Wednesday, July 18, 2018

लोकराज्यच्या ‘वारी’ विशेषांकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन



पुणे  दि. 18 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या लोकराज्यच्या आषाढी वारीविशेषांकाचे आज विधानभवन नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
यावेळी महसूल मंत्री तथा या विशेषांकाचे अतिथी संपादक चंद्रकांत पाटील, विभागीय आयुक्त अनूप कुमार, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल आदी उपस्थित होते. आषाढी वारीचा संग्राह्य विशेषांक पंढरपुरची आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक वैभवाचा सर्वश्रेष्ठ आविष्कार आहे. यंदाच्या वारीत माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयामार्फत संवादवारीहा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. या माध्यमातून शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना वारकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर लोकराज्यच्या या विशेषांकाचे आज प्रकाशन करण्यात आले.
या विशेषांकाचे अतिथी संपादक असलेल्या महसूल मंत्री श्री. पाटील यांनी रंगले हे चित्त माझे विठुपायीअसे म्हणत वारकऱ्यांसाठी संदेश दिला आहे. अंकामध्ये श्रीपाद अपराजित, डॉ. द. ता. भोसले, श्रीधरबुवा देहूकर, संदेश भंडारे, बाळासाहेब बोचरे, डॉ. यू. म. पठाण, प्रा. राम शेवाळकर, डॉ. प्रतिमा इंगोले, जयंत साळगावकर आदी मान्यवरांनी वारीच्या विविध अनुषंगाने विचार मांडले आहेत. विठ्ठल-रुक्म‍िणी मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी समितीमार्फत भक्तांसाठी दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधांची माहिती दिली आहे. पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पालखी मार्गावर तसेच पंढरपूर येथे प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या सोयी सुविधा तसेच उपाय योजनांची माहिती दिली आहे. राज्य शासनामार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या स्वच्छतेच्या वारीसंदर्भातही विशेषांकात माहिती आहे.


