Pages

Tuesday, October 3, 2017

स्वच्छ भारत अभियानातून क्रांती घडेल --- पालकमंत्री गिरीश बापट




पुणे, दि. 29:  संपूर्ण देशभरात राबविण्यात येते असलेल्या स्वच्छ भारत अभियानातून  स्वच्छतेची क्रांती घडल्या शिवाय राहणार नाही. असा विश्वास जिल्हाचे पालकमंत्री गिरीश बापट  यांनी केला.
महात्मा गांधी जयंती निमित्त  चतु :श्रृंगी मंदिराच्या परिसरात आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता अभियाना प्रसंगी पालकमंत्री बोलत होते. भारतीय इतिहासात महात्मा गांधी यांचे मोठे स्थान आहे. गांधीजींनी अंहिसेच्या मार्गाने आंदोलन करुन जगभरात नाव मिळविले. त्यामुळे त्यांना आदरांजली वाहतांना सुमनांने नव्हे तर श्रमदान करुन  श्रध्दांजली वाहणे हे संयुक्तीक ठरेल असे, सांगून ते पुढे म्हणाले, स्वच्छतेची सुरुवात स्वत: पासून करुन ती सवय म्हणून रुजायला पाहिजे. सर्वांनी संकल्प करायला हवा की, आपला देश स्वच्छ करणे ही आपली जबाबदारी आहे. सरकार तसेच महापालिका स्वच्छतेच्याबाबतीत गंभीर आहे. प्रत्येकाने स्वच्छतेचे महत्व जाणणे गरजेचे आहे. स्वच्छता हा एक संस्कार आहे.
यावेळी पालक मंत्र्यांनी विद्यार्थ्यांसमवेत मंदिराच्या परिसराची साफ सफाई केली. खुद्द मंत्री महोदय हातात झाडू घेवून मंत्री पदाचा कोणताही अभिनिवेश न बाळगता आपल्या बरोबरीने श्रमदान करत असल्याचे पाहून विद्यार्थ्यांचाही उत्साह वाढला होता. पालकमंत्र्या समवेत 'मी अस्वच्छता करणार नाही – आणि करु देणार नाही 'अशा घोषणा विद्यार्थ्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी   चतु :श्रृंगी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. गंगाधर अनगळ, भारतीय जैन संघटनेचे शांतीलाल मुथा,सरला मुथा,प्रफुल्ल पारेख आणि शिक्षक तसेच विद्यार्थी मोठया संख्यने उपस्थित होते.
000000


No comments:

Post a Comment