Thursday, September 1, 2016

‘अवयव दान अभियान’ व्यापक चळवळ बनावी - पालकमंत्री विजय देशमुख




सोलापूर दि. 1 : ‘अवयव दान अभियान’ एक व्यापक चळवळ बनावी यासाठी याचा प्रचार आणि प्रसार होणे आवश्यक आहे. हे अभियान सर्वसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आरोग्य विभागाबरोबरच समाजातील सर्वच घटकांनी पुढे येणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री विजय देशमुख यांनी केले.
                 दिनांक 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2016 या कालावधीत राबविण्यात आलेल्या या अभियानाचा सांगता समारोप येथील डॉ. वैंशपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री श्री. देशमुख बोलत होते. कार्यक्रमास आमदार प्रणिती शिंदे, पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मल्लिकार्जुन पट्टणशेट्टी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव, अश्विनी ग्रामीण रुग्णालयाच्या अधिष्ठाता श्रीमती डॉ. माधवी रायते, महाविद्यालयाचे व रुग्णालयाचे डॉक्टर्स, परिचारिका, विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.
                पालकमंत्री श्री. देशमुख म्हणाले, मृत्यूपश्चात एक देह सात जणांच्या आयुष्यात एक आशेचा किरण निर्माण करु शकतो. मृत्यूनंतर सारे नष्ट होते, मात्र अवयव रुपी जिवंत रहायचे असेल तर  अवयव दान  करणे गरजचे आहे. ‘मरावे परी अवयव रुपी ऊरावे’ असे म्हणणे आता वावगे ठरणार नाही असे ते यावेळी बोलताना म्हणाले. रक्तदानामध्ये सोलापूर जिल्हा राज्यात अग्रेसर आहे त्याच प्रमाणे अवयव दानातही जिल्हा अग्रेसर व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करुन अवयव दान अभियानाच्या प्रचार व प्रसिध्दीसाठी आरोग्य विभागाने रॅलीचे आयोजन करुन  अभियाची व्यापक माहिती सामान्यापर्यंत पोहोचविण्याचे केलेले प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गारही  पालकमंत्र्यांनी काढले .
                अवयव दान करणे काळाची गरज असून केंद्र व राज्य शासनामार्फत अवयव दान अभियान राबविण्यात येत असल्याबद्दल आमदार प्रणिती शिंदे यांनी शासनाचे अभिनंदन करुन या अभियानात सर्वांनी सहभागी होऊन अवयव दान करावे असे आवाहन  त्यांनी केले.   यावेळी पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर, अश्विनी ग्रामीण रुग्णालयाच्या अधिष्ठाता श्रीमती डॉ. रायते यांनीही आपले समायोचित विचार व्यक्त्‍ केले. प्रारंभी प्रास्ताविक डॉ.राजाराम पोवार यांनी केले .यावेळी व्ही.एम. मेडिकल महाविद्यालयाचे प्रशिक्षार्थी डॉक्टर नर्सेस मोठया संख्येने उपस्थित होते .          
0000


No comments:

Post a Comment