Friday, July 13, 2018

'संवाद वारी' प्रदर्शन पाहून भारावले वारकरी


बारामती,   जिल्‍हा पुणे, दिनांक 13- मी गेल्‍या 12-13 वर्षांपासून पंढरपूरच्‍या वारीला जात असतो. मी अपंग (दिव्‍यांग) असलो तरी विठुरायाच्‍या दर्शनाच्‍या ओढीने मी अपंगत्‍वावर मात केली आहे. बारामती येथे शासनाच्‍या योजनांची माहिती असलेले प्रदर्शन पाहिल्‍यावर मला खूप आनंद झाला. शेतक-यांनी हे प्रदर्शन पाहून यातील योजनांच्‍या मदतीने आपली आर्थिक प्रगती करुन घ्‍यावी, असे मनमोकळे मनोगत लातूर येथील शिवाजी निवृत्‍ती धुमाळ यांनी व्‍यक्‍त  केले. वयाची साठी पार केलेले श्री. धुमाळ हे दिव्‍यांग व्‍यक्‍ती आहेत. आपल्‍या तिनचाकी सायकलवर ते पंढरीच्‍या वारीला जात असतात. दर वर्षी देहू येथून संतश्रेष्‍ठ तुकाराम महाराज पालखी बरोबर ते निघतात. आज पालखीचा मुक्‍काम बारामती येथे असल्‍याने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्‍या 'संवादवारी' या चित्रप्रदर्शनाचे आयोजन येथे करण्‍यात आले होते. बारामती येथे प्रदर्शनाच्‍या जवळ लावलेल्‍या स्‍पीकरवरील जाहिरातींचा आवाज ऐकून ते आले. आपल्‍या तिनचाकी सायकलवर बसूनच त्‍यांनी संपूर्ण प्रदर्शन पाहिले. प्रदर्शन पाहिल्‍यावर त्‍यांनी समाधान व्‍यक्‍त केले. अपंग (दिव्‍यांग) व्‍यक्‍तींसाठी असलेल्‍या योजनांचीही माहिती यामध्‍ये असायला हवी, असेही त्‍यांनी सुचवले. पंढरीच्‍या  वारीमध्‍ये शेतकरी मोठ्या संख्‍येने सहभागी होत असल्‍याने शेती आणि ग्रामीण विकासाशी संबंधित योजनांवर प्रदर्शनात भर देण्‍यात आला असल्‍याचे जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी सांगितल्‍यावर त्‍यांचे शंकानिरसन होऊन समाधान व्‍यक्‍त  केले.
व्‍हॉट्सपचा स्‍टेटस ठेवणार- नीलेश मेमाणे
एम.ए. इकॉनॉमिक्‍स झालेला नीलेश ज्ञानेश्‍वर मेमाणे बँकेतील नोकरी सांभाळून शेती करतो. बारामती येथे माध्‍यमिक शिक्षण झाल्‍यावर त्‍याने पुणे विद्यापीठातून एम.ए.ची पदवी घेतली. बारामती तालुक्‍यातच सुपा येथे त्‍याची वडिलोपार्जित  शेतजमीन आहे. त्‍याने प्रदर्शनातील सर्व स्‍टॉलचे मोबाईलवर फोटो काढले तसेच सेल्‍फीही घेतला. याबाबत विचारले असता त्‍याने सांगितले. मी आज या प्रदर्शनाचा स्‍टेटस माझ्या व्‍हॉट्सपवर ठेवणार असून माझ्या 45 व्‍हॉट्सअप ग्रूपवरील मित्रांना, नातेवाईकांना हे प्रदर्शन पहाण्‍यासाठी आग्रह धरणार आहे. तसेच आता काढलेले फोटोही मी माझ्या बाहेरगावच्‍या मित्रांच्‍या ग्रूपवर फॉरवर्ड करणार आहे. प्रदर्शनातील योजनांची माहिती खूपच चांगली आहे. या माहितीचा अधिकाधिक प्रचार-प्रचार व्‍हावा, या हे‍तूनेच मी हे करणार आहे.
वडिलांना योजनांची माहिती सांगणार- वैशाली भिवरकर
बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात एस.वाय.बी.कॉम.मध्‍ये शिकत असलेल्‍या वैशाली राजेंद्र भिवरकर या  विद्यार्थिनीने आपल्‍या मैत्रिणीसमवेत प्रदर्शन पाहिले. त्‍यातील काही योजनांबाबत अधिक माहितीही विचारली. ती पवारवाडी येथे राहते. तिचे वडील शेती करतात. प्रदर्शनात शेतीविषयी अधिकाधिक योजना असल्‍याचे पाहून तिने त्‍या योजनांबाबत अधिक माहिती जाणून घेतली. आपण वडिलांना या योजनांविषयी माहिती देणार असल्‍याचेही तिने सांगितले.
शाळा-महाविद्यालयातून योजनांची माहिती सांगणार- सोमनाथ विटकर
सोमनाथ मरगू विटकर हे माजी सैनिक असून 2009 मध्‍ये सेवानिवृत्‍त झाले. बारामती येथे स्‍थायिक असले तरी वेगवेगळ्या शाळा-महाविद्यालयात जाऊन  विद्यार्थ्‍यांना व्‍यायामाचे महत्‍त्‍व ते पटवून देत असतात. महाराष्‍ट्र शासन वेगवेगळ्या योजना राबवत असते, त्‍या नागरिकांपर्यंत जाण्‍यासाठी प्रदर्शन हे उत्‍तम माध्‍यम असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले. लोकांनीही शासकीय योजनांचा लाभ घेतला पाहिजे, असे आवाहन त्‍यांनी केले.  














Thursday, July 12, 2018

उंडवडी येथील पालखी तळांची प्रांताधिकारी हेमंत निकम यांचेकडून पाहणी



      बारामती दि. 12 : - यंदा आषाढी वारी निमित्ताने संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे बारामती तालुक्यात आगमन होत आहे.या पालखीचा दिनांक 12 जुलै 2018 रोजी उंडवडी गवळयाची– येथे मुक्काम होणार आहे. त्यानिमित्ताने तेथील पालखी तळांची पाहणी प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी  आज केली.
       या पाहणी वेळी तहसिलदार हनुमंत पाटील, गटविकास अधिकारी प्रमोद काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता विश्वास ओव्हाळ, सहायक पोलीस निरिक्षक विकास बडवे,  आरोग्य विभाग, अग्निशमन विभाग, महावितरण विभाग, नगरपरिषद विभाग, दूरसंचार व   विविध प्रशासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
       या पाहणी मध्ये प्रांताधिकारी निकम यांनी पालखी तळांची पाहणी करून  संबंधित गावातील प्रमुख पदाधिकारी आणि ग्रामस्थांशी पालखी मुक्कामाच्या वेळी करावयाच्या सोयी सुविधा, स्वच्छता व घ्यावयाच्या दक्षतेबाबत आरोग्य विभागाच्या अधिका-यांशी सविस्तर  चर्चा करून वारकऱ्यांना पालखी तळावर प्रशासनातर्फे  देण्यात येणाऱ्या सुविधा बद्दल  संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या. यावेळी वारक-यांना पुरविण्यात येणा-या गॅस, केरोसीनच्या उपलब्धतेबाबत तसेच वाटपाबाबत सूचना केल्या. पोलीस विभागाच्या अधिका-यांकडून या काळात करण्यात येणा-या वाहतुक नियोजनाचा आढावा घेतला. वारकऱ्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होवू नये याकडे सर्व प्रशासकीय विभागांनी लक्ष द्यावे, असेही ते म्हणाले.
00000





