Friday, July 13, 2018

'संवाद वारी' प्रदर्शन पाहून भारावले वारकरी


बारामती,   जिल्‍हा पुणे, दिनांक 13- मी गेल्‍या 12-13 वर्षांपासून पंढरपूरच्‍या वारीला जात असतो. मी अपंग (दिव्‍यांग) असलो तरी विठुरायाच्‍या दर्शनाच्‍या ओढीने मी अपंगत्‍वावर मात केली आहे. बारामती येथे शासनाच्‍या योजनांची माहिती असलेले प्रदर्शन पाहिल्‍यावर मला खूप आनंद झाला. शेतक-यांनी हे प्रदर्शन पाहून यातील योजनांच्‍या मदतीने आपली आर्थिक प्रगती करुन घ्‍यावी, असे मनमोकळे मनोगत लातूर येथील शिवाजी निवृत्‍ती धुमाळ यांनी व्‍यक्‍त  केले. वयाची साठी पार केलेले श्री. धुमाळ हे दिव्‍यांग व्‍यक्‍ती आहेत. आपल्‍या तिनचाकी सायकलवर ते पंढरीच्‍या वारीला जात असतात. दर वर्षी देहू येथून संतश्रेष्‍ठ तुकाराम महाराज पालखी बरोबर ते निघतात. आज पालखीचा मुक्‍काम बारामती येथे असल्‍याने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्‍या 'संवादवारी' या चित्रप्रदर्शनाचे आयोजन येथे करण्‍यात आले होते. बारामती येथे प्रदर्शनाच्‍या जवळ लावलेल्‍या स्‍पीकरवरील जाहिरातींचा आवाज ऐकून ते आले. आपल्‍या तिनचाकी सायकलवर बसूनच त्‍यांनी संपूर्ण प्रदर्शन पाहिले. प्रदर्शन पाहिल्‍यावर त्‍यांनी समाधान व्‍यक्‍त केले. अपंग (दिव्‍यांग) व्‍यक्‍तींसाठी असलेल्‍या योजनांचीही माहिती यामध्‍ये असायला हवी, असेही त्‍यांनी सुचवले. पंढरीच्‍या  वारीमध्‍ये शेतकरी मोठ्या संख्‍येने सहभागी होत असल्‍याने शेती आणि ग्रामीण विकासाशी संबंधित योजनांवर प्रदर्शनात भर देण्‍यात आला असल्‍याचे जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी सांगितल्‍यावर त्‍यांचे शंकानिरसन होऊन समाधान व्‍यक्‍त  केले.
व्‍हॉट्सपचा स्‍टेटस ठेवणार- नीलेश मेमाणे
एम.ए. इकॉनॉमिक्‍स झालेला नीलेश ज्ञानेश्‍वर मेमाणे बँकेतील नोकरी सांभाळून शेती करतो. बारामती येथे माध्‍यमिक शिक्षण झाल्‍यावर त्‍याने पुणे विद्यापीठातून एम.ए.ची पदवी घेतली. बारामती तालुक्‍यातच सुपा येथे त्‍याची वडिलोपार्जित  शेतजमीन आहे. त्‍याने प्रदर्शनातील सर्व स्‍टॉलचे मोबाईलवर फोटो काढले तसेच सेल्‍फीही घेतला. याबाबत विचारले असता त्‍याने सांगितले. मी आज या प्रदर्शनाचा स्‍टेटस माझ्या व्‍हॉट्सपवर ठेवणार असून माझ्या 45 व्‍हॉट्सअप ग्रूपवरील मित्रांना, नातेवाईकांना हे प्रदर्शन पहाण्‍यासाठी आग्रह धरणार आहे. तसेच आता काढलेले फोटोही मी माझ्या बाहेरगावच्‍या मित्रांच्‍या ग्रूपवर फॉरवर्ड करणार आहे. प्रदर्शनातील योजनांची माहिती खूपच चांगली आहे. या माहितीचा अधिकाधिक प्रचार-प्रचार व्‍हावा, या हे‍तूनेच मी हे करणार आहे.
वडिलांना योजनांची माहिती सांगणार- वैशाली भिवरकर
बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात एस.वाय.बी.कॉम.मध्‍ये शिकत असलेल्‍या वैशाली राजेंद्र भिवरकर या  विद्यार्थिनीने आपल्‍या मैत्रिणीसमवेत प्रदर्शन पाहिले. त्‍यातील काही योजनांबाबत अधिक माहितीही विचारली. ती पवारवाडी येथे राहते. तिचे वडील शेती करतात. प्रदर्शनात शेतीविषयी अधिकाधिक योजना असल्‍याचे पाहून तिने त्‍या योजनांबाबत अधिक माहिती जाणून घेतली. आपण वडिलांना या योजनांविषयी माहिती देणार असल्‍याचेही तिने सांगितले.
शाळा-महाविद्यालयातून योजनांची माहिती सांगणार- सोमनाथ विटकर
सोमनाथ मरगू विटकर हे माजी सैनिक असून 2009 मध्‍ये सेवानिवृत्‍त झाले. बारामती येथे स्‍थायिक असले तरी वेगवेगळ्या शाळा-महाविद्यालयात जाऊन  विद्यार्थ्‍यांना व्‍यायामाचे महत्‍त्‍व ते पटवून देत असतात. महाराष्‍ट्र शासन वेगवेगळ्या योजना राबवत असते, त्‍या नागरिकांपर्यंत जाण्‍यासाठी प्रदर्शन हे उत्‍तम माध्‍यम असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले. लोकांनीही शासकीय योजनांचा लाभ घेतला पाहिजे, असे आवाहन त्‍यांनी केले.  














No comments:

Post a Comment