Friday, August 5, 2016

पुरामुळे वाया जाणारे पाणी कालव्यातून दुष्काळी भागात त्वरित सोडा पालकमंत्री विजय शिवतारे यांचे आदेश


सातारा दि.5 (जि.मा.का): जिल्हयामध्ये चांगला पाऊस झाल्याने धरणांमध्ये मोठा पाणीसाठा झाला आहे. भरलेल्या धरणांमधून  पुरामुळे नदीमधून पाणी वाया जाण्यापेक्षा ते कालव्यातून दुष्काळी भागात त्वरित सोडा, असे आदेश पालकमंत्री विजय शिवतारे यांनी आज सातारा जलसंपदा विभागाला दिले.
जिल्हयातील धरणांमधून होणारा पाण्याचा विसर्ग हा नदीपात्रातून वाया जाण्यापेक्षा तो कालव्याव्दारे सोडल्यास दुष्काळी भागातील शेतीसाठी  तसेच पिण्याच्या पाण्यासाठी त्याचा उपयोग होईल. तलाव भरण्यासही मदत होईल. त्याचबरोबर भूगर्भातील पाणी पातळी  वाढण्यास मदत होऊ शकेल. धोम-बलकवडी धरणांमधून खंडाळा आणि फलटण तसेच धोम डाव्या कालव्याव्दारे  कोरेगाव आणि रहिमतपूर  या भागांना त्याचा निश्चितपणे फायदा होईल. तसेच कण्हेर आणि उरमोडीमधून आरफळ कालव्याव्दारे कराड आणि खटावला पाणी मिळेल.
 त्याचबरोबर पुराची तीव्रताही काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे, असे सांगून पालकमंत्री श्री.शिवतारे यांनी भरलेल्या धरणांमधून पुरामुळे नदीतून पाणी वाया जाण्यापेक्षा ते कालव्याव्दारे दुष्काळी भागात त्वरित सोडा, असे आदेश सातारा जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता विजय घोगरे यांना आज दिले.

                                                                                                00000

No comments:

Post a Comment