Monday, July 9, 2018

प्रबोधनाच्या माध्यमातून राज्यात स्वच्छता अभियान गतीमान करणार - बबनराव लोणीकर



पुणे दि. 9 : स्वच्छता ही जनसेवा आहे आणि जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे. प्रबोधनाच्या माध्यमातून निर्मलवारीचे महत्व राज्यभर पोहोचले असून याच माध्यमातून राज्यात स्वच्छता अभियान अधिक गतीमान करणार असल्याचे प्रतिपादन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज केले.
                येथील विधानभवन परिसरात ग्रामविकास  विभाग, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागयांच्यावतीने आयोजित स्वच्छता दिंडी व ग्रामसभा दिंडीचा शुभारंभ श्री. बबनराव लोणीकर यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते-पाटील, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, पाणी पुरवठा संचालक डॉ. सतीश उमरीकर, उपायुक्त (विकास) चंद्रकांत गुडेकर उपस्थित होते.
            श्री. बबनराव लोणीकर म्हणाले, पंढरपूरच्या वारीत राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी सहभागी होतात. या वारकऱ्यांना शासनाच्यावतीने सर्व सुविधा पुरविण्यात येतात. पंढरपूरच्या वारीत शेतकरी, कष्टकरी जनता सहभागी होत असते. वर्षभरात एक कोटीहून अधिक भाविक भेट देत असतात. पंढरपूर स्वच्छ राहण्याच्या दृष्टीने शासनाच्या माध्यमातून पंढरपूरमध्ये 25 हजार शौचालये उभारण्यात आली आहेत. गेल्या काही वर्षात प्रबोधनाच्या माध्यमातून पंढरपूरची वारी निर्मल झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
            श्री. विश्वासराव देवकाते-पाटील म्हणाले, पंढरपूरच्या वारीच्या कालावधीत पालखी मार्गावर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वारकऱ्यांना सर्व सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. पालखी मार्गावर मोठ्या वाहनांना जाता येत नाही, त्यासाठी पालखी मार्गावर टू व्हिलर आरोग्य सेवा सुरू करण्यात आली आहे.
            डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, स्वच्छता दिंडीत राज्यभरातील 17 जिल्ह्यांचे चित्ररथ सहभागी झाले आहेत. चंद्रभागेच्या स्वच्छतेसाठी “नमामि” चंद्रभागा अभियान शासनाच्यावतीने सुरू करण्यात आले आहे. चार टप्प्यात हे अभियान राबविण्यात येणार आहे.
            यावेळी ‍जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे भाषण झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्यभरातून आलेल्या निवडक कलापथकांचे सादरीकरण करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते स्वच्छता दिंडी व ग्रामसभा दिंडीत सहभागी झालेल्या चित्ररथांना हिरवा झेंडा दाखविण्यात आला.



