पुणे दि. 3: आषाढी यात्रा पालखी सोहळा निर्विघ्नपणे
पार पाडण्यासाठी तसेच वारकरी आणि दिंडी चालकांना कोणत्याही प्रकारच्या असुविधांचा
समाना करावा लागू नये म्हणून पालखी मार्गावरील प्रत्येक पालखी मुक्कामाच्या ठिकाणी
समन्वय कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. स्थानिक प्रांताधिकाऱ्यांच्या
नेतृत्वाखाली सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांचा यात समावेश करण्यात आला असून हे
समन्वय कक्ष चोवीस तास सुरू राहतील अशी माहिती
उपजिल्हाधिकारी तथा पालखी सोहळा 2018चे समन्वय
अधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली.
पंढरपूर आषाढी वारी हा लाखो भाविकांच्या श्रध्देचा भाग
आहे. या आषाढी वारीत शेकडो पालखी दिंड्या आणि लाखो वारकरी सहभागी होतात. यामुळे
स्थानिक पायाभूत सुविधांवर ताण येत असतो, याचा सामना पालखी सोहळ्यातील वारकरी व
दिंडी मालकांना होवू नये म्हणून संत ज्ञानेश्वर महाराज, संत
तुकाराम महाराज व संत सोपानकाका महाराज या प्रमुख तीन पालखी मार्गावर पालखीच्या
प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी समन्वय कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. स्थानिक
प्रांताधिकारी हे या समन्वय कक्षाचे प्रमुख व इन्सिडंट कमांडर राहणार असून
तहसिलदार हे डेप्युटी इन्सिडंट कमांडर म्हणून काम करतील. या कक्षासाठी पोलीस
निरीक्षक दर्जाच्या स्वतंत्र अधिकाऱ्याची पुरेशा पोलीस कर्मचाऱ्यांसह नेमणुक
करण्यात आली आहे. हे मुक्कामाच्या ठिकाणच्या कायदा व सुरक्षेची जबाबदारी पार
पाडणार असून या सबंधिच्या तक्रार निवारणाचे काम करणार आहेत.
पालखी सोहळ्यात भाग घेतलेल्या वारकरी व दिंडी चालकांना
असुविधांचा सामना करावा लागू नये तसेच त्यांना आवश्यक मदत मिळण्याच्या दृष्टीने या
समन्वय कक्षात महसूल विभाग,
पंचायत समिती विभाग, आरोग्य विभाग, पाणी पुरवठा विभाग, पुरवठा विभाग, पोलीस विभाग, स्वच्छता विभाग (मोबाईल टॉयलेट बाबतचे
कर्मचारी), परिवहन विभाग, महावितरण
विभाग या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. हे समन्वय
कक्ष 24 तास सुरू ठेवण्यात येणार असून नेमणुक केलेल्या
अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आठ-आठ तासांच्या शिप्ट करण्यात आल्या आहेत. तसेच
प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांना कामाच्या मार्गदर्शक सूचना तयार करून देण्यात
आल्या आहेत, त्यानुसार काम करून पुर्तता करण्यात आली आहे का?
याचा अहवाल प्रांताधिकाऱ्यांच्याकडून मागविला आहे.
त्याच बरोबर पालखी तळावर नेमणुक करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची
संपर्क क्रमांकासह यादी प्रत्येक पालखी प्रमुखांना देण्यात आली आहे. तसेच ही यादी
समन्वय कक्षातही ठेवण्यात आली आहे. या समन्वय कक्षाच्या माध्यमातून वारकरी व दिंडी
चालकांच्या तक्रारीचे तातडीने निराकरण होण्यास मदत होणार आहे.
निर्मलवारीसाठी
प्रशिक्षण कार्यक्रम
पालखी
सोहळा स्वच्छ व निर्मल होण्यासाठी निर्मलवारी अभियान राबविण्यात येते. हे अभियान
अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात
निर्मलवारी संबंधी संबंधित ठिकाणचे सरपंच, ग्रामसेवक आणि
स्वयंसेवक यांच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. सातारा आणि पुणे
जिल्ह्यातील प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला असून सोलापूर जिल्ह्यासाठी प्रशिक्षण
कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.
गॅस
व केरोसीनचा मुबलक पुरवठा
पालखी
मार्गावरील मुक्कामाच्या ठिकाणी या पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या दिंड्यांना गॅस
व केरोसिनचा मुबलक पुरवठा व्हावा याची व्यवस्था प्रत्येक जिल्ह्याच्या पुरवठा
विभागाने केली आहे. यासाठी पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या दिंड्यांना पासेस
देण्यात आले आहेत. पासेस असणाऱ्या दिंड्यांना प्राधान्याने गॅस व केरोसीनचा पुरवठा
केला जाणार आहे. तसेच कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पालखी मार्गावरील मुक्कामाची
व विसाव्याच्या ठिकाणी अनाधिकृत गॅस वापर होवू नये यासाठी तपासणी पथकाची निर्मिती
करण्यात आली आहे.
***
No comments:
Post a Comment