Friday, January 4, 2019


खेलो इंडीयाच्या यशस्वीतेसाठी
दिलेल्या जबाबदाऱ्या समन्वयाने पार पाडाव्यात
-    आनंद लिमये
पुणे दि. 04: खेलो इंडीया हा राष्ट्रीय कार्यक्रम असून या स्पर्धेच्या आयोजनाचा मान महाराष्ट्राला मिळाला आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्व विभगांनी दिलेल्या जबाबदाऱ्या समन्वयानी पार पाडण्याच्या सूचना विभागीय आयुक्त तथा यशदाचे महासंचालक आनंद लिमये यानी आज केल्या.  
महाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या सभागृहात खेलो इंडीया स्पर्धेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त तथा यशदाचे महासंचालक आनंद लिमये यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला क्रीडा आयुक्त सुनील केंद्रेकर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हार्डीकर,  संयोजन समितीचे अध्यक्ष तथा उपसचिव (क्रीडा) राजेंद्र पवार, क्रीडा व युवक मंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी श्रीकांत ढेकणे, संयोजन समितीचे सचिव तथा सहसंचालक (क्रीडा) एन. एम. सोपल, निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे उपस्थित होत्या.
श्री आनंद लिमये म्हणाले, खेलो इंडीया या स्पर्धेचे देशपातळीवर आयोजन करण्यात येते, यावर्षी या स्पर्धेच्या आयोजनाचा मान महाराष्ट्राला मिळाला आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे सर्वांनी समन्वयाने काम करावे. पुणे महानगरपालिकेने स्पर्धेच्या प्रसिध्दीसाठी त्यांच्या हद्दीत खेलो इंडीयाचे होर्डींग लावून सेल्फी पाँईट उभारावेत. तसेच स्पर्धेच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात कचरा निर्मिती होणार आहे, या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी पुणे व पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेची आहे. स्पर्धेच्या कालावधीत पुणे महानगरपालिकेने पुरेशा प्रमाणात फिरती शौचालये क्रीडा संकुलाच्या आवारात उभारण्याच्या सूचना श्री लिमये यांनी दिल्या.   
श्री सुनील केंद्रेकर यांनी खेलो इंडीया स्पर्धेच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीचा व नियोजित कामांचा आढावा यावेळी सादर केला. या बैठकीला राज्य शासनातील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
0000



No comments:

Post a Comment