Pages

Friday, September 29, 2017

मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण मोहिमेचा लाभ घ्यावा -मोनिका सिंह


        पुणे, दि. 29 : निवडणूक आयोगातर्फे 1 जानेवारी 2017 या अर्हता दिनांकावर आधारित  मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण  कार्यक्रम 3 ऑक्टोबर 2017 ते 3 नोव्हेंबर 2017 या कालावधीत  राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उप जिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांनी केले.
        छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमा निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या सभे दरम्यान त्या बोलत होत्या. मोनिका सिंह म्हणाल्या, दिनांक 3 ऑक्टोबर 2017 (मंगळवार) रोजी प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी करण्यात येईल.  3 ऑक्टोबर 2017 (मंगळवार)  ते 3 नोव्हेंबर 2017 (शुक्रवार) या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. 7 ऑक्टोबर 2017 (शनिवार) व  13  ऑक्टोबर 2017 (शुक्रवार) या कालावधीत मतदार यादीमधील संबंधित भागाचे (सेक्शनचे) ग्रामसभा तसेच स्थानिक संस्था येथे वाचन व आरडब्ल्यूए सोबत बैठक इत्यादी नावांची खातरजमा करण्यात येईल. 8 ऑक्टोबर 2017 (रविवार) व 22 ऑक्टोबर (रविवार) विशेष मोहिमेचे 5 डिसेंबर 2017 (मंगळवार) पर्यंत दावे व हरकती निकालात काढणे. 20 डिसेंबर 2017 (बुधवार) पर्यंत डाटाबेसचे अद्ययावतीकरण तर 5 जानेवारी 2018 (शुक्रवार) रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे.
            या मोहिमेदरम्यान मतदारांना मतदार यादीत नाव आहे का याची खात्री करता येणार आहे. 1 जानेवारी 2018 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्यांना, तसेच ज्यांची नावे मतदार यादीत नाहीत त्यांना नाव नोंदविण्याची संधी या मोहिमेद्वारे मिळणार आहे. तसेच पत्त्यातील दुरुस्ती, दुबार, मृत किंवा स्थलांतरित मतदारांची नावे या मोहिमेत वगळता येणार आहे. महाविद्यालयातील ज्या विद्यार्थ्यांचे वय 18 वर्षे पूर्ण असेल, अशा विद्यार्थ्यांना अर्ज नमुना 6 त्यांच्या महाविद्यालयात भरुन सादर करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे, असेही श्रीमती सिंह यांनी सांगितले.
             मतदार नोंदणीसाठी सर्व मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, महानगरपालिका क्षेत्रातील सर्व क्षेत्रिय कार्यालये, सर्व गटविकास अधिकारी, सर्व नगरपालिका कार्यालये तसेच जिल्हाधिकारी कार्यालय (निवडणूक शाखा), पुणे येथे संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
00000000


No comments:

Post a Comment