Saturday, September 3, 2016

समाजातील दातृत्वाचा गोरगरीबांच्या सेवेसाठी ससूनला सहयोग - डॉ. अजय चंदनवाले


 पुणे. दि. 3 (विमाका)समाजातील दातृत्वामुळे ससून रुग्णालयास अद्यावत यंत्रसामुग्री व सोयीसुविधा प्राप्त होत आहेत. आर्थिक विवंचनेमुळे वैद्यकीय सेवा मिळण्याचा गंभीर प्रश्न असलेल्या गोरगरीब रुग्णांच्या सेवेसाठी ससून रुग्णालयास त्याचा फायदा होतो, असे मत बै. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी व्यक्त केले.
येथील ब्रदरहूड फौंडेशनने ससून सर्वोपचार रुग्णालयास 25 लाख रुपये किमतींचे सीमेन्स कंपनीचे फोर-डी अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी यंत्र प्रदान केले. या कार्यक्रमात ते बोलत होते. ब्रदरहूड फौंडेशनचे अध्यक्ष अजय गोयल, सचिव पवन बन्सल, खजिनदार अरविंदकुमार जैन, सामाजिक उपक्रम प्रमुख मुकेश कनोडिया, संस्थापक अध्यक्ष जयप्रकाश गोयल, अग्रवाल समाजचे अध्यक्ष इश्वरचंद गोयल आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
दातृत्व हे वृत्तीतच असायला हवे असे सांगून डॉ. चंदनवाले म्हणले की, कोणाला अपघातामुळे नवीन जीवन मिळते; कोणाच्या जीवनात खूप दु:ख सोसायला लागते म्हणून परोपकार करण्याची त्या व्यक्तीची इच्छा होणे स्वाभाविक असू शकते. पण कोणतेही दु:ख न सोसलेल्या, अपघात न झालेल्या व्यक्तीला परोपकार करु वाटणे, अवयवदान करु वाटण्याची इच्छा होणे व तशी कृती करणे याला अधिकच महत्व आहे. समाजात असे लोक मोठ्या संख्येने आहेत म्हणूनच गोरगरिबांना अधिकाधिक चांगल्या सुविधा मिळत आहेत. त्या दृष्टीने ब्रदरहुड फौंडेशनने दाखविलेली दानवृत्ती प्रशंसनीय आहे.  या सोनोग्राफी मशीनमुळे गर्भाशयातील बालकांची तपासणी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने होणार आहे. त्यातून तयार होणाऱ्या प्रतिमा अतिशय सुस्पष्ट असल्याने लवकरच्या कालावधीतच गर्भातील दोष, व्यंग लक्षात येऊ शकतील. व्यंग असल्यास त्यावर वेळीच उपचार करणे शकणार आहेत.
डॉ. चंदनवाले पुढे म्हणाले की, ससून रुग्णालयाला गेल्या दोन वर्षात सोशल कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबीलीच्या माध्यमातून विविध संस्था, दगडूशेट हलवाई ट्रस्टसह इतर संस्थांच्या माध्यमातून सुमारे 20 कोटीहून अधिक रक्कम दान स्वरुपात मिळाली आहे. यातून रुग्णालयात अनेक सुधारणा घडवून आणल्या आहेत. डायलेलीसची सुविधा, सुसज्ज आय.सी.यु., व्हेंटीलेटर्स या महागड्या सुविधा मोफत उपलब्ध आहेत. डिसेंबरमध्ये नवजात बालकांसाठी सुसज्ज असे एनआयसीयु सुरु करण्यात येणार आहे. त्याचा फायदा समाजाच्या सर्वच स्तरातील लोकांना होणार आहे.
यावेळी इश्वरचंद गोयल, जयप्रकाश गोयल, अजय गोयल, मुकेश कनोडिया आदींनीही मनोगत व्यक्त केले. सोनोग्राफी यंत्रासाठी निधीत सहयोग दिलेल्यांचे सत्कारही करण्यात आले.
00000

No comments:

Post a Comment