Monday, July 9, 2018

प्रबोधनाच्या माध्यमातून राज्यात स्वच्छता अभियान गतीमान करणार - बबनराव लोणीकर



पुणे दि. 9 : स्वच्छता ही जनसेवा आहे आणि जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे. प्रबोधनाच्या माध्यमातून निर्मलवारीचे महत्व राज्यभर पोहोचले असून याच माध्यमातून राज्यात स्वच्छता अभियान अधिक गतीमान करणार असल्याचे प्रतिपादन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज केले.
                येथील विधानभवन परिसरात ग्रामविकास  विभाग, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागयांच्यावतीने आयोजित स्वच्छता दिंडी व ग्रामसभा दिंडीचा शुभारंभ श्री. बबनराव लोणीकर यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते-पाटील, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, पाणी पुरवठा संचालक डॉ. सतीश उमरीकर, उपायुक्त (विकास) चंद्रकांत गुडेकर उपस्थित होते.
            श्री. बबनराव लोणीकर म्हणाले, पंढरपूरच्या वारीत राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी सहभागी होतात. या वारकऱ्यांना शासनाच्यावतीने सर्व सुविधा पुरविण्यात येतात. पंढरपूरच्या वारीत शेतकरी, कष्टकरी जनता सहभागी होत असते. वर्षभरात एक कोटीहून अधिक भाविक भेट देत असतात. पंढरपूर स्वच्छ राहण्याच्या दृष्टीने शासनाच्या माध्यमातून पंढरपूरमध्ये 25 हजार शौचालये उभारण्यात आली आहेत. गेल्या काही वर्षात प्रबोधनाच्या माध्यमातून पंढरपूरची वारी निर्मल झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
            श्री. विश्वासराव देवकाते-पाटील म्हणाले, पंढरपूरच्या वारीच्या कालावधीत पालखी मार्गावर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वारकऱ्यांना सर्व सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. पालखी मार्गावर मोठ्या वाहनांना जाता येत नाही, त्यासाठी पालखी मार्गावर टू व्हिलर आरोग्य सेवा सुरू करण्यात आली आहे.
            डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, स्वच्छता दिंडीत राज्यभरातील 17 जिल्ह्यांचे चित्ररथ सहभागी झाले आहेत. चंद्रभागेच्या स्वच्छतेसाठी “नमामि” चंद्रभागा अभियान शासनाच्यावतीने सुरू करण्यात आले आहे. चार टप्प्यात हे अभियान राबविण्यात येणार आहे.
            यावेळी ‍जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे भाषण झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्यभरातून आलेल्या निवडक कलापथकांचे सादरीकरण करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते स्वच्छता दिंडी व ग्रामसभा दिंडीत सहभागी झालेल्या चित्ररथांना हिरवा झेंडा दाखविण्यात आला.