Sunday, July 8, 2018

संत विचारांचा ठेवा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संत विचारांचा ठेवा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे दि. : महाराष्ट्राच्या समाजमनावर आजही संत विचारांचा मोठा पगडा आहे. संत परंपरेच्या विचारानेच कायम सामान्य माणसाला प्रेरीत केले. संत विचार हे काळसापेक्ष असून हा विचारांचा ठेवा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक काळात संत चरित्रांचे लेखन होण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
श्री गंधर्व वेद प्रकाशनच्या संतदर्शन चरित्र ग्रंथाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर संमितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, चैतन्य महाराज देगलूरकर, संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बिदुरा नवले, संत परंपरेचे अभ्यासक तथा ग्रंथाचे संपादक डॉ. सदानंद मोरे, आळंदी संस्थानचे विश्वस्त अभय टिळक, प्रकाशक दीपक खाडिलकर, प्रकाश खाडिलकर उपस्थित होते.
            यावेळी श्री. देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राला संत विचारांची मोठी परंपरा आहे. या संत विचाराने सामान्य माणसाला कायमच प्रेरणा दिली. महाराष्ट्रातील संक्रमण काळात हेच संत विचार समाजाच्या पाठिशी उभा राहिला. संत ज्ञानेश्वरांनी अखिल विश्वाच्या कल्याणाची परंपरा सुरू केली तर संत तुकारामांनी अध्यात्म आणि संसार यांची सुयोग्य सांगड घालून दिली.
संत विचार हे काळसापेक्ष आहेत. प्रत्येक काळात त्यांच्या विचारांना महत्व आहे. मात्र हे संत विचार पुढच्या पिढी पर्यंत पोहोचण्यासाठी काळानुसार संत चरित्रांचे लेखन होण्याची आवश्यकता आहे. संत दर्शन या संतांच्या चरित्र लेखनाने संतांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. हे संत विचार सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येणार असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.  
श्री गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले, प्रत्येक संतांच्या मागे मोठा इतिहास आहे. हा संतांचा  इतिहास आजच्या पिढीसमोर येण्याची आवश्यकता आहे. संतांच्या विचारावरच चांगला समाज घडू शकतो, त्यामुळे संतांच्या विचारांना सामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता आहे.
चैतन्य महाराज देगलूरकर म्हणाले, नामदेवराय यांनी आपल्या अभंगातून सर्व संतांचे चरित्र पहिल्यांदा मांडले. महाराष्ट्र ही संतभूमी आहे. सकल समाजाच्या उत्थानासाठी संतांचा जन्म झाला. बदणाऱ्या सामाजिक मनोविकासामुळे संत चरित्रांची वारंवार नव्याने मांडणी आवश्यक आहे. संतांचे विचार पुढे सुरू राहण्यासाठी संत चरित्रांची आवश्यकता आहे. तत्वज्ञान आणि आचरण यांचा सुयोग्य समन्वय संतांच्या जीवनात असल्याने त्यांची चरित्र कायमच उपयुक्त असतात. जीवनाला दिशा देण्यासाठी संत चरित्रांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.    
 डॉ. सदानंद मोरे म्हणाले, महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची समृध्द परंपरा आहे. संतांनी महाराष्ट्राची साहित्य संस्कृती टिकवली. महाराष्ट्राचा सामाजिक पोत सांभाळण्याचे काम संतांनी केले. संतांचे विचार लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी या संत चरित्राची निर्मिती करण्यात आली. वारकरी संप्रदायाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आस्था आहे. ती त्यांच्या कृतीतून वारंवार स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले.  
कार्यक्रमाच्या सुरूवातीला संत चरित्र ग्रंथांच्या सर्व लेखकांचा परिचय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्तीश: करून घेतला व त्यांच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक दीपक खाडिलकर यांनी केले.  सूत्रसंचलन दीपक खाडिलकर यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
*****




Wednesday, July 4, 2018

शासनाच्या महसूल वाढीवर भर द्या विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या सूचना


