पुणे, दि. 06 – मुळशी तालुक्यातील टेमघर धरणाच्या बाहय भागातील भिंतीतून पाणी गळतीच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज धरणाला भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यावेळी त्यांच्यासोबत होते.
धरणाच्या भिंतीतून होणाऱ्या पाणी गळतीमुळे धरणाच्या सुरक्षिततेला कोणताही धोका नसल्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितले. जलसंपदा विभागाने धरणाच्या भिंतीतून पाणी गळती होत असल्याची घटना गंभिरपणे घेतली आहे. ती बंद करण्यासाठी सुमारे 95 कोटी रुपयांचा खर्च येणार असून त्यासंबधीची निविदा प्रक्रिया अंतीम टप्प्यात असल्याची माहिती यावेळी जलसंपदा मंत्र्यांनी दिली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन गळती दुरुस्तीची कार्यवाही कालबध्द योजनेनुसार तातडीने हाती घेण्याचे निर्देश त्यांनी यावेळी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. धरणक्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे पाण्याची पातळी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दक्ष रहावे अशी सूचना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केली. भविष्यात अशाप्रकारे धरणाच्या भिंतीतून पाण्याची गळती होणार नाही याबद्दल दक्षता घेण्याचेही त्यांनी अधिकाऱ्यांना सूचित केले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी सौरभ राव, जलसंपदा सचिव शिवाजीराव उपासे, महाराष्ट्र कृष्णा खेारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक रा.भ.धोटे, मुख्य अभियंता व्ही.एम.कुलकर्णी, मुख्य अभियंता ईश्वर चौधरी, मुख्य अभियंता र.वा.पानसे आदि अधिकारी उपस्थित होते.
000
No comments:
Post a Comment