Thursday, September 1, 2016

विस्तारीत समाधान योजनेच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा – तहसिलदार हनुमंत पाटील



बारामती (उ.मा.का) दि.01: शासनाच्या विविध कल्याणकारी योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी विस्तारीत समाधान योजना उपयुक्त उपक्रम आहे. या माध्यमातून सर्वसामान्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन तहसिलदार हनुमंत पाटील यांनी आज केले.   
शिर्सुफळ येथील श्री. शिरसाई विद्यालयाच्या प्रांगणात महाराजस्व अभियानांतर्गत विस्तारीत समाधान योजनेच्या ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात श्री. पाटील बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्या लताताई भोसले, संजय गांधी निराधार योजना समितीचे तालुकाध्यक्ष राहूल तावरे, शिर्सुफळच्या सरपंच जवाहर सोनवणे, उपसरपंच अनिता हिवरकर, गटविकास अधिकारी प्रमोद काळे, तालुका कृषी अधिकारी संतोषकुमार बरकडे, उप अधिक्षक भूमीअभिलेख अमरसिंह पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
हनुमंत पाटील म्हणाले, शासनाच्या विविध विभागाच्या माध्यमातून लोककल्याणकारी योजना राबविल्या जातात. या योजनांचा तळागाळातील लोकांना लाभ होण्यासाठी महाराजस्व अभियान हा उपक्रम अत्यंत उपयुक्त आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून जनतेच्या शेवटच्या घटकापर्यंत योजनेचा लाभ पोहोचविता येतो. या उपक्रमाचा लाभ सामान्यांनी मोठ्या प्रमाणात घ्यावा. गावातील तरुणांनी एकत्र येवून गावातील समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
राहूल तावरे म्हणाले, महाराजस्व अभियान हा शासनाचा महत्वकांक्षी उपक्रम आहे. शासन आणि जनता यांच्यामधील दरी कमी करण्याचे काम या उपक्रमामुळे सहज शक्य होते. मात्र जनतेनेही प्रशासनाला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी समाजप्रबोधन होणे आवश्यक आहे.  
लताताई भोसले म्हणाल्या, शासनाच्या विविध योजनांचा लाभ महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून सर्वांनी घ्यावा. हा उपक्रम स्तुत्य असून एकाच छताखाली शासनाच्या सर्व योजनांचा लाभ सर्वांना घेता येतो. यामुळे सामान्य लोकांचा वेळ व पैसा या दोन्हीत बचत होत आहे.  
यावेळी आप्पासाहेब आटोळे यांनी भाषण केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शासनाच्या विविध विभागातील योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे, कागदपत्रे, अनुदान, साहित्याचे वाटप करण्यात आले. शिर्सुफळ गावातील स्पर्धा परिक्षेत यशस्वी झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. आभार विश्वास आटोळे यांनी मानले. कार्यक्रमाला शिर्सुफळ गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  
**********

No comments:

Post a Comment