Sunday, July 8, 2018

संत विचारांचा ठेवा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संत विचारांचा ठेवा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे दि. : महाराष्ट्राच्या समाजमनावर आजही संत विचारांचा मोठा पगडा आहे. संत परंपरेच्या विचारानेच कायम सामान्य माणसाला प्रेरीत केले. संत विचार हे काळसापेक्ष असून हा विचारांचा ठेवा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक काळात संत चरित्रांचे लेखन होण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
श्री गंधर्व वेद प्रकाशनच्या संतदर्शन चरित्र ग्रंथाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर संमितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, चैतन्य महाराज देगलूरकर, संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बिदुरा नवले, संत परंपरेचे अभ्यासक तथा ग्रंथाचे संपादक डॉ. सदानंद मोरे, आळंदी संस्थानचे विश्वस्त अभय टिळक, प्रकाशक दीपक खाडिलकर, प्रकाश खाडिलकर उपस्थित होते.
            यावेळी श्री. देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राला संत विचारांची मोठी परंपरा आहे. या संत विचाराने सामान्य माणसाला कायमच प्रेरणा दिली. महाराष्ट्रातील संक्रमण काळात हेच संत विचार समाजाच्या पाठिशी उभा राहिला. संत ज्ञानेश्वरांनी अखिल विश्वाच्या कल्याणाची परंपरा सुरू केली तर संत तुकारामांनी अध्यात्म आणि संसार यांची सुयोग्य सांगड घालून दिली.
संत विचार हे काळसापेक्ष आहेत. प्रत्येक काळात त्यांच्या विचारांना महत्व आहे. मात्र हे संत विचार पुढच्या पिढी पर्यंत पोहोचण्यासाठी काळानुसार संत चरित्रांचे लेखन होण्याची आवश्यकता आहे. संत दर्शन या संतांच्या चरित्र लेखनाने संतांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. हे संत विचार सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येणार असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.  
श्री गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले, प्रत्येक संतांच्या मागे मोठा इतिहास आहे. हा संतांचा  इतिहास आजच्या पिढीसमोर येण्याची आवश्यकता आहे. संतांच्या विचारावरच चांगला समाज घडू शकतो, त्यामुळे संतांच्या विचारांना सामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता आहे.
चैतन्य महाराज देगलूरकर म्हणाले, नामदेवराय यांनी आपल्या अभंगातून सर्व संतांचे चरित्र पहिल्यांदा मांडले. महाराष्ट्र ही संतभूमी आहे. सकल समाजाच्या उत्थानासाठी संतांचा जन्म झाला. बदणाऱ्या सामाजिक मनोविकासामुळे संत चरित्रांची वारंवार नव्याने मांडणी आवश्यक आहे. संतांचे विचार पुढे सुरू राहण्यासाठी संत चरित्रांची आवश्यकता आहे. तत्वज्ञान आणि आचरण यांचा सुयोग्य समन्वय संतांच्या जीवनात असल्याने त्यांची चरित्र कायमच उपयुक्त असतात. जीवनाला दिशा देण्यासाठी संत चरित्रांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.    
 डॉ. सदानंद मोरे म्हणाले, महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची समृध्द परंपरा आहे. संतांनी महाराष्ट्राची साहित्य संस्कृती टिकवली. महाराष्ट्राचा सामाजिक पोत सांभाळण्याचे काम संतांनी केले. संतांचे विचार लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी या संत चरित्राची निर्मिती करण्यात आली. वारकरी संप्रदायाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आस्था आहे. ती त्यांच्या कृतीतून वारंवार स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले.  
कार्यक्रमाच्या सुरूवातीला संत चरित्र ग्रंथांच्या सर्व लेखकांचा परिचय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्तीश: करून घेतला व त्यांच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक दीपक खाडिलकर यांनी केले.  सूत्रसंचलन दीपक खाडिलकर यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
*****




Wednesday, July 4, 2018

शासनाच्या महसूल वाढीवर भर द्या विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या सूचना


सोलापूर, दि. 4 :- राज्‍य शासनाच्या महसूल वाढीचे उद्दीष्ट्य पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे. त्यासाठी सर्व महसूल अधिकाऱ्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रमांचा वापर करावा, पुढाकार घेऊन काम करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी येथे केले.
डॉ. म्हैसेकर यांनी काल सोलापूर जिल्हा परिषद आणि सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा बैठका घेतल्या. या बैठकांत दोन्ही कार्यालयाच्या दफ्तर तपासणीत आढळलेल्या त्रुटींवर त्यांनी संबंधित खाते प्रमुखांकडून माहिती घेतली, सूचना केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत श्री. म्हैसेकर यांनी महसूल वाढीच्या उद्दीष्टावर भर देण्याचे आवाहन केले. विशेषत: गौण खनिजाच्या स्वामित्व हक्कापोटी मिळणारा महसुलात वाढ होणे अपेक्षित आहे. सोलापूर जिल्ह्यातील वाळू ठेक्याच्या लिलावातून महसुल वाढ झाला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
श्री. म्हैसेकर यांनी सातबारा संगणकीकरण, शर्तभंग प्रकरणे, संरक्षण मंत्रालयाला द्यावयाच्या जागा, महावितरण कंपनीला दिलेल्या जागा, कोतवाल आणि पोलीस पाटील भरती, आदी विषयांची माहिती घेतली.  याबाबत जिल्हा प्रशासनाने प्रभावी अंमलबजावणी करुन कामाला निपटारा करावा अशा सूचना त्यांनी केल्या. यावेळी डॉ. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, महसूल उपायुक्त प्रताप जाधव, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपजिल्हाधिकारी श्रीमंत पाटोळे, किशोर पवार, प्रमोद गायकवाड, शमा पवार-ढोक, रामचंद्र उगले, प्रवीण साळुंके, तहसिलदार उज्जवला सोरटे आदी उपस्थित होते.
डॉ. म्हैसेकर यांनी जिल्हा परिषदेत झालेल्या बैठकीत विकासाची कामे गतीने करा, ग्रामीण दवाखाने, शाळांच्या वर्ग खोल्यांचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करा, अशा सूचना दिल्या.

