Saturday, September 29, 2018

आदर्श निवडणुकांसाठी राजकीय पक्षांचे सहकार्य आवश्यक -राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया



लोकशाही, निवडणूक व सुशासन कार्यशाळा : दुसऱ्या सत्रात तज्ज्ञांचे मार्गदर्शन

पुणे दि. 29 : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निर्भयपणे तसेच पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोग प्रयत्न करत आहे. मात्र, आदर्श निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांचे सहकार्य आवश्यक आहे, असे मत राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी आज व्यक्त केले.

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘लोकशाही, निवडणूक व सुशासन’ या कार्यशाळेतील दुसऱ्या सत्रात ‘राजकीय पक्षांद्वारे सशक्त लोकशाही’ या विषयावरील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानंतर राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया बोलत होते.

यावेळी सांगलीच्या महापौर संगीता खोत, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. भास्करराव आव्हाड, उपायुक्त (सामान्य प्रशासन) संजयसिंह चव्हाण उपस्थित होते.

श्री. सहारिया म्हणाले, राज्य निवडणूक आयोग निवडणुकांदरम्यान पारदर्शकता राखण्यासाठी आचारसंहिता लागू करत असतो. त्याचे पालन सर्वांनी करणे आवश्यक आहे. राजकीय पक्षांनी लोकशाहीमध्ये आपली काय भूमिका आहे, हे समजून घ्यावे. पैशाचा दुरूपयोग, मतदारांना आमिष दाखवण्याचे प्रकार रोखण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे.

या सत्रामध्ये राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त राजाराम झेंडे, पुणे पुनर्वसन विभागाचे उपायुक्त दीपक नलावडे, सांगलीचे अपर जिल्हाधिकारी आण्णासाहेब चव्हाण, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित रेळेकर आणि ज्येष्ठ विधीज्ञ भास्करराव आव्हाड यांनी सर्वांना मार्गदर्शन केले.

कार्यशाळेस पुणे विभागातील प्रमुख अधिकारी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, विद्यार्थी तसेच सामान्य नागरिक उपस्थित होते.

***** 






No comments:

Post a Comment