सोलापूर, दि. 4 :- राज्‍य शासनाच्या महसूल वाढीचे उद्दीष्ट्य पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे. त्यासाठी सर्व महसूल अधिकाऱ्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रमांचा वापर करावा, पुढाकार घेऊन काम करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी येथे केले.
डॉ. म्हैसेकर यांनी काल सोलापूर जिल्हा परिषद आणि सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा बैठका घेतल्या. या बैठकांत दोन्ही कार्यालयाच्या दफ्तर तपासणीत आढळलेल्या त्रुटींवर त्यांनी संबंधित खाते प्रमुखांकडून माहिती घेतली, सूचना केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत श्री. म्हैसेकर यांनी महसूल वाढीच्या उद्दीष्टावर भर देण्याचे आवाहन केले. विशेषत: गौण खनिजाच्या स्वामित्व हक्कापोटी मिळणारा महसुलात वाढ होणे अपेक्षित आहे. सोलापूर जिल्ह्यातील वाळू ठेक्याच्या लिलावातून महसुल वाढ झाला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
श्री. म्हैसेकर यांनी सातबारा संगणकीकरण, शर्तभंग प्रकरणे, संरक्षण मंत्रालयाला द्यावयाच्या जागा, महावितरण कंपनीला दिलेल्या जागा, कोतवाल आणि पोलीस पाटील भरती, आदी विषयांची माहिती घेतली.  याबाबत जिल्हा प्रशासनाने प्रभावी अंमलबजावणी करुन कामाला निपटारा करावा अशा सूचना त्यांनी केल्या. यावेळी डॉ. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, महसूल उपायुक्त प्रताप जाधव, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपजिल्हाधिकारी श्रीमंत पाटोळे, किशोर पवार, प्रमोद गायकवाड, शमा पवार-ढोक, रामचंद्र उगले, प्रवीण साळुंके, तहसिलदार उज्जवला सोरटे आदी उपस्थित होते.
डॉ. म्हैसेकर यांनी जिल्हा परिषदेत झालेल्या बैठकीत विकासाची कामे गतीने करा, ग्रामीण दवाखाने, शाळांच्या वर्ग खोल्यांचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करा, अशा सूचना दिल्या.

विभागीय आयुक्तांच्या हस्ते
पोलीस स्टेशन परिसरात वृक्षारोपण
डॉ. म्हैसेकर यांच्या हस्ते अक्कलकोट रोड एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.  यावेळी पोलीस आयुक्त महादेव तांबडे, जिल्हा धिकारी डॉ. राजेंद्र भोसले, उपायुक्त प्रताप थोरात, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपवनसरंक्षक संजय माळी, विभागीय वनाधिकारी सुवर्णा माने, पोलीस निरीक्षक रवी घोडके आदी उपस्थित होते.
*****

Tuesday, July 3, 2018

अफवांवर विश्वास ठेऊन कायदा हातात घेऊ नका - पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ



पुणे दि 3 : राज्यात मागील काही दिवसांपासून मुले पळविणाऱ्या टोळींच्या अफवेने भीतीचे वातावरण पसरविले जात आहे. यातूनच केवळ संशयावरून मारहाणींच्या घटना घडत आहेत. अफवांवर विश्वास न ठेवता संशय आल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस उपायुक्त (आर्थिक व सायबर) सुधीर हिरेमठ यांनी केले आहे.
            समाज माध्यमांवरून पडताळणी न करता चुकीच्या पोस्ट प्रसारित करणे, कोणतीही खातरजमा न करता अफवा पसरविणे, संदेश फॉरवर्ड करणे गुन्हा आहे. या गुन्ह्याबद्दल भारतीय दंड विधान कलम ५०५ अन्वये कडक शिक्षा होऊ शकते.
 राज्यभरात लहान मुलांना पळवून नेणारी टोळी आली असून ती लहान मुलांना पळवून नेत असल्याबाबतचे पोस्टर्स, व्हिडीओज समाजमाध्यमांद्वारे कोणतीही खातरजमा न करता व्हायरल केले जात आहेत. त्यातून एखाद्या व्यक्तीवर किंवा गटावर संशय घेऊन त्यांना मारहाण करण्याच्या घटना घडत आहेत. अशा घटना घडू नयेत आणि राज्यात शांततेचे आणि सलोख्याचे वातावरण रहावे यासाठी नागरिकांनी कुठल्याही व्यक्ती अथवा गटाबद्दल संशय आल्यास त्वरित संबंधित पोलीस स्टेशन, गावातील पोलीस पाटील, पोलीस मित्र, प्रतिष्ठीत नागरिक कायदा हातात न घेता पोलिसांशी संपर्क साधावा.
            आपल्या आवाहनात श्री हिरेमठ यांनी म्हटले आहे की, मुले पळविण्याच्या अफवा पसरविण्याने समाजातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आणणे सर्वांसाठीच धोकादायक आहे. जनतेने अशा अफवांना बळी न पडता सत्यता पडताळून पहावी. समाज माध्यमांच्या वेगवेगळ्या व्यासपीठावर येणाऱ्या माहितीची कोणतीही शहानिशा न करता निरपराध व्यक्तींना मारहाण करून मारून टाकण्याच्या घटना अतिशय गंभीर आहेत. नागरिकांनी कायदा घेऊन एखाद्याला इजा केल्यास शिक्षा होऊ शकते, असेही त्यांनी म्हटले आहे.
0000