पुणे दि. 1: वाचनाने माणूस समृध्द होतो, त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच आवांतर वाचनावर भर देणे आवश्यक आहे. ‘लोकराज्य’ मासिक स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त असून लोकराज्य मेळाव्याच्या माध्यमातून वाचन संस्कृतीला निश्चित बळकटी मिळेल असा विश्वास प्राचार्य डॉ. एस. आर. पाटील यांनी आज व्यक्त केला.
एरंडवणा येथील भारती विद्यापीठाच्या यशवंतराव मोहिते कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या सभागृहात विभागीय माहिती कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकराज्य वाचक मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. एस. आर. पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसंचालक (माहिती) मोहन राठोड होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, महाविद्यालयाचे उप-प्राचार्य डॉ. इ.डी. पाटील, मराठी विभाग प्रमुख डॉ. एस. एस. पाटील उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. एस. आर. पाटील म्हणाले, लोकराज्य हे महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असून ते महाराष्ट्राचे प्रतिबिंब आहे. लोकराज्य वाचक मेळाव्याच्या माध्यमातून वाचनसंस्कृती वाढीसाठी मदत होणार आहे. शासनाच्या विविध योजनांची माहिती लोकराज्यच्या माध्यमातून समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचण्यास मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले.
मोहन राठोड म्हणाले, खुल्या अर्थव्यवस्थेमुळे माध्यमांचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. माध्यमांच्या या बदलात वाचन संस्कृती कमी होत आहे. याला चालना देण्यासाठी लोकराज्य वाचक मेळावा उपयुक्त ठरणार आहे. स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी लोकराज्य उपयुक्त आहे. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी लोकराज्य मराठी भाषेबरोबरच इंग्रजी, हिंदी, गुजराती आणि ऊर्दू भाषेतही प्रकाशित करण्यात येते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी लोकराज्यचे महत्व सांगितले. यावेळी डॉ. इ. डी. पाटील, डॉ. एस. एस. पाटील यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक संचालक वृषाली पाटील यांनी केले. तर आभार माहिती सहायक जयंत कर्पे यांनी मानले. या कार्यक्रमाला विभागीय माहिती कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*****
No comments:
Post a Comment