सोलापूर दि. 04: अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतून सुशीलकुमार शिंदे यांची संघर्षमय आणि खडतर वाटचाल ही तरुणांना प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज येथे काढले.
देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्ताने राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते त्यांचा सपत्नीक विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रपती श्री. मुखर्जी बोलत होते. याप्रसंगी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार शरद पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार अशोक चव्हाण, खासदार पी. चिदंबरम, खासदार कुमारी शैलजा, खासदार ज्योतिरादित्य शिंदे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर, त्रिपुराचे माजी राज्यपाल डॉ.डी.वाय पाटील आदी उपस्थित होते.
राष्ट्रपती श्री. मुखर्जी पुढे म्हणाले, सोलापूर सारख्या ठिकाणी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतून सुशीलकुमार शिंदे यांनी आपला संघर्षमय प्रवास सुरु केला. देशाचे ऊर्जा मंत्री, गृहमंत्री तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, राज्यपाल अशा विविध पदांवर त्यांनी काम केले. आपल्या राजकीय कारकीर्दीत सामाजिक विकासाचा दृष्टीकोन ठेऊन आणि सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेऊन त्यांनी या पदांना योग्य न्याय दिला. नव्या पिढीला खास करुन तरुण, विद्यार्थी यांना सुशीलकुमार शिंदे यांचा संघर्षमय प्रवास हा निश्चितच प्रेरणा देणारा आहे. त्यांच्या या यशामध्ये निश्चितच त्यांच्या पत्नी श्रीमती उज्वला शिंदे यांचा खूप मोलाचा वाटा आहे. शताब्दी महोत्सव साजरा व्हावा, अशा शब्दात त्यांनी शुभेच्छा दिल्या.
राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनीही यावेळी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले महाराष्ट्राने देशाला अनेक नेतृत्व दिले त्यामध्ये प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत स्वत:चे स्थान निर्माण करणारे शांत, संयमी, व सामाजिक बांधिलकी असणारे प्रगल्भ नेतृत्व म्हणून श्री. शिंदे यांचा उल्लेख करावा लागेल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचे लोकोपयोगी काम निश्चितच लक्षात राहणारे आहे. त्यांचा जन्मशताब्दी महोत्सव व्हावा आणि अशा आदरयुक्त, प्रेरणादायी नेतृत्वाच्या महोत्सवाला उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभावे अशी सदिच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
अत्यंत सामान्य कुटुंबात जन्म घेतल्यानंतर आपल्या कर्तुत्वाने एक व्यक्ती असामान्य कार्य करु शकते हे सुशीलकुमार शिंदे यांनी दाखवून दिले आहे. असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, श्री. शिंदे यांचा प्रवास थक्क करणारा तसेच प्रेरणा देणारा आहे. विषम परिस्थितीवर मात करीत त्यांनी दिलेला लढा त्यातून घडविलेले स्वत:चे व्यक्तिमत्व खास करुन तरुणांना प्रेरणा देणारे आहे. श्री. शिंदे यांच्यासारखी व्यक्ती पदांनी मोठी होत गेली, त्यापेक्षा माणूस म्हणून मनाने मोठी झाली. प्रसन्न व्यक्तीमत्व, कामाची सकारात्मकता यामुळे त्यांनी आपल्या पदांना न्याय दिला. शिंदे साहेबांना दीर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा त्यांनी शेवटी दिल्या.
खासदार शरद पवार यावेळी म्हणाले, सुशीलकुमार शिंदे हे स्वकर्तृत्व व स्वकष्टाने उभे राहिलेले नेतृत्व. त्यांचे नेतृत्व म्हणजे देशातील नव्या पिढीसमोर एक आदर्श आहे, अशा शब्दात त्यांचा गौरव केला.
सत्काराला उत्तर देताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, गरीबी, दारिद्रय यांचे घरी वास्तव्य होते. त्यामुळे पडेल ते काम केले. इच्छा असेल तर मार्ग जरुर दिसतो त्यामुळे तरुणांनी कष्ट करण्याची तयारी ठेवावी. आपल्या राजकीय जीवनात पत्नी उज्वला शिंदे यांची साथ असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख करुन सोलापूरच्या जनतेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
या कार्यक्रमासाठी सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, महापौर प्रा.सुशिला आबुटे, खासदार विजयसिंह मोहिते पाटील, खासदार शरद बनसोडे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व नारायण राणे, शिंदे यांचे संपूर्ण कुटुंबियांसह अनेक माजी मंत्री, आजी-माजी आमदार, नगरसेवक आणि नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक त्रिपुराचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय पाटील तर सूत्रसंचालन प्रदीप भिडे यांनी केले.



No comments:
Post a Comment