विभागीय आयुक्तांच्या हस्ते
पोलीस स्टेशन परिसरात वृक्षारोपण
डॉ. म्हैसेकर यांच्या हस्ते अक्कलकोट रोड एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.  यावेळी पोलीस आयुक्त महादेव तांबडे, जिल्हा धिकारी डॉ. राजेंद्र भोसले, उपायुक्त प्रताप थोरात, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपवनसरंक्षक संजय माळी, विभागीय वनाधिकारी सुवर्णा माने, पोलीस निरीक्षक रवी घोडके आदी उपस्थित होते.
*****

Tuesday, July 3, 2018

अफवांवर विश्वास ठेऊन कायदा हातात घेऊ नका - पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ



पुणे दि 3 : राज्यात मागील काही दिवसांपासून मुले पळविणाऱ्या टोळींच्या अफवेने भीतीचे वातावरण पसरविले जात आहे. यातूनच केवळ संशयावरून मारहाणींच्या घटना घडत आहेत. अफवांवर विश्वास न ठेवता संशय आल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस उपायुक्त (आर्थिक व सायबर) सुधीर हिरेमठ यांनी केले आहे.
            समाज माध्यमांवरून पडताळणी न करता चुकीच्या पोस्ट प्रसारित करणे, कोणतीही खातरजमा न करता अफवा पसरविणे, संदेश फॉरवर्ड करणे गुन्हा आहे. या गुन्ह्याबद्दल भारतीय दंड विधान कलम ५०५ अन्वये कडक शिक्षा होऊ शकते.
 राज्यभरात लहान मुलांना पळवून नेणारी टोळी आली असून ती लहान मुलांना पळवून नेत असल्याबाबतचे पोस्टर्स, व्हिडीओज समाजमाध्यमांद्वारे कोणतीही खातरजमा न करता व्हायरल केले जात आहेत. त्यातून एखाद्या व्यक्तीवर किंवा गटावर संशय घेऊन त्यांना मारहाण करण्याच्या घटना घडत आहेत. अशा घटना घडू नयेत आणि राज्यात शांततेचे आणि सलोख्याचे वातावरण रहावे यासाठी नागरिकांनी कुठल्याही व्यक्ती अथवा गटाबद्दल संशय आल्यास त्वरित संबंधित पोलीस स्टेशन, गावातील पोलीस पाटील, पोलीस मित्र, प्रतिष्ठीत नागरिक कायदा हातात न घेता पोलिसांशी संपर्क साधावा.
            आपल्या आवाहनात श्री हिरेमठ यांनी म्हटले आहे की, मुले पळविण्याच्या अफवा पसरविण्याने समाजातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आणणे सर्वांसाठीच धोकादायक आहे. जनतेने अशा अफवांना बळी न पडता सत्यता पडताळून पहावी. समाज माध्यमांच्या वेगवेगळ्या व्यासपीठावर येणाऱ्या माहितीची कोणतीही शहानिशा न करता निरपराध व्यक्तींना मारहाण करून मारून टाकण्याच्या घटना अतिशय गंभीर आहेत. नागरिकांनी कायदा घेऊन एखाद्याला इजा केल्यास शिक्षा होऊ शकते, असेही त्यांनी म्हटले आहे.
0000

