसाठी व मराठी लघुटंकलेखन परीक्षेसाठी वेगवेगळी आवेदनपत्रे कार्यालय प्रमुखांमार्फत पाठवावीत. सदर आवेदनपत्रात उमेदवाराचे पूर्ण नाव, कार्यालयाचा पत्रव्यवहाराचा पूर्ण पत्ता पिन कोड क्रमांकासह नमूद करणे आवश्यक आहे, असे भाषा संचालक व अध्यक्ष, एतदर्थ मंडळ, मराठी टंकलेखन व लघुलेखन परीक्षा मंडळ यांनी कळविले आहे.
००००

जागतिक महिला दिनानिमित्त स्तन कर्करोग पूर्व तपासणी शिबीरास राज्यात सुरुवात


राज्यात 17 मार्चपर्यंत विनामूल्य तपासणी

मुंबई, दि. 8 : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत महिलांसाठी विनामूल्य स्तन कर्करोग पूर्वतपासणी शिबीरासआजपासून सुरुवात झाली आहे. राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांत 17 मार्चपर्यंत ही तपासणी सुरु राहणार आहे.
या शिबीरात आधुनिक उपकरणाद्वारे विनामूल्य तपासणी तसेच स्तनाच्या कर्करोगाबाबत मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात येणार आहे. अमेरिकन तंत्रज्ञानाच्या रेडिएशन फ्री अद्ययावत उपकरणाचा यासाठी उपयोग केला जाणार आहे.
 वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून ऑक्टोबर 2016 हा महिना स्तन कर्करोग जागृती महिना म्हणून हाती घेण्यात आला होता. त्यानुसार विभागाच्या सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना आधुनिक अमेरिकन तंत्रज्ञानयुक्त तपासणी यंत्र उपलब्ध करुन देण्यात आले आहे. त्याद्वारे आजपर्यंत 12 हजार 689 महिलांची तपासणी करण्यात आली असूनयंदा 2 लाख 50 हजार तपासणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक जिल्ह्यासाठी जिल्हा नियोजन निधीतून चार कर्करोग तपासणी यंत्रे देण्यात आली आहेत.
            महिलांनी या शिबीराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.
****



‘लोकराज्य’चा महिलाशक्ती विशेषांक प्रकाशित


लोकराज्यतील यशकथा महिलांसाठी पथदर्शी
-         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबईदि. 8 : लोकराज्य मार्च 2017 च्या महिला विशेषांकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज येथे झाले. लोकराज्य मासिकातील योजनाकायदेविषयक माहितीसोबतच अंकातील विविध क्षेत्रातील यशस्वी महिलांच्या यशकथा राज्यातील महिलांसाठी पथदर्शी ठरणा-या असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.
महिला दिनानिमित्त महिला व बालविकास विभागातर्फे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महिला व बालविकास तथा ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेमहिला व बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर,ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसेखासदार अरविंद सावंतआमदार राज पुरोहितमहिला व बालविकास विभागाच्या सचिव विनिता सिंघलग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्तामहिला व बालविकास आयुक्त लहुराज माळी, 'माविम'च्या व्यवस्थापकीय संचालिका इंद्रा मालो आदी मान्यवर उपस्थित होते.
मराठीइंग्रजी व उर्दू भाषेत प्रकाशित झालेल्या या महिला विशेषांकात विविध क्षेत्रातील यशस्वी महिलांच्या यशकथा,महिलांसाठीच्या विविध योजनाकौशल्य विकासस्पर्धा परीक्षामहिलाविषयक कायदे यावरील लेखांचा समावेश करण्यात आला आहे. 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. आज घडीला महिला सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. या अंकात समाविष्ट करण्यात आलेल्या यशकथांच्या माध्यमातून महिलांचा सन्मान करण्याचा छोटासा प्रयत्न लोकराज्यने केला आहे. त्यासोबतच अंकात समाविष्ट करण्यात आलेली विविध योजनांची माहिती महिलांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहे.
महालक्ष्मी सरस या प्रदर्शनात सहभागी झालेल्या बचतगटांच्या यशकथांचा अंकात समावेश आहे. या यशकथा महिलांना आर्थिक उन्नतीसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या आहेत. महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे तसेच राज्यमंत्री विद्या ठाकूर यांची अंकातील मुलाखत राज्यातील महिला सक्षमीकरणाची दिशा अधोरेखीत करणारी आहे. महिलांसाठीचे सुरक्षा ॲपसायबर सुरक्षेविषयी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या महत्त्वपूर्ण कायद्यांविषयी माहिती या अंकात देण्यात आली आहे. महिलांसाठीच्या विविध योजनाधोरण आणि संधींचा माहितीपूर्ण खजिना असलेला हा अंक स्टॉलवर सर्वत्र उपलब्ध आहे.

०००००