Monday, August 8, 2016

नगरपंचायत निवडणुकीसाठी ३१ ऑगस्टपूर्वी मतदार यादीत नाव नोंदविण्यात यावे - विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम्


पुणे, दि. 8 (विमाका): पुणे विभागात येत्या डिसेंबरमध्ये ४१ नगर परिषद आणि १० नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांची पूर्वतयारी सुरु आहे. या निवडणुकीसाठी ज्यांच्या वयाची एक जानेवारी २०१६ रोजी १८ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवावेत. अन्यथा त्यांना मतदानाचा अधिकार बजावता येणार नाही, अशी माहिती विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम् यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
पुणे विभागातील पुणे जिल्ह्यामध्ये बारामती, लोणावळा, दौंड, तळेगाव, आळंदी, इंदापूर, जेजुरी, जुन्नर, सासवड आणि शिरूर या दहा, सातारा जिल्ह्यातील कराड, फलटण, वाई, रेहमतपूर, पाचगणी, महाबळेश्वर आणि म्हसवड या आठ, सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर, विटा, आष्टा आणि तासगाव या चार नगरपरिषदांच्या, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, पंढरपूर, मंगळवेढा, मैंदर्गी, सांगोला, करमाळा, दुधनी, अक्कलकोट आणि कुर्डूवाडी या नऊ परिषदांच्या तर कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी, जयसिंगपूर, कुरुंदवाड, वडगाव, मलकापूर, पन्हाळा, कागल, मुरगूड आणि गडहिंग्लज  या नऊ नगरपरिषदांची निवडणूक होत आहेत. या नगरपरिषदांपैकी २८ नगरपरिषदांच्या प्रभाग रचनेचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित नगरपरिषदांच्या प्रभाग रचनेचे काम सुरु असून तेही काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहितीही श्री. चोक्कलिंगम् यांनी यावेळी दिली.
या निवडणुकीसाठी ज्या मतदारांच्या मतदार नोंदणीबाबत अडचणी असतील, त्या सोडविण्यासाठी प्रशासनाने नगरपरिषदा, त्या-त्या नगरपालिकेतील वार्ड कार्यालये, महाविद्यालये, तहसील कार्यालये आदी ठिकाणी मतदारांच्या नावातील बदल किंवा त्यांच्या वार्डातील बदल, मतदार यादीत नाव नसेल तर ते नोंदविणे आदी कामे करण्यात येत आहेत. मतदारांनी येत्या ३१ ऑगस्ट पर्यंत आपल्या या अडचणी सोडविण्यासाठी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करून श्री. चोक्कलिंगम् म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांतर्फे नागरिकांना वीज, पाणी, आरोग्य,  रस्ते, गटार आदी नागरी सुविधा पुरविल्या जातात. या सुविधा योग्य प्रकारे मिळविण्यासाठी आपले योग्य प्रतिनिधी निवडता यावेत म्हणून आपले नाव त्या-त्या प्रभागातील मतदार यादीत असणे आवश्यक आहे. केवळ मतदान ओळखपत्र असल्यामुळे मतदानाचा अधिकार बजावता येणार नाही. आपण जेथे राहत असाल, तो पत्ता बदललेला असेल किंवा आपला वार्ड बदललेला असेल तर पुन्हा मतदार यादी तपासून आपणास हवे असलेल्या ठिकाणच्या मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करून घेणे आवश्यक आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपले नाव मतदार यादीत असेल तर त्या-त्या ठिकाणी मतदान करता येते. नगरपरिषद निवडणुकीमध्ये त्या वार्डाच्या मतदार यादीत आपले नाव असणे गरजेचे आहे. याबाबत मतदारांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असेही आवाहन त्यांनी केले आहे.
ज्या २८ नगरपरिषदांच्या प्रभाग रचनेचे काम पूर्ण झाले आहे त्यात पुणे जिल्ह्यातील सहा नगरपरिषदा, साताऱ्यातील चार, सांगलीतील तीन, सोलापूरमधील नऊ आणि कोल्हापूरमधील सात नगरपरिषदातील प्रभाग रचनेचे काम पूर्ण झाले आहे. या निवडणुकीकरिता नगरपरिषदा आणि नगरपंचायतींची सदस्य संख्या १६ मे २०१६ च्या शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. राज्य निवडणूक आयोगाने १५ जून २०१६ रोजी प्रसिद्ध केलेल्या प्रभाग रचना, आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमांचा त्या-त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांनी नगरपरिषदा व नगरपंचायतींचा प्रारूप प्रभाग रचनेस २९ जून २०१६ पर्यंत मान्यता देण्याची कार्यवाही पूर्ण केली आहे. या नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या प्रारूप प्रभाग रचनेवर रहिवाशांच्या दाखल झालेल्या हरकती व सूचना यावर जिल्हाधिकारी यांनी सुनावणी देऊन अभिप्रायासह आवाहन आणि प्रभाग रचनेचे प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी विभागीय आयुक्त कार्यालयास सादर केले आहे. यासर्व प्रस्तावांची छाळणी करून या प्रभाग रचनेस  १० ऑगस्ट २०१६ पर्यंत अंतिम मान्यता देण्याची कार्यवाही सुरु आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
या निवडणुकीसाठी मतदार यादी अद्यावतीकरणाकरिता विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मतदारांमध्ये मतदान नोंदणीसाठी जागृती करण्याच्या अनुषंगाने प्रभागनिहाय तसेच महाविद्यालयाच्या स्तरावर समन्वय अधिकारी नियुक्त करून अर्जस्वीकृती केंद्रं उघडण्यात आले आहेत. यासाठी विभागातील ४६ महाविद्यालयात अशी केंद्र सुरु करण्यात आली आहेत. या अर्जस्वीकृती केंद्रांमध्ये करण्यात येत असलेल्या कार्यवाहीबाबत विभागीय आयुक्त कार्यालयाने खातरजमा केली आहे. आणि त्यांच्या कामात अधिक सुधारणा करण्याच्या अनुषंगाने त्यांना सूचनाही केली आहे, असे सांगून आयुक्त श्री. चोक्कलिंगम् म्हणाले मतदार यादी अद्यावतीकरणाच्या प्रचार-प्रसिद्धीसाठी सोशल मिडियाचाही उपयोग करण्यात येत आहे. यात प्रामुख्याने एसएमएस, व्हॉटसअप, फेसबुक आणि ट्विटरचा उपयोग केला जात आहे. याशिवाय पथनाट्यही सादर केले जात आहेत. आकाशवाणी, केबलवाहिनी, चित्रपटगृहं या माध्यमांचा वापर केला जात असून जनजागृतीसाठी महाविद्यालयांबरोबरच गृहनिर्माण सोसायट्या, उद्योगसमूह याही ठिकाणी हे काम सुरु आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

****

No comments:

Post a Comment