प्रत्येक पालखी मुक्कामाच्या ठिकाणी चोवीस तास सुरू राहणार समन्वय कक्ष - उदयसिंह भोसले



पुणे दि. 3: आषाढी यात्रा पालखी सोहळा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी तसेच वारकरी आणि दिंडी चालकांना कोणत्याही प्रकारच्या असुविधांचा समाना करावा लागू नये म्हणून पालखी मार्गावरील प्रत्येक पालखी मुक्कामाच्या ठिकाणी समन्वय कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. स्थानिक प्रांताधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली सर्व वि‍‍भागांच्या अधिकाऱ्यांचा यात समावेश करण्यात आला असून हे समन्वय कक्ष चोवीस तास सुरू राहतील अशी माहिती  उपजिल्हाधिकारी तथा पालखी सोहळा 2018चे समन्वय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली.
पंढरपूर आषाढी वारी हा लाखो भाविकांच्या श्रध्देचा भाग आहे. या आषाढी वारीत शेकडो पालखी दिंड्या आणि लाखो वारकरी सहभागी होतात. यामुळे स्थानिक पायाभूत सुविधांवर ताण येत असतो, याचा सामना पालखी सोहळ्यातील वारकरी व दिंडी मालकांना होवू नये म्हणून संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज व संत सोपानकाका महाराज या प्रमुख तीन पालखी मार्गावर पालखीच्या प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी समन्वय कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. स्थानिक प्रांताधिकारी हे या समन्वय कक्षाचे प्रमुख व इन्सिडंट कमांडर राहणार असून तहसिलदार हे डेप्युटी इन्सिडंट कमांडर म्हणून काम करतील. या कक्षासाठी पोलीस निरीक्षक दर्जाच्या स्वतंत्र अधिकाऱ्याची पुरेशा पोलीस कर्मचाऱ्यांसह नेमणुक करण्यात आली आहे. हे मुक्कामाच्या ठिकाणच्या कायदा व सुरक्षेची जबाबदारी पार पाडणार असून या सबंधिच्या तक्रार निवारणाचे काम करणार आहेत.
पालखी सोहळ्यात भाग घेतलेल्या वारकरी व दिंडी चालकांना असुविधांचा सामना करावा लागू नये तसेच त्यांना आवश्यक मदत मिळण्याच्या दृष्टीने या समन्वय कक्षात महसूल विभाग, पंचायत समिती विभाग, आरोग्य विभाग, पाणी पुरवठा विभाग, पुरवठा विभाग, पोलीस विभाग, स्वच्छता विभाग (मोबाईल टॉयलेट बाबतचे कर्मचारी), परिवहन विभाग, महावितरण विभाग या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. हे समन्वय कक्ष 24 तास सुरू ठेवण्यात येणार असून नेमणुक केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आठ-आठ तासांच्या शिप्ट करण्यात आल्या आहेत. तसेच प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांना कामाच्या मार्गदर्शक सूचना तयार करून देण्यात आल्या आहेत, त्यानुसार काम करून पुर्तता करण्यात आली आहे का? याचा अहवाल प्रांताधिकाऱ्यांच्याकडून मागविला आहे. 
त्याच बरोबर पालखी तळावर नेमणुक करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची संपर्क क्रमांकासह यादी प्रत्येक पालखी प्रमुखांना देण्यात आली आहे. तसेच ही यादी समन्वय कक्षातही ठेवण्यात आली आहे. या समन्वय कक्षाच्या माध्यमातून वारकरी व दिंडी चालकांच्या तक्रारीचे तातडीने निराकरण होण्यास मदत होणार आहे.
निर्मलवारीसाठी प्रशिक्षण कार्यक्रम
पालखी सोहळा स्वच्छ व निर्मल होण्यासाठी निर्मलवारी अभियान राबविण्यात येते. हे अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात निर्मलवारी संबंधी संबंधित ठिकाणचे सरपंच, ग्रामसेवक आणि स्वयंसेवक यांच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. सातारा आणि पुणे जिल्ह्यातील प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला असून सोलापूर जिल्ह्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.
गॅस व केरोसीनचा  मुबलक पुरवठा
पालखी मार्गावरील मुक्कामाच्या ठिकाणी या पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या दिंड्यांना गॅस व केरोसिनचा मुबलक पुरवठा व्हावा याची व्यवस्था प्रत्येक जिल्ह्याच्या पुरवठा विभागाने केली आहे. यासाठी पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या दिंड्यांना पासेस देण्यात आले आहेत. पासेस असणाऱ्या दिंड्यांना प्राधान्याने गॅस व केरोसीनचा पुरवठा केला जाणार आहे. तसेच कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पालखी मार्गावरील मुक्कामाची व विसाव्याच्या ठिकाणी अनाधिकृत गॅस वापर होवू नये यासाठी तपासणी पथकाची निर्मिती करण्यात आली आहे.
***

