Saturday, September 3, 2016

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा शताब्दी वर्षारंभ सोहळा विकास सोसायटया ग्रामीण विकासाचा केंद्रबींदू ... सहकार मंत्री सुभाष देशमुख



            पुणे, दि. 02 – विविध विकास कार्यकारी सोसायटया ग्रामीण विकासाचा केंद्रबींदू आहेत. या सोसायटयांच्या गट सचिवांच्या अडचणी दूर करण्यासाठी शासन सकारात्मक विचार करीत आहे असे प्रतिपादन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे केले.
                पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा शताब्दी वर्षारंभ सोहळा बालेवाडी क्रिडा संकुलात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सहकार मंत्री सुभाष देशमुख बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री गिरीश बापट, माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार, .दिलीप वळसे पाटील,.अजित पवार, खा.सुप्रिया सुळे, खासदार वंदना चव्हाण, महापौर प्रशांत जगताप, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर श्रीमती शकुंतला धराडे, प्रधान सचिव (सहकार) एस.एस.संधू, सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी, नाबार्डचे अध्यक्ष उमेशचंद्र सरंगी, नाबार्डचे सरव्यवस्थापक आर.एन.कुलकर्णी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेशअप्पा थोरात, उपाध्यक्षा श्रीमती अर्चना घारे उपस्थित होते.
                यावेळी सहकार मंत्री सुभाष देशमुख म्हणाले की, सर्व शेतकऱ्यांनी विविध विकास कार्यकारी सोसायटयांचे सभासद व्हावे. या सोसायटया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या रक्तवाहिन्या आहेत त्यामुळे त्यांचा विकास झाला पाहिजे. विकास सोसायटयांच्या गट सचिवांचे वेतन व इतर मागण्यांच्या संदर्भात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी शासन सकारात्मक आहे.
                जिल्हा सहकारी बँकेप्रमाणेच राष्ट्रीयकृत बँकानी शेतकऱ्यांना पिक कर्जाचे प्राधान्याने वाटप करावे अशी सूचना यावेळी सहकार मंत्र्यांनी केली. सहकारातील गैरप्रकाराला आळा बसल्यास जिल्हा सहकारी बँका फायद्यात येतील. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सभासदांचा विश्वास प्राप्त केला असून त्यामुळे सभासदांना ही बँक आपली वाटते. बॅकेच्या कामकाजामध्ये व्यावसायीकता आणल्यामुळे आणि आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे सहकार मंत्र्यांनी बँकेविषयी गौरवोद्गार काढले.
                यावेळी बोलताना पालकमंत्री गिरीश बापट यांनी, नैसर्गिक अडचणी व संकटांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा सहकारी बँकेने शेतकऱ्यांना पिक कर्ज उपलब्ध करुन दिल्याबद्दल प्रशंसा केली. आर्थिक शिस्त व कर्जाच्या वसूलीच्या जोरावर सर्वसामान्यांना बँक आपली वाटते असे सांगून सहकारातून स्वाहाकार ऐवजी सहकार्य मिळावे अशी अपेक्षा पालकमंत्र्यांनी  व्यक्त्केली.
                माजी केंद्रीय कृषीमंत्री खासदार शरद पवार यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकेने शिस्तीच्या चौकटीत काम केल्यामुळे बँकेची देशातील अग्रगण्य बँकामध्ये गणना केली जाते असे सांगितले. सामाजिक व आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्या नामवंत व्यक्तींसह राज्य व राष्ट्रीय पातळीवर कार्यरत  असणाऱ्या लोकप्रतिनिंधीचे बँकेला मार्गदर्शन लाभले आहे. महिला बचट गटाला भरीव मदत करण्याकडे संचालक मंडळाने लक्ष द्यावे असे सांगून, खा.शरद पवार यांनी शासनाने शेतमालाला रास्त भाव द्यावा व शेतकऱ्याला रास्त दरात कर्ज उपलब्ध करुन द्यावे असे सांगितले.
                .अजित पवार यावेळी म्हणाले की, स्पर्धेच्या युगात सहकारी बँका चालविणे अवघड आहे. सहकारी बँकाना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. तथापि, यावर मात करुन बँकेने शेतकऱ्यांना मोठया प्रमाणावर पिक कर्ज उपलब्ध करुन दिले आहे. सामाजिक बाधिलकी जपताना कर्जाची वसूली व व्यावसायीकतेचा अवलंब केल्यामुळे बँक नफयात आहे. राज्यातील इतर नफयात असलेल्या बँकांपेक्षा या बँकेचा नफा अधीक आहे. इतर बँकानी याचा आदर्श घ्यावा असे सांगून ते म्हणाले की, बँकेमध्ये भविष्यात करण्यात येणारी कर्मचारी भरती ऑनलाईन पध्दतीने करण्यात येईल. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिडा स्पर्धेत नैपुण्य मिळविणाऱ्या राज्यातील युवा खेळाडूंना बँकेतर्फे सर्व प्रकारची मदत देण्यात येईल अशी माहिती त्यांनी याप्रसंगी दिली.
                नाबार्डचे सरव्यवस्थापक आर.एन.कुलकर्णी यांनी, बँकेने सहकाराची तत्वे अंगिकारुन, ग्राहक सेवेला प्राथमिकता देऊन, तंत्रज्ञानाचा वापर करुन व्यावसायीकतेचा अवलंब केल्यामुळे बँकेने यशस्वी वाटचाल केली असल्याचे सांगितले.
                बँकेच्या शताब्दी वर्षात पदार्पणानिमित्त तयार करण्यात आलेल्या बोधचिन्हाने अनावरण पालकमंत्री गिरीश बापट यांच्याहस्ते तर बँकेची वाटचाल दाखविणाऱ्या फिल्मचे अनावरण सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केले. बँकेची वेबसाईट, मोबाईल बँकींग व इंटरनेट बँकींग सेवेचे उदघाटन खासदार शरद पवार यांच्याहस्ते करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलनाने करण्यात आली.
                या कार्यक्रमास बँकेचे सभासद, शेतकरी, विविध साखर कारखान्यांचे पदाधिकारी, सहकार क्षेत्रातील विविध संघटनांचे पदाधिकारी, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
000
                 





No comments:

Post a Comment