पंढरपूर दि. २३: आषाढी वारीच्या शासकीय महापूजेचा मान हिंगोली जिल्ह्यातील भगवंती- कडोळी गावातील जाधव दाम्पत्याला मिळाला. या मानाच्या वारकरी दाम्पत्याच्या हस्ते विठ्ठल-रूक्मिणीचीशासकीय महापूजा पहाटे संपन्न झाली.
यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन व दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर, पालकमंत्री विजयकुमारदेशमुख, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, खासदार अनिल देसाई, आमदार सुरेश खाडे, पंढरपूरच्या नगराध्यक्षा साधना भोसले, विभागीयआयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
गेल्या चार वर्षापासून आषाढी वारी करणाऱ्या अनिल गंगाधर जाधव व त्यांची सुविद्य पत्नी वर्षा अनिल जाधव (रा.भगवंती, पो. कडोळी, ता. शेणगाव, जि. हिंगोली) यांना यावर्षीचा आषाढी एकादशीच्यामहापूजेचा मान मिळाला. जाधव दाम्पत्याच्या हस्तेच यावर्षीची शासकीय महापूजा करण्यात आली.
महापूजेनंतर मंदिराच्या सभामंडपात झालेल्या कार्यक्रमात विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने जाधव दाम्पत्याचा सत्कार समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले व त्यांच्या सुविद्य पत्नी गौरवीदेवी भोसलेयांच्या हस्ते करण्यात आला. मानकरी दाम्पत्याला परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते एसटी महामंडळाच्यावतीने एक वर्ष मोफत एसटी प्रवास पासाचे वितरण करण्यात आले.
यावेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने निर्मल दिंडी पुरस्काराचे वितरण परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते करण्यात आले. निर्मल दिंडी प्रथम पुरस्कार संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसोहळ्यातील रथापुढील शेडगे दिंडी क्रमांक ३ ला, व्दितीय पुरस्कार कोथळी येथील संत मुक्ताई दिंडीला तर तृतीय पुरस्कार संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर दिंडीलादेण्यात आला. तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते वारीदरम्यान उत्कृष्ठ काम करणाऱ्या स्वयंसेवकांचा प्रातिनिधीक स्वरुपात सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अतुल भोसले यांनी केले. तर आभार गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मानले.
******
No comments:
Post a Comment