प्रशासकीय कामकाज पारदर्शक व अचूक होण्यासाठी लेखापरीक्षक कार्यालयांमध्ये समन्वय ठेवावा - प्रधान महालेखाकार संगीता चौरे
पुणे,दि. 24- शासनाच्या विविध कार्यालयांचे लेखापरीक्षण वेळेत
आणि अचूक करुन प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी लेखापरीक्षकाच्या वरिष्ठ
आणि विभागीय लेखापरीक्षण कार्यालयांमध्ये समन्वय ठेवावा, असे आवाहन प्रधान
महालेखाकार संगीता चौरे यांनी केले.
भारताचे नियंत्रक तथा महालेखापरीक्षक यांच्या अधिनस्त असलेल्या
मुंबई येथील प्रधान महालेखाकार लेखापरीक्षक कार्यालयाच्या पुणे विभागीय
कार्यालयाची 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित कार्यक्रमात श्रीमती चौरे बोलत
होत्या. यावेळी समाजकल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर,
वरिष्ठ उपमहालेखाकार (प्रशासन) उदय शिंदे, वरिष्ठ उपमहालेखाकार
(बाह्यलेखापरीक्षण) टी. एस. आर. गुप्ता आदी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी जमाबंदी
आयुक्त एस.चोक्कलिंगम उपस्थित होते. यावेळी लेखापरीक्षण कार्यालयात
महत्वपूर्ण सेवा बजावणाऱ्या रंगनाथ लोकापूर,
दत्तात्रय बर्वे यांच्या सह तत्कालीन सेवा निवृत्त अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात
आला.
प्रधानमहालेखाकार संगीता चौरे यांनी लेखापरीक्षणातील विविध पैलू
आणि त्यात आजवर झालेले बदल स्पष्ट केले. श्रीमती चौरे म्हणाल्या, राज्य शासनाची
राज्य व विभाग पातळीवरील बहुतांशी कार्यालये पुण्यात कार्यरत आहेत. त्यामुळे या
कार्यालयांच्या लेखापरीक्षणासाठी पुणे विभागीय कार्यालय निर्माण होणे अत्यंत
गरजेचे होते. ही गरज ओळखून 1 एप्रिल 1968 मध्ये नवीन मध्यवर्ती इमारतीत विभागीय
लेखापरीक्षण कार्यालयाची स्थापना करण्यात आली. शासनाच्या विविध कार्यालयांच्या
योजनांचे लेखापरीक्षण करुन हा अहवाल विधान सभेत सादर केला जातो, त्यामुळे या
योजनांची सद्यस्थिती नागरिकांपर्यंत पोहचण्यास मदत होते. या विभागाचे महत्व लक्षात
घेता वरिष्ठ कार्यालयातील अधिकाऱ्यांनी विभागीय कार्यालयाला वेळोवेळी भेट
द्यावी. तसेच कार्यालयीन कामकाजाचा आढावा घेवून त्यांना
येणाऱ्या अडचणींबाबत मार्गदर्शन करावे.
श्री. चोक्कलिंगम यांनी लेखापरीक्षणाचे महत्व विशद केले. ते
म्हणाले, शासकीय कार्यालयाच्या कामकाजात सुधारणा घडविण्यासाठी नियमितपणे
लेखापरीक्षण करणे आवश्यक आहे. कामकाज करताना कर्मचाऱ्यांकडून झालेल्या आर्थिक
बाबींमधील उणीवा दाखवून देणे आणि त्या सुधारण्याच्या दृष्टीने लेखापरीक्षण करणे
अत्यंत महत्वाचे असते. शासनात लेखापरीक्षक हा प्रशासकीय कामकाजातील चूका दाखवून
देवून त्या वेळीच सुधारुन कार्यालयाचा कारभार पारदर्शकपणे करण्यास मदत करणाऱ्या
मित्राची भूमिका पार पाडतो.
वरिष्ठ उपमहालेखाकार (प्रशासन) उदय शिंदे यांनी कार्यक्रमाच्या
आयोजनामागील हेतू विशद केला. तर वरिष्ठ उपमहालेखाकर (सामाजिक व सामान्य क्षेत्र II) टी. एस. आर गुप्ता यांनी पुणे
विभागीय कार्यालयाचे काम उत्तम प्रकारे सुरु असल्याबद्दल येथील अधिकारी-
कर्मचाऱ्यांच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमात डी.एन.बर्वे व
एस. व्ही.नेने यांनी मनोगत व्यक्त केले.
लेखापरीक्षा अधिकारी उज्ज्वला ढेकणे यांनी प्रास्ताविकातून लेखापरीक्षण
कार्यालयाची माहिती दिली. सूत्रसंचालन पर्यवेक्षिका मानसी विजापुरे यांनी केले.
आभार लेखापरीक्षा अधिकारी सदाफ शेख यांनी मानले. कार्यक्रमास पुणे विद्यापीठाच्या मुख्य लेखा व वित्त
अधिकारी विद्या गारगोटे, वित्त व लेखा अधिकारी श्री. जाधवराव तसेच लेखापरीक्षा
विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000000
No comments:
Post a Comment