पिंपरी चिंचवड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश सुरू



पुणे दि. ३ : कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत शासकीय प्रशिक्षण संस्था, पिंपरी चिंचवड, पुणे येथे २०१८-१९ च्या ऑगस्ट सत्राकरिता प्रवेश सुरू झाले आहेत, तरी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन स्वरूपात अर्ज करून प्रवेश प्रक्रियेत सहभाग घ्यावा, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांनी केले आहे.
पिंपरी चिंचवड येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था ही औद्योगिक वसाहतीत २.१४ हेक्टरच्या विस्तीर्ण परिसरात वसलेली आहे. संस्थेत २ हजार ६१ चौरस मीटर क्षेत्रफळाची सुसज्ज अशी कार्यशाळा आहे. तसेच ५० मुलांच्या राहण्याची सोय असलेल्या वसतिगृहाची व्यवस्था आहे. याचसोबत सीएसआर योजनेअंतर्गत व्होक्स वॅगन कंपनीने संस्थेसोबत दोन कोटी रुपयांचा करार केला असून या निधीतून नूतनीकरणाबरोबरच अनेक नवीन उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
संस्थेत अल्पसंख्याक समाजातील उमेदवारकरिता ७० टक्के जागा राखीव असून खुल्या व मागासवर्ग श्रेणीतील उमेदवारांसाठी ३० टक्के जागा राखीव आहेत. प्रवेश अर्ज www.admission.dvet.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. प्रवेशाचे वेळापत्रक, माहितीपुस्तिका इ. माहितीसुद्धा संकेतस्थळावर उपलब्ध असून अधिक माहितीसाठी ०२० – २७६६१२९६ किंवा ०२० – २७६६०३२० या क्रमांकावर संपर्क साधावा. 



आदिवासी विकास विभागातर्फे उद्योजकता कौशल्य विकास आणि व्यवसाय जोपासना कक्षाची स्थापना




पुणे, दि. ३ :  आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत उद्योजकता कौशल्य विकास आणि व्यवसाय जोपासना कक्षाची स्थापना आर्थिक वर्ष २०१८-१९ करिता करण्यात आली आहे. सदर कक्षामार्फत आदिवासी युवक-युवतींसाठी कौशल्य विकासाद्वारे रोजगार क्षमता वाढविणे, तसेच आदिवासी समाजासाठी नावीन्यपूर्ण उपक्रमाद्वारे उत्पन्न निर्मितीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेकडे कौशल्य विकास, उद्योजक घडविणे आणि नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे आदिवासी युवक-युवतींना उत्पन्न निर्मिती कार्यक्रम राबविणाऱ्या संस्थांनी नोंदणी करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. उद्योजकता कौशल्य विकास आणि आदिवासी समाजातील पहिल्या पीढीच्या उद्योजकांसाठी व्यवसाय जोपासना व संवर्धन यांचा योजनेमध्ये समावेश असेल.
इच्छुक संस्थांनी संस्थेच्या टीआरटीआय च्या trg.trt-mh@nic.in या ई-मेल आयडीवर उद्योजकता आणि कौशल्य विकासाचे प्रशिक्षण प्रस्ताव दिनांक ५ जुलै २०१८ पर्यंत मा. आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे – १ या नावाने सादर करावेत, असे आवाहन आदिवासी विकास विभागाने केले आहे.