अपर पोलिस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांना निरोप
पुणे, दि. 31 – येथे कारागृह विभागाच्या अपर पोलिस महासंचालक पदावर कार्यरत असणारे डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांची बदली नागपूर पोलीस आयुक्तपदी झाली आहे.त्यानिमित्ताने विभागाच्या वतीने आयोजित समारंभात सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला.
यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव, पश्चिम विभागाच्या कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, पुणे विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक मोहन राठोड, येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक यू. टी. पवार आदी उपस्थित होते.
डॉ. भूषणकुमार उपाध्याय म्हणाले, निरपेक्ष वृत्तीने केलेल्या कामातून आनंद मिळतो. कारागृह विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या सर्वसमावेशक कार्यपद्धतीमुळे कारागृह विभागाचा चेहरा बदलण्यास मदत झाली. यामुळे विभागाची प्रतिमा उंचावली आहे. पोलीस आणि बंदीजनातील सुसंवादातून त्यांच्यात सुधारणा होत असल्याचे चित्र नक्कीच सुखावह आहे.
अपर पोलीस महासंचालक या पदावर काम करत असताना डॉ. उपाध्याय यांच्या कारकिर्दीमध्ये अत्याधुनिकी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कारागृहाची सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत झाली.बंदीजन व त्यांच्या नातेवाईकांसाठी गळाभेट या उपक्रमाची देशपातळीवर दखल घेण्यात आली. बंदीजनांसाठी टेलिमेडिसिन ही आरोग्य सुविधा सुरू झाली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग तंत्रामुळे कारागृह विभागाची करोडो रुपयांची बचत झाली असून बंदीजनाला रुग्णालयात ने-आण करण्यातील जोखीम दूर झाली व वेळेचा अपव्ययही टळला आहे.
कार्यक्रमास प्राचार्य एस. व्ही. खटावकर, उप अधीक्षक राजेंद्र जोशी, तुरूंगाधिकारी एस. बी. दराडे, के. एन. शेटे यांच्यासह कारागृह विभागातील पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
000000
No comments:
Post a Comment