सातारा, दि. 6 (जि.मा.का.): ग्रामीण
भागातील इंग्रजी माध्यमातील मुले ही जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेश घेत
आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील शाळेतील पट संख्या वाढत आहे, ही समाधानाची बाब
असून प्राथमिक शिक्षकांनी ग्रामीण भागातील विद्यार्थी संस्कारक्षम आणि आजच्या
स्पर्धेच्या युगात टिकणारी अशी पिढी घडवावी, असे आवाहन विधान परिषदेचे सभापती
रामराजे नाईक-निंबाळकर यांनी आज केले.
जिल्हा
परिषदेतर्फे जिल्ह्यातील आदर्श प्राथमिक शिक्षक पुरस्कार वितरण व धावपटू ललिता
बाबर हिच्या विशेष सत्काराचा कार्यक्रम आज शाहू कला मंदिर येथे झाला. यावेळी अध्यक्षीय
भाषणात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर बोलत होते. या कार्यक्रमास
जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष नरळे, आमदार बाळासाहेब पाटील, प्रभारी मुख्य कार्यकारी
अधिकारी पी.बी. पाटील, धावपटू ललिता बाबर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव
सोनवलकर, शिक्षण सभापती सतीश चव्हाण, महिला व बाल विकास सभापती वैशाली फडतरे, समाज कल्याण
सभापती सुरेखा शेवाळे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) देविदास कुलाळ, शिक्षणाधिकारी
(प्राथमिक) पुनिता गुरव आदी यावेळी उपस्थित होते.
प्राथमिक शिक्षकांनी आता
ग्रामीण भागाकडे आपले लक्ष केंद्रीत करुन शिक्षण देण्याबरोबर आपली सामाजिक
बांधीलकी जोपासावी, असे सांगून विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर पुढे
म्हणाले, शिक्षकांचा दर्जा कायमस्वरुपी हा उच्च राहणार आहे. शिक्षणाचे स्वरुप बदलत
चालले आहे. त्या प्रमाणे शिक्षकांनीही बदलले पाहिजे. ग्रामीण भागातील
विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आहे. या विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात कसे
खंबीरपणे तोंड देता येईल यासाठी गुणवत्ता पूर्व शिक्षण द्या, ही तुम्हाला मिळालेली
एक चांगली संधी आहे. या संधीचा तुम्ही उपयोग करुन एक जबाबदार व संस्कारक्षम पिढी
घडवावी, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष
श्री. नरळे म्हणाले, शिक्षक हा सर्वगुण संपन्न असला पाहिजे. सर्वगुण संपन्न पिढी घडविणे
ही काळाची गरज आहे. हे महान कार्य तुमच्याकडून होत आहे. सुजान पिढी घडवून शिक्षण क्षेत्रात जिल्ह्याला
नावलौकीक मिळवून द्यावा, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.
यावेळी धावपटू ललिता बाबर
म्हणाली, मी आज येथे पोहचले ती शिक्षकांमुळे.
आज होणारा हा माझा 5 वा सत्कार आहे. जिल्हा परिषदेकडून होणारा सत्कार हा
खूप महत्वाचा आहे. जिल्हा परिषदेने मला खूप मदत केली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये खूप
गुणवत्ता असून अनेक गुणवंत खेळाडू निर्माण होऊन जिल्ह्याचे नाव देशपातळीवर
गाजवतील. टोकीयो येथे होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये नक्की पदक मिळवेन असा विश्वासही
तीने शेवटी व्यक्त केला.
यावेळी 12 प्राथमिक
शिक्षकांना आदर्श प्राथमिक शिक्षक
पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी ललिता बाबर हिला जिल्हा परिषदेमार्फत 3
लाख 92 हजारांचा धनादेशही देण्यात आला.
यावेळी आमदार बाळासाहेब पाटील
यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षण
सभापती श्री. चव्हाण
यांनी केले. या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य, शिक्षक, शिक्षिका, नागरिक मोठ्या
संख्येने उपस्थित होते.
0000

No comments:
Post a Comment